महाराष्ट्र टाइम्स - १ ऑगस्ट २०१२
- मेधा ताडपत्रीकरआपलं ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा ज्यांना आहे , असे लोक स्वप्नांनी भारलेले असतात. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. आलेल्या संकटातून तुम्ही कशीही वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.
जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर म्हणून नाव कमावत असतानाच हॉलिवुडमध्ये स्टारपदही कसं मिळवलं, या प्रश्नाचं उत्तर देताना हॉलिवुडस्टार अर्नाल्ड श्वार्झ्नेगर म्हणाला की, 'या यशाचं कारण आहे ध्येय गाठायचा ध्यास. सगळ्या यशाची सुरुवात ही एखाद्या कल्पनेतून जन्म घेते ; पण त्या कल्पनेला जोडा तीव्र इच्छा आणि आपली कल्पना अमलात आणायचा ध्यास - अबर्निंग डिझायर.'
तुमच्यासमोर जी ध्येयं आहेत, त्यांचा जरा विचार करा. ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे वचनबद्ध आहात? कोणत्या परिस्थितीत तुम्ही त्यांचा नाद सोडून द्याल? तुम्हाला ध्येय कोणत्याही परिस्थितीत गाठायचं असेल तर तुमची खात्री असते की, आपण तो ध्यास मध्येच सोडून देणार नाही. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. तुम्ही आलेल्या संकटातून वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.
आपल्या सर्वांना आयुष्यात अनेक गोष्टी हव्या असतात. अनेक गोष्टींची गरजही असते; पण इच्छा आणि ध्यास यात फरक आहे. तुम्हाला खूप पैसे कमावण्याची इच्छा असेल; पण ते पैसे कशासाठी मिळवायचे आहेत? जास्त वेळ ,समाजात नाव, ऐषोराम असं काही असेल. म्हणजे पैसे कमावणं हे इतर गोष्टी मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कशासाठी काय हवं आहे हे एकदा समजलं की त्यावर लक्ष केंद्रित करून यश मिळवणं सोपं जातं.
आपले ध्येय गाठण्याची ज्यांना तीव्र इच्छा आहे असे लोक आपल्या स्वप्नांनी भारलेले असतात. पण हे काहीजणांपुरतंच मर्यादित आहे का? तर, नाही. थोड्याशा प्रयत्नांनी, मानसिकता बदलून यशाचा ध्यास घेणं कुणालाही शक्य आहे. कारण मग त्यांच्यासाठी यश हे सूर्योदयाइतकंच हमखास असतं. ध्येयाच्या ध्यासाने भारून जाण्यासाठी आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात करायला हवी.
योग्य ध्येय निवडा
तुम्ही जर चुकीच्या ध्येयाकडे डोळे लावून बसलात तर ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणं शक्य नाही. आपलं ध्येय योग्य आहे का हे पाहण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारा.
पैसे न मिळण्याची शक्यता असेल तरीही आपलं ध्येय तेच राहिल का ?
ज्यासाठी कष्ट करता आहात , ते तुमच्या आयुष्यात अगोदरच आहे का ?
समजा उद्या कोणी तुम्हाला दहा कोटी रुपये दिले , तरीही तुम्ही ध्येयाकडेच जाणार का ?
बहुतेकांची विकेट शेवटच्या प्रश्नात उडते. कारण पैसा कमावणं हेच अनेकांचं ध्येय असतं. पण पैसा सुख देत नाही ,तर ते कमावण्याकरीता करावे लागणारे कष्ट आनंद देऊ शकतात. तेव्हा वरीलपैकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल , तर तुमच्या ध्येयाबाबत परत विचार करा.
स्वत:वर विश्वास ठेवा
वारीमध्ये म्हातारे-कोतारे , अपंग वारकरी होते ; पण ते केवळ विठ्ठलाच्या ध्यासापोटी चालत होते आणि मनात आत्मविश्वास होता की , ते पंढरपूर गाठणारच. अनेकांना त्यांच्या ध्येयाबद्दल विचारलं असता , ' त्यानंतर आपलं आयुष्य किती मस्त होईल आणि त्यासाठी अमुक एक ध्येय महत्त्वाचं आहे ', असं उत्तर येतं ; साध्या वारकऱ्यांची जर ही कथा असेल तर , मग आपल्यापैकी अनेकजण प्रत्यक्षात का काही करत नाहीत ? याचं कारण आहे , त्यांना आपण अमुक ती गोष्ट करू शकू , असा विश्वास नसतो.
परतीचे मार्ग बंद करा
जर तुमचं ध्येय तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं असेल तर परतीचे मार्ग बंद करून टाका. उदाहरणार्थ , तुम्हाला स्वत:चा व्यवसाय करायचा असेल , तर नोकरीच्या राजीनाम्याचं पत्र लिहून ते एका पाकिटात बंद करून मित्राकडे द्या आणि त्याला सांगा की , तुम्ही ठराविक तारखेपर्यंत नोकरीचा राजीनामा दिला नाही , तर ते पत्र बॉसकडे नेऊन दे. याचं कारण देताना ' आर्ट ऑफ वॉर ' या पुस्तकात सून त्झू असं म्हणतो की , ज्या तरुणांना यशाची खात्री नसते तेच जिवावर उदार होऊन लढतात. कारण जिव सांभाळूनही पराक्रम गाजवू आणि विजयी होऊ हा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.
No comments:
Post a Comment