नमस्कार मित्रांनो!
आपण ठिकठीकाणी गोविंदा पथकांद्वारे दहीहंडीचे थर लागताना पाहतो. माझ्या मते व्यावसायिक संस्था उभारण्याचे काही धडे त्यातून प्रत्येक उद्योजक घेउ शकतो व एक आदर्श संघटनेची निर्मिती करू शकतो. चला दहीहंडीतुन हे धडे गिरवुया...
आपण ठिकठीकाणी गोविंदा पथकांद्वारे दहीहंडीचे थर लागताना पाहतो. माझ्या मते व्यावसायिक संस्था उभारण्याचे काही धडे त्यातून प्रत्येक उद्योजक घेउ शकतो व एक आदर्श संघटनेची निर्मिती करू शकतो. चला दहीहंडीतुन हे धडे गिरवुया...
1. स्पष्ट ध्येय असणे व ते साध्य करण्यासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्ती वचनबध्द असणे:
आपल्या संस्थेचे पुढील 3 ते 5 वर्षाचे ध्येय, वार्षिक ध्येय व 3 महीन्यांचे ध्येय स्पष्टपणे ठरले असले पाहीजे व ते संस्थेतील प्रत्येकाला माहीत असले पाहीजे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक वचनबध्द असला पाहीजे. ज्या प्रमाणे दहीहंडीतील थरामधील एखाद्या थरातील व्यक्ति वचनबध्द नसेल तर सगळे थर कोसळू शकतात त्याचप्रमाणे संस्था उभारणीच्या प्रक्रीयेमध्ये होऊ शकते.
2. संघटनेचा पाया जेवढा मजबूत तेवढी संस्था यशस्वी होऊ शकते:
ज्या प्रमाणे जेवढी उंच दहीहंडी तेवढा मोठा पाया. त्याच प्रमाणे जेवढी मोठी व् यशस्वी संघटना उभारायची असेल तेवढा मोठा व भक्कम पाया बांधणी होणं गरजेचं आहे. व्यावसायिक संघटनेचा पाया, हा विचारसरणी व मुल्यांवर अवलंबुन असतो. संघटनेची विचारसरणी व मूल्य ठरवल्याने दूरगामी यशासाठी आपण सज्ज होतो.
3. सांघिक कामगिरी:
एकाच व्यक्तिद्वारे दहीहंडी फोडणं अशक्य! सांघिक कामगिरीनेच ते शक्य होऊ शकतं. हंडी फुटण्या मागे प्रत्येक व्यक्तीचे योगदान असते. उद्योजकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की तो एकटा एका विशिष्ट पातळी पर्यंतच यशस्वी होऊ शकतो. दूरगामी यश मिळवण्यासाठी चांगला संघ निर्माण करणं गरजेचं आहे.
4. संघातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका व जबाबदारी ठरवा:
संघटनेमध्ये फक्त लोकं जमा करून चालत नाही. त्यामुळे केवळ गर्दी होईल. ज्याप्रमाणे हंडीमधे थर असतात व प्रत्येक व्यक्तीचे विशिष्ट स्थान ठरलेले असते, त्याच प्रमाणे संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तिची भूमिका व जबाबदारी आधीपासुनच ठरली असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याची भूमिका ठरवणं महत्त्वाचं आहे.
5. श्रेयाच्या व प्रसिद्धीच्या मोहात पडू नका:
हंडी फोडण्यामध्ये दहीहंडीच्या थरातील प्रत्येकाचे योगदान असते, परंतु दहीहंडी एकच व्यक्ती फोडते. लोकांचं लक्ष त्या एकाच व्यक्तीकडे असते. पारितोषिक घेण्यासाठीसुध्दा एकच व्यक्ती व्यासपीठावर जाते. परंतु कोणत्याही गोविंदाच्या मनात त्याबद्दल द्वेष नसतो. त्याचप्रमाणे संघटनेमध्ये भुमिकेनुसार काही व्यक्तिंना प्रसिध्दी मिळते परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहीजे की प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळे संस्था यशस्वी होऊ शकते.
6. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या:
दहीहंडी फोडण्याच्या प्रक्रीयेमध्ये आपल्याला लागेल, दुखेल, आपण पडू याची भिती न बाळगता गोविंदा त्याची मजा लुटतात. धमाल करतात. जर थर कोसळला तर त्याचे विश्लेषण करून पुन्हा थर रचतात व हंडी फोडतात. त्याचप्रमाणे व्यवसायात उतार-चढाव हे येतच असतात, संघातील प्रत्येक सदस्याने आनंदाने संस्था उभारणीच्या प्रक्रीयेमध्ये सामिल झाले पाहिजे. अपयश जरी आलं तरी त्यातून शिकून पुन्हा नवीन जोशात कामाला लागलं पाहीजे.
7. लिडरची महत्त्वाची भूमिका:
गोविंदा पथकाला थर रचण्यासाठी त्यांचा लिडर मार्गदर्शक सूचना देत असतो. सर्व गोविंदा त्या सुचनांचं पालन करत असतात. लिडर हां एकच असणं गरजेचं असतं. त्यामुळे सुचनांबद्दल गोंधळ निर्माण होत नाहीत. सर्व गोविंदांनी लिडरला स्विकारणं अत्यंत महत्त्वाचं असतं अन्यथा तो नामधारीच राहतो. संघटना उभारणीसाठी एका कर्तुत्ववान लिडरची गरज असते. लिडर स्वत: संघटना उभारणीसाठी प्रशिक्षित असला पाहीजे किंवा त्याने स्वत:ला त्यासाठी तसं घडवलं पाहीजे.
मित्रांनो, प्रत्येक लघूद्योजकाने दहीहंडीचा हा धडा घेतला पाहीजे व एक आदर्श संघटना उभारण्यासाठी सज्ज झालं पाहीजे... शुभेच्छा!
Just Do It...!!!
Just Do It...!!!
- अतुल राजोळी
BORN2WIN
No comments:
Post a Comment