जागवा आपल्यातील नेतृत्व
सी. ई. पोतनीस, सकाळ, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
मानवानं अनेक शोध लावले.
होय, शोधच म्हणता येईल; नवशोध म्हणता येणार नाही.
कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे
त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं
आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व
उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची
जोडणी, मांडणी करून नवीन
कसब, कौशल्य निर्माण
करायचं आहे.
नेतृत्व ही नैसर्गिक
देणगी आहे, की आत्मसात करता येणारं कौशल्य, याविषयी बहुतेकांचं दुमत आहे. तरीही साधारणपणे नेतृत्व ही
नैसर्गिक देणगी आहे, असेच अनेकांचं मत असतं. खरं तर नेतृत्व आणि व्यवस्थापन हे
गुण प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हे गुण म्हणण्यापेक्षा
नैसर्गिक गरज म्हणणंच रास्त ठरेल. या भौतिक जगात जगण्याकरता व पुढं जाण्याकरता
काही मूलभूत साधनांची, गुणांची, कौशल्यांची गरज असते. ही सर्व साधनं परमेश्वरानं आपल्याला
उपलब्ध करून दिलेली असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हेही असंच मूलभूत साधन आपणा
सर्वांकडं असतंच. आपल्यात नेतृत्वाचे व व्यवस्थापनाचे गुण आहेत, ही जाणीव अन् विश्वास
आपल्याला नसतो. त्यामुळंच नेतृत्व हे काही मोजक्या जणांसाठीच आहे, ही सर्वसाधारण धारणा असते; तसेच नेतृत्व अन्
व्यवस्थापन ही केवळ व्यवसाय/ सामाजिक क्षेत्रात अधिकारपदावर असलेल्या लोकांचीच गरज
आहे, असाही समज आहे.
या धारणेमुळं आपल्यातल्या नेतृत्वाविषयीच्या अन् व्यवस्थापनाविषयीच्या गुणांकडं
लक्षही दिलं जात नाही.
मानवानं अनेक शोध लावले.
शोधच (Discovery) म्हणता येईल; नवशोध (Invention) म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व
उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू
शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत.
आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे
आहेत. त्या गुणांची जोडणी, मांडणी करून नवीन कसब, कौशल्य निर्माण करायचं आहे. नेतृत्व, व्यवस्थापनाचं कसब हे
अशातलंच एक आहे. आपण प्रत्येक जण ते वापरतही असतो. हे अर्थात नकळत, अजाणतेपणानं, क्वचित व अपघातानं वापरलं
जातं. तसंच ते बहुधा सुप्तावस्थेत असतं.
व्यवसाय, नोकरी, सामाजिक क्षेत्रांत
जेव्हा कामाचा व्याप मोठा व हाताखाली काम करणारे सहकारी असतात, फक्त तेव्हाच नेतृत्व आणि
व्यवस्थापन आवश्यक असतं, अशीच बहुतेकांची समजूत असते. अशा वेळी नेतृत्वाची खरी कसोटी
लागते, याबाबत शंकाच
नाही; परंतु हे सर्व
काही नसतानाही नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज असतेच, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःपुरतंच
मर्यादित काम करत असतो, तेव्हाही या गुणांचा वापर होत असतो वा होणं अपेक्षित आहे.
नेतृत्व काही केवळ हाताखाली किंवा समवेत सहकारी असतानाच होतं, असं नाही. स्वतःचं
स्वतःकरता नेतृत्व आणि व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. याची खरी सुरवात तर वैयक्तिक
पातळीवरच होत असते; तसेच स्वतःकरताचं व्यवस्थापनही गरजेचं आहे. प्रथम नेतृत्व
अन् व्यवस्थापनातला फरक समजून घेऊ या. नेतृत्व म्हणजे ध्येय ठरवणं, दूरदृष्टी असणं, दिशा देणं, प्रोत्साहित करणं, विश्वास संपादन करणं व
उंचावणं, इत्यादी.
व्यवस्थापन म्हणजे ठरवलेल्या ध्येयाकडं आखलेल्या दिशेनं कूच करणं. यात योजना, वेळेचं नियोजन, कामाची आखणी, असलेल्या साधनांचा
परिणामकारक वापर करणं इत्यादी गोष्टी येतात. विचार केल्यास लक्षात येईल, की हे सर्व स्वतःलाही
लागू आहे. चांगल्या नेतृत्वाशिवाय आणि व्यवस्थापनाशिवाय चांगलं आयुष्य जगणं अशक्यच
आहे. त्यामुळंच विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा सर्वांनाच आपल्यातलं नेतृत्व शोधणं आवश्यक
आहे. आपल्या आयुष्याला ध्येय हवं, दिशा हवी, स्वतःला प्रोत्साहित ठेवता येणं गरजेचं आहे. त्याशिवाय
योजना व वेळेचं नियोजन, इत्यादीही साधता आलं पाहिजे, हेच तर स्वतःचं नेतृत्व व व्यवस्थापन.
आपण प्रत्येकजण हे गुण
वापरत असतोच. त्यांचा आवाका कमी-जास्त असतो. त्यात सातत्य नसतं. बर्याचदा त्यांचा
वापर नकळतच होतो. संकटात, अतिमहत्त्वाच्या प्रसंगी, अचानक जबाबदारी पडल्यावर हे सुप्त गुण जागृत झाल्याचं आढळतं, अशी अनेक यशस्वी उदाहरणं
आपल्या पाहण्यात असतील. असंच एक उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांचं. कॅथॉलिक शाळेत
शिकवणारी ही संन्यासिनी. मुख्याध्यापिका होऊन शाळेचं नेतृत्व आपल्याला करता येईल, याचा विश्वासही नसलेली
ही संन्यासिनी; परंतु गरिबातल्या गरिबांच्या दारिद्य्रानं आणि दुःखानं ती हेलावली. त्यातूनच
नेतृत्व जागृत झालं. प्रेमाच्या झर्यानं आणि नेतृत्वाच्या आधारानं तिनं उभारलेली
संस्था जगभरात सर्वत्र सेवा पोचवत आहे.
आपण प्रत्येक जण काही ना
काही तरी निर्णय घेत असतो, निवड करत असतो, एक दिशा ठरवत असतो, त्या मार्गानं चालत असतो. समस्या एवढीच आहे, की हे सगळं आपण
अजाणतेपणाच्या अवस्थेतून करत असतो. नेतृत्वासारख्या अन् व्यवस्थापनासारख्या
गुणांना आपण आकार दिलेला नसतो. जाणीवपूर्वक त्या गुणांना जोपासलेलं नसतं. त्यामुळं
अपघातानंच व क्वचित या गुणांची चुणूकही आपल्याला जाणवते. सराव नसलेला खेळ खेळताना
अचानक आपल्याकडून एखादी सुंदर खेळी होते! ती चुकून, म्हणजेच अपघातानं, घडलेली असते. आपल्यातली ही खेळी वारंवार व आपल्याला हवी
तेव्हा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या जाणीवपूर्वक व सततच्या
प्रयत्नांतूनच हे कौशल्य, कसब निर्माण होतं व कायमस्वरूपी साथ देतं. त्यानंतर
अपघातानंच नव्हे, तर ठरवून हवा तो परिणाम घडवून आणता येतो; तसंच नेतृत्व अन् व्यवस्थापन हे जाणिवेच्या पातळीवरच घडवणं
आवश्यक असतं.
व्यावसायिक, सामाजिक आदी
क्षेत्रांतल्या नेतृत्वाची व्याप्ती जास्त असते. त्यात इतरांना दिशा देणं, प्रोत्साहित ठेवणं आदींची
जबाबदारीही आपल्यावर असते. या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी तशी आवड तर हवीच; पण त्यासाठी मोठी तयारीही
हवी. वैयक्तिक नेतृत्व व व्यवस्थापनावर पकड असल्याशिवाय इतरांचं नेतृत्व करणं व
इतरांचं व्यवस्थापन सांभाळणं अशक्यच. दुर्दैवानं अनेक जण अशा नेतृत्वात तयारीविना
पडलेले असतात. नोकरीमधल्या काही वर्षांचा अनुभव काहींना ओघानं त्यात नेतो. मागच्या
काही वर्षांतलं यश हे नेतृत्वातही यश देईल, हा अत्यंत चुकीचा समज. यात यश मिळवण्यासाठी बरीच तयारी
लागते. खरं तर आपल्यातलं नेतृत्व आधी विकसित होऊन नंतरच तसं पद मिळावं. लोक
पदाच्या मागं असतात; पण नेतृत्व व व्यवस्थापन विकसित करण्यावर त्यांचं लक्ष
नसतं. त्यामुळंच या पदांवर अनेकांची केविलवाणी अवस्था होते. हाताखाली सहकारी असतात; परंतु नेतृत्वाचा अभाव
असतो. असं नेतृत्व संस्थेचं; तसंच सहकार्यांचंही नुकसान करतं.
व्यावसायिक, सामाजिक इत्यादी
क्षेत्रांत नेतृत्व करायचं की नाही, हा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्न. प्रत्येकानं या
दिशेला वळलं पाहिजे असंही नाही; परंतु अशा नेतृत्वाची जर महत्त्वाकांक्षा असेल, तर सर्वप्रथम
स्वतःसंदर्भात काम करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर नेतृत्वावर आणि
व्यवस्थापनावर पकड असलीच पाहिजे. स्वतःला दिशा नसेल तर दुसर्यांना काय दिशा देणार? स्वतःला ध्येय नसेल तर
इतरांच्या ध्येयपूर्तीला काय मदत करणार? स्वतःचं नियोजन करता येत नसेल, तर इतरांना व्यवस्थापन काय शिकवणार?
स्वतःला प्रोत्साहित ठेवता येत नसेल तर इतरांना
काय प्रोत्साहन देणार? अशा नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा नसली तरी केवळ आपल्यासाठीही
हे गुण विकसित करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वतःवरचं नेतृत्व व व्यवस्थापन आपल्या
जीवनाला हेतू देतं. सर्वांगीण विकास घडवतं. यातूनच आपलं जीवन खुलतं-फुलतं.
नेतृत्व विकसित
करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. निर्णय घेण्यानंच निर्णयशक्ती वाढते.
प्रत्येक निर्णयाच्या परिणामातून जाणीवपूर्वक शिकता येतं. त्यातूनच योग्य निर्णय
घेण्याची तयारी होते. ध्येयनिश्चिती, स्वतःवरचा विश्वास, वेळेचं नियोजन यावर काम करावं. प्राधान्य कशाला द्यावं हे
जाणीवपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. सातत्यानं या गोष्टींचा जाणीवपूर्वक सराव केल्यास
नेतृत्व व व्यवस्थापन विकसित झाल्याखेरीज राहणार नाही. इतरांबरोबरच्या
नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणा व विश्वासार्हता याला सर्वांत अधिक महत्त्व आहे, हे जाणावं. स्वतःपेक्षा
दुसर्यांचं हित महत्त्वाचं, हा नेतृत्वातला महत्त्वाचा गुण. याच्याशिवाय आपण खरं
नेतृत्व देऊ शकणार नाही, हे ध्यानी ठेवावं. जबाबदारी घेणं हादेखील नेतृत्वातील एक
महत्त्वाचा गुण. आपल्या आयुष्याची जबाबदारी ही केवळ आपलीच. आपल्यातलं नेतृत्व
जागवा, जीवनाला दिशा
द्या. जीवन घडवा.
No comments:
Post a Comment