निग्रहाचे बादशहा !
सुनंदन लेले, सकाळ, रविवार, 15 सप्टेंबर 2013
मोठ्या अपघातातून
बरा होत सहा महिन्यांत टेनिस कोर्टवर पुनरागमन करणारा थॉमस मस्टर असो, वयाची चाळिशी
उलटून गेल्यावरही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा लिअँडर पेस असो वा गुडघ्याच्या
दुखापतीवर मात करून 13 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा रॅफेल नदाल असो, त्यांच्या यशात
चांगल्या खेळाबरोबरच निग्रही मनाचाही मोठा वाटा आहे. "अशक्य' हा शब्दच त्यांनी
त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार करून टाकलेला आहे.
ही घटना आहे 21 एप्रिल 1989 ची. ऑस्ट्रियाचा
21 वर्षीय टेनिसपटू
थॉमस मस्टर त्याच्या कारकिर्दीच्या बहराच्या पर्वात होता. अमेरिकेतल्या फ्लोरिडा
या गावी त्याचा अंतिम फेरीतला सामना होणार होता. सराव करून परत येत असताना त्याला
भूक लागली म्हणून तो फूड मॉलवर थांबला. कारमधून पैसे काढायला त्यानं डिकी उघडली
आणि तेवढ्यात काही कळायच्या आत तो हवेत सहा फूट फेकला गेला.
नॉर्मन सोबी
नावाच्या मद्यधुंद माणसानं थॉमसच्या कारला समोरून प्रचंड जोरात धडक दिली होती. हा
दणका इतका भयानक होता, की थॉमस तीनताड उडाला आणि त्याच्या डाव्या पायाच्या
गुडघ्याचा चक्काचूर झाला. वेदनेची कळ त्याच्या मेंदूत गेली आणि तो भोवळ येऊन खाली
पडला.
डॉक्टरांनी
त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. शुद्धीत आल्यावर त्यानं प्रथम पायाकडं
बघितलं आणि डॉक्टरांना विचारलं"मी टेनिस कधी खेळू शकेन?'' डॉक्टर म्हणाले"मित्रा, टेनिस खेळायचं
स्वप्न बाजूला ठेव...तू स्वत:च्या पायावर नीट चालू लागलास तरी मी देवाचे आभार
मानेन.''
काही दिवसांनी
थॉमसला रुग्णालयातून सोडण्यात आलं. एके दिवशी शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर
गावातल्या क्लबमध्ये व्यायामाला गेला असताना समोरचं दृश्य बघून तो थक्क झाला.
कारण, थॉमस व्हीलचेअरवर
बसून टेनिसचे फटके मारत होता. "हा काय वेडेपणा तू करतो आहेस थॉमस?'' डॉक्टरनं
विचारलं असता, मस्टर म्हणाला"डॉक, माझ्या पायाला दुखापत झाली आहे; पण हात शाबूत आहेत... माझी पायाची दुखापत बरी
होईपर्यंत मी हाताचा फील का घालवू...? माझे पाय बरे होतील, तेव्हा माझी फटक्यातली ताकद शाबूत राहायला हवी
ना, म्हणून हा सराव
करतोय...आणि रोज करत राहणार आहे.''
डॉक्टर थॉमसचा
निग्रह बघून अचंबित झाला.
त्याच निग्रही
थॉमसनं सहा महिन्यांत टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं. इतकेच नव्हे तर मायकेल
चॅंगसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवीत 1995 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
ही कथा
सांगण्याचा मतलब इतकाच, की निग्रही खेळाडू अशक्य ते शक्य करून दाखवतात आणि आदर्श
घालून देतात.
लिअँडर पेसची
कमाल
यंदाच्या अमेरिकन
खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावून लिअँडर पेसनं कमाल
केली. स्टीपनेकच्या साथीनं खेळताना लिअँडरनं उपांत्य फेरीत ब्रायन बंधूंचा केलेला
पराभव तोंडात बोटं घालायला लावणारा होता. ब्रायन बंधूंचा दुहेरीतला खेळ जबरदस्त
असतो. त्यातून मायदेशात खेळताना त्यांना मिळणारा "आवाजी' पाठिंबा त्यांचं
मनोबल वाढवतो. असं असतानाही लिअँडर-स्टीपनेक जोडीनं ब्रायन बंधूंना थेट पराभूत
केलं. तिथंच त्यांच्या विजेतेपदाचा पाया घातला गेला.
लिअँडरनं एका अशा
विक्रमाची नोंद केली आहे, ज्यानं त्याचं नाव टेनिसच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी
नोंदवलं जाईल. तीन दशकांत विंबल्डनचं विजेतेपद मिळवणारा तो टेनिसच्या इतिहासातला
फक्त दुसरा खेळाडू झाला आहे. होय, महान खेळाडू रॉड लेव्हर यांनीच फक्त असा चमत्कार करून
दाखवला आहे. इतकंच नाही तर, सहा ऑलिंपिक स्पर्धांत लिअँडरनं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व
केलं आहे. हा विक्रम बाकी कोणत्याही टेनिस खेळाडूला जमलेला नाही. त्यानं 1992 मध्ये
पहिल्यांदा ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला, तो 2012 च्या लंडन ऑलिंपिक खेळापर्यंत. 2016 च्या रियो
ऑलिंपिक स्पर्धेतही लिअँडरला खेळायचं आहे, असं समजतं.
1999 मध्ये लिअँडरनं महेश भूपतीच्या साथीनं पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं; म्हणजेच 1990 चं दशक, 2000 चं दशक आणि आता 2010 चं दशक अशा तीन
दशकांत लिअँडरची विजयी वाटचाल सुरू आहे. नुकतीच त्यानं चाळिशी ओलांडली आहे.
वाढत्या वयात खेळताना, तिशीतील खेळाडूंनाही जमत नसताना लिअँडर नव्या जोमानं
दुहेरीचे सामने खेळतो...आणि जिंकतो, याचा सर्वांना अभिमान आहे. बरोबर दहा
वर्षांपूर्वी लिअँडरच्या मेंदूत ट्यूमर असण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेत
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या वेळी मार्टिना नवरातिलोवानं
त्याला धीर दिला होता. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 (9/11) रोजी "ट्विन टॉवर्स'वर झालेल्या
दहशतवादी हल्ल्याच्या आदल्या दिवशी लिअँडरनं ट्विन टॉवर्सच्या शॉपिंग मॉलमध्ये
खरेदी केली होती. त्या खरेदीची पावती त्यानं अजून जपून ठेवली आहे. हे सगळं जिथं
घडलं, त्याच
न्यूयॉर्कमध्ये लिअँडरनं अमेरिकन खुल्या स्पर्धेतल्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं, हा मला
विस्मयकारक योगायोग वाटतो.
नदालचा धडाका
2013 सालचं वर्णन रॅफेल नदाल कसं करेल, मला समजत नाही. वर्षाच्या सुरवातीला नदालनं पोट
बिघडल्याचं कारण सांगत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतून माघार घेतली. खरं सांगायचं
तर त्याला पोटाबरोबर दुखऱ्या डाव्या गुडघ्यानंही सतावलं होतं. गुडघ्यावर तीन महिने
उपचार करून घेतल्यावर नदालनं त्याच्या सर्वांत लाडक्या फ्रेंच खुल्या स्पर्धेवर
राज्य गाजवलं. नदालचा उपांत्य फेरीत जोकोविचबरोबर झालेला साडेचार तासांचा सामना
लाल मातीच्या कोर्टवरील सर्वोत्तम सामना समजला जातो. अंतिम सामन्यात आपल्याच
देशाच्या डेव्हिड फेररला आरामात हरवत नदालनं विश्वविक्रमी आठवं विजेतेपद पटकावलं
होतं.
फ्रेंच खुल्या
स्पर्धेतल्या विजयी कामगिरीची नशा विंबल्डनच्या हिरवळीनं लगेच उतरवली. नदालला
पहिल्या फेरीतच गारद व्हावं लागलं होतं. नदालला त्याचा दुखरा गुडघा परत सतावायला
लागला होता. त्याच्या कारकिर्दीला धोका निर्माण करणारी गुडघ्याची दुखापत गंभीर
होती. कारण डाव्या गुडघ्यातलं "पटेला टेंडन' अर्ध फाटलं होतं. 2012 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेतलं विजेतेपद
सोडता नदालला चांगला खेळ करता आला नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर नदाल अमेरिकन
खुल्या स्पर्धेत कसा खेळतो, याकडं सर्वांचं लक्ष होतं. अमेरिकन खुल्या स्पर्धेतले सामने
हार्ड कोर्टवर होत असल्यानं नदालच्या गुडघ्याची दुखापत डोकं वर काढणार नाही ना, अशी पाल बऱ्याच
जणांच्या मनात चुकचुकत होती. विंबल्डनच्या मानहानिकारक पराभवानंतर नदालनं आपले
प्रशिक्षक आणि काका टोनी यांच्याबरोबर योग्य मेहनत घेतली. कमजोर गुडघा
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तंदुरुस्त केला. अमेरिकन खुल्या स्पर्धेअगोदर
नदालनं तीन स्पर्धांत भाग घेत हार्ड कोर्टवर खेळायचा अनुभव गोळा केला. तो नुसताच
खेळला नाही, तर त्यानं समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पराभूत केलं.
न्यूयॉर्कच्या
फ्लशिंग मेडोज प्रांगणात जाताना नदालच्या पाठीशी चांगल्या खेळाचा आणि भक्कम
गुडघ्याचा विश्वास होता. पंधरा दिवसांच्या कालखंडात नदालनं दाखविलेल्या खेळानं
प्रेक्षक अचंबित झाले. अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या
नोवाक जोकोविचला पराभूत करून नदालनं 13 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले.
"नदालच विजेतेपदाला पात्र होता...तो अफलातून खेळला...त्याच्या सातत्याला
माझ्याकडं उत्तर नव्हतं,'' अशी प्रांजळ कबुली जोकोविचनं पराभवानंतर दिली. तंदुरुस्त
नदालला पराभूत करणं किती कठीण आहे, याची प्रचिती सर्वांना आली. त्याच्या दुखऱ्या गुडघ्याची
अवस्था बघता नदाल परत कोणत्या मोठ्या स्पर्धेत इतका चांगला खेळ करू शकेल, यावर कुणाचा विश्वास
नव्हता; पण निग्रही
नदालनं सर्व अडचणींवर मात करताना केलेले कष्ट सर्वांना दिसून आले.
निग्रही माणसांची
झेप
वयाची चाळिशी
उलटून गेल्यावरही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा लिअँडर पेस असो वा गुडघ्याच्या
दुखापतीवर मात करून 13 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा रॅफेल नदाल असो, त्यांच्या यशात
चांगल्या खेळाबरोबरच निग्रही मनाचाही मोठा वाटा असतो. "अशक्य' हा शब्दच त्यांनी
त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार करून टाकलेला असतो!
""आत्ता मी 40 वर्षांचा आहे. पुढच्या वर्षी 41, त्याच्या पुढच्या वर्षी 42...'', असं म्हणत लिअँडर
"वय' या भीती
दाखवणाऱ्या शब्दाची खिल्ली उडवतो. थॉमस मस्टरच्या जीवनकथेवरूनही हेच दिसून येतं, की निग्रही
माणसांच्या मनात नकारात्मक विचारांना थारा नसतो.
थॉमस असो, लिअँडर असो वा
नदाल असो, यांना नुसतं
खेळताना आणि यश संपादन करताना बघून चालणार नाही. यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या
कष्टाची नोंद घेणं आवश्यक आहे. अत्युच्च यश संपादन करण्यासाठी त्यांनी
बाळगलेला निग्रह लक्षात घेतला पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी हसत हसत
केलेल्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. विजेता जन्माला येत नसतो...दगडातून मूर्ती
घडवताना जसे छिन्नीनं दगडाचे टवके काढावे लागतात, अगदी अशीच असते महान विजेता खेळाडू
घडवितानाचीही प्रक्रिया! सर्वोच्च स्तरावरचा कोणताही खेळ बघताना म्हणूनच
पाहणाऱ्याला भारावून जायला होतं!
No comments:
Post a Comment