आधी इतरांना समजुन घ्या - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

24 March 2015

आधी इतरांना समजुन घ्या - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या सदरातील 'आधी इतरांना समजुन घ्या' या विषयावरील दिनांक २३ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

"प्लीज मला समजुन घ्यायचा प्रयत्न कर!"
"तु मला कधीच समजुन घेत नाहीस"
"He will never understand my feelings."
मित्रांनो ही वाक्य बर्‍याच वेळा आपल्या कानावर पडत असतील, किंवा आपण सुध्दा कधीतरी, कोणाबद्दल तरी, कळत नकळत हे असे बोलत असु. आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटत असतं की इतर व्यक्तींनी आपल्याला समजुन घेतलं पाहिजे. खास करुन आपले कुटुंबिय, आपला मित्रपरिवार व आपले सहकारी ज्यांच्या बरोबर आपण दिवसातील जास्त वेळ व्यतित करतो. सहाजिकच आहे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींनी जर आपल्याला समजुन घेतलं तर आपलं जगणं किती सुखकर होईल. परंतु प्रश्नं असा पडतो की इतरांनी आपल्याला समजुन घेण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? मित्रांनो, इतरांनी जर आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर सर्वात रामबाण मार्ग म्हणजे, 'आधी इतरांना समजुन घ्या!'

आपण जर आधी इतरांना समजुन घेण्यासाठी पुढाकार घेतला तर इतर देखिल आपल्याला समजुन घेण्यासाठी पुढे सरसावतात. जर आपण त्यांना समजुन घेत आहोत तर त्यांना सुध्दा आपल्याला समजुन घेण्याची नैतिक जबाबदारी जाणवते आणि ते आपल्याला समजून घेतात. जसं आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं. तसचं इतरांनाही वाटत असत की आपण त्यांना समजुन घ्यावं. म्हणून आपण आधी इतरांना समजुन घेण्यासाठी स्वतःमध्ये समजुतदारपणा आणला पाहिजे. परंतु आणखी एक प्रश्न पडतो की इतरांना समजुन घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मित्रांनो, समजुन घेणं म्हणजेच इतर व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये आहेत ज्या अनुभवातून सध्या जात आहेत, त्याठिकाणी आपण स्वतःला ठेवून कल्पना करणे की जर आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं. जेव्हा आपण स्वतःला दुसर्‍या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करतो त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीच्या भावनांची जाणिव होते व आपण त्या व्यक्तीला समजुन घेऊ शकतो. परंतु आणखी एक प्रश्न निर्माण होतो की त्या व्यक्तीची परिस्थिती किंवा अनुभव आपल्याला कळणार कसा? आपण अंतरज्ञानी नाही आहोत! म्हणूनच जर आपल्याला इतर व्यक्तींना समजुन घ्यायचं असेल तर आपण त्या व्यक्तीचं बोलणं 'कान आणि मन लावून ऐकलं' पाहीजे. जेव्हा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील व्यक्ती किंवा आपला सहकारी त्याच्याबद्दल सांगत असेल त्यावेळी त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. त्या व्यक्तीच्या भावना समजुन घ्या. फक्त ऐकू नका. कान व मन लावून ऐका. फक्त कानाने ऐकल्याने आपल्याला माहीती मिळते परंतु कान व मन लावून ऐकल्याने त्या व्यक्तीच्या भावनांची आपल्याला जाणिव होते, व आपल्याला व्यक्तीच्या खर्‍या परिस्थितीची जाणिव होते. इतर व्यक्तींचं म्हणणं ऐकल्यामुळे समजुन घेतल्यामुळे सहाजिकच त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी व मैत्री निर्माण होते. त्यामुळे आपलं म्हणणं ऐकण्यासाठी ती व्यक्तीसुध्दा पुढाकार घेते.

मित्रांनो, ऐकणं हे कोणत्याही संभाषणामध्ये बोलण्याइतकचं प्रभावी ठरु शकतं. आपल्याला देवाने दोन कान व एक तोंड दिलं आहे. बहूतेक हाच संदेश त्यातुन आपण घ्यायला हवा की त्याच प्रमाणामध्ये बोला आणि ऐका. कमी बोला आणि जास्त ऐका! आपल्या स्नेहसंबंधांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. चांगला श्रोता म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल, तेव्हा कान व मन लावून ऐका.
मित्रांनो, आज मी आपल्याला एक आव्हान देतो, आजच व आत्तापासुनच दुसर्‍यांचं म्हणणं शांतपणे, कान व मन लावून ऐकण्याचा निर्णय घ्या. जेव्हा दुसरी व्यक्ती बोलत असेल तेव्हा मनामध्ये आपलं उत्तर तयार करु नका. जेव्हा एखादी व्यक्ती आपले विचार मांडत असेल तेव्हा दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नका; फक्त मनापासुन ऐका. त्या व्यक्तीला महत्त्व द्या. प्रत्येक व्यक्तीच्या मनात बर्‍याच गोष्टी दडल्या आहेत. त्यांना व्यक्त व्हायचं आहे. त्यांना वाट करुन द्या. फक्त एवढं करुन बघा आणि आपल्या स्नेहसंबंधांमध्ये चमत्कार अनुभवा. इतर व्यक्ती देखिल आपल्याला महत्त्व देऊ लागतील व आपलं म्हणणं, ऐकतील. आपल्याला समजुन घेतील. जर इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर आधी इतरांना समजुन घ्या.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites