'पयोद', पयोद म्हणजे पाणी घेऊन आलेला एक ढग. कदाचीत शहरी माणसाला या शब्दाशी एवढं जुळता येणार नाही पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी पयोद म्हणजे आयुष्यच असते जणू. सध्या उन्हाची काहिली वाढलीय. त्यामुळे पाण्याचं मूल्य आपल्या प्रत्येकाला जाणवत असेलच. त्या पयोदवर त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल, त्याच्या मुलांचं शिक्षण, आईवडलांच्या आजारावर उपचार, सणासुदीचा खर्च सारं काही अवलंबून असतं. हाच पयोद शब्द त्याने आपली नवीन कंपनी सुरु करताना निवडला आणि आठ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक महिलांच्या घरी हा पयोद सुख-समृद्धी आणि विकासाच्या रुपाने बरसत आहे. हा पयोद बरसविणारे आहेत पयोद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष देवानंद लोंढे.
कवठे महांकाळ या सांगलीतल्या एका खेडेगावात देवानंदचा जन्म झाला. कवठे महांकाळ तसा दुष्काळी भाग. त्यामुळे शेती पेक्षा शेतमजूरी करणे हा तेथील प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय. देवानंदचे आई वडील देखील शेतमजूरीचे काम करीत असत. देवानंदने स्वत: शेतात राबून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूर विद्यापीठातून तो सिव्हील इंजिनियर झाला. पाणी आणि पाणी व्यवस्थापन हे त्याचे स्पेशलायझेशनचे विषय होते. याच विषयाच्या अनुषंगाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार बनला. त्याला युनिसेफ बरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली. ८० देशांमध्ये कामानिमित्ताने संचार करता आला. पण नोकरी किती दिवस करायची हा प्रश्न त्याने स्वत:लाच विचारला. लहानपणापासून त्याने आपल्या आई बाबांना शेतात राबताना पाहिले होते. जर ही गुलामगिरी झुगारायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे मनाशी पक्कं झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी सोडून दयानंद लोंढेंनी व्यवसायात उडी घेतली.
मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी व्यवसाय कोणता करावा याचे काही ठोकताळे मनाशी त्यांनी मांडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरातून आल्याने आंतरराष्ट्रीय चलनातच व्यापार करायचा हे मनाशी पक्कं होतं. असं उत्पादन असावं जे भारतात खूप कमी उद्योजक तयार करत असतील आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे या उत्पादनातून सामाजिक संदेश गेला पाहिजे. हे सर्व विचारचक्र आणि संशोधन दोन वर्षे चालू होते. संशोधनातून एक उत्पादन समोर आले ते म्हणजे हातमोजे तयार करणे. एकतर भारतात हातमोजे तयार करणारे खूपच कमी उद्योजक आहेत. हातमोजे तयार करुन ते निर्यात करायचे त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय चलन मिळणार होतं. आणि हातमोजे घालून सुरक्षितता बाळगा हा संदेश आपसूकच समाजात जाणारा होता. त्यामुळे हाच व्यवसाय करण्याचा निर्णय झाला.
पण खरी परिक्षा तर पुढेच होती. उद्योग करण्यासाठी भांडवल लागतं. हे भांडवल बॅंका देतात. भांडवल मिळावे यासाठी देवानंद यांनी वित्तीय संस्थांना प्रकल्प सादर केले. आणि वित्तीय संस्थांनी कर्ज नाकारलं. कर्ज नाकारण्याचं कारण होतं दलित समाजातील एक तरुण, उद्योग पण उभारु शकतो यावर नसलेला विश्वास. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नोकरी, मानमरातब, उच्च शिक्षण सामाजिक व्यवस्थेने तयार केलेल्या दलित या घटकासमोर निष्प्रभ झाले होते. अजूनही जात व्यवस्था आपल्या भारतीय मानसिकतेत कशी दबा भरुन बसली आहे याचं हे मूर्तीमंत्त उदाहरण आहे. मात्र जर व्यवस्था आपल्या नाकारत असेल तर आपण आपली व्यवस्था प्रस्थापित करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या जगाला दिलेलं बाळकडू दयानंद लोंढेंनी वापरलं आणि स्वत:च उद्योगासाठी लागणारा पैसा उभारला. यासाठी आपलं राहतं घर, जमीन, बायकोचे दागिने त्यांना गहाण ठेवावं लागलं. आणि त्यातून उभी राहिली पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि.
आज पयोद कडे ८५० हून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. जपान आणि काही युरोपियन देशांत पयोदचे हातमोजे निर्यात होतात. ओबेरॉय, ऑर्किड, ताज ही भारतातील पंचतारांकित हॉटेल्स, वाहने तयार करणाऱ्या कंपन्या हे पयोदचे भारतातील प्रमुख ग्राहक आहेत. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी पयोद जपते. हातमोजे सारखी वस्तू निर्जंतूक आणि स्वच्छ असावी यासाठी धूळ आणि धूर नसलेल्या ठिकाणीच पयोद हातमोजे तयार करायला देते. पण ग्रामीण भागात हे दोन्ही घटक अविभाज्य आहेत. जर कोणती महिला पयोदकडे रोजगारासाठी आली तर मशीन देताना पयोद दोन गोष्टी करते. धूराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पयोद संबंधित महिलेला गॅस कनेक्शन मिळवून देते आणि धूळ टाळण्यासाठी तिला फरशी टाकण्यासाठी संबंधित कंपनीशी भेट घालून देते वा कार्पेट मिळवून देते. हे सगळं करण्यासाठी जर कोणाकडे पैसे नसतील तर पयोद कच्चं कर्ज देखील देते ते देखील नाममात्र मासिक हफ्ता घेऊन. ग्रामीण भागामध्ये आजदेखील न्हाणीघर बाहेर असतं ते देखील व्यवस्थित झाकलेलं नसतं. परिणामी लज्जास्तव पहाटेच्या अंधारात कित्येक महिला स्नानादी आटोपून घेतात. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये शौचालयासोबत न्हाणीघर देखील व्यवस्थित असावं यासाठी पयोद मदत करते.
त्याचबरोबर २५ गावांत पसरलेला पयोदचा पसारा पाहण्यासाठी दूर दूरचे लोक येतात. त्यांना पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी न ठेवता पयोद दोन मुलांना मार्गदर्शन करण्याचा रोजगार देणार आहे. यातून उद्योजकीय सहल ही संकल्पना पयोद राबविणार आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत ते कच्चा माल देखील हिंगणगावातच तयार करणार आहेत. नद्या स्वच्छ करण्याचा प्रकल्प टाटा समूह राबवत आहे. महाराष्ट्रात पयोद या प्रकल्पात टाटाचे सहाय्यक आहेत. तरुणांना रोजगार आणि लोकांना प्यायला स्वच्छ पाणी देणे हाच यामागे हेतू आहे.
एकेकाळी देवानंद लोंढेंना वित्तीय संस्था कर्ज द्यायला नकार देत होती. आज व्हेंचर कॅपिटल कंपनी पयोदमध्ये ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार आहे. स्वत:च्या हिंमतीवर लढा देत चाळीशीच्या आतच या तरुणाचा व्यवसाय वर्षाला ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल करतो. निव्वळ दलित असल्यामुळे व्यवस्थेने नाकारलेल्या या तरुणाने स्वत:चीच व्यवस्था तयार केली. असे अनेक देवानंद लोंढे उद्योजक म्हणून उभे राहून समृद्धीचे पयोद महाराष्ट्रावर बरसावेत ही सदीच्छा.
- लक्ष्यवेधी प्रमोद सावंत
www.yuktimedia.com
- लक्ष्यवेधी प्रमोद सावंत
www.yuktimedia.com