सामाजिक उद्योजकतेची पंचसुत्री ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

25 February 2014

सामाजिक उद्योजकतेची पंचसुत्री

'बॉर्न टू विन' संस्थेची स्थापना जानेवारी २००८ मध्ये झाली. त्यानंतर केवळ सहा वर्षात आपले विविध प्रशिक्षणक्रम, सभा इत्यादीद्वारे संस्था एक लाख लोकापर्यंत पोचलेली आहे. या संख्येबरोबरच महत्वाची बाब अशी की संस्थेचा लक्ष्यवेध व “लक्ष्यवेध अॅडव्हान्स” कोर्स केल्यानंतर उद्योजकांच्या उद्योग करण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, त्यांना अमाप यश मिळालेले आहे. आज संस्था इतकी मोठी झाली, त्यात सुरवातीला तिला काहीजणांकडून निरपेक्ष सहकार्य मिळाले. संस्थेचे प्रमुख अतुल राजोळी त्याचा कृतज्ञतापूवक उल्लेख करत असतात. असे सहकार्य संस्थेला मिळाले होते सेंट ॲन्जेलो प्रोफेशनल एज्यूकेशन या कंपनीचे सीएमडी श्री. ॲग्नेलोराजेश अथायडे यांच्याकडून. अथायडेंनी बॉर्न टू विनला फ्यूचर पाठशालाचे कोर्सेस त्यांच्या शाखांमध्ये सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. एका अगदी नवीन संस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला. अथायडे सांगतात फक्त तीस सेकंदात मी समोरच्या व्यक्तीला ओळखतो. मला वाटते म्हणूनच अतुल राजोळी त्यांना प्रथम भेटले त्यावेळीही अथायडे यांनी लगेच अतुलमध्ये क्षमता आहे, धडाडी आहे ओळखले आणि प्लॅटफॉर्म दिला. आता १३ फेब्रुवारी २०१४ ला बॉर्न टू विनचा अठरावा लक्ष्यसिध्दी' सोहळा झाला आणि त्यासाठी ॲग्नेलोराजेश अथायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना निमंत्रित करण्यामागे अतुल यांचा दुहेरी हेतू होता एक, त्यांचे रोखठोक विचार ऐकायला मिळावेत आणि दोन, त्यांच्या मौलिक चिंतनाचा लाभ सर्वांना मिळावा.
  लक्ष्यसिध्दी सोहळा कार्यक्रमात यावेळेस सुरवातीला “सामाजिक उद्योजकता, जागतिकिकरण आणि भारत” या विषयाच्या अनुषंगाने अथायडे यांनी चर्चा केली. ते म्हणाले, भारतीयांचे सरासरी वय चाळीस आहे आणि हे मनुष्यबळ ही आपली ताकद आहे. जगात भारतीयांबद्दल भीती व आदर आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, येणारा काळ भारताचा आहे. देशाची प्रगती उद्योजकांमार्फतच होत असते, म्हणून उद्योजकांनी त्यांच्या उद्योगात प्रगती करावी व देशहित साधावे. बॉर्न टू विनच्या कोर्सला प्रवेश घेऊन इथे जमलेल्या उद्योजकांनी पहिले पाऊल उचललेले आहे. सचिन तेंडुलकर इतका महान खेळाडू आहे, पण त्याला कोच होता, तसा कोच प्रत्येकाला आवश्यक असतो. बॉर्न टू विनही एक उत्तम कोच आहे, ही संस्था हिंमत देते, जे इथे मिळते ते दुसरीकडे मिळत नाही. उद्योजकांनी छोटे ध्येय समोर ठेऊ नये तर मोठे ठेवावे आणि त्याचसह ग्लोबल विचार करावा. कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य अशा क्षेत्रात उद्योजकांना वाव आहे. कोणताही उद्योग सुरू करताना त्याची ब्ल्यू प्रिंट तयार हवी, तसेच एका वर्षात काय करायचे ते पन्नास वर्षात काय करायचे ते वारसदार कोण इथपर्यंतचा प्लॅन तयार हवा. माझा उद्योग छोटी नदी आहे ती पुढे कोणत्या सागराला जाउन मिळणार माहीत हवे. देशात वीज, पाणी यांची कमतरता आहे, रस्ते नाहीत, त्यामुळे हा एक उद्योग होऊ शकतो. अशा आव्हानांकडे संधी म्हणून बघा. येणार्‍या दिवसात कोणीही एकटा काम करू शकणार नाही, कोलॅबरेशन करा. प्रामाणिकपणा ही एक अपरिहार्य बाब झालेली आहे. त्याचा कधीही विसर पडू देऊ नका.
देशात १९५० ते ९० या दशकात ज्यांच्याकडे ताकद होती ते यशस्वी उद्योजक झाले, नंतर ज्ञानाधारित उद्योग यशस्वी झाले. आता सामाजिक उद्योजकता ज्यांच्याकडे आहे ते यशस्वी होतील. जे शार्प असतील, ज्यांच्याकडे नेतृत्वगुण असतील व उद्योगातून मिळालेली संपत्ती समाजाला परत करण्याची दानत ज्यांच्याकडे असेल ते यशस्वी होतील. सामाजिक उद्योजकता या निकषात बसणारे उद्योग कोणते?
पाच निकष आहेत:
१. उद्योग करण्याचा उद्देश काय?
    फक्त पैसे कमवणे हा उद्देश नको.
२. समाजातील कोणती समस्या तुम्ही दूर कराल?
    गावाच्या समस्या दूर करणे हा उद्योग होऊ शकतो. त्यातही नफा आहे.
३. ग्राहकाला तुम्ही काय वचन देत आहात, जे पूर्ण करणार आहात?
    याचा अर्थ जे पूर्ण करता येईल असेच वचन द्या.
४. पुरावा: ते वचन पूर्ण करत आहात याचा पुरावा देता आला पाहिजे.
५. माणसे: माणसे-कर्मचारी यांना पारखून निवडा. आपल्या विचारांशी मेळ साधणारी माणसे काळजीपूर्वक निवडा. त्यांची क्षमता व ज्ञान याही आधी त्यांचे चारित्र्य पारखा.
              यानंतर अतुल राजोळी यांनी श्री. ॲग्नेलोराजेश अथायडे यांची मुलाखत घेतली. अतुल सुरवातीलाच त्यांना म्हणाले यशस्वी उद्योजक होण्यासाठी ध्येय हवे, जिद्द, मेहनत हवी, असे मोघम नको, नेमके बोलू या. पहिला प्रश्न होता, तुमचा जन्म एका सामान्य कुटुबांत झाला, मग उद्योजकतेचे बाळकडू कसे मिळाले? अथायडे म्हणाले आर्थिक दुर्बलता हीच ताकद होती. आई दक्षिणी हिंदू, वडील ख्रिश्चन, दोघांच्या घरून विवाहाला विरोध. आई-वडील गोरेगावला उन्नत नगरमध्ये रहात होते, बरे सुरू होते, ॲग्नेलोराजेश आठवीत असताना ते घर सोडावे लागले, मालवणीला १८० चौरस फुटाच्या घरात जावे लागले. हा फार मोठा सांस्कृतिक धक्का होता. सोळा घरांत मिळून एक टॉयलेट, एक नळ, तिथली भांडणे. पण आई- वडिलांनी शाळा गोरेगावचीच ठेवली हे फार उत्तम झाले. तेव्हाच ॲग्नेलोराजेश यांनी ठरवले परिस्थितीला शरण जायचे नाही, तिच्यावर काबू मिळवायचा. १९८८ साली, आठवीत असताना त्यांनी घरी मदत म्हणून बिंदिया बनवण्याचे काम सुरू केले. दहावीत असताना एम एम मिठाईवालाच्या मालकास इंग्लिश शिकवणे सुरू केले, त्याचे दरमहा ३५० रुपये मिळायचे, तेव्हा ती फार मोठी रक्कम होती. दारोदार जाऊन कपडे विकले. ते म्हणतात कामाबाबत शरम नको, कोणतेही काम करा ते मनापासून आणि उत्तम करा, ते निकृष्ट दर्जाचे केले तर त्याची शरम वाटायला हवी. शिकत रहा, चोवीस तास शिकत रहा हाही त्यांचा मंत्र. नंतर त्यांनी मालाडमधील दालमिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे पंजाबी, मारवाडी, गुजराथी, सिंधी समाजाचे विद्यार्थी होते, उद्योजकतेचे आपोआप संस्कार झाले. देशात संगणकक्षेत्राला भविष्य आहे त्यांना दिसले. पदवीनंतर त्यांनी याच क्षेत्रात जायचे ठरवले. १९९३ साली मुंबईत दंगे झाले. मालवणी त्यासाठी कुप्रसिध्द, पण त्याच सुमारास व्यवसाय सुरू केला. एका मित्राने २२,००० रुपये दिले, एक पीसी घेतला, डेटा प्रोसेसिंगचे काम सुरू केले. काम वाढले तसे एका पीसीचे आठ पीसी झाले. पण हर्षद मेहता घोटाळा उघडकिला आला आणि काम बंद पडले. आता या पीसींचे करायचे काय, त्याचा उपयोग व्हावा म्हणून कॉम्प्युटर कोर्स सुरू केले. मोठ्या कंपन्या ज्या कोर्सची १२,००० रुपये फी घेत तो १,५०० रुपयात देऊ केला. याही वेळेस ल्युपिन फार्माचे सतीश दिवेकर यांचे सहाय्य मिळाले. कॉम्प्युटर कोर्सचा व्यवसाय सुरू केल्यावर रितसर सेंट ॲन्जेलो कॉम्प्युटर इन्स्टिट्युट स्थापन केली.
             अतुल यांचा पुढील प्रश्न होता, सुरवातीची आव्हाने काय होती? ॲग्नेलोराजेश म्हणाले, कर्ज मिळणार नाही की कोणी पैसे देणार नाही हे कळून चुकले होते. १९९४ मध्ये सहयोग पतपेढीने मदतीचा हात पुढे केला, कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना कोर्ससाठी कर्ज देऊन. हे विद्यार्थी गरीबवर्गातील होते, त्यांच्यासाठी ही फार मोठी सोय होती. कोर्स तीन महिन्यांचा, पण कर्ज फेडायची सवलत होती बारा महिन्यात. एकानेही कर्ज बुडवले नाही, हे ते अभिमानाने सांगतात. आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग केल्यामुळे दहा लाख रुपयांची उलाढाल साध्य करता आली. समुद्र किनारी जोरात हवा येते, भिंत बांधू नका तर पवनचक्की उभारा, हे त्यांचे उद्गार!
           व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काही युक्त्या वापरल्या. पेपर, टिव्हिवर जाहिरात परवडणारी नव्हती. एका माणसाकडे रंगाचा डबा दिला, त्याला जागोजागी भिंतीवर संस्थेच्या जाहिराती रंगवायला सांगितले. कोणी रागावला तर त्याची माफी मागायची, त्याची भिंत व्हाईटवॉश करुन दयायची, पण असे थोडेच असायचे. अशारितीने स्वस्तात जाहिराती झाल्या. तीन-चार वर्षांनी महानगरपालिकेला जाग आली, त्यांनी केसेस करणे सुरू केले, पण तोपर्यंत जम बसायला मदत झाली होती. दुसरी युक्ती, एनआयआयटी, ॲपटेक या बड्या कंपन्या पेपरमध्ये पूर्ण पान जाहिरात देत त्यादिवशी सेंट ॲन्जेलोचा माणूस या कंपन्यांच्या दारात आपले पत्रक घेऊन उभे रहायचा. ज्यांना त्या कंपन्यांची फी परवडणारी नव्हती ते सेंट ॲन्ज्रलोच्या कोर्सला प्रवेश घ्यायचे. पण १९९७ पर्यंत चार वर्षात संस्थेचे फक्त ७-८ सेंटर सुरू झाले होते. ॲग्नेलोराजेश त्याबाबत समाधानी नव्हते. त्यांनी फ्रॅंचायझी देणे सुरू केले. ते वीस टक्के रॉयल्टी घ्यायचे, गुंतवणूक फ्रॅंचायझी उद्योजकाची, जागा त्याची, पण त्याला सेंट ॲन्जेलो नावाचा फायदाही व्हायचा, कोर्सचे तयार मॉडेल मिळायचे. यापध्दतीने चांगली वाढ झाली. अनेक ठिकाणी सेंट ॲन्जेलो नाव दिसायला लागले. ‘जितना दिखोगे, उतना बिकोगे’ हा ॲग्नेलोराजेश यांचा यामागे विचार.
                कंपनीत योग्य माणसे निवडण्याबाबत ॲग्नेलोराजेश यांनी सखोल विचार केलेला आहे. एक नासका आंबा सगळी टोपली खराब करतो, तसेच एक वाईट माणूस इतरांना बिघडवतो. असा माणूस कंपनीत नको याबाबत ते दक्ष आहेत. पूर्वी ते स्वत: मुलाखती घ्यायचे. तुमच्यापेक्षा हुशार लोक कंपनीत घ्या, एकदा निवड झाली की त्यांना कंपनीच्या वाढीत पार्टनर बनवा, ते गुणाकार करतील. त्यांना ग्रोथ हवी असते, डेलिगेशन म्हणजे त्यांना फक्त जबाबदारी देणे नव्हे तर ॲथॉरिटीही देणे, स्वत:चे क्लोन तयार करा, ज्यांची मुल्ये तुमच्यासारखी असतील, कर्मचार्‍याने कंपनी सोडली तरी तो बाहेरून तिला सहाय्य करेल असे संबंध असू द्या, अशा अनेक बाबी ते सांगतात. त्यांचा एक स्पष्ट सल्ला आहे, तुमचा कर्मचारी स्पर्धकाच्या पेरोलवर नको, तुमच्या गोपनीय बाबी त्याने बाहेर सांगू नयेत यासाठी चांगली टीम बनवा. जर कंपनीसाठी व तुमच्यासाठी जीव देणारे कर्मचारी हवे असतील तर तुमचीही त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी हवी, तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहात हा विश्वास त्यांच्या ठायी हवा. जो प्रेशरखाली परफॉर्म करतो, तो घडतो, आपला त्याच्यावरील विश्वास हे त्याचे भांडवल. ॲग्नेलोराजेश कंपनीच्या वेगवान प्रगतीचे श्रेय कर्मचारी व ग्राहक यांच्याबरोबरच्या उत्कृष्ट नातेसंबंधाला देतात.
      उद्योजकाला भेटायला जाण्याआधी ते त्याचा रिसर्च करतात. एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवहार करायचा असेल तर आधी त्याच्याबरोबर छोटा व्यवहार करा, त्याचे चरित्र कळेल, हाही त्यांचा सल्ला. तुम्हाला कोणी फसवणार नाही हे बघा. क्लासची फी असो किंवा त्यांचे इतर व्यवसाय, त्यांना ग्राहकांकडून आधी पैसे मिळतात, मग ते सेवा देतात! मुद्दल व नफा, दोन्ही ग्राहकांच्या ताब्यात असा उद्योग नको, असे ते म्हणतात. विद्यार्थीजनांना बारा महिन्यात कर्ज फेडायची सवलत याबाबतीतही हिशेबी जोखीम घेतली असे ते म्हणतात. आज त्यांचे हॉटेल्स आहेत, बांधकाम व्यवसाय आहे, खेळाची मैदाने बनवतात. शिक्षण हा आता त्यांच्यासाठी व्यवसाय नाही तर देवाचे काम आहे, पॅशन आहे. लोकांची गुणवत्ता वाढवून समाजाला योगदान करणे आहे.
     प्रतिकूल परिस्थितीतही सदैव उत्साही असण्याबाबत ते म्हणतात, विचारांची स्पष्टता हवी, मला काय हवे आहे ते मला माहीत आहे. आत्मविश्वास हवा. जगात नकारात्मक काहीच नाही. मालवणी इथे अठरा वर्षे काढली, पण ते सर्वात चांगले दिवस होते, आता आणखी किती खाली जाऊ शकतो? निर्भय बना. स्पर्धेबाबत ते म्हणतात, मला स्पर्धा आवडते, जिथे इतरांचे क्लास आहेत तिथेच मी सेंट ॲन्जेलोचे क्लासेस सुरू केले, मी वेगळा आहे, मला दाखवून द्यायचे होते. माझी फी कमी, माझे विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक संबंध, मग मला चिंता कशाला? स्पर्धकांचे बघून काही शिकता येत असेल तर ते घ्या, स्पर्धेमुळे त्या उद्योगक्षेत्राची वाढ होते.
                समाजसेवा करणे अगदी आवश्यक आहे, असे ते केवळ सांगत नाहीत तर दरवर्षी मोतीबिंदूच्या एक हजार शस्त्रक्रिया करण्यासाठी ते मदत करतात. आदिवासी शाळा, मुलींच्या तंत्रशिक्षणासाठी मदत असे त्यांचे काही उपक्रम आहेत. दान करा, पण सांगू नका अशी शिकवण असते, पण ते म्हणतात, काय दान केले ते अवश्य सांगा, कारण त्यामुळे समाजात दातृत्वगुण वाढेल. एक विशेष म्हणजे तोटा झाला तरी मदत करा असे ते सांगतात. पुढील व्हिजनबाबत ते म्हणतात, मला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनायचे नाही, तर सर्वात आंनदी व्यक्ती व्हायचे आहे, लोकांचे जीवन उज्ज्वल करा, त्यातून पैसा मिळेल, ते कमावलेले पैसे इतरांकडे गेले पाहिजेत, खर्च करा. लोकहितकेंद्री जीवन हा ॲग्नेलोराजेश यांचा मूलमंत्र आहे. शेवटच्या दिवशी ट्रॅफिक जाम झाला पाहिजे या भावनिक नोटवर त्यांच्या मुलाखतीची सांगता झाली.
अश्या प्रकारे हा सोहळा अत्यंत जोशात आणि जल्लोषात साजरा झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बॉर्न टू विन परिवार आपला मन:पूर्वक आभारी आहे.
धन्यवाद.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites