बॉर्न२विनच्या कार्यक्रमातून उलगडले जाहिरातीचे विश्व. ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

22 July 2012

बॉर्न२विनच्या कार्यक्रमातून उलगडले जाहिरातीचे विश्व.

बॉर्नविन संस्था लक्ष्यवेध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आपल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यासाठी लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करते. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याप्रसंगी ही संस्था उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला बोलावून, त्यांच्या मुलाखतीतून नव-उद्योजकांना प्रेरित करत असतेच, शिवाय त्यातून त्या उद्योगक्षेत्राची खूप माहितीही मिळते.
१० मे १२ ला झालेल्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात ह्यावेळेस प्रमुख पाहुणे होते जाहिरातक्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व गोपी कुकडे. हे नाव वाचल्या बरोबरच अनेकांना ओनिडा टिव्ही आणि डेव्हील ही जाहिरात नक्कीच आठवेल. ही जाहिरात कशी सुचली, इतरही अनेक जाहिराती कशा सुचल्या, त्यामागे काय लॉजिक होते, अशा अनेक बाबींचा विशिष्ट जाहिराती घेऊन त्या, त्या संदर्भात त्यांनी खुलासा केला. ही मुलाखत घेतली बॉर्न २ विनचे संचालक अतुल राजोळी यांनी.
अगदी सुरवातीलाच गोपी कुकडेंनी जोर देऊन स्पष्ट केले की मराठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा, पण इंग्लीश भाषेवरही प्रभुत्व अगदी हवेच. फक्त मराठीच येत असेल तर ते आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे होईल. त्यांना ह्या बाबीवर सुरवातीलाच जोर द्यावा वाटला यावरूनच ह्या मुद्याचे महत्व लक्षात येते.
गोपी कुकडे यांचे वडिल चित्रपटक्षेत्रात फोटोग्राफर होते, पण अचानक त्यांना त्या क्षेत्रातून बाहेर पडावे लागले. वाईट दिवस आले. गोपी यांची आई फार प्रॅक्टीकल होती व गोपींबरोबर त्यांची वागणूक मित्रासारखी होती. जे विषय सहसा घरात टाळले जातात, त्याविषयीही त्या आपल्या मुलांना माहिती देत, म्हणजे मुलांच्या कानावर बाहेरून कुठून चुकीची माहिती जाऊ नये. गोपींना लहानपणापासून चित्रे काढण्याची आवड होती, रांगोळीही काढत. त्यांना खरे तर आर्कीटेक्ट व्हायचे होते, पण जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये ते प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांची चित्रकलेतील गती व त्या परिक्षेतील गुण बघून तिथल्या सरांनी त्यांना कमर्शियल आर्टला जायचा सल्ला दिला व तो कोर्स त्यांनी पूर्ण केला. त्या आधी त्यांनी एस.एस्सी.नंतर चित्रपटांचे होर्डींग्ज रंगवण्याचे कामही पुष्कळ केले. भव्य आकाराची ही होर्डींग्ज रंगवल्यामुळे त्यांची रंगाची भिती गेली, ड्राईंग चांगले झाले. हे काम त्यांनी पाच-सहा वर्षे केले.
कमर्शियल आर्टचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुलजारच्या मीरा चित्रपटाचे कॅम्पेन केले. हेमा मालीनी व व विनोद खन्ना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळेस चित्रपट हा एक प्रॉडक्ट आहे, त्याचेही कॅम्पेन केले जाऊ शकते हेच कोणी सुरवातीला मान्य करत नव्हते. पण या कॅम्पेनला सुवर्णपदक मिळाले व नंतर मात्र असे कॅम्पेन सर्रास केले जाऊ लागले. कॉलेजनंतर ते त्यावेळच्या चित्रा ह्या जाहिरात एजन्सीत रुजू झालेले होते. रावळगाव कंपनीच्या पानपसंदच्या जाहिराती त्यांनी इथेच केल्या. ह्या फक्त १० सेकंदाच्या होत्या, बजेट कमी होते. पानपसंद सारख्या प्रॉडक्टना ब्रॅंड लॉयल्टी नसते, ते लहर आली म्हणून घेतले जाते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आधी माणूस खूप रागावून बोलत आहे व पानपसंद खाल्यावर गोड आवाजात बोलत आहे अशा जाहिराती त्यांनी केल्या. लोक ज्यांना ओळखतात, असे भारती आचरेकर, चंदू पारखी, दुबे असे प्रसिध्द कलाकार घेतले, म्हणजे लोक लगेच त्यांच्याशी रिलेट होऊ शकतील.

गोपी म्हणतात, जाहिराती करताना त्या प्रॉडक्टची खूप तांत्रिक माहिती देऊन उपयोग नाही. ग्राहकाला त्यातून काय फायदा मिळतो यावर जाहिरातीत भर दिला पाहिजे. हे फायदे एकदम भाराभर पंधरा देऊन उपयोग नाही. जे महत्वाचे उपयुक्त फायदे आहेत ते सांगितले पाहिजेत. तसेच टारगेट कस्टमर कोण आहे ते विचारात घेतले पाहिजे. अॅड एजन्सीज ज्या कंपनीच्या प्रॉडक्टसाठी जाहिरात बनवतात त्या कंपनीच्या मालकाकडून/अधिकार्‍यांकडून ती जाहिरात संमत केली जाते व नंतरच ती प्रदर्शित केली जाते. अॅड एजन्सीजचे लोक व कंपनीचे मालक/ अधिकारी यांच्यात सामंजस्य असणे, रॅपो असणे आवश्यक असते. एशियन पेंटसच्या जाहिराती गोपी यांनी बनवल्या, त्यांच्याबरोबर असा छान रॅपो होता अशी गोपी यांनी आठवण सांगितली. फोनवरसुध्दा एशियन पेंटसच्या जाहिरातींचे अप्रुव्हल व्हायचे. चित्रा एजन्सीमध्ये कामाचे फारसे प्रेशर नव्हते.

 ज्या माणसांना स्वत:ला आव्हान द्यायला आवडते त्यांना अशी स्थिती मानवणारी नसते. त्यामुळे गोपी क्लॅरिएंट कंपनीत रूजू झाले. ह्या कंपनीबद्दल स्पष्टपणे त्यांनी सुरवातीलाच सांगून टाकले इथे मी राजकारण (ऑफिस पॉलीटीक्स), दुष्टपणा शिकलो. मात्र ते म्हणतात हेही आवश्यकच असते! ह्या कंपनीत त्यांनी हॉकीन्स प्रेशर कुकरची जाहिरात बनवली. ब्रह्म वासुदेव हे हॉकीन्स कंपनीचे प्रमुख. त्यांनी सांगितले प्रेशर कुकर किचनमध्ये असतो, तो मला डायनिंग टेबलवर आणायचा आहे. गोपींनी विचार केला जर तो किचनमधून बाहरे आणायचा आहे तर त्याची शिट्टी काढली पाहिजे. शिट्टीसकट तो टेबलावर येऊ शकणार नाही. हॉकीन्सच्या तांत्रिक टीमनेही यावर विचार केला व ती शिट्टी दिसणार नाही असे डिझाईन बनवले. फ्युचुरा नावाचा हा कुकर प्रिमियम प्रॉडक्ट आहे व त्याच्या डिझाईन निमिर्तीपासूनच अॅड कंपनीचा त्यात सहभाग होता.
गोपींचे महत्वाचे काम म्हणजे बिग बाझारच्या जाहिराती.  बिग बाझारच्या किशोर बियाणींबद्दल ते म्हणतात, बियाणी चांगले लिडर आहेत, ते चांगले श्रोते आहेत तसेच चांगले शिक्षक आहेत. इससे सस्ता और अच्छा काही नही ही बिग बाझारची जाहिरात प्रसिध्द आहे. एका शहरात बिग बाझारचे लॉंच होणार होते. जाहिरातीत चूकून साखरेची किंमत एक तृतीयांश म्हणजे पंधराऐवजी पाच छापली गेली. लोकांनी रांगा लावल्या, दंगा व्हायची वेळ आली. बरं, किंमत छापण्यात चूक झाली आहे असे लोकांना सांगता येणे शक्य नाही. गोपींना वाटले बिग बाझारला इतका तोटा सहन करावा लागला, गेला आता हा अकाऊंट आपल्या हातून. पण बियाणी म्हणाले किती तोटा होइल? सात-आठ लाख रुपये, पण आपल्याला पंचवीस लाखाची प्रसिध्दी मिळाली. 
ओनिडा टीव्ही आणि त्याचा डेव्हील ह्या अतिशय गाजलेल्या जाहिरातीविषयी अतुल राजोळींनी विस्ताराने विचारले कारण ती जाहिरात तशीच माईलस्टोन जाहिरात आहे. गोपींनी सांगितले हा डेव्हील सहज गंमत म्हणून आलेला नाही. त्यामागे निश्चित विचार होता. १९८२चा तो काळ होता. तेव्हा टीव्ही मॅन्यूफॅक्चरर ज्या कंपन्या होत्या, त्या बहुतेक परदेशातून टीव्हीचे सुटे भाग आयात करत व त्याची जुळणी फक्त इथे करत. त्यातही जे तंत्रज्ञान परदेशात जूने झाले आहे ते स्वस्तात इथे आणणे हे धोरण होते. म्हणजे खरे तर ह्या कंपन्या मॅन्यूफॅक्चरर नव्हत्या तर ट्रेडर होत्या. देशात जवळपास वीस ब्रॅंड होते. सगळे जाहिरात करताना टेक्निकल बाबींवर जोर द्यायचे. ओनिडा टीव्हीच्या जाहिरातीचे काम गोपींकडे आले. बजेट कमी म्हणजे फक्त तीन लाख होते. गोपींनी ठरवले लक्ष वेधून घ्यायचे तर त्यात काही शॉक व्हॅल्यू हवी, त्यामुळे त्यांनी एन्व्ही - मत्सर हा घटक त्यात आणला. दगड मारून टीव्ही फोडणारा हा डेव्हील चांगलाच गाजला आणि ओनिडा टीव्हीची खूप विक्री झाली. पण गोपी आग्रहाने सांगतात, टीव्हीचा दर्जाही खूप चांगला होता, गुणवत्तेत, तांत्रिकबाबीत तो टीव्ही चांगला होता म्हणूनच ही जाहिरात यशस्वी झाली. डेव्हील ही पाश्चात्य जगातील संकल्पना. आपल्या राक्षसाऐवजी हा डेव्हील घेतला याबाबत ते सांगतात, एक रावण सोडला तर आपले राक्षस सहसा डोके नसलेले. उलट हे डेव्हील हुशार. फक्त चुकीच्या मार्गाला गेलेले म्हणून ते सैतान आणि त्यांना असा हुशारच डेव्हील हवा होता. तसेच ह्या डेव्हीलचे काम करणारी व्यक्ती अभिनेता नव्हता की मॉडेल. तो होता मॉडेल को-ऑर्डीनेटर. पण त्याचा चेहरा डेव्हीलच्या रोलसाठी खूपच फिट होता. त्याचा आवाज मात्र प्रसिध्द निवेदक हरिश भिमाणींचा आहे. ह्याच ओनिडा टीव्हीची जाहिरात नंतर दुसर्‍या कंपनीने करणे सुरू केले तेव्हा त्यांनी त्यांनी डेव्हीलला काढून टाकले. प्रतिस्पर्धी कंपनीची यशस्वी झालेली कॅम्पेन दुसरी कंपनी कशी चालवून घेणार? पण नंतर ओनिडा टीव्हीच्या विक्रीवर मात्र परिणाम झाला. तसेच जेव्हा गोपींनी डेव्हील आणला तेव्हा अनेकांनी ओनिडा टीव्हीचे मालक मिरचंदानी यांना सांगितले, हे काय केले, कसली जाहिरात केली, आता तुमची वाट लागेल, असा टीव्ही फोडला जात असेल तर तुमचा टीव्ही कोण घ्यायला बघेल. पण हीच जाहिरात माईलस्टोन ठरली व यशस्वी झाली. 


लघुउद्योजकांनी कशाप्रकारे जाहिरात करावी असे अतुल राजोळींनी विचारले. गोपी म्हणाले, आपला जो टारगेट ग्राहक आहे त्याच्या अपेक्षांशी मॅच होणारी जाहिरात हवी. ती सोपी हवी, नेमकी हवी. ग्राहकाची गरज काय आहे ते कळले पाहिजे व त्या गरजेला अनुलक्षून जाहिरात केली पाहिजे. तसेच प्रॉडक्टविषयी एकच गोष्ट सांगा, दहा गोष्टी सांगून तोटाच होईल.
एक चपखल उदाहरण त्यांनी दिले. ते सकाळी घराजवळच्या जिममध्ये जातात, जिमच्या मालकीण त्यांना म्हणाल्या आम्ही खूप जाहिरात केली, खर्च केला पण उपयोग झालेला नाही. आता तुम्ही बघा. गोपींनी सांगितले तुमची ही एक स्थानिक जिम आहे, सगळ्या शहरभर शाखा नाहीत. मग पेपरमध्ये, टीव्हीवर जाहिरात देऊन उपयोग काय? बोरिवलीच्या माणसाला जाहिरात चांगली वाटली तरी तो सांताक्रूजला येऊन जिम जॉईन करणार नाही. जिम घराजवळच असावी लागते. त्यामुळे जिमजवळच, बसस्टॉपवर वगैरे जाहिराती केल्या. त्यातही लिहिले:

"आय हेट जिम्स, दे आर बोअरींग
आय लव्ह ....जिम, इट इज समथिंग मोअर.."

ही जाहिरात चांगलीच प्रभावी ठरली.


गोपींच्या आयुष्यातील एक टप्पा म्हणजे जाहिरातक्षेत्रात प्रचंड यश मिळालेले असतानाही त्यांनी वयाच्या ३६व्या वर्षी या क्षेत्राला राम राम ठोकला. एकच एक काम करून त्यात त्यांचे मन रमत नव्हते. सिरॅमिक्सची त्यांना आवड होती. त्या क्षेत्रात ते गेले. पाच वर्षे शिकले. नंतर पाच वर्षे काम केले. गोरेगावला त्यांनी त्याकरता स्टुडीओ घेतला. आपल्या सिरॅमिक्सचे नाव ठेवले. यूझलेस सिरॅमिक्स. ह्याहीमागे विचार होता. सिरॅमिक्सपासून सहसा उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. फुलदाणी इत्यादी. पण गोपींचे म्हणणे होते आर्टच्या वस्तूबाबत आपण उपयुक्तता बघत नाही. एक पेटींग आणले तर ती निखळ सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणून घरात आलेली असते. तीच संकल्पना त्यांना सिरॅमिक्सबाबत रुजवायची होती. पाच वर्षे ह्या क्षेत्रात काम करून ते पुन्हा जाहिरातक्षेत्रात आले. स्वत:चे मार्केटींग करण्याबाबत ते म्हणतात, एम.एफ. हुसेन हा सर्वात मोठा स्वत:चे मार्केटींग करणारा. गोपींनी मात्र कधी तसे केलेच नाही. आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मस्तीत आयुष्य जगलो असे त्यांचे उदगार!   कलदंर व्यक्ती सहसा वैयक्तीक आयुष्यात असफल असतात, आर्थिक विपन्नावस्थेला त्यांना तोंड द्यावे लागते. गोपी कुकडे मात्र त्याला अपवाद, ते पूर्णपणे यशस्वी आहेत आणि याचे कारण आहे त्यांच्यातील अफाट गुणवत्ता.

याच कार्यक्रमात जान्हवी राऊळ यांनी लिहिलेल्या ब्रॅंडगुरू या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे गोपींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले हा एक दुग्धशर्करा योग!

उदय कुलकर्णी ९८६९६ ७२६९६ 
kuluday@rediffmail.com

या कार्यक्रमाची डिव्हीडी विकत घेण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites