उद्योग कुठलाही असो, तो करताना मी कमीपणा मानला नाही. मी डोअर टू डोअर कपड्यांचे मार्केंटींग केले. प्रसंगी माझ्याच कंपंनीत ड्रायव्हर बनून कारही चालवली. पण ग्राहकाला पूर्ण समाधान दिले. माझ्या सहकार्यांना नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले. उद्योग ५० कोटींहून ५०० कोटींवर नेताना प्रोफेशनल अॅप्रोच अंगी बाळगला, असे सांगत गुप्ता यांनी नव उद्योजकांना यशाची सूत्रे समजावली.
आपल्या अवतीभोवती असंख्य घडामोडी घडत असतात, कळत नकळत बर्याच संधी आपल्यासमोर चालून येतात, परंतु त्या ओळखता न आल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. खरा उद्योजक तोच, जो या संधी अचूक ओळखतो आणि त्याव्दारे आपल्या यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवतो, असे सांगत प्रसिध्द उद्योजक मेरु कॅबचे संस्थापक नीरज गुप्ता यांनी नव उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला.
शनिवारी प्रभादेवी येथील वस्त्र समितीच्या सभागृहात पार पडलेल्या 'मी उद्योजक' या बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या 'डेट विथ ग्रेट' कार्यक्रमाला 'एसएमई' क्षेत्रातील उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'मी मराठी LIVE' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
गुप्ता यांनी उपस्थित उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी स्वतःच्या खडतर वाटचालीचा पटच सर्वांसमोर सादर केला. यामुळे आपापल्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी धडपडणार्या नव उद्योजकांना काही वेळ जणू स्वतःचेच प्रतिबिंब पाहत असल्याचा भास झाला.
गुप्ता म्हणाले, शाळा-कॉलेजच्या वयात सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने, सहल आयोजनात नेहमीच पुढाकार घेत असल्याने माझे नेतृत्त्वगुण अवघ्या विशीतच तळपू लागले होते. कॉलेजच्या वयात इतर तरुणांप्रमाणेच अभ्यास कमी आणि इतर गोष्टींकडे माझे लक्ष असायचे. पण कॉलेजनंतर पुढे काय? या प्रश्नाने मलाही बेचेन करायला सुरुवात केली.
सुरुवातीला नोकरीचा काटेरी अनुभव घेतला पण त्यापुढे करेन तर एखादा उद्योगच करेन, नोकरी करणार नाही, या निर्णयावर ठाम राहून नवनव्या उद्योगांत हात आजमावायला सुरुवात केली. इम्पोर्ट-एक्पोर्ट, गिफ्ट आर्टिकल सप्लायर, प्रिंटींग प्रेस, गारमेंट, गॅरेज, फर्निचर मेकिंग, फिल्म प्रोडक्शन, व्हेईकल सप्लायर इ. डझनभर उद्योग केले. या प्रत्येक उद्योगात मी यश, अपयशाची गोडी चाखली, पण गुंतवलेला पैसा कधीही गमावला नाही. शिवाय प्रत्येक उद्योगात कल्पकतेचाही पुरेपूर वापर केला. उदा. तोंडचलाखीने मला 'एचयूल' कंपनीला गिफ्ट आर्टिकल पुरवण्याचे कंत्राट मिळाल्यावर वाजवी दरासोबतच मी कंपनीचा 'लोगो' टाकून गिफ्ट आर्टिकल दिले. १९९९ मध्ये सामान्य गॅरेजपेक्षा दर्जेदार आणि कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरपेक्षा वाजवी अशी प्रीमियम सेगमेंटमधील गॅप भरुन काढणारे गॅरेज सुरु केले. यातूनच पुढे 'टीसीएस' ला वरिष्ठ अधिकारी, पाहुण्यांसाठी बस पुरवण्याचे कंत्राट मिळाले. या बसमध्येही मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, टीव्ही, नोटपॅड, एसी, फ्रीज इ. सुविधा दिल्या होत्या. ज्याचा विचार इतरांनी केला नव्हता.
एक-एक बस, कार जोडत २००१ मध्ये सुरु केलेल्या व्ही-लिंक नावाच्या कंपनीव्दारे मी पुढे नव्याने उदयास आलेल्या 'बीपीओ' सेंटरला कार पुरवणारा सर्वात मोठा कंत्राटदार बनलो होतो. २००१ ते २००३ पर्यंत वर्षाला ३०० कार्स आणि १२ लाखांची उलाढाल असणारा माझा व्यवसाय केवळ सहा वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत गेला. तिथूनच पुढे २००७ मध्ये जीपीएस तंत्रज्ञानावरील 'रेडिओ कॅब' सुरु करण्याची संधी मी हुडकून काढली आणि त्यातही यशस्वी झालो. तब्बल ६५० कोटींहून जास्त उलाढाल असलेला मेरु 'रेडिओ कॅब' क्षेत्रातील नामांकित ब्रँड बनला आहे.
मी उद्योगात शिरलो तेव्हा मला कुणाचेही मार्गदर्शन नव्हते. मात्र 'मी उद्योजक' सारखी संस्था नव उद्योजकांना मार्गदर्शनासोबतच उद्योगवाढीसाठी व्यासपीठही देत आहे. हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असुन मला देखील संस्थेचा सदस्य व्हायला आवडेल, असे गुप्ता म्हणाले.
कार्यक्रमात 'मी उद्योजक' संस्थापक स्वप्नील दलाल यांनी नेटवर्किंग फोरमची संकल्पना, पुढील योजनेची माहिती दिली. तर 'बॉर्न टु विन' ट्रेनिंग सेंटरचे अतुल राजोळी यांनी 'हेल्प इच अदर, ग्रो टूगेदर' संकल्पनेमागचा गाभा समजावत सांगितला.

No comments:
Post a Comment