बॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात २६ ऑगस्ट ११ला ‘दास ऑफशोअर इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड’चे एम.डी. (व्यवस्थापकीय संचालक) श्री. अशोक खाडे हे प्रमुख पाहुणे होते. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालूक्यातील पेड हे त्यांचे गाव. श्री. अशोक खाडे यांच्या सक्त सूचना आहेत या गावातील एकाही माणसाच्या आईचे लुगडे फाटलेले असू नये. असेल तर तेथिल एका कापडाच्या दुकानात त्यांचा अकाऊंट आहे, त्या दुकानातून त्या माणसाने नवे लुगडे आईसाठी घेऊन जावे, फक्त दुकानात नोंद करावी. त्यांची अशीच आणखी एक अनोखी गोष्ट. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीतून जाताना दादरला चित्रा टॉकिजजवळ गाडी आली की ते तिथल्या झाडाला नमस्कार करतात. गावातील देवळाचा जीर्णोध्दार त्यांनी केला आहे, असे सांगितले तर वाटेल तर त्यात काय विशेष? पैसे आहेत, म्हणून केला असेल. पण अशा सगळ्या गोष्टींमागे आहेत, त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग जे त्यांनी मनाच्या हळव्या कप्प्यात जपून ठेवलेले आहेत. त्यांच्या बालपणात डोकावून आपणही त्यांची कहाणी जाणून घेऊ या. बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी त्यांच्या या कहाणीला नाव दिले होते, ‘एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची!’
अशोक खाडे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. अंधार व दारिद्र्य कायम सोबतीला. अशोक लहानपणी एकदा दळणाचा डबा घेऊन येत असताना, त्यांच्या हातून तो डबा पडला, सगळे पीठ सांडले. घरी आल्यावर आई म्हणाली, तेवढेच पीठ आपल्याकडे होते. शेजारी काही देतील तर ठिक नाहीतर उपाशी झोपावे लागेल. शेजार्यांनी मक्याची कणसे दिली ती या सहा भांवडांनी मिळून खाल्ली. पण या प्रसंगानंतर अशोक यांनी ठरवले, आपण शिकायचे, घराला बरे दिवस आणायचे. ते खूप मन लावून शिकत गेले. हुशार होतेच आणि जिद्द निर्माण झाली. गावातील शाळा सातवीपर्यंतच होती. आठवीपासून पुढे ते बोर्डींगमध्ये राहून शिकले. वर्गात अनेक ब्राम्हण मुले पण हा दलित घरातील मुलगा संस्कृतमध्ये पहिला आला. अकरावीनंतर त्यांना मेडिकलला जायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते तर केवळ अशक्य होते. माझगाव डॉकमध्ये ते अप्रेंटीस म्हणून कामाला लागले. नोकरी करतानाच अंशकालीन अभ्यासक्रम पूर्ण करून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील पदविकाही मिळवली. अशोक खाडे म्हणतात एक लक्ष्य असाध्य असेल तर लढाईच हरलो म्हणून हार मानू नका, ‘नेचर तसे फीचर’ तत्वाचा स्वीकार करा व दुसरे लक्ष्य समोर ठेवा. पण समोर काही लक्ष्य हे हवेच.
लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचा लक्ष्यसिध्दी पुरस्कार देउन गौरव करण्यात आला
माझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी बरी चालली होती, कामाचा तर अजिबात ताप नव्हता. पण बहिणींची-चुलत बहिणींची लग्ने याला हा पगार पुरा पडणारा नव्हता. काम कमी म्हणजे टवाळक्या करीत आयुष्य काढणे. अशोक यांनी ठरवले, धोका घ्यायचा, नोकरी सोडायची व स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. अगदी काही जमले नाही तर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवून पैसा मिळवता येईल हा स्वत:बद्दलचा विश्वास होता. १०,००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. कंपनीचे नाव हा त्यांच्या मते खूप महत्वाच मुद्दा. खाडे इंजिनिअरींग नाव ठेवले तर कोणी बिझनेस देईल की नाही अशी शंका. अशोक यांनी वाचनालयात जाऊन, ‘हाऊ टू नेम अ कंपनी’ यासारखी पुस्तके वाचली. तिन्ही भावांच्या नावातील आद्याक्षरे (दत्ता, अशोक व सुरेश) डी-ए-एस घेऊन मग त्यांनी दास ऑफशोअर इंजिनिअरींग ठेवले. त्यांचे मोठे बंधू हनुमानाचे दास तोही एक अर्थ या नावात आहे. ओएनजिसीची ऑफशोअरची छोटी छोटी कामे ते घेत गेले. १९९५ मध्ये त्यांचे धाडस व कष्ट यांना यशाने प्रतिसाद दिला. माझगाव डॉकचे काम एक कॉंट्रक्टर सोडून गेला, ते १ कोटी ९२ लाखांचे काम ‘दास’ला मिळाले. यानंतर कामाच्या बाबतीत त्यांना मागे वळून बघायची आवश्यकता उरली नाही. नंतर ६ कोटी, १२ कोटी, ५० कोटी असा व्यवसाय वाढत गेला तो आता १२५ कोटीवर गेला असून ५५० कोटींच्या ऑर्डर कंपनीकडे आहेत. ४,५०० लोक त्यांच्याकडे काम करतात. माझगाव डॉकचे चेअरमनच आता त्यांच्याकडे सल्लागार म्हणून काम करतात. काटेकोर नियोजन हे त्यांच्या यशाचे गमल. प्रत्येक दिवसाचे, नव्हे प्रत्येक श्वासाचे प्लानिंग हवे असे ते सांगतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, मोका व धोका दोन्ही एकाचवेळी येतात, असे दृष्टांत देत ते बोलतात व श्रोत्यांना आपलेसे करतात.
मुंबईतील- बांद्रा येथील पहिला स्कायवॉक त्यांनी केवळ ५ महिने २४ दिवसांत बांधला. विक्रोळी, घाटकोपर येथील स्कायवॉक त्यांच्या कंपनीने बांधले. सायनसारख्या अती गजबजलेल्या ठिकाणचा स्कायवॉक त्यांनी कोणतीही तक्रार न येऊ देता बांधला. त्यांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाला. नुकतेच त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्री. अशोक खाडे उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना
उद्योजकांच्या यशोगाथा कधी कधी आपल्याला वाचायला मिळतात. त्यात अशोक खाडे यांचे वेगळेपण म्हणजे सुरवातीलाच नमूद केलेले आहे. त्यामागची भावना व कारणे जाणून घेऊ. ते लहान असताना आईचे गुडघ्यावर फाटलेले लुगडे बघून त्यांच्या मनाला यातना होत. पण करता तर काही येत नव्हते. म्हणून आज ते म्हणतात, माझ्याच काय, गावातील कोणाच्याच आईच्या अंगावर फाटके लुगडे असू नये. त्यांचे वडिल दादरला चित्रा टॉकीजजवळ बसून चांभारकाम करीत. सावलीसाठी वडिलांनी झाडही लावले होते. त्यामुळे अशोक खाडे तेथून जाताना झाडाला नमस्कार करतात. आणि ज्या देवळात दलित म्हणून त्यांना प्रवेश नाकारला जात होता, त्याचाच त्यांनी जीर्णोध्दार केला. हुशार पण गरीब मुलांना ते साहाय्य करतात. अशा १८ मुलांनी एमपीएससी परिक्षा पास केली व शासनात ही मुले राजपत्रित अधिकारी झाली.
शाळेत असताना त्यांच्या शाईच्या पेनचे निफ तुटले तर नवे घेण्यासाठी त्यांच्याकडे चार आणे नव्हते. ते त्यांच्या शिक्षकाने दिले व मग ते पेपर लिहू शकले. आज तेच अशोक खाडे १०,००० रुपयांचे सोन्याचे निफ असलेले मॉन्ट ब्लॉक पेन वापरतात. इतकचे नाही तर दुबईत त्यांनी तेथिल राजाच्या भागीदारीत व्यवसाय सुरू केला, त्या राजाला साडे चार लाखांचे मॉन्ट ब्लॉक पेन भेट दिले! खाडे आता आंतरराष्ट्रीय उद्योजक झाले आहेत. मध्यपूर्वेतून इतर देशातही आता ते विस्तार करतील आणि त्याचबरोबर आपल्या मुळ गावी त्यांनी शंभर एकर जमीन विकत घेतली आहे. गावाकडे त्यांचे लक्ष असते. त्याच्या भल्यासाठी ते काही काम करत असतातच. असा हा मुळांशी घट्ट बांधिलकी जपणारा भावूक उद्योजक!
बॉर्न२विन संस्था उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती सातत्याने समाजासमोर आणत असते, त्यांना धन्यवाद.
-उदय कुलकर्णी: ९८६९६७२६९६
No comments:
Post a Comment