मुलाखतकार असावा तर असा! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 September 2013

मुलाखतकार असावा तर असा!

मुलाखतकार असावा तर असा!
समीरण वाळवेकर, सकाळ, रविवार, ८ सप्टेंबर, २०१३
विख्यात ब्रिटिश मुलाखतकार, पत्रकार सर डेव्हिड फ्रॉस्ट यांचं नुकतंच (31 ऑगस्ट) निधन झालं. "टीव्हीवर मुलाखती घ्याव्यात तर फ्रॉस्ट यांनीच' असा लौकिक मुलाखत घेण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीद्वारे त्यांनी मिळवला होता. भाषेवर प्रभुत्व, समोरच्याला खुलवण्याची कला, मोजकं; पण मार्मिक बोलणं आणि सूचक कॉमेंट्‌सद्वारे मारलेल्या कोपरखळ्या...अशा गुणवैशिष्ट्यांनी त्यांच्या मुलाखती सजलेल्या असत. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, अभिनेता, खेळाडू...कुणीही असो, फ्रॉस्ट यांनी मुलाखत द्यायची म्हटली की संबंधितांना दडपणच येत असे...!
लंडनमधल्या एका मित्राचा ई-मेल माझ्या कॉम्प्युटरवर येऊन पडला होता "डेव्हिड फ्रॉस्ट इज नो मोअर.'
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर फ्रॉस्ट यांचा चेहरा तरळला. 1991 मध्ये भारतीय माहिती सेवेत (आयआयएस) दाखल झाल्यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत होतं आणि त्यात एक ब्रिटिश प्रशिक्षक बीबीसीच्या काही प्रसारणांच्या कॅसेट्‌स घेऊन आले होते. भारतात दूरदर्शन सोडल्यास एकही खासगी वाहिनी त्या वेळी नव्हती. फ्रॉस्ट यांनी घेतलेल्या काही मुलाखती त्यातल्या एका कॅसेटवर होत्या. त्या पाहताना या माणसाची पहिली ओळख झाली. तिथपासून ते 1997 च्या सुमारास भारतात नियमितपणे बीबीसी वाहिनी दिसू लागेपर्यंत (म्हणजे 1984 ते 1997 पर्यंत) डॉ. प्रणोय रॉय आणि विनोद दुवा हेच आमचे आदर्श. त्यानंतर आले तो सुरेंद्रप्रताप सिंग (एसपी) "आज तक' घेऊन! पण या सर्वांचे पितामह किंवा भीष्माचार्य म्हणजे फ्रॉस्ट!
1962 पासून ब्रिटिश टेलिव्हिजनवर झळकत स्वतःच्या प्रगल्भ, संयत आणि चिकित्सक शैलीनं फ्रॉस्ट यांनी जगभरातल्या चाहत्यांच्या मनात उत्तम टीव्ही पत्रकार, मुलाखतकार म्हणून मानाचं स्थान मिळवलं होतं. "दॅट वॉज द वीक दॅट वॉज' हा त्यांचा पहिला टीव्ही शो. काहीशा उपहासगर्भ पद्धतीनं, समोरच्याला कोपरखळ्या मारत, कधी चिमटे काढत फ्रॉस्ट हा शो अँकर या नात्यानं सादर करायचे. या शोमुळं ते इतके लोकप्रिय झाले, की जगभरातल्या नामवंत दूरचित्रवाणी वाहिन्यांकडून त्यांना आमंत्रणं येऊ लागली. अँकर म्हणून शो सादर करण्यासाठीची.
त्यांनी अँकर म्हणून शो सादर करावा, यासाठी अमेरिकी वाहिन्यासुद्धा उत्सुक असत. 1983 मध्ये ब्रिटनमध्ये "आय टीव्ही ब्रेकफास्ट स्टेशन' सुरू करणाऱ्या संस्थापकांपैकी फ्रॉस्ट हे एक होते. "ब्रेकफास्ट विथ फ्रॉस्ट' हा त्यांचा दर रविवारचा शो चांगलाच गाजला. 1993 ते 2005 अशी तब्बल 12 वर्षं तो चालला. त्यानंतर त्यांनी दोन दशकांत पाच टॉक शो चालवले. "थ्रू द की होल' हा काहीशा वेगळ्या धाटणीचा शोध-मुलाखतींचा शो टीव्ही-पत्रकारिता आणि मुलाखतींना वेगळा पैलू देऊन गेला. 2006 ते 2012 या सहा वर्षांत मात्र त्यांनी "अल्‌ जझीरा' वाहिनीवर "फ्रॉस्ट ओव्हर द वर्ल्ड' आणि "द फ्रॉस्ट इंटरव्ह्यू' हे दोन शो केले.

1968 मध्ये सव्वा लाख पौंडाची घसघशीत रक्कम देऊन अमेरिकी टीव्हीवर निमंत्रित करण्यात आलेले फ्रॉस्ट हे पहिले ब्रिटिश मुलाखतकार होते. "यूएस वेस्टिंग हाऊस'च्या "ग्रुप डब्ल्यू'साठी त्यांचा "द डेव्हिड फ्रॉस्ट शो' प्रचंड लोकप्रिय झाला. जॅक बेरी, टेनिसी विलियम्स यांच्यासारखे बडे लोक "फ्रॉस्ट ऑन अमेरिका' या त्यांच्या शोमध्ये आनंदानं सहभागी व्हायचे.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांची मुलाखत फ्रॉस्ट यांनी 1977 मध्ये घेतली. जगाच्या टीव्ही-इतिहासात सार्वकालिक मानदंड म्हणून मानल्या जाणाऱ्या ज्या काही मोजक्‍या टीव्ही-मुलाखती आहेत, त्यांत निक्‍सन यांची ही मुलाखत गणली जाते.
प्रत्येक भाग दीड तासाचा, अशी ही पाच भागांतली प्रदीर्घ मुलाखत होती. निक्‍सन यांना त्या काळात या मुलाखतीसाठी सहा लाख डॉलर मानधन देण्यात आलं होतं. ही मुलाखत खूप गाजली. या मुलाखतीसाठी फ्रॉस्ट यांनी सुमारे 30 तास निक्‍सन यांच्याबरोबर रेकॉर्डिंग केलं. त्यासाठी त्यांना एक महिना लागला.
अमेरिकेत त्या वेळी "वॉटरगेट' हे राजकीय भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजत होतं. "वॉटरगेट'बाबत आयुष्यात पहिल्यांदाच निक्‍सन यांनी- फ्रॉस्ट यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना- अमेरिकी जनतेची माफी मागितली होती, म्हणून ही मुलाखत ऐतिहासिक ठरली. ""अमेरिकी जनतेला मी फसवलं आहे आणि हे ओझं मला आयुष्यभर माझ्या शिरी बाळगावं लागेल,'' हे निक्‍सन यांचे माफी मागतानाचे शब्द होते!
फ्रॉस्ट यांनी 1964 ते 2010 या काळात सर्व म्हणजे आठ ब्रिटिश पंतप्रधानांची मुलाखत त्यांच्या टीव्ही-शोमध्ये घेतली होती. अशी कामगिरी नावावर असणारे फ्रॉस्ट हे बहुदा जगातले एकमेव टीव्ही-मुलाखतकार असावेत. त्याचबरोबर 1969 ते 2008 या काळातल्या सर्व अमेरिकी अध्यक्षांच्याही मुलाखती त्यांनी घेतल्या! असं भाग्य जगातल्या दुसऱ्या कोणत्याही टीव्ही-मुलाखतकार अँकरला मिळालेलं नाही.
निक्‍सन यांच्या त्या ऐतिहासिक मुलाखतीनंतर "फ्रॉस्ट-निक्‍सन' नावाचंच नाटक आणि नंतर चित्रपटही निघाले. हेसुद्धा जागतिक पातळीवरचं एकमेव उदाहरण! त्या काळी, म्हणजे 1970 च्या दशकात, "कॉंकार्ड' विमानानं लंडन ते न्यूयॉर्क असा दर वर्षी किमान 20-25 वेळा हवाई प्रवास करणारे फ्रॉस्ट हे "मोस्ट फ्रिक्वेन्ट फ्लायर' होते!
"फ्रॉस्ट ऑन सटायर' ही त्यांची टीव्ही-जगताला मिळालेली लघुपट रूपातली आणखी एक देणगी! एका तासाचा हा लघुपट "बीबीसी-फोर'साठी त्यांनी तयार केला आणि टीव्ही-इतिहासातल्या उपहासिकांचा वेध घेतला. टीना फे, रॉय ब्रेमनर, चेव्ही चेस, जॉन स्ट्युवर्ट, जॉन लॉइड यांच्यासारखे लोकप्रिय उपहासक आणि विनोदवीर त्यात सहभागी झाले होते. फ्रॉस्ट यांना डोळ्यांपुढे ठेवून त्या काळी अनेक चित्रपटांतल्या व्यक्तिरेखासुद्धा लिहिल्या जात असत.
नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पाऊल ठेवलं, तेव्हा फ्रॉस्ट यांनी ब्रिटिश टीव्हीवर सलग दहा तासांचा "अपोलो-दोन कव्हरेज' नावाचा शो सादर करून प्रेक्षकांना थक्क केलं. 20-21 जुलै 1969 लाझालेला हा त्याचा शो ऐतिहासिकच ठरला!
1960 च्या दशकात ब्रिटिश अभिनेत्री जेनेट स्कॉटबरोबर फ्रॉस्ट फिरायचे. अमेरिकी अभिनेत्री डायन कॅरॉलबरोबर त्यांचं लग्नही ठरलं होतं; पण झालं नाही. ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ कॅरोलिन कुशिंग हिच्याबरोबरही त्यांची दोस्ती होती. अभिनेता पीटर्स सेलर्सच्या मृत्यूनंतर त्यांची बायको लीन फ्रेडरिकबरोबर फ्रॉस्ट यांनी लग्न केलं; पण एका वर्षात घटस्फोट झाला. अमेरिकी अभिनेत्री कॅरोल लिनली हिच्याबरोबरही फ्रॉस्ट यांचे 15 वर्षं प्रेमसंबंध होते असं म्हटलं जातं. 1983 मध्ये लेडी कॅरिनाबरोबर फ्रॉस्ट यांचा विवाह झाला. या विवाहातून त्यांना तीन अपत्यं झाली. तसं एकूण रंगेल आयुष्य होतं फ्रॉस्ट यांचं!
टीव्हीच्या छोट्या पडद्यावरचा फ्रॉस्ट यांचा वावर जितका सहजसुंदर, सुखावह, खट्याळ, खोडकर होता, तितकेच अनपेक्षित धक्के देणारे, उपहासात्मक चिमटे काढून अस्वस्थ करणारे त्यांचे प्रश्‍न असत. समोरचा माणूस कितीही मोठा असू द्या...पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, अभिनेता किंवा खेळाडू...असा कुणीही असू द्या...फ्रॉस्ट यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देताना त्याच्या नाकी नऊ येत असत. फ्रॉस्ट यांच्यासमोर बसण्याआधी भली भली मंडळी गृहपाठ करून यायची! इतकंच नव्हे तर, मोठमोठ्या अभिनेत्रीही रंगीत तालीम करूनच मुलाखत द्यायला यायच्या. ही रंगीत तालीम मोठ्या दिग्दर्शकांसमवेत कॅमेऱ्यापुढं बसून रीतसर केली जायची...!
मुलाखती घेताना फ्रॉस्ट यांनी कधी आक्रस्ताळेपणा केला नाही, आवाजाची पट्टी वाढवली नाही किंवा असंसदीय शब्दप्रयोगही केले नाहीत. समोरच्याकडून ते हवी ती माहिती प्रगल्भपणे, संयत पद्धतीनं काढून घेत असत. स्वतःच्याही नकळत फ्रॉस्ट यांना हवं ते उत्तर दिल्यावर समोरच्याला उमगत असे, की आपण काय बोलून गेलो आहोत! निर्भयपणे, स्पष्टपणे आणि ठामपणे प्रश्‍न विचारणं ही फ्रॉस्ट यांची खासियत होती. फ्रॉस्ट यांच्याकडून टीव्ही अँकर-संपादकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. फ्रॉस्ट यांचा ठसा जागतिक टीव्हीवर; तसंच ब्रिटिश आणि अमेरिकी समाजजीवनावरही मोठ्या प्रमाणावर उमटला होता. फ्रॉस्ट यांनी टीव्हीवर मनापासून प्रेम केलं.
भाषेवर प्रभुत्व, समोरच्याला खुलवण्याची कला, मोजकं पण मार्मिक बोलणं आणि कोपरखळ्यांच्या सूचक कॉमेंट्‌स ही फ्रॉस्ट यांची वैशिष्ट्यं होती. फ्रॉस्ट यांनी टीव्ही-इंडस्ट्रीत पाच दशकं इतिहास घडवला. यापुढं, जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर बसण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा, डेव्हिड फ्रॉस्ट, तुमचा चेहरा डोळ्यांपुढं तरळेल आणि थोडं वळून कॅमेऱ्यात नजर भिडवून म्हटलेले तुमचे शब्द आठवतील ः "हॅलो...गुड इव्हिनिंग अँड वेलकम!'

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites