डोळसांनाही थक्क करणारी भावेश भाटिया यांची उत्तुंग झेप ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

16 June 2017

डोळसांनाही थक्क करणारी भावेश भाटिया यांची उत्तुंग झेप

भावेश भाटिया जन्माने अंध नव्हते, मोठे होईपर्यंत त्यांना अंधुकसं दिसत होतं. वयाच्या २३ व्या वर्षीच अपेक्षेपेक्षा लवकर दृष्टी गेली. तेव्हा ते एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. कर्करोगग्रस्त आईच्या उपचारांसाठी पैसा साठवत होते. आईला गमावण्याची भीती असतानाच दृष्टी गमावणं त्यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांना नोकरीवरुनही काढून टाकण्यात आलं. या धक्क्यानं लवकरच त्यांच्या आईचं निधन झालं. पण, 'तुला जग नाही पाहता आलं तरी चालेल पण असं काही तरी कर ज्यामुळे जग तुझ्याकडे पाहिल'. आईच्या या शब्दांनी त्यांना हिम्मत दिली. लहानपणापासूनच त्यांना हातांनी वस्तू बनवण्याचा छंद होता. ते पतंग बनवायचे, मातीची खेळणी, छोट्या मूर्ती तयार करायचे. त्यांनी मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात हात घालण्याचं ठरवलं. १९९९ मध्ये मुंबईच्या राष्ट्रीय अंध प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी याचे प्रशिक्षण घेतलं. ते मेणबत्त्या तयार करुन महाबळेश्वरच्या बाजारात मोटगाडीवर विक्री करायचे.


एक दिवस एक महिला त्यांच्या गाडीजवळ मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी थांबली आणि अचानक काही तरी सकारात्मक घडत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांची सौम्य वागणूक आणि त्यांच्या स्मितहास्यानं त्या प्रभावित झाल्या. त्यांची मैत्री झाली आणि ते तासनतास गप्पा मारु लागले. त्यांचं नाव नीता होतं आणि भावेशने त्यांच्याशी लग्नाचा निश्चय करुन टाकला. लवकरच त्यांनी लग्न करुन महाबळेश्वरमध्ये एका छोट्याशा घरात आपल्या संसाराला सुरुवात केली.


पुढे बॅंकेने त्यांना १५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर केलं आणि हेच त्यांच्या जिवनातलं महत्त्वपूर्ण वळण ठरलं. त्या पैशांच्या सहाय्यानं त्यांनी १५ किलो मेण, दोन साचे आणि पन्नास रुपयात एक हातगाडी विकत घेतली. त्यानंतर त्यांनी यातूनच कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आज अनेक प्रतिष्ठीत कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत, तसच २०० कर्मचारी त्यांच्याकडे आता काम करत आहेत. आता सनराईज कँडल्स ९ हजार प्रकारच्या साध्या, सुगंधीत मेणबत्त्या बनवण्यासाठी २५ टन मेणाचा वापर करतात, रिलायन्स इंडस्ट्रिज, रनबक्षी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब यांसारखे काही प्रमुख उद्योग त्यांचे ग्राहक आहेत. भाटिया यांच्याकडे आता २०० लोक काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व २०० कर्मचारी अंध आहेत.


सौजन्य: संध्यानंद

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites