LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE: LAKSHYASIDDHI SOHALA
Showing posts with label LAKSHYASIDDHI SOHALA. Show all posts
Showing posts with label LAKSHYASIDDHI SOHALA. Show all posts

26 August 2016

एक असामान्य यशोगाथा

संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय. आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.


इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..

आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला !

सौजन्य: लोकसत्ता वृत्तपत्र 

हणमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळवा लक्ष्यासिद्धी सोहळ्यामध्ये

!! लक्ष्यसिद्धी सोहळा !!
विषय: एक असामान्य यशोगाथा
दिनांक: 31 ऑगस्ट 2016
वेळ: सायंकाळी 6 वाजता
स्थळ: मैसूर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
प्रवेश विनामुल्य... अनुभव अमुल्य!
नाव नोंदणीसाठी संपर्क: 7666426654, 9619465689
नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा





01 February 2014

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: ‘सामाजिक उद्योजकता, जागतिकीकरण आणि भारत’

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत
नमस्कार मित्रांनो !
बॉर्न टू विन च्या परिवारास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि २०१४ ची दणदणीत सुरुवात द सक्सेस ब्लू प्रिंट या कार्यक्रमाने झाली.आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. मित्रांनो १९ जानेवारी ला बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ६ वर्षे पूर्ण करून धमाक्यात ७ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
द सक्सेस ब्लू प्रिंट


आपणा सर्वास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि लक्ष्यवेधची १८ वि बॅच तिच्या शेवटच्या टप्प्यात आहेसर्व बॅचेस प्रमाणे या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त झाली आहे. आणि या सर्वांचा कौतुक सोहळा म्हणजेच अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा... येत्या १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजतामाटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यमंदीर येथे पार पडणार आहे. दर ३ महिन्यांनी होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने सर्वच लक्ष्यवेधचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत असतात. अशा या  आपल्या लक्ष्यवेधच्या कार्यक्रमाला बॉर्न टू विनचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी आपल्या स्नेहींबरोबर उपस्थित राहतील व जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवतील यात काहीच शंका नाही. हा एक खुप छान असा क्षण असणार आहे जिथे त्यांना आपले सर्व सहप्रशिक्षणार्थी भेटतीलचत्याच बरोबर नवीन ओळखी आणि मित्र देखील बनतील! हि एक संधी असते ती एनर्जीतो अनुभव पुन्हा अनुभवण्याची. तसेच या बॅचच्या प्रशिक्षाणार्थ्यांची यशोगाथा जाणून घेण्याची.

नेहमीप्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! नेहमीप्रमाणेच या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला देखील एक दिग्गज व्यक्तिमत्व लाभलं आहे. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. St Angelo’s Professional Education Institution for Technology & Management चे Chief Managing Director श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे.
त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते एक मल्टी-डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी विविध व्यवसायक्षेत्रात आघाडी घेतली आहे. ते कन्सट्रक्शन तसेच हॉटेल व हॉस्पिट्यालिटी व्यवसायात देखील आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय असणार आहे.. सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत.


सध्या जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे आज वेग-वेगळ्या देशांमध्ये सीमा राहिल्या नाहित. त्याचाच परिणाम वेग-वेगळ्या व्यवसायांवर देखील होत चालला आहे. आज भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य आहे व भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जातंय. या जागतिकीकरणाबरोबरच सामाजिक उद्योजकतेला अनुसरून कोणकोणत्या नवीन संधी भारतात आहेत व पुढे या कश्या वाढत जाणार आहेत आणि या संध्याकडे उद्योजकांनी किवां सर्वसामान्य व्यक्तीने कश्याप्रकारे बघितलं पाहिजेत्यांचा दृष्टीकोन कसा असला पाहिजेआणि या संधीचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करू शकतोत्याच बरोबर सामाजिक बांधिलकी असलेले व्यवसाय कोणतेआणि ते कसे करावेतयाबद्दल देखील मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.


श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे, आणि सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन यांच्याविषयी थोडेसे:

  • St. Angelo’s Computer ltd. An ISO 9001:2008 Certified Company is one of the leading IT group in Mumbai, India. St. Angelo’s was Established in the year 1993 & today has grown up to be one of the largest IT training organizations in Mumbai.
  • सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन  हि एकमेव संस्था आहे जीला  Bombay Stock Exchange  व Ahmedabad Stock Exchange कडून पब्लिक इशु काढण्याची मान्यता मिळाली आहे.
  • आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन घडवलं आहे. आणि यांचे विद्यार्थी आतापर्यंत अमेरिकाचायनाहॉंग़-कॉंगन्यूझीलंडऑस्ट्रेलिया आणि सिंगापोर येथे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.
  • उद्योजकांना सामाजिक उद्योजकतेत येण्यासाठी नेहमीच प्रेरित करणे हा ध्यास आहे. शिकाकमवा आणि परतफेड करा या संकल्पनेतून सामाजिक उद्योजकतेला ते पाठींबा देत असतात.
  • माजी मुख्यमंत्री कै. श्री. विलासराव देशमुख यांनी सेंट अ‍ॅन्जेलोज व अथायडे यांना हजारो गरजू विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल खास सन्मानित केले आहे.
  • यांच्या कामाची दखल आत्तापर्यंत टाइम्स ऑफ इंडियाइंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवभारत, मिड-डे. इकॉनॉमिक टाइम्स तसेच स्टार टीव्हीझी टीव्हीइ टीव्ही, झी २४ तासस्टार माझासाम टीव्ही या सारख्या मिडिया ने घेतली आहे.  
  • मित्रांनोआपण या कार्यक्रमाला का उपस्थित असले पाहिजे हे आणखी नव्याने सांगायची गरज नक्कीच नाही... आपण आपल्या संपुर्ण कुटुंबासह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी आशा करतो.

अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: 'सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत'
दिनांक: १३ फेब्रुवारी २०१
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंत नाट्यमंदिर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८७६६६४२६६५४९६१९४६५६८९


27 April 2013

पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'

नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विनच्या परिवारासाठी २०१३ वर्ष दणक्यात सुरु झालं. १९ जानेवारीला बॉर्न टू विनने यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली. सहाव्या 'द सक्सेस ब्लू प्रिंट'  या कार्यक्रमाने या वर्षाची सुरुवात झाली. तसेच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा इथे साजरा झाला. आणि या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होत 'ध्येयनिश्चीती ते ध्येयपूर्ती' या आपल्या त्रैमासिकाच प्रकाशन!!
एप्रिल २०१३ ला सगळ्यांचा लाडका विषय म्हणजेच फ्युचर पाठशाला…. याच्यादेखील ५ बॅचेस पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने वसई, सँडहर्स्ट रोडपुणे आणि अलिबाग येथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. व आता बोरीवलीडोंबिवलीमाटुंगा इथे बॅचेस सुरु आहेत. तसेच लवकरच विले पार्लेकांदिवलीअंधेरीकर्जतवरळीबेलापूरकल्याणविक्रोळी, वाई (सातारा)ठाणे येथे सुरु होणार आहेत.
लक्ष्यवेधच्या पंधराव्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी जबरदस्त झाली आहे. बॅच खुपच छान पार पडली आणि आता सगळ्या आजी-माजी प्रशिक्षाणार्थ्यांना ओढ लागली आहे  ती पंधराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आगामी  लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे, ३० एप्रिल २०१३ रोजीयशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.) येथे संध्याकाळी ६:०० वाजता.
आपल्याला नेहमीच उत्सुकता असते की लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोणमित्रांनो नेहमी प्रमाणेच लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे या वेळी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत विकोचे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर. 'उद्योगक्रमणा सहा दशकांची' या त्यांच्या भाषणातून सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी शून्यातून इतकं विशाल साम्राज्य कसं प्रस्थापित केलं याचा सविस्तर  उलगडा ते करणार आहेत. 
श्री. गजानन पेंढारकर सर व विको लेबॉरेटरीज विषयी थोडेसे:

श्री. गजानन पेंढारकर हे विकोचे अध्यक्ष आहेत. यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. अहमदाबाद मध्ये ते फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९५७ साली ते वडिलांच्या व्यवसायात सामील झाले आणि लवकरच त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटीवनस्पती आणि इतर औषधे वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात यश मिळविले. सरांनी आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करुन देण्यासाठी अतिशय परिश्रम केले आणि कमालीचे यश मिळविले.
परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत "विको" ची उत्पादने होत असत. नंतर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारण्यात आला. १९८० साली "विको" ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज २०११ साली ती ३५० कोटीवर गेली आहे. श्री. गजाननराव पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचे, परिश्रमाचे हे फलित असून येत्या ५ वर्षात वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपयांवर नेण्याचा त्यांचा निश्चय आहे. भारतीय उत्पादने आणि आयुर्वेद परदेशात लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या निर्धारामुळेच सध्या ४० देशात त्यांची उत्पादने खपत आहेत. १९५५ पासून "विको" ची उत्पादने आईसलँड येथेही निर्यात होऊ लागली. आणि प्रथमच भारतीय माल तेथे पोहोचला. विकोला "International Trade Trophy Phonecia" हा मानाचा आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक करंडक १९८० साली "माल्टा" चे माननीय राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते मिळाला. ९२-९३, ९३-९४ व ९८-९९ साली देखील विकोला निर्यात प्रोत्साहनातील पारितोषिके मिळाली. विकोला आतापर्यंत उत्तम जाहिरात, निर्यात, दर्जा, आंतरराष्ट्रीय व्यापार, याबाबत देशी विदेशी अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. "२००२" हे वर्ष म्हणजे, विकोचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यावर्षी विको उद्योगसमुहाला ५० वर्षे पूर्ण झालीत.
अशा ह्या स्फुर्तीदायक कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित रहावे... 
पंधरावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'उद्योगक्रमणा सहा दशकांची'
दिनांक: ३० एप्रिल २०१३
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८७६६६४२६६५४९६१९४६५६८९



30 November 2011

"उद्योग निर्माण" - श्री. राजेंद्र सावंत आणि श्री. अजित मराठे

बॉर्न२विनच्या कार्यक्रमात डोळे ऊघडणारी, ऊद्बोधक मुलाखत.
 बॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यात  निर्माण रीअलटर्स अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेडचे चेअरमन राजेंद्र सावंत आणि कार्यकारी संचालक अजित मराठे हे दोन मान्यवर प्रमुख पाहुणे होते. बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी दोघांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अनेक दृष्टीने ऊद्बोधक होती, नव्हे डोळे ऊघडणारी होती.
राजेंद्र सावंत आणि अजित मराठे दोघेही इंजिनिअर. पार्ल्याच्या परांजपे विद्यालयात अगदी लहानपणापासून ते एकत्र शिकत. राजेंद्र संपन्न वर्गातील तर अजित निम्न मध्यम वर्गातील, दोघांच्या जाती वेगळ्या. पण या कशाचा अडथळा न येता ते दोघे घनिष्ट मित्र झाले, कारण त्या दोघांची उंची. ती जास्त असल्याने दोघांना मागच्या बाकावर बसावे लागे- बॅकबेंचर्स! पण बॅकबेंचर्स असूनही दोघांनी इंजिनिअरींगची पदवी घेतली. अजित यांनी इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे संघाचा स्वंयसेवक म्हणून पूर्ण वेळ काम केले. राजेंद्र यांनी त्यांच्या वडिलांना बांधकाम व्यवसायात मदत करणे सुरू केले. रायगड मिलीटरी स्कूलचे मोठे काम त्यांना करायला मिळाले व त्यातून खूप शिकायले मिळाले. पुढे वडिलांबरोबर व्यवसाय कसा करायचा यावरून मतभेद झाले. ते घराबाहेर पडले. ते व अजित यांनी मिळून व्यवसायच करायचे ठरवले. श्रीमंत व्हायचे असेल तर धंदा करणे आवश्यक हा स्पष्ट विचार त्यांच्या मनात होता. राजेंद्र यांनी वडिलांबरोबर व्यवसाय केला होता, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामाचा त्यांना अनुभव होता. इंजिनिअरींगची पदवीबरोबरच राजेंद्र यांच्या मते एफइ युनिव्हर्सिटीचे मौल्यवान शिक्षण गाठीशी होते. एफइ युनिव्हर्सिटी म्हणजे फिल्ड एक्सपिरीयन्स युनिव्हर्सिटी!

ह्या दोघांना पहिले काम मिळाले ते पाच हजार रुपयात एका घराचे पेंटींग करण्याचे. स्वत: रंगकाम केले. अशी छोटी कामे करत असताना १९९४मध्ये, अजित यांच्या मावशीने सुचवले, त्यांचा नेरळला प्लॉट आहे, तो प्लॉट विकसित करा. बदल्यात पैसे नकोत, दोन फ्लॅट द्या. हा प्रस्ताव म्हणजे जणू एक खाण मिळाली. या प्लॉट योजनेच्या भूमीपुजनाच्या दिवशी तेथिल बारा प्लॅटपैकी सहाचे बुकींग झाले. इतकच नाही तर तिथे नंतर असे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे चालून आले. राजेंद्र यांनी या योजनेची सुरवात करताना उद्गार काढले होते, इथे निर्माण नगरी होणार आहे. ते उद्गार सार्थ ठरवत या जोडीने तिथे पंचवीस इमारती बांधल्या.

अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना संबोधताना
या दोघांच्या कंपनीचे काम अशा प्रकारे सुरू होते. पण बांधकाम व्यवसाय हा अतोनात पैसा आवश्यक असणारा उद्योग आहे. २००२ पर्यंत ते कामे मिळवत होते, पूर्ण करत होते, पण आर्थिक बाजूचा फारसा विचार न करता. बरीच वर्षे कॅश फ्लोची समस्या होती. डोक्यावर चाळीस लाखाचे कर्ज झाले होते. अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा, उगाच धंद्यात पडलो. दोघांनी त्याच सुमारास लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे मात्र त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाला. डेलिगेशन हा शब्द त्यांनी इथे ऐकला आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणला. काम मिळाल्यानंतर त्यातच गुंतून न राहता, ते पूर्ण करण्याची जबाबदारी योग्य व्यक्तींवर सोपवून, त्यावर देखरेख करण्याचे काम स्वत:कडे घेणे असे धोरण त्यांनी स्वीकारले. यामुळे जास्त कामे ते घेऊ शकले. तसेच त्रयस्थपणे नजर ठेवल्याने गुणवत्ता राखली जात आहे याची खात्री बाळगतानाच, त्यातून उचित नफा कसा मिळवायचा तेही लक्षात आले. कंपनीकरता व्हिजन काय असावी त्यांनी ठरवले. अशा प्रशिक्षणाचा कोर्सचे या दोघांना इतके महत्व वाटते की ते सतत दर सहा महिन्यांनी असे नवे नवे कोर्स करत असतात. आपल्या कर्मचार्‍यांना सतत प्रशिक्षणाचा देतात. असे कोर्स म्हणजे स्वत:चा नव्याने शोध घेणे म्हणता येईल. लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स करून तर जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली असे ते म्हणतात. आपल्याकडे काही विचारवंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाचे कोर्स इत्यादी म्हणजे एकाच छापाची माणसे घडवणे, थोतांड वगैरे त्याला नावे ठेवतात. त्यांचे डोळे उघडायला हरकत नाही.
अर्थात व्यवसाय वाढवताना पैसा कुठून आणायचा हा फार मोठा प्रश्न होता. राजेंद्र म्हणतात ओपीएम हे भांडवल म्हणजे अदर पीपल्स मनी!  तुमची सचोटी, तुमचे नाव हे तुमचे भांडवल. तुम्ही जर शर्यतीत जिंकणारे घोडे असाल तर लोक तुमच्यावर पैसे लावणार. लोक पैसे देतात ते चॅरीटी म्हणून नाहीच वा बिनव्याजी नाही. त्यांनी दिलेल्या पैशावर त्यांना योग्य परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. तो त्यांना देऊन स्वत:ला वाजवी नफा मिळायला हवा. हे गणित जमले तर एफइ युनिव्हर्सिटीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन तुम्हाला यशस्वी उद्योजक ही पदवी मिळणार!


'उद्योग निर्माण' मुलाखत रंगात आली असताना...
पार्टनरशिप टिकली आहे, अशी उदाहरणे कमी आहेत. त्याबाबत राजेंद्र सांगतात, प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे. ती टिकवण्याचे त्यांनी नियम सांगितले ते असे: योग्य पार्टनर निवडता आला पाहिजे. एकमेकांबरोबर थेट संवाद होणे फार महत्वाचे आहे. मला न विचारता निर्णय का घेतला असा इगोचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून संवाद हवाच. एकमेकांबद्दल विश्वास हवा. तसेच स्वत:ची व पार्टनरची सामर्थ्यस्थाने ओळखता आली पाहिजेत. राजेंद्र म्हणतात मी क्रिएटर आहे, मी नवनवीन आयडिया देतो, पण अमंलबजावणीत कमी पडतो हे ते मोकळेपणाने सांगतात.
अजित पार्टनरशिपबाबत सांगतात, मतभेद झाले असा सुगावा लागला तरी लोक आगीत तेल ओतायला तयार असतात. इतकेच काय मतभेद नसतानाही लोक एकमेकांविषयी काय बोलतात, त्याऐवजी स्वत:च एकमेकांशी बोला. मनातून स्पष्टता हवी. व्यवसाय करताना प्रत्येक बाबतीत दोघांचे मत तंतोतंत जुळणार नाही. त्यातून कटूता येऊ शकते. तिचे लगेच निराकरण व्हायला पाहिजे. एक मार्मिक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला. पार्टनरशिप आहे म्हणून एकमेकांच्या घरात हस्तक्षेप करायचा, दुसर्‍याच्या घरात जास्त लक्ष घालायचे हे टाळलेच पाहिजे. त्यात अंतर राखायला हवे. खूप जिव्हाळ्याचे मैत्र असले तरी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. राजेंद्र हे लिडर आहेत असे अजित दिलखुलासपणे म्हणतात. महत्वाचा प्रस्ताव घेऊन कोणी आले तर पहिली मिटींग राजेंद्र यांच्याबरोबर होते, मग अजित ते काम पुढे नेतात.
मैत्रीच्या भक्कम पायावर त्यांच्या पार्टनरशिपची टोलेजंग इमारत ऊभी आहे.
लघुउद्योजकांना चांगली माणसे मिळत नाहीत, मिळाली तरी टिकत नाहीत ही समस्या नेहमी ऐकू येते. अजित त्याबाबत म्हणतात, नवी नवी माणसे आणा, तुमच्यापेक्षा हुशार माणसे आणा. ही चांगली माणसे तुमच्यासाठी पैसा कमावतील. ही माणसे छोट्या कंपनीत का येतील? जर तुमच्याकडे व्हिजन असेल तर येतील. वाढीच्या मार्गावर असलेल्या कंपनीत राहून त्यांचीही वाढ होत जाईल म्हणून येतील. कामाचे समाधान हा महत्वाचा मुद्दा आहे. मी सांगेन ते, तसच आणि तेवढेच करा म्हणजे ओझ्याचे हमाल व्हा, अशा पध्दतीने माणस असमाधानी राहतील. त्यांच्यावर कामाची जबादारी दिली पाहिजे, डेलिगेशन पाहिजे. ते केल्यानंतर त्यांच्यामागे ऊभे राहून त्यांच्या खांद्यावरून बघत त्यांना काय करायचे बारिकसारीक सूचना देत राहू नका. तुम्ही डेलिगेशन केले नाहीत तर अपवर्ड डेलिगेशन होते, म्हणजे हाताखालचा माणूस तुम्हाला कामाल लावतो, कारण तो प्रत्येक काम घेऊन तुमच्याकडे येतो आणि काय करू विचारतो! कामाची एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली पाहिजे. दैनंदिन व्यवहारातील आपल्या हस्तक्षेपाशिवाय कंपनी सुरू राहिली पाहिजे म्हणून टीम हवी. कर्मचार्‍यांची वृत्ती व सचोटी याला ते महत्व देतात. आवश्यक असेल तर कर्मचार्‍यांची मानसिकता बदलणे गरजेचे ते म्हणतात.  राजेंद्र म्हणतात लोक काम का करतात याच्या पाच प्रेरण आहेत. भीती, पैसा, कामाची दखल घेतली जाणे, त्याबद्दल शाबासकी, मालकाचे नेतृत्व, श्रद्धा उदा: देश, धर्म यासाठी लोक काम करतात. मग पैसा हा त्यांच्यासाठी बाय-प्रॉडक्ट असतो.
यशस्वी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्कार स्विकारताना
बिल्डर म्हटल्यावर एक प्रतिमा डोळ्यासमोर येते, शब्द बदनाम झाला आहे याबाबत राजेंद्र सांगतात, त्यांच्या आईने त्यांना सांगितले सामान्य माणूस आपल्या आयुष्याची कमाई विश्वासाने तुमच्या हवाली करतो, त्यांचा विश्वास सार्थ करा. आईला दिलेला शब्द ते कसोशीने पाळतात. लोक काय बोलतात यापेक्षा ग्राहक समाधानी आहेत याचा त्यांना आनंद आहे. स्वत:चे मन साफ आहे. लोकांचा इतका विश्वास निर्माणने कमावला आहे की लोक त्यांच्याकडे मुदतठेवीत पैसे ठेवतात तेही फक्त १२ टक्के व्याज मिळत असताना, कारणे इथे ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत हा त्यांचा विश्वास आहे. प्लॅटचे शंभर टक्के पेमेंट ते चेकने घेतात. चुक होणे आणि फसवणूक यात फरक आहे. त्यांच्या हातूनही कधी चुक होऊ शकते, पण त्याची दुरुस्ती केली जाते यामुळे विश्वास टिकून राहतो.

सहसा उद्योजकांची आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये अशी इच्छा असते. पण निर्माण मात्र आपले ज्ञान शेअर करण्यावर विश्वास ठेवते. पन्नास मराठी बिल्डर त्यांना तयार करायचे आहेत. त्यांनी साडे तीन वर्षांचा कोर्स त्याकरता तयार केला आहे. बिल्डरच्या हाताखाली बिल्डर ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली.
प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे.
अजित यांनी एक चांगली आयडीया सुचवली. समजा व्यवसायातील उलाढालीचा ५००० कोटी रुपयांचा टप्पा साधायचा आहे. मग अशा उद्योजकाला जाऊन भेटा, ज्याची तितकी उलाढाल आहे. त्याच्याबरोबर सहज बोलूनही काही नवीन गोष्टी समजू शकतात. अजित व राजेंद्र दोघे दीपक घैसासना भेटले, तेही डिनरच्या निमित्ताने. ह्या एका बैठकीतून आर्थिक बाजू कशा बघावा लागतात त्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. आपल्या व्यवसायाचे प्रॉफीट सेंटर काय आहे, कुठून नफा होतो ते शोधणे ही कल्पनाही अजित यांनी सांगितली.
काम व कुटुंबासाठी वेळ देणे, यांच्यात कसा समन्वय साधता हा एक हमखास प्रश्न असतो. त्याबाबत ते म्हणतात, २००२ पर्यंत आम्ही कामात सतत व्यस्त असायचो. घराकडे लक्ष दिले नाही. ते संघर्षाचे दिवस होते. नंतर घडी बसल्यावर व डेलिगेशन करणे सुरू केल्यावर आता वेळ देऊ शकतात.

मराठी उद्योजक म्हटल्यावर समाजसेवेची अपेक्षा असते. उद्योजक स्वत: त्यात गुंतला तर व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार हा धोका त्यात असतो. परंतु निर्माणने त्याचीही एक सुनियोजित प्रणाली तयार केली आहे. प्रत्येक प्लॅटमागे ते पाच हजार रुपये समाजासाठी बाजूला काढून ठेवतात. त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शंभर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातो.

यापुढील व्हिजनबाबत ते सांगतात, आम्हाला कधीच रहेजा, हिरनंदानी बनायचे नव्हते. एल अॅन्ड टी सारखी एक उत्तम नाव असलेली कंपनी व्हावे असे वाटते. आणखी तीन वर्षांनी वार्षिक उलाढाल पाच हजार कोटीपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आज त्यांचे चाळीस प्रकल्प सुरू आहेत. भारतातील पहिल्या पाच बिल्डरपैकी एक त्यांना व्हायचे आहे. या उद्दीष्टांबरोबरच राजेंद्र यांनी एक उद्दीष्ट सांगितले ते अक्षरश: क्रांतिकारी म्हणावे असे आहे. मराठी समाज म्हणजे धंदा करणारा समाज अशी समाजाची ओळख असावी अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे. असा विचार सुचणे हीच परिवर्तनाची नांदी आहे.
बॉर्न२विन आपल्या प्रशिक्षणातून उद्योजकांना प्रेरित करत असतेच, पण अशा कार्यक्रमातून सातत्याने उद्योग व अर्थक्षेत्रातील मान्यवरांना, लोकांसमोर आणून त्यांचे उद्बोधन करत असते, त्यामुळे राजेंद्र यांची महत्वाकांक्षा पूर्ण होईल अशी आशा वाटते.


उदय कुलकर्णी  ९८६९६ ७२६९६
kuluday@rediffmail.com
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites