बॉर्न२विन ही उद्योजकांना, व्यावसायिकांना व सर्वसामान्यांना प्रशिक्षण देणारी, मुंबईतील एक आघाडीची संस्था आहे. उद्योग-व्यवसायात प्रगती साध्य करणे, तसेच व्यक्तीमत्व विकास साधणे यासाठी ही संस्था प्रशिक्षण देते. लक्ष्यवेध हा त्यांचा प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सहभागी व्यक्तींसाठी संस्था लक्ष्यसिध्दी सोहळा ह्या खास कार्यक्रमाचे नेहमी आयोजन करत असते. यात मान्यवर उद्योजकांना बोलावून त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सन्मानपत्र देण्यात येते. त्याचबरोबर बॉर्न२विनचे तरूण, धडाडीचे संचालक अतुल राजोळी या मान्यवर उद्योजकांची मुलाखत घेतात. त्यातून उपस्थितांना खूप मार्गदर्शन मिळते. उद्योगातील काही महत्वाची सुत्रे हाती गवसतात. आतापर्यंत या सोहळ्यात कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, एल अॅन्ड टीचे सीएफओ वाय.एम.देवस्थळी, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, निर्माण रीअलटर्स ग्रुपचे अजित मराठे व राजेंद्र सावंत असे अनेक नामवंत या कार्यक्रमात आले होते. नुकत्याच २१/२/१२ला झालेल्या लक्ष्यवेध सोहळ्यात त्यांनी मुंबईचे डबेवाले या नावाने प्रसिध्द, त्यांचे प्रतिनिधित्व करणारे श्री रघुनाथ मेदगे व श्री गंगाराम तळेकर या दोन मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.
बॉर्न२विन संस्थेच्या बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी दोघांची मुलाखत घेतली. तिचा हा वृत्तांत:
बॉर्न२विन ही उद्योजकांना प्रशिक्षण देणारी संस्था. मग त्यांच्या कार्यक्रमात डबेवाल्यांना का बोलवायचे? ती तर सेवाभावी वृत्तीने काम करणारी, थोडक्यात संतोष मानणारी वारकरी पंथाची मंडळी अशी कोणाला शंका येऊ शकेल. पण त्यांना बोलावण्यामागे फार महत्वाचे कारण होते, त्यांच्या जगप्रसिध्द – होय- फोर्बसने नावाजलेल्या त्यांच्या सिस्टमविषयी जाणून घेणे. डबेवाले रोज २ लाख डबे लोकांच्या घरातून त्यांच्या कार्यालयात पोचवतात. ह्या कामात चुका होण्यास भरपूर वाव आहे, पण डबेवाल्यांचे चुकांचा रेशिओ आहे, १ कोटी ६० लाख डिलिव्हरीमध्ये फक्त १ चुक. त्यामुळेच त्यांना सिक्स सिग्मा हे मानांकन देण्यात आलेले आहे. जनरल मोटर्स, जीई यांच्याबरोबरीने त्यांना हे मानाचे स्थान मिळाले ते अक्षरश: मेहनतीच्या जोरावर तितकेच एका विचारपूर्वक आखलेल्या अभेद्य सिस्टमच्या जोरावर. मॅनेजमेंट-व्यवस्थापनाची तत्वे याबाबत आता लोकांना खूप माहिती आहे. अनेकजण एमबीए करतात. पण डबेवाल्यांचा व्यवसाय सुरू झाला १८९० साली. मुख्यत: ते अशिक्षित-अर्धशिक्षित. त्यांनी ही आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे अनुस्यूत असलेली सिस्टम अमलात आणण्याचा त्याकाळी विचार करावा, ती इतकी वर्षे यशस्वीपणे राबवून दाखवावी हे खरेच जागतिक आश्चर्य आहे. म्हणूनच जगभरातून त्यांचे कौतूक होते. ह्या सिस्टमध्ये ते प्रत्येक डब्यावर कोडींग करतात. ह्या कोडींगसाठी खूणा, अक्षर, याबरोबरच त्यांनी त्याला रंगाची जोड दिली. यामुळे डबेवाल्यांसाठी ती सोपी झाली. तसेच चुक होण्यास वाव राहिला नाही.
यशस्वी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्कार स्विकारताना
मुंबईत सुमारे १२० वर्षांपूर्वी व्हीटी स्टेशन बांधण्यास सुरवात झाली. त्या कामाकरिता खूप मोठ्या संख्येने लोक तिथे येत. त्यावेळेस हॉटेल, कॅंटीन अशा जागोजाग सोयी नव्हत्या. लोकांना घरून डबे पोचवावेत अशी कल्पना सुचली आणि डबेवाला संस्थेचा जन्म झाला. पुढे १९५६साली त्याची संस्था म्हणून नोंदणी झाली. आज या डबेवाल्यांची तिसरी पिढी ह्या कामात आहे. आजचा या कामाचा व्याप बघितला तर रोज २ लाख डबे पोचवले जातात व परत घरी आणून दिले जातात. ५००० डबेवाले रोज ७० किमीचा प्रवास करून हे काम करतात. सेंट्रल व वेस्टर्न व आता नवी मुंबई तिन्ही रेल्वे लाईनवर ते कार्यरत आहेत व ७० स्टेशन ते कव्हर करतात. डबेवाले इयत्ता पाचवी ते सातवी शिकलेले आहेत. एका डबा बास्केटचे वजन सुमारे ६५ किलो असते. इतका मोठा व्याप असूनही यात कोठेही पेपरवर्क नाही आणि २ लाख डबे न चुकता योग्य ठिकाणी पोचवले जातात. वह्या व्यवसायाचे सर्वात वेगळेपण म्हणजे हे डबेवाले त्यात भागीदार आहेत. केवळ पैसे देऊन कामावर ठेवलेले ओझ्याचे हमाल नाहीत. १९८० पासून मालक-नोकर पद्धत बंद करून त्यांनी डबेवाल्यांना भागीदारी दिली. २००८मध्ये जगभर अर्थव्यवस्था कोसळली हे आपल्याला माहीत आहे. भांडवलशाही व्यवस्थेत दोष आहे का यावर विचारमंथन सुरू झाले. आधी पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या बाबतीत शेअरहोल्डर्सचा फायदा, त्यांचेच हित याला सर्वोच्च प्राधान्य होते. आता स्टेकहोल्डर असा शब्द वापरला जातो. म्हणजे यात कंपनीचे कर्मचारी, ग्राहक, समाज सगळ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे हे तत्व आहे. डबेवाल्यांनी ते चक्क १९८०पासून अमलात आणले आहे. ग्राहकहिताला तर त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले.
नवा माणूस जेव्हा त्यांच्याकडे कामाल येतो तेव्हा त्याला सहा महिने प्रशिक्षण दिले जाते, तेही स्टायपेंड देऊन. माणूसही ते अगदी पारखून घेतात. सुदृढ असेल बघतात. त्याला हिंदी बोलता येते हे बघतात.
कामावर असताना कडक नियमांचे पालन त्यांना करावे लागते. टोपी नसेल तर दंड, विनापरवानगी गैरहजर राहता येणार नाही असे नियम कसोशिने पाळले जातात. मिटींगसुध्दा काकामच्या वेळेनंतरच होतात. नाहीतर सामान्य माणसाचा अनुभव असतो, तो सरकारी कार्यालयात कामासाठी गेला, त्याला सांगण्यात येते, साहेब मिटींगला गेले आहेत! टोपीमुळे त्यांना एक आयडेंटिटी मिळते, त्याचबरोबर खच्चून भरलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये ते एकमेकांच्या पटकन नजरेस पडतात हाही फायदा आहे.
दत्ता सामंतांच्या संपानंतर गिरण्या बंद पडल्या, त्यावेलेस १००-२०० डबेवाल्यांचे काम कमी झाले. पण याच मिलच्या जागेवर मॉल आले, तिथे ऑफिसेस आली आणि पुन्हा डबे सुरू झाले. २६जूलैच्या पुरानंतर दुसर्या दिवशी त्यांनी पुन्हा डबे पोचवणे सुरू केले.
'मुंबईचा अन्नदाता' मुलाखत रंगात आली असताना...
आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे, परदेशी माणसांनी कौतुक केल्यावर आपण त्याची दखल घेतो. डबेवाल्यांच्याबाबतीतही तेच झाले. ४/११/२००३ला कार्तिकी एकादशीला प्रिन्स चार्ल्सनी डबेवाल्यांची चर्चगेट स्टेशनच्याबाहेर भेट घेतली त्यानंतर देशात त्यांना प्रसिध्दी मिळाली. यात प्रिन्स चार्ल्स यांचे कौतुक करावे तसेच डबेवाल्यांचेही कौतुक करायला पाहिजे. जेव्हा प्रिन्स चार्ल्सनी त्यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा हॉटेलमध्ये भेटायला जाण्यास नकार देऊन त्यांनी चर्चगेट स्टेशनवर भेट घेतली. सकाळी ११.२० ते ११.४० ही ऐन कामाची वेळ, त्यात खोटी व्हायला नको, ही कर्तव्याची भावना त्यांच्या मनात होती. पण सार्वजनिक भेट झाल्याने त्यांना त्या प्रसिध्दीचा लाभ मिळाला. आता बीबीसी, नॅशनल जिओग्राफिकने त्यांच्यावर लघुपट बनवले. दिल्ली, अहमदाबादच्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर रिसर्च केला. सप्लाय चेन मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट हे व्यवसायात कसे वापरले जाते ते बघितले.
२६ जानेवारी २०१०ला दिल्लीतील चित्ररथात डबेवाल्यांचे दृश्य होते, त्याला प्रथम क्रमांचे पारितोषक मिळाले.
मुलाखतीआधी बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी लिडर, नेता कोणाला म्हणावे याविषयी विचारमंथन केले. ते म्हणाले, नेता तो असतो, ज्याला आपले पॅशन-आपला ध्यास काय आहे ते ओळखता येते. मग तो ध्येनिश्चिती करतो. हे ध्येय साध्य करण्यासाठीचा त्याचा प्रवास हा आनंदाचा असतो. त्यात तो स्वत: शिकतो, त्याचा विकास होतो, कुटुंबाचाही विकास होतो, त्याचा समाज, उद्योग, देश असा सगळ्यांवर प्रभाव होतो व त्यांचाही विकास होतो. लिडर-नेता हा जन्माला यावा लागतो ही चुकीची समजूत आहे तर तो घडवता येतो, किंबहूना त्याच्या कृतीतून तो घडत जातो.
डबेवाल्यांचे प्रतिनिधी गंगाराम तळेकरही त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी म्हणाले की माणसाला प्रेरणा देण्याचे वर्ग कुठे नसतात, अशी माझी समजूत होती. पण बॉर्न२विनच्या सहभागींचा जोश बघून त्यांनी आपल्या विचारात खुलेपणाने बदल केला. ते म्हणाले, इथे येऊन खरोखरच माणसाला प्रेरणा मिळते, हे बघायला मिळाले. डबेवाले म्हणजे केवळ भावनिक अंगाने मुलाखत न घेता, त्यांच्या सिस्टमचे रहस्य जाणून घेणारा, तसेच त्यांनाही नवीन दृष्टी देणारा हा एक उपयुक्त कार्यक्रम झाला.
उदय कुलकर्णी ९८६९६ ७२६९६
1 comment:
NAMASKAAR ATUL SIR, VERY FIRSTLY THANK YOU VERY MUCH FOR INVITING SUCH EXCELLENT PERSONALITIES FOR OUR LAKSHYASIDDHI SOHALA,EXPERIENCE OF LISTENING THEIR SYSTEM OF OPERATIONS WAS REALLY AMAZING...THEIR DISCIPLINE IN WORK... COMMITMENT TOWARDS THEIR WORK IS JUST PHENOMENAL... THANKS SIR....
Post a Comment