अनघा
दिघे - सोमवार,
२३
जानेवारी २०१२ (LOKSATTA)
व्यापारामधील सृजनशीलता राखण्यासाठी जगभरात सोनी उद्योगसमूह विख्यात आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये स्वतंत्र ठसा उमटवलेल्या या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे - सोनी कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आणि विख्यात उद्योजक अकियो मोरिता असं म्हणायचे की, चुकांमुळे कचरत जाऊ नका, परंतु तीच तीच चूक तुम्ही परत करत नाही ना, याची मात्र खबरदारी घ्या. कुठलीही समस्या ही तंत्रज्ञानाच्या आधारे सोडवता येते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सोनीचे कर्ताकरविता म्हणून ते सुपरिचित होते आणि राहतीलही. हल्लीच्या जमान्यातील टेक्नॉलॉजिकल जायंटच्या - सोनीच्या यशस्वी वाटचालीमागे अकियो मोरिता यांचा भव्य उद्योजकीय दृष्टिकोन होता आणि आहे. जगरहाटीनं स्वीकारलेल्या नेहमीच्याच मार्केटिंग संकल्पना त्यांनी बदलल्या. ब्रँडची ओळख आणि ब्रँड आयडेंटिटी तसंच ब्रँड - विश्वसनीयता या गोष्टी रुजवून मोरिता यांनी या गोष्टी व्यापाराचे बलस्थान असल्याचे दाखवून दिले. ‘अत्यंत विकसित आणि उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान देणारा उद्योग’ या अढळ पदावर जपानी तंत्रज्ञानाला तसेच सोनी उद्योगाला नेण्यामध्ये मोरिता यांचे भरीव योगदान आहे.
व्यापारामध्ये सृजनशीलता आणणे म्हणजेच अशा कल्पना कार्यान्वित करणे की, ज्यामुळे कंपनीला आथक लाभ होऊन ती ठोस पावले टाकत पुढे जाईल. ही किमया अकियो मोरिता यांनी साधली होती. पठडीतले विचार सोडून किंवा चाकोरी मोडून विचार करणारा उद्योजक ही अकियो मोरिता यांची नेमकी ओळख आहे. २६ जानेवारी या अकियो मोरिता यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचे केलेले हे सिंहावलोकन.. त्यांचे अभिजात आणि प्रेरणादायी विचार हे आजही सयुक्तिक ठरतात हीच त्यांच्या महानतेची खूणगाठ आहे.
व्यापारातील सृजनशीलता
विज्ञान हा तंत्रज्ञानाचा पर्याय असू शकत नाही, तसेच अभिनव नवनिर्मितीचे तंत्रज्ञान हा पर्याय ठरत नाही. दुसर्या शब्दांत मांडायचे तर, केवळ टेक्नोलॉजी आहे, म्हणून नवनिर्मिती बाजूला ठेवून देता येत नाही. नवनिर्माण क्षमता ही व्यवसाय - उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लंडन येथील रॉयल सोसायटीमध्ये १९९२ सालामध्ये दिलेल्या मोरिता यांच्या भाषणाचे शीर्षकच मुळी अशा आशयाचे होते- (S [Science] does not equal T
[Technology] and T does not equal I [Innovation].) मोरिता यांच्या दृष्टिकोनातून, खर्याखुर्या सृजनशीलतेची कास धरायची तर केवळ ‘इनोव्हेटिव्ह’ तंत्रज्ञान जवळ बाळगणे पुरेसे नाही.’ खराखुरा अभिनव नवनिर्माण हा तीन सूत्रांनी प्रत्यक्षात आणला जातो, असे मोरिता यांना ठामपणे वाटत असे. या सूत्रांचा उल्लेख ‘थ्री क्रिएटिव्हिटीज’ असा ते करीत असत. मोरिता यांनी दिलेल्या या ‘थ्री क्रिएटिव्हिटीज’ पुढीलप्रमाणे आहेत-
१. तंत्रज्ञानातील नवनिर्माण (Creativity in Technology)
२. उत्पादन आयोजनातील नवनिर्माण (Creativity in Product Planning)
३. विक्री तसेच प्रचारातील सृजनशीलता (Creativity in Marketing)
अभिनव नवनिर्मिती ही आधीपासूनच उपस्थित असणार्या घटकांचे मिश्रण असते. सर्वसामान्य मतप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अकियो मोरिता असे ठामपणे मांडतात की, अंतस्फूर्त प्रज्ञेने तंत्रज्ञानाचा सृजनशीलतेने वापर करूनच - उद्योजकांना यश प्राप्त होते. कितीही उत्कृष्ट असले तरी एकटे, एकाकी तंत्रज्ञान हे विकले जात नाही.
‘बरेचजण हे ओळखत नाहीत, मात्र उत्पादन आयोजनातील सृजनशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘प्रॉडक्ट प्लानिंग’ मधील सृजनशीलता एवढी महत्त्वाची आहे की, उपयुक्त, आकर्षक आणि युझर - फ्रेन्डली उत्पादन जर तुम्ही निर्माण करू शकला नाहीत तर.. सर्व आयाम जमेस धरूनही ते तंत्रज्ञान तुमच्या दिमतीला उभे राहू शकत नाही. आणि अशा तर्हेने किती नावीन्यपूर्ण तसेच अलौकिकरीत्या तुम्ही उत्पादन काढू शकता, याचा विचार आवश्यक आहे,’ असे मोरिता सांगतात.
‘नवनिर्माण हा उद्योगाकडे पाहण्याचा ‘सिक्थ सेन्स’ असतो. मोरिता यांचे असे निरीक्षण आहे की, व्हिडीयो टेप तंत्रज्ञान हे बाजारपेठेत सर्वप्रथम १९६५ सालामध्ये आले. परंतु होम व्हिडीओ मार्केट निर्माण होण्यासाठी १९७५ साल उजाडावे लागले. यालाच मी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट प्लानिंग असं म्हणेन. व्हिडीओची टेप रीळमधून बाहेर काढून सुटसुटीत बेटामॅक्स कॅसेटमध्ये घालून घरगुती वापरासाठी सादर केली गेली. असं नवीन देण्यासोबतच त्याच्या प्रचार आणि मार्केटिंगमधील नवता ही देखील डावलता येणार नाही. तुमच्यापाशी महान तंत्रज्ञान आहे आणि उत्कृष्ट उत्पादनही आहे, परंतु तेवढंच पुरेसं होत नाही. तुमच्या उत्पादनाचं स्वागत करण्यासाठी बाजारपेठेमध्ये त्याचा पुरेसा गवगवा झाला पाहिजे. ग्राहकाला त्यांची विस्तृत माहिती दिली गेली पाहिजे.’ सोनीच्या इतिहासातील एक नामी उदाहरण आपला मुद्दा पटवण्यासाठी मोरिता देतात. हा ‘वॉकमन’चा किस्सा आहे. अनेक लोकांनी जगभर एक अभिनव चमत्कार असे वॉकमनचे कौतुक केले; पण त्यात तंत्रज्ञानाचे काय नावीन्य आहे? (वॉकमनचे सगळे पार्ट्स किंवा घटक-उपघटक हे तर आधीपासूनच उपलब्ध होते.)
‘सांगायचं असं, तर वॉकमनच्या निर्मितीमध्ये मलाचा दगड ठरावं असं कुठलंही ब्रेक-थ्रू तंत्रज्ञान नव्हतं. त्याचं यश हे उत्पादन आयोजनातील नवनिर्माण आणि विक्री तसेच प्रचारातील सर्जनशीलतेवर आधारलेलं होतं.’ असं मोरितांचं म्हणणं.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच उद्योगाचा गाभा ध्यानात येणं, ग्राहकाची नस पकडणं या दिशेनं प्रयास व्हावे लागतात. बिझनेस - आकलनामध्ये केलेल्या प्रगतीवर एक यशस्वी उद्योजक घडत असतो.
No comments:
Post a Comment