सेल्फ अवेअरनेस
मेधा ताडपत्रीकर, महाराष्ट्र टाईम्स ३० जुलै २०११
मी नेमका काय आहे हे
जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:मधील चांगले वाईट गुण समजून घेत, स्वत:मध्ये सुधारणा
घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:मधील चांगले काय आणि वाईट काय हे डोळसपणे समजून
घेत जाणारेच आयुष्यात यशस्वी होतात.
आपल्या बिझी
श्येड्युलमध्ये स्वत:बद्दल विचार करायला वेळ मिळत नाही आपण कोण आहोत, आपल्या आवडी-निवडी काय
आहेत, आपल्या व्हॅल्यु
काय आहेत, आपली जगण्याची
परिसीमा काय आहे? आपल्या सवयी आणि स्वयंप्रेरणा काय आहे? याचा विचार करण्यात आपण किती वेळ घालवतो हा संशोधनाचा विषय
आहे. आणि स्वत:च्या वागण्याचा विचार करण्यात वेळ घालवणारे खूपच कमी. त्यातूनही
स्वत:विषयी मिळणारा फीडबॅक जर आपल्या मनासारखा किंवा चांगला नसेल तर त्याकडे
दुर्लक्ष करण्याकडेच कल असतो.
मात्र स्वत:चे चांगले आणि वाईट गुण समजून जगाला
सामोरे जाणारे आयुष्यात यशस्वी होतातच. प्रत्येकाला कॉन्फिडन्स आणि स्वाभिमान
मिळवण्यासाठी स्वत:ला स्वत:ची माहिती असणे महत्त्वाचे असते.
पण सेल्फ अवेअरनेस
म्हणजे नक्की काय? त्याचे आपल्या आयुष्यात महत्त्व का आहे आणि त्यासाठी नेमके
काय करायला पाहिजे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपण एक स्वतंत्र आणि एकमात्र व्यक्ती
आहोत याची जाणीव असणे. आपले चांगले गुण कोणते याची डोळस माहिती असणे मात्र त्याच
वेळेला आपल्याला अजून खूप शिकण्यासारखे आहे याची जाणीव असणे. यात तुम्हाला माहिती
नसलेल्या गोष्टींची खुली कबुली देणे आणि आपल्या चुका मनापासून मानणे याचाही समावेश
होतो.
सेल्फ अवेअरनेस म्हणजे:
आपल्या आयुष्यात आपल्याला
काय करायचे आहे, काय हवे आहे हे माहिती असणे. स्वत:चे चांगले गुण आणि आपल्यातली कमकुवत बाजू
तुम्हाला स्वयंप्रेरणा कशामुळे मिळते आणि कशामुळे तुम्ही सुखी होता स्वत:बद्दल
किंवा स्वत:च्या आयुष्यात काय बदल हवे ह्याची जाणीव असणे. आतापर्यंतच्या आयुष्यात
मिळवलेले यश तुमचे इतरांबरोबरचे वर्तन कसे आहे आयुष्य संपन्न होण्यासाठी करावी
लागणारी प्रगती तुमची ठाम मते आणि ध्येय. तुम्ही स्वत:कडे
कुठल्या नजरेने बघता/ स्वत:विषयीचे मत, यात अजूनही
गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
सेल्फ अवेअरनेसचे महत्त्व:
तुम्हाला तुमच्या
आयुष्यात कोणतेही बदल घडवायचे असतील तर त्यासाठी कोणतीही कृती करण्याआधी स्वत:ला
समजून घेणे महत्त्वाचे असते. योग्य दिशेने जाण्यासाठी काय केले पाहिजे ह्याची
जाणीव जर आपण स्वत:ला ओळखत असू तरच होते. आपला मार्ग बरोबर की चूक हे अपणच ठरवू
शकतो. वय वाढले तरी आयुष्यात काय मिळवायचे आहे ते माहिती नसलेले अनेकजण आपल्याला
आजूबाजूला दिसत असतात. त्यांच्या आयुष्यात ध्येय नसते वा दिशा नसते. येईल तो दिवस जगायचा
इतकेच ही मंडळी करताना दिसतात. अशा प्रकारच्या जगण्यामुळे फ्रस्ट्रेशन वा डिप्रेशन
येण्याची शक्यता असते. मात्र सेल्फ अवेअरनेसमुळे आपल्या आवडीचे, योग्यतेचे करिअर करणे शक्य होते.
स्वत:ला समजावून घेणे म्हणजे आत्मकेंद्री
होणे नाही तर यातून स्वत:ला ओळखून, स्वत:च्या मतांशी प्रामाणिक राहून इतरां बरोबरची नाती
संपन्न करणे हे होय. ह्याचा उपयोग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी होतो. तुम्हाला लोकांशी
बोलायला, त्यांच्यात
मिसळायला आवडत नसेल तर लोकाभिमुख व्यवसाय निवडणे आपल्या प्रवृत्तीच्या विरूद्ध
जाते आणि त्यातून आनंद, सुख मिळत नाही. आपण हिमनगासारखे असतो. बऱ्याचशा भागाशी आपली
ओळखही नसते. त्यामुळे आपल्या वागण्याने कधीकधी आपणच चकित होतो.
प्रसिद्ध लेखक
ऑस्कर वाईल्ड म्हणतो, “स्वत:ला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:चा स्विकार
करणे”. प्रत्येकाला आपण
दुसऱ्यासारखे नाही याचे वाईट वाटते. मात्र आपल्या सारखे दुसरे कोणीही नाही हे
मात्र विसरले जाते. स्वत:बरोबर वेळ घालवायला, मनाशी संवाद साधायला आपल्याकडे वेळ नसतो किंबहुना आपल्याला
स्वत:ला वेळ द्यायचा म्हणजे गिल्टी वाटत किंवा वेड्या कल्पना वाटतात. दहा मिनिटे
शांत बसलो तर फोन करायचा आठवतो, गाणे ऐकावेसे वाटते. काहीवेळा आपण जर स्वत:चा विचार केला तर
स्वत:ला आवडणार नाही अशी सुप्त भितीही मनात असू शकते. यामुळे आपण स्वत:च्या
कंपनीऐवजी इतरांची कंपनी शोधतो. स्वत:विषयी सांगा असे म्हटले की लोक आपले नाव, काय करतो, कोठे राहतो, कुटुंबात कोण हे सांगतात.
पण आपण म्हणजे आपल्या नावापेक्षाही अधिक, कामापेक्षा, व्यवसायापेक्षा अजून काही आहोत . आपल्या मित्र मैत्रिणींपेक्षा वेगळे राहतो त्या
ठिकाणापेक्षा अधिक जगात वस्तूंपेक्षाही आपण अधिक असतो पण ते काय याचा प्रत्येकाने
शोध घेतला पाहिजे. आपण जेव्हा कामात खूप बिझी असतो किंवा खूप एकाग्र होतो तेव्हा
मेंदूचा भाग जो सेल्फ अवेअरनेसचे कार्य करतो तो टर्न ऑफ करतो. आपण एखादे काम झोकून
देऊन एकाग्रतेने करतो तेव्हा स्वत:ला काय वाटते हे मनातही येत नाही. त्यासाठी
स्वत:ला वेळ देऊन, स्वत:ला केंदस्थानी ठेवून डोळसपणे समजावून घेणे हे सतत आणि
आयुष्यभर होत राहणे गरजेचे आहे.
सेल्फ अवेअरनेससाठी काय
केले पाहिजे?
- स्वत:शी प्रामाणिक राहून आपल्या वागणूकीचा जमाखर्च पाहणे
- आपल्या जवळच्यांना तुमच्या बद्दल योग्य फिडबॅक द्यायला सांगा आणि त्यावर न चिडता विचार करा.
- समोरच्याचे न आवडणारे गुण आपल्याला आवडत नाहीत याचे कारण म्हणजे ते गुण आपल्यातही असतात. तेव्हा लोकांशी वागताना आपल्याला काय आवडत नाही हे पाहताना स्वत:लाही तपासा.
- आपल्याला ज्याचा आदर्श वाटतो त्यांच्या जीवनाकडे पहा. त्यातले काय भावते आणि ते वेगळे काय करतात ते पहा.
- ज्यांच्या बद्दल आदर आहे अशांना तुमच्यात काय बदल अपेक्षित आहेत हे न संकोचता विचारा. या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचण्याची सवय ठेवा.
- इंटरनेटवर अनेक प्रकारचे क्विझ टेस्ट उपलब्ध आहेत, त्यांचा स्वत:ला समजून घेण्यासाठी उपयोग करा.
- आणि सगळ्यात जरूरीचे म्हणजे स्वत:साठी वेळ देऊन मनाशी संवाद साधायला शिका. ह्यामुळे आपली स्वत:शी नव्याने ओळख होऊन मैत्री होऊ शकते, जी आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरते. कारण आपण स्वत:कडे कसे बघतो हे इतर आपल्याकडे कसे बघतात यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते.