सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
स्टीव्हन रुडॉल्फ
लिखित ‘१० लॉज् ऑफ लर्निंग’ या पुस्तकाचा
अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकातील लेखकाच्या
मनोगताचा संपादित अंश.
प्रत्येक पालकाला
आपल्या मुलाचे चांगले व्हावे, असेच वाटत असते. त्याची मुले आनंदी,
स्वस्थ व गुणी असावीत
अशीच इच्छा असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वच क्षेत्रात यशस्वी
व्हावे असे वाटत असते; पण मुलांना लहानाचे मोठे करताना बरेचदा अवघड परिस्थितीला
तोंड द्यावे लागते. वेगवेगळे मार्ग शोधताना कधी कधी निराशा वाटायला लागते. मुलाला
अभ्यासासाठी कसे प्रेरित करावे किंवा दोन भावंडांची भांडणे कशी सोडवावीत, हे समजेनासे
होते.
बरेचदा पालक
स्वत:च्या लहानपणीच्या गोष्टी, अनुभव आठवायचे प्रयत्न करतात; पण त्याचबरोबर बदलत्या काळामुळे गोंधळून जातात.
जर मी सतत कॉम्प्युटरवर चॅटिंग करत राहिलो असतो तर माझ्या आईवडिलांनी काय केले
असते? माझ्या
आईवडिलांच्या मुलांना वाढवायच्या पद्धती या कॉम्प्युटर, मोबाइल, टी.व्ही. व जंक फूडच्या जमान्यात योग्य ठरल्या
असत्या का, हाही प्रश्न पडतोच. अशा वेळेस बऱ्याचदा पालक मदतीसाठी स्वत:च इंटरनेटकडे वळतात.
बरेचदा त्यांना उत्तरे मिळतात; पण ती अर्धवट, गुंतागुंतीची, संदिग्ध व व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि जेव्हा
बाजारात खरेदीला गेल्यावर मुले रस्त्यातच एखादी वस्तू हवी,
म्हणून हट्ट करतात, भोकांड पसरून
रडायला, ओरडायला लागतात
तेव्हा इतर कोणाचे सल्ले घेण्याइतका त्यांच्याकडे वेळ असतो कुठे?
त्यामुळेच हल्ली
पालकांना खरी जरुरी असते, ती साध्या सोप्या नियमांच्या संचाची, जे प्रत्येक कठीण
प्रसंगी त्यांना मार्गदर्शक ठरतील. ते नियम आठवायला सोपे आणि अंतर्मनातून
येणारेसुद्धा हवेत; पण त्याचबरोबर या नियमांची व्याप्ती एवढी पाहिजे की एखाद्या
सात वर्षांच्या उत्साही मुलापासून गोंधळलेल्या १५ वर्षांच्या मुलांपर्यंत सर्वाना
लागू पडतील.
मुले, पालक, शिक्षकांमध्ये
वावरण्याचा आणि शिक्षण क्षेत्रात दोन दशकांपेक्षा जास्त कामाचा अनुभव घेतल्यावर व
प्राचीन वेदांपासून ते आधुनिक न्युरो सायन्सपर्यंत सर्व पुस्तके व लेखांचा अभ्यास
केल्यावर मी असे दहा नियम/ तत्त्वे तयार केली, ज्याला मी ‘शिकण्याचे दहा नियम’ म्हणतो. पुरातन काळापासून चालत आलेली तत्त्वे, नियम या
सर्वातूनच काही गोष्टी निवडून, ज्या काळाच्या चाचणीवर खऱ्या ठरल्या आहेत, ज्या समजायला
सोप्या आहेत, पटकन आचरणात आणण्याजोग्या आहेत. मला खात्री आहे की एकदा हे समजून घेतले की, प्रत्येक वेळेस
कठीण प्रसंगात तुम्ही सहजपणे ते वापरू शकाल.
शिक्षणाचे दहा नियम
शिक्षणाचे दहा नियम
१. मुलांना
स्वत:विषयी काळजी घ्यायला शिकवा.
२. मुलांना
स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा.
३. मुलांना जिज्ञासू
शोधक बनवा.
४. मुलांना
आयुष्यात ध्येय, उद्देश ठरवायला शिकवा.
५. मुलांना योजना
बनवायला शिकवा.
६. मुलांना
खेळाचे नियम शिकवा.
७. मुलांना
प्रत्यक्ष कृती करायला, सराव करायला शिकवा.
८. मुलांना
खेळायला शिकवा.
९. मुलांना
व्यवहारज्ञान शिकवा.
१०. मुलांना नेहमी
विजेत्यासारखे वागायला शिकवा.
जर आपण या
नियमांकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, या सर्व
नियमांमध्ये एक परस्परसंबंध आहे. एकातूनच दुसरा नियम निर्माण होत जातो. त्यात एक
तर्कशुद्ध क्रम आहे. उदा. सर्वप्रथम मुलांना स्वत:ची काळजी करायला/ घ्यायला शिकवा, मग त्यांना
स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवा, मग जिज्ञासू बनवा व आयुष्यात ध्येय ठरवायला शिकवा वगैरे. पण
त्यात एक नॉन लिनियर रिलेशनशिप आहे, जसे खेळात असताना स्वत:ची काळजी घ्यायला शिका
किंवा ज्ञान मिळवाल, तेव्हा स्वत:वर विश्वास ठेवायला शिका वगैरे. वरचा तक्ता या
सर्व दहा नियमांमधील संबंध दाखवतो.
तुम्हीच तुमच्या
मुलाचे पहिले गुरू
पालक म्हणून
तुम्हीच तुमच्या मुलाचे पहिले गुरू, प्रशिक्षक आहात.
आणि एक प्रशिक्षक
म्हणून तुम्ही :
तुमच्या
खेळाडूंना नीट ओळखाल तेव्हाच तुम्ही त्यांच्यातल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊ
शकाल.
* जबाबदारी व सहनशीलता शिकवा.
* नि:पक्षपाती बना.
* परिस्थितीवर अवलंबून योग्य तसे कणखर किंवा मृदू बना.
* त्यांच्या यश किंवा अपयश दोन्हीची अंशत: तरी जबाबदारी घ्या.
दहा नियमांचे पालन
एक गोष्ट लक्षात
घेतली पाहिजे की, हे दहा नियम ही एक जीवनशैली आहे. एका वेळी सगळे नियम उपयोगात आणण्याऐवजी जे
आत्ताच्या समस्येशी संबंधित आहेत, तेच उपयोगात आणावेत व हळूहळू बाकीच्या नियमांकडे वळावे.
एकदा माझ्या
मित्राने मला सांगितले की, त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या वर्तन समस्येसाठी त्याने
पालकांसाठीचे एक पुस्तक विकत घेतले व वरचेवर त्यातील काही गोष्टींबद्दल स्वत:च्या
बायकोशी तो चर्चा करायचा, पण त्याच्या हे लक्षात आले नाही की त्याचा मुलगा हे सर्व
लक्ष देऊन ऐकतो आहे. एक दिवस मुलाने येऊन कॉम्प्युटर बंद करून टाकला. जेव्हा
त्याने असे का केले असे विचारले तेव्हा मुलाने उत्तर दिले की, मी आता तुम्हाला
माझ्याशी कसे वागायचे ते शिकवणार आहे. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुलांना सर्व
समजत असते. त्यामुळे त्यांच्याशी या नियमांची चर्चा जरूर करावी.
हल्ली टी.व्ही., इंटरनेटमुळे मुले
खूप हुशार झाली आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. जेव्हा पालक स्वत:च
गोंधळलेल्या मन:स्थितीत असतात, पण मुलांना मात्र कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध कारणाशिवाय
शिकवायचा प्रयत्न करतात तेव्हा मुलांना आवडत नाही. त्यामुळेच जीवनशैलीला अनुसरून
केलेला सारासार व सुसंगत विचार व अनुभव यातूनच सुजाण पालक निर्माण होईल यात शंकाच
नाही.
शेवटी, जेव्हा तुम्ही हे
नियम उपयोगात आणाल, तेव्हा ते अमलात आणायचे नवनवीन उपाय तुमच्या मुलाच्या
आवडीनिवडी, गुणदोष लक्षात घेऊन योजलेत तर त्याचा जास्त फायदा होईल आणि जर तुमच्या
कल्पनेतून तुम्ही अशी एखादी पद्धत शोधलीत की ती खूपच प्रभावी आहे तर जरूर ती खालील
वेबसाइटवर कळवा, सर्वानाच त्याचा फायदा होऊ शकेल.
Source: