अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाचे भव्य ध्येय' या विषयावरील दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...
नमस्कार उद्योजक मित्रांनो! ४ जुलै १९५२, या दिवशी इंग्लंड मध्ये फ्लॉरेंस चॅडविक नावाच्या मुलीने कॅटलिना खाडी पोहून पार करण्याचे ठरवले. असं करणारी ती पहिलीच महीला जलतरणपटू बनणार होती. लाखो लोकांचे लक्ष तिच्या या विक्रमाकडे लागले होते. वातावरण दाट धुक्यामुळे अंधुक होते, कडाक्याची थंडी होती. फ्लॉरेंस अश्या परिस्थितीत पोहत असताना आपल्या गॉगल मधून समोर पहायचा प्रयत्न करत होती, परंतु तिला किनाराच दिसत नव्हता. समोर काहीच दिसत नाही म्हणुन तिने माघार घेतली. खरं तर ती किनार्यापासुन फक्त अर्धा मैल अंतरावर होती. ती सहजासहजी हार मानण्यारातली नव्हती. दोन महीन्या नंतर तिने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी मात्र समुद्रात भरती होती परंतु वातावरण अंधुक नव्हते. तिला किनारा स्पष्ट दिसत होता. अश्या परिस्थितीत सुध्दा तिने कॅटलीना खाडी पार केली व पुरुषांचा विक्रमसुध्दा मोडून काढला! फ्लॉरेंसच्या पहील्या प्रयत्नात अपयश आणि दुसर्या प्रयत्नात यश का आले? अर्थातच दुसर्या प्रयत्नाच्यादरम्यान तिला किनारा स्पष्ट दिसत होता! दुसर्या प्रयत्नाच्या दरम्यान पोहत असताना जरी जास्त परिश्रम करावे लागले तरी फ्लॉरेंसला तिचे ध्येय स्पष्ट दिसत होते.
माझ्यामते कोणत्याही उद्योजकाला या उदाहरणातून महत्त्वाचा धडा शिकला पाहिजे. व्यवसाय करत असताना आपल्या आजुबाजुला प्रचंड अडचणी निर्माण होतात. बर्याच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपल्याला फार परिश्रम घ्यावे लागतात. परंतु आपल्या समोर आपल्याला जिथे पोहोचायचं आहे ते ध्येय जर निश्चित असेल तर आपण त्या अल्पकालीन अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनतो. उद्योजकाला जर आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल व त्याच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करुन जबरदस्त प्रगती करायची असेल तर त्याने आपल्या 'व्यवसायाचे भव्य ध्येय' निश्चित केलेच पाहिजे.
मित्रांनो, व्यवसायाचे भव्य ध्येय म्हणजे व्यवसायाने आपल्या दुरगामी प्रगती दरम्यान असे काय साध्य केलेले असेल ज्याच्यामुळे आपला व्यवसाय सुरु करण्यामागचा खरा उद्देश साध्य झाला असं आपण म्हणू? आज पासुन किमान १० वर्षांनंतर किंवा २० वर्षांनंतर व्यवसायाने काय साध्य केले पाहिजे हे स्पष्टपणे ठरवणे व आपल्या व्यवसायातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात ते रुजवणे म्हणजेच व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवणे.
मी आतापर्यंत ज्या व्हिजनरी व्यवसायांचा व यशस्वी उद्योजकांचा अभ्यास केला त्या दरम्यान मला ही गोष्ट प्रामुख्याने आढळली की, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एक स्पष्ट व भव्य ध्येय असावं लागतं. असं भव्य ध्येय जे व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीला ढवळून काढेल. असं ध्येय जे व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमता रुंदावण्यासाठी भाग पाडेल. असं ध्येय जे व्यवसायातील प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणेल. असं ध्येय जे साध्य करण्याची प्रत्येकाची मनापासुन इच्छा असेल. असं ध्येय जे साध्य झाल्यावर आपल्याला प्रचंड आनंद प्राप्त होईल. असं ध्येय जे आपण मनातल्यामनात स्पष्टपणे बघु शकू.
मित्रांनो, १९४५ साली मसुरु इबुका यांनी 'सोनी' कंपनीची स्थापना केली. त्यावेळी दुसर्या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. अश्या बिकट परिस्थितीत 'सोनी'ची मुहुर्तमेढ झाली. कालांतराने अकियो मोरिता यांचा 'सोनी'मध्ये प्रवेश झाला. 'सोनी'ची सुरुवात सात लोकांनी मिळून त्यांच्या वैयक्तिक बचतीतुन जवळपास १,६०० डॉलर्स इतक्या भांडवालातून केली. फक्त सात जणांनी मिळून ही कंपनी सुरु झाली, काहीतरी करुन दाखवण्याच्या उमेदीने, जगात आपला ठसा उमटवण्याच्या जिद्दीने अक्षरशः झपाटून त्यांनी काम केले! फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. त्यादरम्यान 'Made in Japan' चा अर्थ असा होता की 'स्वस्त व तकलादू उत्पादने' परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे 'भव्य ध्येय' होते की 'जगातील जपानची प्रतिमा बदलणे.' सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन 'जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा' अशी करायची होती. आज पासुन ६० वर्षांपूर्वी निश्चित केलेलं भव्य ध्येय त्यांनी साध्य केलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत 'सोनी'ने प्रगती केली.
मित्रांनो, भारतातील उद्योगक्षेत्रातील बलाढ्य कंपनी म्हणजे 'रिलायन्स'! अल्पावधीत प्रचंड प्रगती करणारी ही जगातील फार थोड्या कंपनीपैकी एक! रिलायन्सने इतकी भन्नाट प्रगती कशी काय केली असेल? रिलायन्सचे जनक श्री. धीरुभाई अंबानी, गुजरात मधल्या खेडेगावात अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेले, शिक्षण अर्धवट. या माणसाने इतका मोठा पराक्रम केला कसा? याचं उत्तर खुद्द धीरुभाईच आपल्या आत्मचरित्रात सांगतात. ते म्हणतात 'स्वप्नं पहा, मोठी भव्य दिव्य स्वप्नं पहा, डोळे उघडे ठेऊन व दिवसा ढवळ्या स्वप्नं पहा!' खरंच किती माणसं स्वप्नं बघतात? आणि बघीतलीच तर मोठी, भव्य दिव्य स्वप्नं किती माणसं बघत असतील? फार थोडी! बहूतेक म्हणूनच धीरुभाईंनी जे यश मिळवलं ते फार दुर्मिळ आहे. धीरुभाईंनी खुप मोठी स्वप्नं पाहीली व ती साध्य करण्यासाठी अपार कष्ट केले. आज रिलायन्स संपुर्ण भारताच्या GDP (Gross Domestic Product) मध्ये ३% चे योगदान देते.
उद्योजकांनो व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवा. आपल्या व्यवसायाने आज पासून १० किंवा २० वर्षात काय साध्य केले पाहिजे ते ठरवा. सद्यपरिस्थिती काहीही असो, आपला भुतकाळ व वर्तमानाच्या पलिकडे जाऊन विचार करा. भव्य ध्येयामुळे आपण व आपल्या टिमला मोठा विचार करण्याशिवाय पर्यायच उरत नाही! याचा अर्थ भव्य ध्येय साध्य करणे सोपे असते असे मुळीच नाही. सद्य परिस्थितीला लक्षात घेता ते आपल्या आवाक्या बाहेरचे असते. परंतु कंपनी अंतर्गत सर्वांचा ठाम विश्वास असला पाहिजे, की 'आपण हे साध्य करु शकतो' आपण ते साध्य करण्यासाठी वचनबध्द असलो पाहिजे आणि जोखिम घेण्यास तयार असलो पाहीजे. त्याच बरोबर व्यवसायाचे भव्य ध्येय 'व्यवसायाच्या पायाभुत तत्त्वप्रणालीशी' संलग्न असले पाहीजे.
मित्रांनो, ज्याप्रमाणे फ्लॉरेंस चॅडविकने अत्यंत बिकट परिस्थितीत सुध्दा, किनारा स्पष्ट दिसत असल्या कारणाने पोहून आपला विक्रम प्रस्थापित केला, त्याच प्रमाणे आजच्या खवळलेल्या युगात व्यवसायाच्या भविष्याचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसलं पाहिजे. आपल्या मनात आपण भव्य ध्येयाच्या स्वरुपात ते कोरलं पाहिजे. जर आपण आपले भव्य ध्येय स्पष्टपणे पाहू शकलो तर कितीही संकटे आली तरी आपण नक्कीच त्यावर मात करु, कारण भविष्याचं उज्ज्वल चित्र आपल्याला साद देत असेल आणि ते वास्तवात उतरवण्याची प्रचंड ओढ़ आपल्याला लागलेली असेल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.http://goo.gl/uNdKBy
No comments:
Post a Comment