April 2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

29 April 2015

व्यवसाय विकासाचा आराखडा - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! क्रिकेटच्या दोआंतरराष्ट्रीय संघांमध्ये जर सामना होणार असेल तर सामन्यापूर्वी त्या संघाचा कप्तान व कोच मिळून आपल्याला हा सामना कसा जिंकता येईल याबाबत चर्चा करत असतील की नाही? काय वाटतं तुम्हाला? एखाद्या संघाचं सामना खेळण्यामागचं उद्दीष्ट काय असंतं? तो सामना जिंकावा हेच प्रत्येक संघाचं उद्दीष्ट असतं. सामन्याच्या आधी संघाचा कप्तान, कोच व इतर खेळाडू मिळून सामना जिंकण्यासाठीचा आराखडा म्हणजेच प्लॅन तयार करतात. ज्या संघाचं प्लॅनिंग जबरदस्त असते त्याच संघाला मैदानात योग्य रणनीतीच्या आधारावर सामना जिंकता येतो. याचाच अर्थ फक्त खेळ खेळता येणं हे सामना जिंकण्यासाठी पुरेसं नाही. सामना जिंकण्यासाठी प्लॅनिंग करता आलं पाहीजे. त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.
व्यवसायाचा आराखडा हा व्यवसाय व्यवस्थापनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. प्लॅनिंग दरम्यान व व्यवसायाचे भविष्याचे चित्र आधीपासुनच तयार केले जाते, व्यवसायातील ध्येय ठरवले जाते व ते साध्य करण्यासाठी योग्य - कृती आराखडा तयार केला जातो. व्यवसायाअंतर्गत प्लॅनिंग निरनिराळ्या पातळीवर व निरनिराळ्या स्वरुपात केले जाते. परंतु उद्देश हाच असतो की व्यवसायाचे ध्येय साध्य करणे.

व्यावसायिक आराखड्याचे प्रकारः

1. Strategic Planning: स्ट्रॅटेजिक प्लॅन हा संपुर्ण व्यवसायाला लक्षात घेऊन बनवला जातो. स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये व्यवसायाची दूरगामी उद्दीष्टे ठरवली जातात व त्याला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवले जाते. त्याच प्रमाणे वार्षिक ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या विविध विभागांना अनुसरुन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. व्यवसायामध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी प्राधान्यता ठरवल्या जातात. स्ट्रॅटेजिक प्लॅन कंपनीचे विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मिळून बनवतात. व्यवसायची वार्षिक विक्री ध्येय, नफा प्राप्ती, उत्पादन क्षमता, मार्केटींग, ग्राहकसेवा, बजेटींग, भांडवल उभारणी, इत्यादी महत्त्वाच्या विभागांबद्दल आगामी वर्षाचे ध्येय व धोरणे ठरवली जातात.
उदाहरणार्थ: एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वार्षिक ध्येय रु. ५० कोटी एवढे ठरवण्यात आले असेल तर ते साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये काय महत्त्वाचा बदल करावा लागेल मार्केटिंगसाठी काय नविन करावे लागेल? आवश्यक मनुष्यबळ किती लागेल? भांडवल उभारणी कशी व कधी करावी लागेल इत्यादी बाबतचे महत्त्वाचे निर्णय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दरम्यान घेण्यात येतात. या प्लॅनला संलग्न असा प्रत्येक विभागासाठी वेगळा प्लॅन बनवावा लागतो तो म्हणजे Tactical Plan.

2. Tactical Plan: स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य करण्यासाठी व्यवसायातील विशिष्ट विभागाद्वारे Tactical Plan तयार करण्यात येतो. व्यवसायाच्या विभागांअंतर्गत विशेष निर्णय घेण्यात येतात, जेणे करुन व्यवसायाचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. Tactical Plan मध्यम पातळीच्या व्यवस्थापकांद्वारे बनवला जातो. Tactical Plan व्यवसायाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनशी संलग्न असतो.
उदाहरणार्थ: व्यवसायाचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेमध्ये ३०% वाढ होणे आवश्यक आहे, अशी जर स्ट्रॅटेजिक प्लॅनमधील प्राधन्यता असेल तर ती साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाअंतर्गत Tactical Plan बनविण्यात येईल. त्या अंतर्गत पुरवठादार, उत्पादन प्रक्रीया, नविन यंत्रसामुग्री विकत घेणे, डिलिव्हरी प्रक्रीया, दर्जा इ. बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. त्यांच्या अंमलबजावणीमुळे स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य होतो. Tactical Plan ची वास्तवात कृती स्वरुपात अंमलबजावणी होण्यासाठी Operational Plan तयार करवा लागतो.

3. Operational Plan: व्यवसायातील दैनंदिन कामकाज ज्या प्रक्रीयेद्वारे चालते त्याला Operational Plan म्हणतात. Operational Plan मुळे Tactical Plan व्यवस्थित पार पडतो. Operational Plan कर्मचार्‍यांद्वारे बनवला जातो. ठरवलेल्या Strategic व Tactical Plan ची अंमलबजावणी Operational Plan मुळे होते. ठरवलेल्या सर्व निर्णयांना अनुसरुन नेमकी कृती या पातळीवर होते.
उदाहरणार्थ: कंपनीचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाने जे निर्णय Tactical Plan दरम्यान घेतलेत्याची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीला देण्यात येते, त्याची कालमर्यादा ठरवण्यात येते व त्याचा आढावा घेतला जातो.

4. Contingency Plan: ठरविलेल्या प्लॅननुसार जर गोष्टी झाल्या नाहीत तर आधीपासुन ठरवलेला दुसरा प्लॅन म्हणजेच Contingency Plan मित्रांनो, Tactical Plan व Operational Plan हे खरं तर व्यवसायाचा Strategic Plan लाच संलग्न असे प्लॅन असतात. Strategic Plan खर्‍या अर्थाने कंपनीला दिशा दाखवणारा असतो परंतु त्या दिशेने कंपनी नेण्याची कृती मात्र Tactical आणि Operational Plan ठरवतात. व्यवसायाचा Strategic Plan विकासाची दिशा दाखवतो व व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरतो. Strategic Plan तयार करताना व्यवसायाच्या दुरगामी भव्य ध्येयाचा विचार करणे गरजेचे आहे. खालिल पायर्‍यांचा वापर करुन Strategic Plan तयार केला जाऊ शकतो.
१. व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवणे.
२. SWOT Analysis (आगामी लेखात सखोल माहीती मिळवू.)
३. व्यवसायाचा USP निर्माण करणे (आगामी लेखात या संदर्भात माहीती मिळवू.)
४. व्यवसायाचे भव्य ध्येय साध्य करण्यासाठी पुढील ३ ते ५ वर्षात कोणते ध्येय साध्य केले पाहिजे ते ठरवणे.
५. व्यवसायाची बाजारपेठ ठरवणे.
६. ३ ते ५ वर्षांच्या ध्येयाला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवणे.
७. वार्षिक ध्येयाला अनुसरुन तिमाही किंवा मासिक ध्येय ठरवणे.

बर्‍याच लघु व्यवसायामध्ये असे आढळून येते की उद्योजक आपल्या व्यवसायाचा विकास आराखडा तयारच करत नाहीत, केला तरी तो लिखित स्वरुपात नसतो. त्यामुळे कित्येक लघु उद्योजकांचा व्यवसाय आहे तेवाढाच राहतो. व्यवसायाचा विकास होत नाही टर्नओवर, ग्राहकांची संख्या सर्व जैसे थे! अश्या व्यवसाया अंतर्गत दिशाहीन कामकाज असते. कर्मचारी सुध्दा थकलेले व गोंधळलेले असतात. सद्यपरिस्थिती हाताळण्यावर जास्त भर या व्यवसायांचा असतो. बाजारपेठेत संधी असुन सुध्दा असे व्यवसाय प्रगती करु शकत नाहीत.

मित्रांनो, मी आपल्याला आवाहन करु इच्छीतो की, व्यवसायाच्या विकासाचा आराखडा बनवा. कसा बनवावा हे माहीत नसेल तर शिका. गप्प बसु नका. आराखडा कागदावर उतरवा व त्यावर अंमलबजावणी करुन कृती करा.
पुढील लेखामध्ये आपण व्यवसायाचे SWOT Analysis बद्दल जाणून घेऊया.

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

22 April 2015

व्यवसायाचे भव्य ध्येय - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाचे भव्य ध्येय' या विषयावरील दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार उद्योजक मित्रांनो! ४ जुलै १९५२, या दिवशी इंग्लंड मध्ये फ्लॉरेंस चॅडविक नावाच्या मुलीने कॅटलिना खाडी पोहून पार करण्याचे ठरवले. असं करणारी ती पहिलीच महीला जलतरणपटू बनणार होती. लाखो लोकांचे लक्ष तिच्या या विक्रमाकडे लागले होते. वातावरण दाट धुक्यामुळे अंधुक होते, कडाक्याची थंडी होती. फ्लॉरेंस अश्या परिस्थितीत पोहत असताना आपल्या गॉगल मधून समोर पहायचा प्रयत्न करत होती, परंतु तिला किनाराच दिसत नव्हता. समोर काहीच दिसत नाही म्हणुन तिने माघार घेतली. खरं तर ती किनार्‍यापासुन फक्त अर्धा मैल अंतरावर होती. ती सहजासहजी हार मानण्यारातली नव्हती. दोन महीन्या नंतर तिने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी मात्र समुद्रात भरती होती परंतु वातावरण अंधुक नव्हते. तिला किनारा स्पष्ट दिसत होता. अश्या परिस्थितीत सुध्दा तिने कॅटलीना खाडी पार केली व पुरुषांचा विक्रमसुध्दा मोडून काढला! फ्लॉरेंसच्या पहील्या प्रयत्नात अपयश आणि दुसर्‍या प्रयत्नात यश का आले? अर्थातच दुसर्‍या प्रयत्नाच्यादरम्यान तिला किनारा स्पष्ट दिसत होता! दुसर्‍या प्रयत्नाच्या दरम्यान पोहत असताना जरी जास्त परिश्रम करावे लागले तरी फ्लॉरेंसला तिचे ध्येय स्पष्ट दिसत होते.
माझ्यामते कोणत्याही उद्योजकाला या उदाहरणातून महत्त्वाचा धडा शिकला पाहिजे. व्यवसाय करत  असताना आपल्या आजुबाजुला प्रचंड अडचणी निर्माण होतात. बर्‍याच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपल्याला फार परिश्रम घ्यावे लागतात. परंतु आपल्या समोर आपल्याला जिथे पोहोचायचं आहे ते ध्येय जर निश्चित असेल तर आपण त्या अल्पकालीन अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनतो. उद्योजकाला जर आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल व त्याच्या मार्गातील अडथळ्यांवर  मात करुन जबरदस्त प्रगती करायची असेल तर  त्याने आपल्या 'व्यवसायाचे भव्य ध्येय' निश्चित केलेच पाहिजे.
मित्रांनो, व्यवसायाचे भव्य ध्येय म्हणजे व्यवसायाने आपल्या दुरगामी प्रगती दरम्यान असे काय साध्य केलेले असेल ज्याच्यामुळे आपला व्यवसाय सुरु करण्यामागचा खरा उद्देश साध्य झाला असं आपण म्हणू? आज पासुन किमान १० वर्षांनंतर किंवा २० वर्षांनंतर व्यवसायाने काय साध्य केले पाहिजे हे स्पष्टपणे ठरवणे व आपल्या व्यवसायातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात ते रुजवणे म्हणजेच व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवणे.

मी आतापर्यंत ज्या व्हिजनरी व्यवसायांचा व यशस्वी उद्योजकांचा अभ्यास केला त्या दरम्यान मला ही गोष्ट प्रामुख्याने आढळली की, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एक स्पष्ट व भव्य ध्येय असावं लागतं. असं भव्य ध्येय जे व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीला ढवळून काढेल. असं ध्येय जे व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमता रुंदावण्यासाठी भाग पाडेल. असं ध्येय जे व्यवसायातील प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणेल. असं ध्येय जे साध्य करण्याची प्रत्येकाची मनापासुन इच्छा असेल. असं ध्येय जे साध्य झाल्यावर आपल्याला प्रचंड आनंद प्राप्त होईल. असं ध्येय जे आपण मनातल्यामनात स्पष्टपणे बघु शकू.

मित्रांनो, १९४५ साली मसुरु इबुका यांनी 'सोनी' कंपनीची स्थापना केली. त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. अश्या बिकट परिस्थितीत 'सोनी'ची मुहुर्तमेढ झाली. कालांतराने अकियो मोरिता यांचा 'सोनी'मध्ये प्रवेश झाला. 'सोनी'ची सुरुवात सात लोकांनी मिळून त्यांच्या वैयक्तिक बचतीतुन जवळपास १,६०० डॉलर्स इतक्या भांडवालातून केली. फक्त सात जणांनी मिळून ही कंपनी सुरु झाली, काहीतरी करुन दाखवण्याच्या उमेदीने, जगात आपला ठसा उमटवण्याच्या जिद्दीने अक्षरशः झपाटून त्यांनी काम केले! फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. त्यादरम्यान 'Made in Japan' चा अर्थ असा होता की 'स्वस्त व तकलादू उत्पादने' परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे 'भव्य ध्येय' होते की 'जगातील जपानची प्रतिमा बदलणे.' सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन 'जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा' अशी करायची होती. आज पासुन ६० वर्षांपूर्वी निश्चित केलेलं भव्य ध्येय त्यांनी साध्य केलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत 'सोनी'ने प्रगती केली.
मित्रांनो, भारतातील उद्योगक्षेत्रातील बलाढ्य कंपनी म्हणजे 'रिलायन्स'! अल्पावधीत प्रचंड प्रगती करणारी ही जगातील फार थोड्या कंपनीपैकी एक! रिलायन्सने इतकी भन्नाट प्रगती कशी काय केली असेल? रिलायन्सचे जनक श्री. धीरुभाई अंबानी,  गुजरा मधल्या खेडेगावात अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेले, शिक्षण अर्धवट. या माणसाने इतका मोठा पराक्रम केला कसा? याचं उत्तर खुद्द धीरुभाईच आपल्या आत्मचरित्रात सांगतात. ते म्हणतात 'स्वप्नं पहा, मोठी भव्य दिव्य स्वप्नं पहा, डोळे उघडे ठेऊन व दिवसा ढवळ्या स्वप्नं पहा!' खरंच किती माणसं स्वप्नं बघतात? आणि बघीतलीच तर मोठी, भव्य दिव्य स्वप्नं किती माणसं बघत असतील? फार थोडी! बहूतेक म्हणूनच धीरुभाईंनी जे यश मिळवलं ते फार दुर्मिळ आहे. धीरुभाईंनी खुप मोठी स्वप्नं पाहीली व ती साध्य करण्यासाठी अपार कष्ट केले. आज रिलायन्स संपुर्ण भारताच्या GDP (Gross Domestic Product) मध्ये ३% चे योगदान देते.

उद्योजकांनो व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवा. आपल्या व्यवसायाने आज पासून १० किंवा २० वर्षात काय साध्य केले पाहिजे ते ठरवा. सद्यपरिस्थिती काहीही असो, आपला भुतकाळ व वर्तमानाच्या पलिकडे जाऊन विचार करा. भव्य ध्येयामुळे आपण व आपल्या टिमला मोठा विचार करण्याशिवाय पर्यायच उरत नाही! याचा अर्थ भव्य ध्येय साध्य करणे सोपे असते असे मुळीच नाही. सद्य परिस्थितीला लक्षात घेता ते आपल्या आवाक्या बाहेरचे असते. परंतु कंपनी अंतर्गत सर्वांचा ठाम विश्वास असला पाहिजे, की 'आपण हे साध्य करु शकतो' आपण ते साध्य करण्यासाठी वचनबध्द असलो पाहिजे आणि जोखिम घेण्यास तयार असलो पाहीजे. त्याच बरोबर व्यवसायाचे भव्य ध्येय 'व्यवसायाच्या पायाभुत तत्त्वप्रणालीशी' संलग्न असले पाहीजे.

मित्रांनो, ज्याप्रमाणे फ्लॉरेंस चॅडविकने अत्यंत बिकट परिस्थितीत सुध्दा, किनारा स्पष्ट दिसत असल्या कारणाने पोहून आपला विक्रम प्रस्थापित केला, त्याच प्रमाणे आजच्या खवळलेल्या युगात व्यवसायाच्या भविष्याचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसलं पाहिजे. आपल्या मनात आपण भव्य ध्येयाच्या स्वरुपात ते कोरलं पाहिजे. जर आपण आपले भव्य ध्येय स्पष्टपणे पाहू शकलो तर कितीही संकटे आली तरी आपण नक्कीच त्यावर मात करु, कारण भविष्याचं उज्ज्वल चित्र आपल्याला साद देत असेल आणि ते वास्तवात उतरवण्याची प्रचंड ओढ़ आपल्याला लागलेली असेल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.http://goo.gl/uNdKBy



15 April 2015

व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसायाचा पायाभूत उद्देश - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसायाचा पायाभूत उद्देश' या विषयावरील दिनांक १५ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो! व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली: भाग १ मध्ये आपण पायाभूत मुल्यांबद्दल समजून घेतलं. या लेखामध्ये आपण व्यवसायच्या पायाभूत उद्देशाबद्दल समजून घेऊया.

मित्रांनो एखादं जहाज समुद्रातून प्रवास करत असताना, समुद्र कधी शांत असतो तर कधी प्रचंड खवळलेला असतो. रात्रीच्या वेळी समुद्र खवळलेला असताना जहाज हवे त्या दिशेने नेणं आव्हानात्मक असतं परंतु अश्यावेळी जहाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी 'दिपस्तंभ' मार्गदर्शक ठरतो आणि वादळी वातावरणातून जहाजाला आपला मार्ग काढता येतो. तसेच एखादा वाटसरु प्रवास करताना 'होकायंत्राचा' वापर करुन आपली वाट शोधू शकतो. ज्या प्रमाणे 'दिपस्तंभ' किंवा 'होकायंत्र' प्रवासा दरम्यान दिशा दाखवण्याचे महत्त्वपुर्ण काम करतात त्याच प्रमाणे 'व्यवसायाचा पायाभूत उद्देश' व्यवसायाला सतत योग्य दिशेने प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.
'व्यवसायाचा पायाभूत उद्देश' म्हणजेच व्यवसाय अस्तित्वात असण्यामागचे खरे कारण होय. परिणामकारक पायाभूत उद्देश संस्थेतील व्यक्तींना आपण करत असलेल्या कामामागचे खरे महत्त्वाची जाणीव करुणा देते त्यामुळे त्यांना आंतरिक प्रेरणा मिळते. व्यवसायाचे ध्येय म्हणजे व्यवसायाचा पायाभूत उद्देश नाही. पायाभूत उद्देश व्यवसायाच्या अस्तित्वाचे मुळ असते आणि कोणत्याही व्यवसायाचा मुळ उद्देश हा फक्त पैसा कमवणे नसतो. व्यवसाय अस्तित्वात असण्यामागचे खरे कारण आणखी भक्कम असेल तरच व्यवसाय दुरगामी प्रगती करु शकेल.

मित्रांनो, व्हिजनरी कंपन्या ज्या वर्षानुवर्षे जगात यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत, त्यांचा अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे व्यवसाय सुरु होण्याचा त्यांचा प्रमुख हेतू आजही तसाच कायम आहे. हे व्यवसाय सुरु होऊन कित्येक वर्षे झाली परंतु ज्या पायाभूत उद्देशाने व्यवसायाच्या संस्थापकाने व्यवसाय सुरु केला तो उद्देश आजही संस्थेला प्रगती करण्यासाठी कारणीभूत ठरतो.

उदाहरणार्थ, इंन्फोसिस या भारतीय बहुराष्ट्रीय आय. टी. कंपनीच्या अस्तित्वात असण्यामागचा पायाभूत उद्देश आहे. "Building Tomorrow's Enterprise Today". इंन्फोसिस ही आज एक यशस्वी व जगामध्ये आदर प्राप्त झालेली कंपनी आहे. त्यांचा पायाभूत उद्देश त्यांना सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती (Innovation) करून विविध कंपन्यांच्या व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरित करतो. 'भविष्यातील व्यवसाय निर्माण करण्याचा' त्यांचा पायाभूत उद्देश खर्‍या अर्थाने ही इंन्फोसिस कंपनी जगते. श्री. नारायण मुर्थी यांनी इंन्फोसिसचा पाया रचला आणि याच पायावर आज इंन्फोसिस प्रगती करत आहे.
मित्रांनो, 'वॉल्ट डिस्ने' या प्रख्यात कौटुंबिक करमणूक करणार्‍या कंपनीचा पायाभूत उद्देश आहे, 'Making people happy!', 'लोकांना आनंदी करणे' हा 'वॉल्ट डिस्ने' या कंपनीचा ध्यास आहे. याच ध्यासापोटी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांव्दारे ही कंपनी लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे. अ‍ॅनिमेशन फिल्मस, चित्रपट, टिव्ही चॅनल्स्, अ‍ॅम्युजमेंट पार्क, खेळणी इ. सेवांव्दारे आपला पायाभूत उद्देश साध्य करण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. कंपनीचे संस्थापक स्वतः श्री. वॉल्ट डिस्ने यांची नेहमी हीच तळमळ असायची. आज ते जिवंत नाहीत परंतू त्यांची कंपनी त्यांनी जडण घडण केलेल्या पायाभूत उद्देशाभोवतीच कार्यरत आहे. 'Making people happy' हे वाक्य जणू 'वॉल्ट डिस्ने' ला दिपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवते.
मित्रांनो, भारतातील प्रसिध्द ब्रॅण्ड व यशस्वी कंपनी 'महींद्रा' या कंपनीचा पायाभूत उद्देश आहे, 'Challenging conventional thinking & innovatively use all our resources to drive positive change in the lives of our stakeholders & communities across the world, to enable them to Rise'. महींद्राचे सध्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद महींद्रा कंपनीच्या पायाभूत तत्त्वप्रणालीला प्रचंड महत्त्व देतात. महींद्रा कंपनीच्या आगामी योजना त्यांच्या पायाभूत उद्देशाला अनुसरुनच निर्माण केल्या जात आहेत. इतकच नव्हे तर 'Mahindra Rise' हे त्यांचे बँड स्लोगन व कँपेन सुध्दा त्यांच्या पायाभूत उद्देशाला अनुसरुनच आहे. त्यामुळे व्हिजनरी कंपन्यांमध्ये पायाभूत उद्देशाला किती महत्त्व दिले जाते हे आपल्याला आता लक्षात आले असेलच.
पायाभूत उद्देश व्यवसायाच्या दुरगामी अस्तित्वाचा विचार करुन तयार केलेला असला पाहिजे. कोणत्याही विशिष्ट उत्पादन व सेवेचा त्यामध्ये उल्लेख नसावा. पायाभूत उद्देश व व्यावसायिक ध्येय, कृती योजना यांमध्ये घोळ घालू नये. ध्येय, कृती योजना, उत्पादने व सेवा भविष्यात कित्येक वेळा बदलू शकते परंतू पायाभूत उद्देश हा दुरगामी असतो. तो सहसा बदलत नाही.

मित्रांनो, मी माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचा पायाभूत उद्देश नक्की कसा ओळखायचा, ठरवायचा व शब्दबध्द करायचा यावर उद्योजकांना मार्गदर्शन करतो. त्याच बरोबर व्यवसायामध्ये पायाभूत उद्देशाची अंमलबजावणी करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण सुध्दा देतो.

मी आपल्याला आवाहन करतो की आपण जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे अस्तित्वात असण्यामागचं नेमकं कारण ओळखा व ठरवा! ते योग्य शब्दाचा वापर करून लिहून काढा. आपल्या व्यवसायाचा हाच पायाभूत उद्देश आहे. आपण रोज प्रेरित होऊन कार्यरत असण्यासाठी, व्यवसायाच्या सर्व कर्मचार्‍यांमध्ये आंतरीक ऊर्जा निर्माण होण्यासाठी जबरदस्त कारण असणे गरजेचे आहे. व्यवसायाला पायाभूत उद्देश प्राप्त झाल्यामुळे आपण काम करतोय असं वाटणार देखिल नाही. उलट आपल्या कामाला अर्थ प्राप्त होतो व व्यवसायाच्या अस्तित्वाला स्फुर्ती मिळते. कोणतेही मोठे आवाहन पेलण्याची ताकद मिळते. दुरगामी यश मिळवायचं असेल तर बळ आणि प्रेरणा ही अंतरमनातूनच आली पाहिजे. नेमकं हेच पायाभूत उद्देशामुळे प्राप्त होतं.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.

08 April 2015

व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य' या विषयावरील दिनांक ८ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो! कोणतीही गगनचुंबी इमारत बांधणं कश्यामुळे शक्य होतं? निश्चितच त्या इमारतीच्या भक्कम पायामुळे! कोणताही आर्किटेक्ट उंच इमारतीचं डिझाइन तयार करताना त्या इमारतीचा पाया खोल आणि भक्कम करण्यावर जास्त भर देतो. इमारत बांधकामाच्या कामाची सुरुवात देखिल आधी पायाभरणीनेच होते. पायाभरणीच्या कामाला वेळ देखिल जास्त लागतो. एखादं उंच, बहरलेलं झाड आपण पाहतो. वर्षानुवर्ष ते झाड उभं असतं. ऊन-पाऊस बाह्य परिस्थितीचा विशेष फरक त्या झाडावर पडत नाही कारण त्या झाडाची मुळं जमिनीमध्ये खुप खोलवर पसरलेली असतात. खोलवर घट्ट रुतलेल्या मुळांमु़ळेच झाड मोठं होतं व वर्षानुवर्षे उभं राहतं. पडत नाही! 

मित्रांनो, ज्या प्रमाणे उंच इमारत बांधण्यासाठी व बहरलेल्या झाडासाठी त्यांचा पाया किंवा मुळे मजबुत असणं महत्त्वाचं असतं, त्याच प्रमाणे यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी व दुरगामी व्यावसायिक यश मिळवण्यासाठी व्यवसायाची 'पायाभूत तत्त्वप्रणाली' महत्त्वाची असते. व्यवसायात निर्माण होणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्णायक भुमिका बजावते. बाजारपेठेमध्ये किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणतेही बदल घडून आले तरी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली कायम राहते व व्यवसायाला वर्षानुवर्षे जीवंत ठेवते. पायाभूत तत्त्वप्रणाली व्यवसायाला 'आपण कोणत्या गोष्टींवर ठाम आहोत (पायाभूत मुल्यं) आणि आपल्या अस्तित्वात असण्यामागचा नेमका उद्देश काय (पायाभूत उद्देश)' या बद्दल स्पष्ट संकल्पना देते. व्यवसायाची पायाभूत मूल्ये व उद्देश, व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्माण करतात. ही तत्त्वप्रणाली वर्षानुवर्षे तशीच असते ती कधीच बदलत नाही. जगातील यशस्वी व्यवसाय जे ५०, १०० किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ अस्तित्वात आहेत, त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली आजही तशीच कायम आहे. उत्पादने व सेवा बदलतात, बाजारपेठ बदलते, व्यवसायाचे नेतृत्व व व्यवस्थापन यंत्रणा बदलते, टेक्नोलॉजी बदलते, व्यावसायिक कृतीआराखडा बदलतो परंतु पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र कधीच बदलत नाही. टाटा समूहाचे जमशेदजी टाटा व जे. आर. डी. टाटा आज हयात नाहीत परंतु त्यांनी टाटा समूहाला पायाभूत तत्त्वप्रणालीच्या स्वरुपात दिलेला 'वसा' आजही तसाच अस्तित्वात आहे. टाटा उद्योग समूह १०० वर्षांपेक्षा जुना आहे व वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे परंतु त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र तीच आहे. ती बदलली नाही.

या लेखामध्ये आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीतील पहिला भाग म्हणजेच 'पायाभूत मुल्ये' या बद्दल जाणून घेउया.
पायाभूत मुल्ये आपल्या व्यवसायाची अत्यंत आवश्यक व अजरामर तत्त्वे असतात. काही मोजकी व निरंतर अशी दिशादर्शक तत्त्वे जी कोणत्याही बाह्य कारणांमुळे अस्तित्वात येत नाहीत. व्यवसायातील कार्यरत लोकांसाठी ती महत्त्वाची असतात. व्हिजनरी व्यवसाय आपल्या पायाभूत मुल्यांबद्दल ठाम असतात व आपल्या मुल्यांना अनुसरुनच निर्णय घेतात. सर्व व्हिजनरी व्यवसाय विशिष्टच पायाभूत मुल्ये ठरवतात असे नाही. प्रत्येक व्हिजनरी व्यवसाय त्यांना त्यांच्यासाठी जी पायाभूत मुल्ये योग्य वाटतात, तीच ठरवतात. या व्यवसायांची पायाभूत मुल्ये वेगवेगळी जरी असली तरी ठराविक 'पायाभूत मुल्ये' असणे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ : टाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये- 'सचोटी', 'समजुतदारपणा', 'उत्कृष्टता', 'ऐक्य' आणि 'जबाबदारी' ही आहेत. टाटा समूहाच्या कोणत्याही व्यावसायिक योजना ह्या त्यांच्या महत्त्वाच्या मुल्यांना मुरड न घालता आखल्या जातात. मुल्यांशी तडजोड करायला व्हिजनरी व्यवसाय कधीच तयार नसतात. प्रत्येक पायाभूत मुल्याला अनुसरुन विशिष्ट कृती करण्यावर त्यांचा भर असतो. बघुया 'टाटा'ची पायाभूत मुल्यं काय कृती करण्यासाठी त्यांना सदैव प्रेरणा देतात.   
टाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये:

१) सचोटी : आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने करतो. आम्ही जे काही करतो त्या बद्दल सार्वजनिक चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.
२) समजुतदारपणा : आपण आपल्या सहकार्यांची व जगभरातील आपल्या ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे. त्याच बरोबर आपण सदैव समाजाच्या हिताचा विचार करुनच आपले कार्य केले पाहिजे.
३) उत्कृष्टता : आपण आपल्या दैनंदिन कामात नेहमी उच्च परिणाम साध्य करण्यासाठी झटले पाहिजे आणि आपल्या उत्पादन व सेवेचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे.
४) ऐक्य :  आपण जगभरातील आपल्या सहकार्‍यांबरोबर, ग्राहकांबरोबर व भागीदारांबरोबर संलग्नतेने काम केले पाहिजे. त्यांच्या बरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासण्यावर आपला भर असला पाहिजे.
५) जबाबदारी : ज्या परिसरामध्ये, समाजामध्ये व देशामध्ये आपण कार्यरत आहोत त्याबद्दल आपल्याला जबाबदार व संवेदनशील असले पाहिजे. लोकांकडून जे मिळेल ते लोकांनाच जास्त पटीने देण्याचा आपला मानस असला पाहिजे. 
(*टाटा उद्योग समूहाची वरील 'पायाभूत मूल्ये' त्यांच्या 'पायाभूत तत्वप्रणाली'चा भाग आहेत. टाटा समूहाच्या वेबसाइट वर सुध्दा आपण वाचू शकता.)

मित्रांनो, मला असं वाटतं टाटा उद्योग समूहाचं व्यावसायिक यश, पत आणि यशस्वी इतिहासामागे त्यांची 'पायाभूत मूल्य' फार मोलाची कामगिरी बजावतात.

मी हजारो लघुउद्योजकांबरोबर संवाद साधतो, त्यांना भेटतो. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये हा विषय मी सखोलपणे मांडतो व उद्योजकांना आपल्या व्यवसायची पायभूत मूल्ये ठरवण्यास प्रेरित करतो. पायाभूत मुल्ये निश्चित केल्याने उद्योजकांचा त्यांच्या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. उद्योजकांना कळून चुकते की आपण मोठी स्वप्ने पाहत जरी असलो तरी त्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींबरोबर तडजोड नाही केली पाहिजे.

मित्रांनो, व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली तयार केली पाहिजे. 'पायाभूत मुल्ये' व 'पायाभूत उद्देश' हे त्याचे दोन भाग आहेत. पायाभूत मुल्यांमुळे आपल्या व्यवसायाची एक प्रकारे संस्कृती निर्माण होते. व्यवसायामध्ये कार्यरत कर्मचार्यामधे एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासाठी ही पायाभूत मुल्ये व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिने अंगीकारावी लागतात. सुरुवात मात्र उद्योजकाने स्वतः पासुन केली पाहिजे कारण उद्योजकच व्यवसायाचा लिडर असतो आणि Leader should always lead from the front. शिवाजी महाराजांसाठी 'स्वराज्य' आणि 'स्वाभिमान' ही दोन पायाभूत मुल्ये महत्वाची होती. आपल्या मवळ्यांमध्ये त्यांनी ही मुल्ये यशस्वीपणे विकसित केली परंतु त्याची सुरुवात मात्र त्यांनी स्वत: पासून केली!
पुढील लेखात आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीचा दुसरा भाग समजून घेऊ. तो म्हणजे 'पायाभूत उद्देश'
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy


01 April 2015

व्यावसायिक संधी ओळखा - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यावसायिक संधी ओळखा' या विषयावरील दिनांक १ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो! यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याला 'उद्योजकीय मानसिकता' आत्मसात करावी लागते व व्यावसायिक संधी ओळखून उद्योजकाला जोखिम घ्यावी लागते. व्यावसायिक संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे उद्योजकाला अवगत असलेलं एक महत्त्वाचं कौशल्य आहे. बर्‍याच यशस्वी उद्योजकांच्या अभ्यासादरम्यान मला आढळून आलं की, यशस्वी उद्योजक व्यावसायिक संधी इतरांपेक्षा आधी ओळखतात. व्यावसायिक संधी ओळखण्याचा एक अजब दृष्टीकोन त्यांनी स्वत:मध्ये विकसीत केलेला असतो. त्याच व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी ते व्यवसाय उभारणी करतात आणि यश मिळवतात.

मित्रांनो, 'डेल कंप्युटर्स' चे संस्थापक मायकल डेल यांनी तरुण वयातच पर्सनल कंप्युटर्स क्षेत्रामध्ये निर्माण झालेली संधी हेरली. त्यांना कळून चुकलं की भविष्यात या क्षेत्रात प्रचंड मागणी असणार आहे. त्या संधीवर त्यांना पक्का विश्वास होता. त्यांना बरेच अडथळे आले परंतु व्यावसायिक संधीवर असलेल्या त्यांच्या भरवश्यामुळे ते डगमगले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की 'डेल' ने खुप कमी कालावधीत प्रचंड यश मिळवले. पर्सनल कंप्युटर्स क्षेत्रातील दिगज्ज कंपन्यांना 'डेल' ने 'काटे की टक्कर' दिली.

मित्रांनो, आपण स्वतःचा व्यवसाय करण्याचा प्लान करत आहात किंवा व्यवसाय विस्तार करणार आहात, आपण बाजारपेठेतील व्यावसायिक संधीचा मागोवा सातत्याने घेतला पाहीजे. व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी मी आपल्याला विचार मंथन करण्यासाठी टिप्स देणार आहे. या टिप्सचा वापर करुन आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी ओळखू शकता व त्या संधीचं मुल्यमापन करु शकता. व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी आपण खालिल बाबींचा विचार करु शकता.
गरज : आपण ज्या बाजारपेठेत व्यवसाय करणार आहोत, त्या बाजारपेठेत एखाद्या उत्पादन अथवा सेवेची गरज असणे गरजेचे आहे. उत्पादन व सेवेद्वारे ग्राहकांची कोणतीतरी गरज पुर्ण झाली पाहीजे व ग्राहक त्या उत्पादन व सेवेसाठी पैसे देण्यास तयार असला पाहिजे. जो पर्यंत बाजारपेठेत गरज नाही तो पर्यंत उत्पादन व सेवा बाजारपेठेत आणणे कठीण आहे. बाजारपेठेत काही उत्पादनांसाठी गरज निर्माण करावी देखिल लागते. त्यामुळे बाजारपेठेतील गरज सर्व प्रथम उद्योजकाला ओळखता आली पाहीजे.
ग्राहक : बाजारपेठेत गरज जरी असली तरी नक्की ती गरज किती प्रमाणामध्ये आहे हे देखिल ओळखता आले पाहीजे. आपल्याला जे उत्पादन विकायचं आहे ते विकत घेणार्‍या ग्राहकांची संख्या मुबलक प्रमाणात असली पाहीजे. जेवढी ग्राहकांची उपलब्धता जास्त तेवढा मोठा व्यवसाय आपण उभारु शकतो. नवीन व्यवसाय सुरु करत असताना किंवा व्यवसायाचा विस्तार करत असताना याबाबत खात्री लायक माहीती मिळवून आपण योजना बनवली पाहिजे.
नफा : व्यवसायाने आर्थिक यश हे मिळवलच पाहीजे. आपण ज्या क्षेत्रात उद्योग करत आहोत त्यामध्ये आर्थिक यश मिळवण्यासाठी योग्य टक्केवारित नफा कमवणे शक्य आहे का? याचं आपण गणित मांडल पाहिजे. उद्योजक जेवढी जोखिम घेतो त्याच्या मानाने उद्योजकाला अपेक्षीत नफा हा मिळालाच पाहीजे. बाजारपेठेत गरज असुन देखिल असं होऊ शकतं की आपल्याला हवा तेवढा नफा कमवणे शक्य नाही. अश्यावेळी खरच जोखिम घ्यायची की नाही प्रश्न निर्माण होतो. उद्योजकाला आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती नफा कमवता येईल याचं गणित मांडल्यामु़ळे हा निर्णय घेणे सोपे जाते.
• कौशल्य : बाजारपेठेत असलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याकडे व आपल्या सहकार्‍याकडे आवश्यक कौशल्य असणं गरजेचं आहे. एखाद्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची, अनुभवाची गरज असते. आपल्याकडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे ती असतील तरच आपण व्यवसायात तग धरुन उभे राहू शकतो.  वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात वेगवेगळी कौशल्ये आवश्यक आहेत. उदाहरणार्थ : हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, रिटेल इंडस्ट्रीमध्ये, आय. टी. इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इ. वेगळी कौशल्ये आपल्याकडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे असली पाहीजेत.
भविष्य : व्यावसायिक संधी आज कितीही मोहक वाटत असली तरी त्या संधीचं भविष्यातील स्वरुप काय असणार आहे याचा देखिल वेध आपल्याला घेता आला पाहीजे. आज दिसत असलेली संधी ही तात्पुरती लाट असेल तर व्यवसायाला दुरगामी यश मिळवणे कठीण आहे. परंतु आजची सुवर्ण संधी भविष्यात देखिल असणार आहे किंवा ती वाढत जाणार असेल तर व्यवसायाचा पाया आणखी मजबुत होऊ शकतो व व्यवसायाला दुरगामी यश प्राप्त करणे शक्य होते. बरेच मोठे यशस्वी उद्योग सुरु करत असताना भविष्यातील मोठी संधी लक्षात घेऊन व्यवसाय सुरु करतात. वर्तमानात त्यामानाने संधीचं स्वरुप लहान असतं परंतु भविष्याचा विचार करुन ते जोखिम घेतात.
पैसा : व्यावसायिक संधीचं रुपांतर व्यवसायामध्ये करण्यासाठी आवश्यक आर्थिक भांडवल किती लागणार आहे याचं आपल्याला मुल्यमापन केलं पाहीजे. जेवढं भांडवल लागेल ते आपल्याकडे आहे का? नसेल तर आपण भांडवल उभं करु शकतो का? बर्‍याच वेळी लघुउद्योजक व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवल उभं करतात परंतु व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं खेळतं भांडवल उभं करण्यामध्ये ते मार खातात. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या भांडवलांचा विचार केला पाहीजे. जर भांडवल उभारणं आपल्याला शक्य असंणार असेल तर व्यवसाय सुरु केल्यावर आर्थिक व्यवस्थापन करणे सुलभ होऊ शकते.
आनंद : उद्योग उभारणी करताना किंवा विस्तार करताना आपण जोखिम घेतो. साहजिकच आहे हा प्रवास सोपा नसणार आहे. या प्रवासात आपण बर्‍याच खाचखळग्यातून जातो. बर्‍याच अडथळ्यांना सामोरे जातो, कधी अपेक्षित परिणाम होतात, कधी नाही होत. कधी यश मिळतं तर कधी अपयशाला तोंड द्यावे लागते. परंतु आपण जो व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायात आपल्याला जर आंतरिक आनंद मिळत असेल तर या सर्व उतार-चढावा दरम्यान आपण मानसिकरित्या उत्साही राहतो. व्यवसायनिर्मितीच्या प्रक्रीयेचा आपण आनंद घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या क्षेत्रात आपण व्यवसाय करत आहात त्यात आपल्याला आनंद मिळत नसेल किंवा आपल्या मुल्यांविरुध्द वागावं लागत असेल तर नक्कीच दुरगामी यश मिळणं मुश्कील आहे.
मित्रांनो, व्यवसायाची सुरवात करताना किंवा व्यवसाय विस्तार करत असताना व्यावसायिक संधी ओळखा, तिचं मुल्यमापन करा. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी तसा दृष्टीकोन आत्मसात करा. मी सांगितलेल्या सात बाबींबद्दल विचार करा. मी ठामपणे सांगु शकतो की या बाबींचा जर आपण सखोलपणे विचार केलात, अभ्यास केलात तर आपण व्यावसायिक जोखिम घेण्यासाठी सज्ज व्हाल. आपला आत्मविश्वास आणखी वाढेल. उद्योजकता हे एक Adventure आहे, त्यामध्ये धाकधुक आहे, उत्सुकता आहे, आव्हान आहे, साहस आहे, जोश आहे, आणि आनंद आहे. या रोलर-कोस्टर राइड साठी खुप खुप शुभेछा!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा.

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites