साड्या आणि बायका हा एक मोठ्ठा विषय आहे. पण, साडी खरेदीसारखी अत्यंत आनंदाची गोष्ट अगदी सहजच सोडून देणार्या सुधा मूर्ती, म्हणूनच एका उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती २१ वर्षापूर्वी काशी येथे गेल्या होत्या, काशीला गेल्यानंतर एखाद्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो अशी मान्यता आहे. त्यावेळी सुधाताईंनी खरेदीचा आणि त्यातूनही विशेषत: साडी खरेदीचा त्याग केला. या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता केवळ अत्यावश्यक वस्तूच त्या विकत घेतात, असे त्यांनी नुकतेच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इतकेच नव्हे तर या निर्णायामुळे खूप आनंदी व मोकळे वाटत आहे असेही त्यांनी सांगितले.
अनावश्यक खर्चाला कात्री लावल्यानंतर शिल्लक राहिलेली मोठी रक्कम समाजकार्यासाठी उपयोगी पडते. अशाच पैशांतून पूरग्रस्तांसाठी दोन हजार तिनशे घरे बांधली गेली तसेच गुजरातमधील भूकंपग्रस्तांनाही मदत केली गेली हे त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला थक्क झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सुरवातीच्या काळात १९८१ साली, सुधाताईंनी बचत केलेले १० हजार रुपये नारायण मूर्तींना दिले होते व त्याआधारेच इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली गेली. अर्थात, त्यांच्या मदतीमुळेच नारायण मूर्तींचे उत्पन्न आज १.९२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात आहे.
खरचं, कसं जमलं असेल त्यांना? हा प्रश्न राहून राहून मनात येतो… प्रत्येक बाई साडी हौसेने मिरवते, कोठेही, कोणाकडेही गेलं तर मानाची भेट म्हणून साडीचोळी मिळते पण त्यापेक्षाही स्वतःच्या आवडीची साडी खरेदी करण्यासाठी तासनतास दुकानांचे उंबरठे झिजवणार्या बायकांपैकी कदाचित आपण प्रत्येक जणच असतो. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट मनाने करायचा पक्का निर्धार केल्यावर जे त्याच मार्गावरुन चालतात तीच माणसं खरी. सुधाताईंनी साडी खरेदी थांबवली असली तरीही त्या पुस्तक खरेदी मात्र आवर्जून करतात. विशेष म्हणजे आज त्यांच्या ग्रंथालयात तब्बल वीस हजारांहून अधिक पुस्तके आहेत आणि हो, एवढी पुस्तके जवळ असूनही त्यांना आपले पुस्तक कोणालाही देणे आवडत नाही. कारण, लेखकांची घरं पुस्तकांच्या विक्रीवर चालतात, आपण अशी फुकट पुस्तकं वाटत गेलो तर लेखकांचं कसं होणार….? हा आणखी एक मोठा व्यापक विचार त्यांच्या या कृतीमागे आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकप्रेमापोटी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत कर्नाटकमध्ये तब्बल ६० हजारांहून अधिक ग्रंथालयेही उभारण्यात आली आहेत.
खरंच, एरवी आपल्याला साध्या साध्या गोष्टिही ठरवणं आणि आचरणात आणणं अवघडं जाते. काही करायला जावं की त्याला हजार फाटे फुटतात आणि मग जे ठरवलं ते मागेच पडते.
जे ठरवायचं त्यामागे योग्य विचार महत्त्वाचा आणि योग्य विचारानंतर आचरणात आणलेल्या कृतीवर ठाम राहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हेच सुधाताईंकडून प्रत्येकाने शिकायला हवे.
सौजन्य: संध्यानंद
No comments:
Post a Comment