बोस कंपनी ऑडिओ क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड आहे. मागील ०५ दशकांहून अधिक काळापासून ध्वनीविज्ञानातील गहन संशोधनावर आधारित स्पीकर, हेडफोन आणि ऑडिओ उपकरणांची निर्मिती करत आहे. १९६० च्या दशकात कंपनीने अत्याधुनिक पद्धतीने स्पीकर्स ची निर्मिती करण्यास सुरवात केली. जगातील पहिल्या व्यावसायिक Noise Cancellation Headphones आणि कार्स साठीच्या ऑडिओ सीस्टीम्स ची निर्मिती केली. आज बोस निर्मित हेडफोन्स अंतराळवीर व प्रोफेशनल पायलट्स द्वारे वापरले जातात. बोस कार ऑडिओ सिस्टिम Maserati आणि Maybach सारख्या लक्झरी कार ब्रॅण्डमध्ये वापरले जातात.
बोस चे संस्थापक अमर बोस हे ऑडिओ निर्मिती क्षेत्रात येण्या आधी १९५० च्या दशकात MIT संस्थेत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे U.S. नौदल आणि NASA सारख्या शासकीय संस्थासाठीही licensing power conversion and amplification technology मध्ये काम केले. लहानपणापासूनच अमर यांना ऑडिओ व इलेक्ट्रॉनिक विषयांबद्दल कुतुहूल होते. वयाच्या १० व्या वर्षी स्काऊट च्या कॅम्प ला गेले असताना मित्रांपैकी कोणीतरी आणलेल्या खेळण्यातील रेडिओ कम्युनिकेशन किट ने त्यांचे लक्ष वेधले. रेडिओ लहरींद्वारे होणाऱ्या संवादाने त्यांचे कुतुहूल जागृत झाले. पुढे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना रेडिओ दुरुस्त करण्याचा छंद जडला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांच्या शिपिंग व्यवसायावर आलेल्या बंदीमुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी घराच्या तळघरात रेडिओ छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले.
पुढे परिस्थिती फारशी चांगली नसतानाही वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी MIT संस्थेतून PhD पूर्ण केली. या आनंदात त्यांनी स्वतःला एक छानसा High End ऑडिओ सिस्टिम भेट म्हणून घ्यायचे ठरविले. हा ऑडिओ सिस्टिम घेताना एखाद्या तरुण अभियंत्याप्रमाणे त्यांनी बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध ऑडिओ सिस्टिम्स चे विश्लेषण केले, आणि त्यातील विशेष वैशिष्ट्यांचा अभ्यास करून सर्वोत्तम अशा ऑडिओ स्पीकर ची निवड केली.घरी आणल्यावर मात्र त्या ऑडिओ स्पीकर चा परफॉर्मन्स त्यांच्या मनासारखा नव्हता. साधारण अमेरिकन ज्याप्रमाणे आपल्या लहान मुलांना व्हायोलिन शिकवतात त्याचप्रमाणे अमर यांच्या पालकांनी त्यांना व्हायोलिन चे प्रशिक्षण दिले होते, त्यामुळे वादनात गती नसली तरी त्यांना संगीताचा कान होता. त्यामुळे तो ऑडिओ स्पीकर कसा सुरेल वाजणे अपेक्षित होते हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळे त्या महागड्या ऑडिओ सिस्टिम ची काळजीपूर्वक निवड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली. याच घटनेने बोस कॉर्पोरेशन ची मुहूर्तमेढ रोवली.
त्यामुळे त्यांनी आपल्या फावल्या वेळेत ध्वनीशास्त्र या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात केली.
दिवसा ते आपल्या सहकाऱ्यांसोबत शासकीय कामे करत व रात्री संशोधन करत असत. प्रयोगासाठी त्यांनी बर्कशायरमधील टेंग्लवुड म्युझिक सेंटरमध्ये ग्रिनेमध्ये बोस्टन सिम्फनीचे रेकॉर्डिंग देखील केले. चाचणी साठी हेडफोन्स मानवी पुतळ्यांच्या कानाला लावून कॉन्सर्ट हॉल मध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात येत. या प्रयोगाचा उद्देश एका व्यक्तीकडे थेट संगीत कशा आवाजात येईल हे रेकॉर्ड करणे होते.त्यांनी पहिले निर्माण केलेले उत्पादन 2201 हे अगदीच अपयशी ठरले. त्याचा आकार इंग्रजी 8 सारखा होता, जेणेकरून ते घराच्या खोलीतील कोपऱ्यात हि राहू शकत होते. हे स्पीकर्स तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट होते. त्याचा आवाज अतिशय उत्तम दर्जाचा होता परंतु याचे डिझाईन ही एक व्यावसायिक व्यथा होती. ज्यांच्या घरात दोन उत्तम कोपरे आहेत अशा लोकांची संख्या कमी असल्याने हे उत्पादन गडबडले. किंमत जास्त असल्याने इतर स्पर्धकांशी स्पर्धा करणे कठीण झाले. मार्केटिंग सल्लागाराच्या निर्देशानुसार पहिल्या वर्षी 2201 स्पिकर्स ची २ मिलियन डॉलर ची विक्री अपेक्षित होती परंतु प्रत्यक्षात फक्त ३० संचाची विक्री झाली. हे अपयश फार मोठे होते. परंतु तरीही कंपनी अतिशय उच्च दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करत होती. त्यानंतर त्यांनी 901 हे उत्पादन बाजारात आणले. यामध्ये आधीच्या 2201 मधील वैशिष्ट्ये होतीच परंतु मूलभूत फरक होता तो म्हणजे ध्वनी चे परावर्तन थेट श्रोत्यांवर न होता, भिंतीवर होत होते. त्यावेळेच्या इतर सुप्रसिद्ध व प्रतिष्ठित लाउडस्पीकरांमध्ये केवळ फॉरवर्ड-फायरिंग ट्रान्सड्यूसर होते, परंतु 901 मॉडेल मध्ये ८ बॅक व १ फॉरवर्ड-फायरिंग ट्रान्सड्यूसर होते. त्यानंतर त्यांनी १९६० च्या दशकात ग्राहकांसाठी एक आगळेवेगळे उत्पादन निर्माण केले ते म्हणजे एक लहान कॉम्पुटर 1001 आणि त्याला 901 स्पिकर्स ला जोडण्यात आले. या मॉडेलला १००० डॉलर पेक्षा कमी किंमतीत विकण्यास त्यांनी वितरकांना मनाई केली. अमर बोस यांनी स्वतः काही हायएंड ऑडिओ मासिकांच्या पत्रकारांना याचे प्रात्यक्षिक सादर केले. याने प्रभावित होऊन तीन पत्रकारांनी चांगल्या प्रकारे केलेल्या समीक्षे मुळे या मॉडेलची विक्री वाढण्यास मदत झाली.
बोस यांनी कंपनीचे स्वरूप कायम प्रायव्हेट ठेवले. यामुळे त्यांना झालेल्या नफ्याची गुंतवणूक संशोधनावर खर्च करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. यामुळे आपल्या क्षेत्रातील बऱ्याच उत्पादनांवर प्रथम अशी मोहोर उमटवता आली. बोस निर्मित पहिल्या Noise Cancellation Headphones साठी एक दशकांहून अधिक काळ व ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले. पण यामुळेच श्रोत्यांसाठी पहिल्यावहिल्या Noise Cancellation Headphones ची निर्मिती झाली. आता याचा वापर हवाई वाहतूक व अंतराळ क्षेत्रात केला जातो.
याचप्रमाणे कंपनीने कार ऑडिओ क्षेत्रातील प्रथम ऑडिओ सिस्टीम ची निर्मिती केली. १९८३ मध्ये कॅडिलॅक कार्स मध्ये याचा वापर करण्यात आला. आज अनेक ऑटो ब्रँड्स या ऑडिओ सिस्टीम चा वापर करतात. सर्वात नवीन कॅडिलॅक सीटी 6 मॉडेलसाठी बनविलेल्या साउंड सिस्टममध्ये 34 स्पीकर आहेत.
अमर बोस नेहमी म्हणत जर ते एखाद्या पब्लिक कंपनीचे CEO असते तर त्यांना किमान १०० वेळा तरी पदावरून दूर केले गेले असते. कारण कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक संस्था संशोधनावर गुंतवणूक करण्यास फारश्या अनुकूल नसतात. अमर बोस हे या अगदी उलट होते.
ते एकदा म्हणाले होते कि, जर मी असे म्हणालो तर, चांगल्या गोष्टी भीती निर्माण करतात, कॉर्पोरेट जगतात सुद्धा लोक चांगल्या बदलांना घाबरतात. तुम्हांला हे हास्यास्पद वाटेल, सगळ्यानांच आणखी चांगले हवे असते. पण आणखी चांगले म्हणजे प्रत्येकवेळी काहीतरी वेगळेच हवे असते आणि जर ते आधी सारखेच असेल तर ते निश्चितच नाविन्यपूर्ण व चांगले नाही असे मानले जाते. हा बदल लोकांमध्ये भीती निर्माण करतो. हा एक प्रकारचा जुगार आहे जिथे तुम्हांला धैर्य लागते.
सौजन्य - CNBC