सौजन्य : सकाळ
दिनांकः २६ सप्टेंबर २०१०
"उद्योजकाच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेशाची रूपे हवीत"
रवींद्र प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन; लक्ष्यसिध्दी पुरस्कारांचे वितरण
"उद्योजकाच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रुपे असली पाहीजेत. तरच यशस्वी होता येतं. सतत नवनवीन उत्पादनांची निर्मिती करणं - वाढवलेला उद्योग सुयोग्यरीत्या सांभाळणं, वाढवणं आणि उद्योग विकासाला बाधक ठरणार्या प्रतिस्पर्ध्यांना नेस्तनाबूत करणं अशा तिन्ही आघाडयांवर उद्योजकाला कार्यरत राहावं लागतं," असं प्रतिपादन 'पितांबरी' उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलं.
'बॉर्न टू विन' या नेतृत्वगुणविकास करणार्या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 'लक्ष्यवेध' प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि या शिबिरातील यशस्वी प्रशिक्षणार्थींना 'लक्ष्यसिध्दी' पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातल्या प्रा. बी. एन. वैद्य सभागृहात नुकताच पार पडला. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं. या वेळी प्रभुदेसाई यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना हा यशाचा कानमंत्र दिला.
पितांबरीच्या उद्योग वाटचालीतले अनेक पैलू या वेळी त्यांनी 'बॉर्न टू विन'चे अतुल राजोळी यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडले. "उद्योजकाने उद्योग वाढवताना आपल्या हाताखालच्या सहकार्यांमध्येही नेतृत्वगुण विकसित केले पहिजेत. नवीन उदयोन्मुख उद्योजकांना उद्योगविस्ताराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याबरोबरच समाज, राष्ट्र, देश आणि धर्म या सर्वांच्या संवर्धनात आपला महत्त्वपूर्ण सहभाग दिला पाहिजे." अशा शब्दात प्रभुदेसाई यांनी उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये उपस्थितांसमोर मांडली.
बॉर्न टू विन संस्थेविषयी बोलताना प्रभुदेसाई म्हणाले, 'जन्माला येणार्या प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात विजयी झालं पाहिजे हाच संदेश आपल्या नावातून 'बॉर्न टू विन' या संस्थेनं दिला आहे. बर्याचदा प्रत्येक व्यक्ती ही सहजसाध्य यशाचं लक्ष्य समोर ठेवून वाटचाल करत असते. परंतु विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींना, त्यांच्यातल्या क्षमता, गुणवत्ता यांचा विकास करत सहजसाध्य यशाच्या पुढे जाऊन कष्टसाध्य यश मिळवण्याकरिता सुयोग्य मार्गदर्शन करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम अतुल राजोळी त्यांच्या संस्थेमार्फत करत आहेत.'
'लक्ष्यसिध्दी' या १० आठवडयांच्या प्रशिक्षण शिबिरात ३०० टक्क्यांचं उद्दिष्ट ठेवलं जातं आणि ते साध्य करण्याकरिता आवश्यक त्या सर्व क्षमंताचा विकास घडवून आणला जातो. अशा प्रकारचं लक्ष्य साध्य करणार्या २६ व्यक्तींना 'लक्ष्यसिध्दी' पुरस्कारानं यंदा सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतून आलेल्या प्रशिक्षणार्थींनी आणि उदयोन्मुख उद्योजकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.
'बॉर्न टू विन' प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या लक्ष्यसिध्दी शिबिरात 'पितांबरी' उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
दिनांकः २६ सप्टेंबर २०१०
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे:
अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना
पितांबरीचे एम्.डी. श्री. रवींद्र प्रभुदेसाई
लक्ष्यसिध्दी पुरस्कार वितरण समारंभ: श्री. तानसिंग लामा श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या ह्स्ते पुरस्कार स्विकारताना
कार्यक्रमाचे व्यासपीठ
उपस्थित प्रेक्षकवर्ग