गुरुकिल्ली सशक्त मनाची!
डॉ.अद्वैत पाध्ये | (01/02/12) (Divya Marathi)
मनाचा शोध घेताना आपण पाहिले की, मन हे आपल्या मेंदूतच असते व त्यातीलच काही भाग मन म्हणून कार्य करत असतो. हे कार्य जीवरासायनिक संप्रेरकांद्वारे चालत असते. मनाचे मुख्य कार्य म्हणजे विचार. भावना व वर्तनाचे नियंत्रण. उत्तम इत्यादी. म्हणून पुढच्या काही मानसशास्त्रज्ञांनी याच गोष्टीवर अधिक संशोधन केले आणि त्यातूनच वैचारिक सिद्धांताचा जन्म झाला. म्हणजे आपल्याला जो काही त्रास होतो त्याला कारण आपली विचार करण्याची पद्धत असते असा ‘विचारप्रधान’ सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडला.
अॅरन बेक या मानसशास्त्रज्ञाने असे सांगितले की, आपल्याला जेव्हा नैराश्य येते तेव्हा आपण स्वत:बद्दल, स्वत:च्या भविष्याबद्दल व आजूबाजूच्या वातावरणाबद्दल नकारात्मक विचार करू लागतो, परिणामी आपले नैराश्य वाढते. परंतु, या संदर्भात सर्वात मोठे कार्य अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने केले आहे. स्वत:च्या आयुष्यात लहानपणापासून आलेले विविध अनुभव, त्यांच्याशी त्याने केलेला सामना यावरून या सिद्धांताचा जन्म झाला. त्यावरूनच पुढे सद्सद्विवेकवर्तन उपचार पद्धतीचा (Rational Motive Behaviour Therapy) जन्म झाला.
हा सिद्धांत म्हणजे एक समीकरण आहे.
अ + इ = उ
यात अ म्हणजे Antecedent Event घडलेली घटना
इ म्हणजे Belief System किंवा विचारसरणी किंवा घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन.
उ म्हणजे Consequences किंवा परिणाम म्हणजे चिंता, नैराश्य, राग, क्रोध वगैरे विरूप भावना.
एलिसने असा सिद्धांत मांडला की, आपल्यावर जो काही परिणाम होतो तो झाला की आपल्याला किंवा इतरांना वाटते की तो घडलेल्या घटनेचा परिणाम आहे; परंतु एलिसच्या सिद्धांताप्रमाणे आपण बघत/भोगत असलेला परिणाम हा त्या घटनेचा प्रत्यक्ष परिणाम नसतो, तर त्या घटनेकडे बघण्याची आपली विचारसरणी ठरवते की त्या घटनेचा आपल्यावर कोणता परिणाम होणार.
उदा. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला आणि त्याच्या मनात नैराश्य आले, आत्महत्येचे विचार येऊ लागले. या उदाहरणात परीक्षेतील अपयश ही घटना किंवा अ आहे, तर नैराश्य हा उ किंवा परिणाम आहे. मग त्याचा इ काय असेल? कारण परीक्षेत नापास अनेक विद्यार्थी होतात; परंतु सर्वच काही निराश होत नाहीत. म्हणजेच त्यांची विचारसरणी वेगळी व निराशा आलेल्याची वेगळी हे तर नक्की!
म्हणजे हा विद्यार्थी असा विचार करत होता की, मला कधीच परीक्षेत अपयश येताच कामा नये. आल्यास त्यासारखी महाभयंकर गोष्ट नाही. त्यामुळेच अपयश आल्यावर त्या महाभयंकर गोष्टीचा सामना करण्याऐवजी निराश होऊन आत्महत्येचे पलायनवादी विचार/अविवेक निर्माण झाले. त्यातूनच हा परिणाम दिसला.
थोडक्यात त्याच्या अविवेकी (irrational) विचारांमुळे त्याच्या मनाचा दृष्टिकोन (नापास होण्याच्या घटनेकडे बघण्याचा) अविवेकी राहिला, त्यामुळे त्याच्या मनात निराशेच्या विरूप भावना निर्माण होणे हा परिणाम दिसला. मग विवेक विचार कोणता असायला पाहिजे? मी परीक्षेत यश मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. ते मी व्यवस्थित करीन; परंतु काही कारणामुळे यश पुढे-मागे कमी-जास्त होऊ शकते. हा झाला विवेकी विचार. असा विचार करणारा विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर दु:खी जरूर होईल; पण पाच-सहा दिवसांनी नक्की स्वत:ला सावरेल व पुढचा विचार करू लागेल! म्हणजेच त्याच्या मनात नकारात्मक पण अनुरूप भावना निर्माण होईल जी त्याची प्रगती रोखणार नाही हे नक्की! अनेक सेशन्समधून वर्तनोपचाराच्या साहाय्याने (Behavior Modification) ते साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टी संबंधित व्यक्तीचे (Client) सहकार्य असल्याशिवाय शक्य नाही. कारण हा सर्व प्रवास दोन्ही चाके एकत्र फिरल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी, मनाची चांगली मशागत करणारी ही गुरुकिल्ली आहे. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलेच आहे.
धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।
नाना युक्ती शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या।।
1 comment:
आर्टिकल खूपच छान आहे!
तन का मैल हर कोई धोये मन का मैल न धोये कोई
बीत जाये सारा जीवन मोल न इस का जाने कोई...
मन है कर्ता धर्ता सभी दुखोंका और सुखोंका
सब चमत्कार है दिल का और उससे ज्यादा मन का
जानकर इसका भेद सुखी हो जाये हर कोई...
तन का मैल हर कोई धोये मन का मैल न धोये कोई....
Post a Comment