पोलिसांचा ‘जीवनरंग’ बदलतोय!
प्राजक्ता कदम
प्राजक्ता कदम
शनिवार, २८ मार्च २००९
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पोलिसांच्या समस्या आणि त्यांचे आयुष्य सर्वासमोर आले आणि अनेक संस्थां त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरसावल्या. आजघडीला अनेक जण आपापल्या परीने त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ‘जीवनरंग’ ही स्वयंसेवी संस्था त्यात उजवी ठरली आहे. दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या या संस्थेतर्फे १० दिवसांची कार्यशाळा घेण्यात येत असून त्यात पोलिसांना त्यांची जीवनशैली बदलण्याबरोबरच कुटुंब, नातेवाईक आणि इतर समाजाशी कसे ऋणानुबंध जुळवावेत, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सकारात्मक दृष्टीकोनासाठी काय करावे आणि विशेष म्हणजे तुटपुंज्या पगारातूनही विविध प्रकारे गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित कसे करता येईल, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याद्वारे पोलिसांच्या आयुष्याची पुनर्बाधणी करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
नागपाडा येथील कार्यालयात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिसांच्या आयुष्याच्या आणि जीवनमानाच्या पुनर्बाधणीची कार्यशाळा घेण्यात येते. दक्षिण विभागात एकूण १७ पोलीस ठाण्यांचा समावेश असून प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि दोन हवालदार दररोज या कार्यशाळेत सहभागी होतात. डॉ. व्यंकटेशन यांनी तसा आदेशच प्रत्येक पोलीस ठाण्याला दिला आहे.
२६/११ नंतर पोलिसांच्या समस्या प्रकर्षांने समाजापुढे पुढे आल्या. त्यानंतर त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षणासोबतच आरोग्य, मानिसक, स्नेहसंबंध आणि गुंतवणुकविषयीही मार्गदर्शन देण्याची गरज असल्याचे हेरून अतुल राजोळी, स्नेहल गोविलकर, संजय गोविलकर, अरूण सिंग, मिलिंद बने आणि विनोद मिस्त्री या ‘जीवनरंग’च्या चमुने डॉ. व्यंकटेशन यांच्याकडे ‘पोलिसांच्या आयुष्याच्या पुनर्बाधणी’चा प्रस्ताव सादर केला. डॉ. व्यंकटेशन यांनीही वेळ न दवडता त्याला हिरवा कंदील दाखवून कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही १० दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत अतुल राजोळी, स्नेहल गोविलकर, संजय गोविलकर, अरूण सिंग, मिलिंद बने आणि विनोद मिस्त्री यांची पाच सत्रे होतात. ‘जीवनरंग’चा प्रत्येक सदस्य हा त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून केवळ सामाजिक बांधिलकीतून ते ही कार्यशाळा घेत आहेत व त्यासाठी एकही पैसा ते त्यांच्याकडून घेत नाहीत.
कार्यशाळेतील पहिले सत्र हे अुतल राजोळी यांचे असते. ‘माईंड ट्रेनर’ असलेले राजोळी या सत्रात जीवनाशी संबंधित छोटय़ा आणि रोचक कथा सांगून ‘प्रो-अॅक्टिव्हीट’बद्दल म्हणजेच स्वत:च्या आयुष्याची, वागणुकीची आणि भावनांची जबाबदारी ही त्यांची स्वत:ची जबाबदारी असल्याबद्दल मार्गदर्शन करतात. तसेच त्यांच्या आवाक्यात असलेल्या गोष्टींना प्राधान्य देऊन स्वत:चे आयुष्य सुखी करण्याचा मंत्रही देतात. आहारतज्ज्ञ असलेल्या स्नेहल गोविलकर या कार्यशाळेत सहभागी झालेल्या पोलिसांना आहाराचे आणि त्यांच्या शरीराचे महत्त्व समजावून सांगतात. याशिवाय आहाराचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्गनही करतात. स्वत: पोलीस सेवेत असलेले संजय गोविलकर पोलिसांना शरीराच्या ‘बायोलॉजिक वॉच’ची माहिती देऊन अनियमित डय़ुटी करतानाही निसर्गाने बनविलेले हे ‘बायोलॉजिकल वॉच’ कसे सुरू ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करतात. पोलीस म्हणजे उद्धट, बोलण्याची शिस्त नाही असे सर्वसामान्यांचे मत असते. नेमका हाच धागा पकडून विनोद मिस्त्री या कार्यशाळेत पोलिसांना त्यांच्याबद्दल समाजमनात-कुटुंबात असलेली त्यांची प्रतिमा ‘मानवी स्नेहसंबंधा’च्या माध्यमातून बदलण्याचा गुरुमंत्र देत आहेत. या कार्यशाळेतील सगळ्यात आवडते आणि महत्त्वाचे सत्र असते ते अरुण सिंह यांचे. अरुण सिंह हे पोलिसांना सुरक्षित, मध्यम सुरक्षित ते असुरिक्षत गुंतवणुकीबाबतचे धडे देत आहेत. तुटपुंज्या वेतनातून भविष्य कसे सुरक्षित करावे याबाबतचा सल्ला आजपर्यंत पोलिसांना कुणीच दिलेला नाही. त्यामुळेच अरुण सिंह यांच्या या सत्राला पोलिसांकडून अधिक पसंती मिळत आहे.
पोलिसांसाठीचे हे मार्गदर्शन केवळ एका दिवसाच्या कार्यशाळेपुरते मर्यादित राहू नये यासाठी ‘जीवनरंग’तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच दिवसभर कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर काही तरी नवे गवसल्याचा आनंद दिसू लागला आहे.
No comments:
Post a Comment