छायाचित्रकारांचा बाप माणूस ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 August 2013

छायाचित्रकारांचा बाप माणूस

छायाचित्रकारांचा बाप माणूस
प्रा. श्रीकांत मलुष्टे, रविवार, १८ ऑगस्ट २०१३.
येत्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रदिन साजरा करण्यात येतो. छायाचित्रणातील बापमाणूस असणारं एक अफलातून व्यक्तिमत्त्व जॉर्ज इस्टमन यांच्या कार्यावर प्रकाशझोत...
अवेळी शाळेतून नाव काढून टाकलेला जॉर्ज इस्टमन हा मुलगा पुढे फोटोग्राफी क्षेत्रात जगात खूप नाव कमावून अमेरिकेतला खूप श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जाईल याची सुरुवातीला कुणाला कल्पना तरी करता आली असती का?

आई मारिया किलबार्न व वडील वॉशिंग्टन इस्टमन यांचा दोन मुलींनंतर १२ जुलै १८५४ दिवशी जन्माला आलेला जॉर्ज सर्वात धाकटा मुलगा. वडिलांचं छत्र जॉर्ज आठ वर्षांचा असतानाच हरपलं. सोळा वर्षांचा असताना पोलिओने आजारी असलेली धाकटी बहीण काटिया गेली. त्याच्या आईनं अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्याला वाढविलं. चौदा वर्षांचा असताना जॉर्ज मेसेंजर बॉय(शिपाई) म्हणून रॉचेस्टर इन्श्युरन्स कंपनीत नोकरीला लागला. चांगली नोकरी मिळावी म्हणून अकाऊंटिंगचा अभ्यास संध्याकाळच्या वेळात त्यानं सुरू केला आणि पुढे एका स्थानिक बँकेत क्लार्क म्हणून काम करू लागला.

चोवीस वर्षांचा असताना सुट्टीत तो सान्टो डोमिंगो या पर्यटनस्थळी जाणार होता तेव्हा त्याच्या मित्राने तेथील निसर्गरम्य दृश्ये टिपण्यास कॅमेर्‍याचं साहित्य नेण्यास सांगितलं. त्यावेळी कॅमेर्‍याचं साहित्य म्हणजे मायक्रोओवनइतका मोठा कॅमेरा, त्याकरिता मोठा टायपॉड, फोटो काढण्यापूर्वी रसायन प्लेटवर पसरविण्याकरिता एक तंबू. त्याचबरोबर केमिकल्स, ग्लास टँक, पलेट पकडण्याकरिता जड पलेट होल्डर, पाण्याची बादली वगैरे वस्तू घोड्याच्या पाठीवर टाकून वाहून नेण्याइतक्या असत. ओल्या पलेटवर ही चित्रं टिपावी लागत. एवढं करून जॉर्ज इस्टमन सान्टो डोमिंगोला जाऊ शकला नाही, पण या तयारीमुळे जगाला फोटोग्राफी क्षेत्रातला एक हरहुन्नरी क्रांतिकारक मिळाला. इस्टमनमध्ये फोटोग्राफीची कमालीची आवड निर्माण झाली. त्यानं फोटोग्राफीत स्वत:ला संपूर्ण झोकून दिलं. फोटो टिपण्याची गुंतागुंतीची पद्धत सोपी करण्याच्या पाठीमागे तो लागला. ओल्या पलेटच्या पद्धतीत पलेट सुकण्याअगोदरच फोटो काढावा लागे. एका ब्रिटिश मासिकात त्यानं वाचलं होतं की, पलेटवर थर टाकण्याचं इमल्शन आपल्याला स्वत:लाच तयार करता येतं. ते पलेटवर टाकून सुकल्यानंतरही त्याची प्रकाशाची संवेदना राहते. त्या मासिकातील फॉर्म्युल्याप्रमाणं तो इमल्शन तयार करू लागला. दिवसभर बँकेत काम केल्यानंतर रात्री आईच्या स्वयंपाकघरात तो प्रयोग करीत राहिला. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार कित्येक वेळा हे प्रयोग करताना इतका दमून जात असे की, घातलेल्या कपड्यांनिशी जमिनीवर ब्लँकेट टाकून झोपत असे.


तीन वर्षांच्या सतत प्रयत्नांनी १८० साली इस्टमननं स्वत:चा फॉर्म्युला तयार केला. डायपलेट फॉर्म्युल्यानंतर त्यानं अशा पलेट बनविण्याचं मशीन तयार करून पेटंट मिळविलं. रॉचेस्टर येथील स्ट्रीट बिल्डिंगवर तिसर्‍या मजल्यावर त्यानं पलेट विकण्याचं ऑफिस काढलं. तेथून तो पलेटस् विकायला लागला. इस्टमन विचार करू लागला की, काचेच्या पलेटपेक्षा पेपरासारख्या जर हलक्या व लवचिक माध्यमावर हे इमल्शन ठेवलं तर ते जास्त सोयिस्कर होईल. पेपर हा जरी सोयिस्कर असला तरी ते योग्य माध्यम नव्हतं. कारण पेपरावरचे ग्रेन्स दिसणं हे प्रतिमेला त्रासदायक होतं. १८८५ साली संवेदनशील फिल्म वापरण्याची व आपल्याकडं मिळण्याची जाहिरात त्यानं प्रसिद्ध करून टाकली. या पद्धतीत प्रथम विरघळणारं जिलेटिन पेपरवर घेऊन नंतर ते न विरघळणार्‍या संवेदनशील जिलेटिनवर ठेवायचं आणि एक्सपोझर दिल्यानंतर व जिलेटिनवर प्रतिमा उमटल्यानंतर पेपरच काढून घ्यायचा. अशा तर्‍हेनं लवचिक, पण घट्ट पृष्ठभागावर प्रतिमा दिसू लागली, पण ओल्या पलेट वापरायची सवय असलेल्यांना त्यानं काढलेल्या रोलफिल्मचे आकर्षण त्यावेळी वाटलं नाही. लोकांना खेचण्याकरिता त्यानं स्वत:चा कॅमेरा काढायचं ठरविलं. १८८८साली त्यानं जगात पहिला रोलफिल्म कॅमेरा बाहेर काढला. या कॅमेर्‍याला नाव देण्याकरिता दोन गोष्टी त्याने मनाशी धरल्या होत्या. कॅमेर्‍याचं नाव क अक्षरानं सुरू होणारं व त्याच अक्षरानं संपणारं हवं. शिवाय ते उच्चारायला सोपं हवं आणि मग कोडॅक कॅमेराचा जन्म झाला. हा जगातला विक्रीला आलेला पहिला कॅमेरा आणि त्याचा मानकरी ठरला तो जॉर्ज इस्टमन. १८९२ साली इस्टमन फोटोग्राफी कंपनीचं अगोदरचं नाव आता इस्टमन कोडॅक कंपनी असं झालं. स्वत: इस्टमन कॅमेर्‍याच्या जाहिरातीचे मसुदे तयार करीत असे. कोडॅक कॅमेर्‍याच्या जाहिरातीचं घोषवाक्य त्यानं तयार केलं होतं. you press the button, we do the rest’’ अल्पावधीत या जाहिराती जगभर पसरल्या व शंभर फोटो टिपणारा रोल संपल्यानंतर लोक त्यावर रासायनिक क्रिया करून प्रिंट घेण्यास रॉचेस्टरला कोडॅक कंपनीत आणून देत व पुन्हा शंभर फोटो टिपणारा रोल भरून घेत. पेपर निगेटिव्हवर प्रतिमा चांगली स्पष्ट येत नसल्यानं त्यानं इमल्शनचा पातळ थर दिलेली पारदर्शक फिल्म तयार केली. Eastman Dry Plate and Film Company  काढून तो ही फिल्म विकू लागला. कोडॅकचं नाव जगात पसरलं. लंडनला मोठमोठे बॅनर्स लागले. वर्तमानपत्रं, मासिकं, डिस्पले बोर्ड, पत्रकं वगैरेनं जगात जिथे तिथे कोडॅक कॅमेर्‍याच्या जाहिराती पोचल्या.


इस्टमननं मग मागे वळून पाहिलंच नाही. फोटोग्राफीचे कॅमेरे, फिल्म, रसायने व तत्सम साहित्य करण्यात त्याने स्वत:ला झोकून दिलं. अनेक तर्‍हेचे कॅमेरे त्याने लोकांसमोर आणले. सर्वसामान्य लोकांना वापरता येणारा व पुढे अतिशय लोकप्रिय झालेला ब्राऊनीकॅमेरा, फोल्डिंग कोडॅक कॅमेरा, पॉकेट कोडॅक कॅमेरा, होम मूव्ही कॅमेरा, सिने-कोडॅक मोशन पिक्चर कॅमेरा, एक्स-रे फिल्म व त्याकरिता लागणारा कॅमेरा, जागतिक युद्धात वापरता येणारा एरियल फोटोग्राफी करणारा कॅमेरा, खगोलशास्त्रात अंतराळात निरीक्षण करणारा कॅमेरा असे अनेक तर्‍हेचे कॅमेरे कोडॅक कंपनीनं बाजारात आणले. जगाच्या कानाकोपर्‍यात कोडॅक कंपनीचं नाव गेलं. कंपनीनं भरपूर पैसा मिळविला व अमेरिकेतल्या श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत इस्टमनचं नाव गेलं.
पहिल्यापासूनच तो परोपकारी वृत्तीचा होता. १९१९ साली कंपनीचा आपल्या उत्पन्नातला एक तृतीयांश हिस्सा म्हणजे दहा कोटी डॉलर्स कामगारांना वाटले. तो लोकोपकारी म्हणूनच ओळखला जाई. अगदी सुरुवातीला त्याचा पगार केवळ ६० डॉलर्स होता तेव्हा तो त्यातले ५० डॉलर्स रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिक्सच्या विद्यार्थ्यांना देत असे. इस्टमननं फोटोग्राफी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात आपला जीव ओतला आणि एवढा पैसा मिळविला की, अमेरिकेच्या श्रीमंत लोकांत त्याचं नाव गेलं. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे तो स्वत:ला फोटोग्राफी क्षेत्रातला छांदिष्ट म्हणवून घेत असे. फोटोग्राफी क्षेत्रातला गडगंज संपत्ती मिळविलेला हा गृहस्थ स्वतला हौशी फोटोग्राफरच समजायचा. त्याच्या दृष्टीने जो केवळ प्रेमाने, श्रद्धेनं एखाद्या गोष्टीत जीव ओततो तो ऍम्युचरच राहतो. मग त्याने कितीही पैसा मिळविला तरीही. केवळ पैसे मिळविण्याकरिता जो आयुष्यभर धडपडत असतो तो व्यावसायिक होतो. इस्टमननं जे काही केलं ते फोटोग्राफीच्या प्रेमाखातर. पैसा मिळणं ही गोष्ट दुय्यम आहे. तो मेहनतीने आपोआपच मिळतो. सर्वसाधारण लोकांना त्याचा एक सल्ला असे की, तुम्ही जी नोकरी करता किंवा व्यवसाय करता तेव्हा लोकांना तुम्ही काय करीत आहात हे दाखविता, पण तुम्ही एखादा छंद बाळगून त्यात जीव ओतता व काम करता तेव्हा तुम्ही काय आहात हे लोकांना दाखविता आणि मग त्या नावाने लोक तुम्हाला ओळखतात. आज आपल्याकडे दोनचार वर्षे काम करणार्‍या कलावंतांना आपण ऍम्युचर आहोत हे बोलायला लाज वाटते व स्वत:ला व्यावसायिक म्हणवून घेण्यात धन्यता वाटते. त्यानी अमेरिकेच्या जॉर्ज इस्टमन या स्वत:ला ऍम्युचर म्हणवून घेणार्‍या श्रीमंत माणसाचा संदेश अंगी बाळगावा आणि आयुष्यात बरंच काही करण्याची मनीषा ठेवावी. इस्टमनला चांगली पेंटिग्स संग्रही ठेवण्याचा नाद होता व त्याचं घर म्हणजे अप्रतिम पेंटिग्सचा अनमोल साठा होता. तो म्हणायचा ज्या पेंटिंगद्वारे माझ्या घरात मी जगू शकेन अशाच पेंटिंग्स मी संग्रही ठेवतो.


जॉर्ज इस्टमन शेवटपर्यंत अविवाहितच राहिला. जे काही मिळविलं ते दुसर्‍यांना देण्याकरिताच मिळविलं. जॉर्ज इस्टमनने वयाच्या ७७ वर्षी १४ मार्च १९३२ साली आपल्या काही खास मित्रांना आपल्या बंगल्यावर बोलावलं. आपल्या संपत्तीचा मृत्युपत्रातला बहुतांशी हिस्सा रॉचेस्टर युनिव्हर्सिटीला त्यांच्या समक्ष देणगी दिला. कागदपत्रांवर सही करून तो वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेला व पिस्तुलाने आपल्या छातीत गोळी मारून घेतली. एकच वाक्य लिहिलेली चिठ्ठी मागे ठेवली. ‘‘My work is done. Why wait?’’ (मला जे काही करता येणं शक्य झालं ते मी केलं. आता मी कशाला थांबू?)अशा तर्‍हेनं फोटोग्राफी क्षेत्रातल्या उद्योग जगतात प्रथम कॅमेरा आणणार्‍या या अफलातून व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला, पण कोडॅक व इस्टमन ही नावं मात्र फोटोग्राफी क्षेत्रात अजरामर झाली. जॉर्ज इस्टमनचं अमेरिकेतलं घर आज International Museum of Photography and Film ओळखलं जात आहे व त्याला राष्ट्रीय पातळीवरचा दर्जा दिला गेला आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites