व्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

20 May 2015

व्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! व्यवसाय सुरु केल्यानंतर, आपले उत्पादन व सेवा जर दर्जेदार असेल, व आपल्या ग्राहकापर्यंत त्या बद्दलची माहीती योग्य माध्यमांद्वारे पोहचवू शकलो तर नक्कीच आपल्याला ग्राहक मिळू लागतात. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढू लागते व व्यवसायाचा विकास होऊ लागतो. जस-जसा व्यवसाय वाढू लागतो तस-तसे व्यवसायाअंतर्गत कामकाज देखिल वाढू लागते. हे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. बरेच लघुउद्योजक आवश्यकता असेल त्याप्रमाणे नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक करतात. व्यवसायाअंतर्गत विविध प्रकारची कामे प्रत्येक दिवस होत असतात. व्यवसायातील कुठली ना कुठली व्यक्ती ही कामे करत असतात. कोणी उत्पादन प्रक्रीयेमध्ये सहभागी असतो, कोणी डिलीव्हरीमध्ये, कोणी ग्राहकाला बील पाठवतो, कोणी ग्राहकाकडून पेमेंट गोळा करतो, कोणी ग्राहकाकडून आलेल्या उत्पादनाबद्दलच्या चौकशीला उत्तर देतो, कोणी ग्राहकाला दरपत्रक इ-मेल करतो, कोणी बॅंकेत चेक डीपोझीट करतो, कोणी हिशोबाच्या वह्या नीट ठेवतो. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे दर दिवशी व्यवसायाअंतर्गत होत असतात. बर्‍याच लघुउद्योगांमध्ये ही कामे सुनियोजीत पध्दतीने होत नाहीत. मी हजारो लघुउद्योजकांच्या संपर्कात येतो. बहुतांश उद्योजक स्वतःच सगळ्या कामांमध्ये गुंतलेले असतात. व्यवसायात कर्मचारी काम करत असतात व ते सुध्दा कामात व्यस्त असतात. परंतु कोणतेही काम कोणीही करत असतो. 'जिथे कमी तिथे आम्ही!' अशी त्यांची काम करायची पध्द्त असते. अश्या कामकाज करण्याच्या पध्द्तीमुळे दैनंदिन कामकाज कसेबसे पार पडते. परंतु व्यवसायाच्या प्रगतीला खीळ बसते व व्यवसाय त्याच स्वरुपाचा राहतो. सुरुवातीच्या काळात वेगात झालेला व्यवसायाचा विकास आता मात्र थांबतो!
मित्रांनो! माझं असं ठाम मत आहे, कोणत्याही पहिल्या पिढीच्या उद्योजकाने व्यवसाय उभारणी करत असताना 'संघटना निर्मिती' वर भर दिला पाहिजे. जो उद्योजक व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मितीवर भर देतो तो व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीचा विचार करणारा असतो. जर आपल्या व्यवसायाला दुरगामी प्रगती करायची असेल व उत्तुंग यश मिळवायचं असेल तर ते संघटनात्मक कार्यपध्द्तीनेच शक्य आहे आणि म्हणुनच लघुउद्योजकांनी व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळापासुनच व्यवसायाचा दुरगामी विचार केला पाहीजे व संघटना निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे.

संघटना म्हणजे लोकांचा एक असा गट जो ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रपणे काम करतो. संघटना निर्मिती करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो व्यवसायाची अंतर्गत विभागणी. व्यवसायाअंतर्गत आदर्शपणे कामकाज कसे चालले पाहिजे याचे स्पष्ट चित्र उद्योजकांकडे असणे गरजेचे आहे; त्याला 'संघटनात्मक रचना' (Organizational Structure) असं आपण म्हणू शकतो. 'संघटनात्मक रचना' म्हणजे व्यवसायामधील विविध कामकाज कश्या प्रकारे विभागले आहे, त्यांचे कोणते गट आहेत व त्यांचे आपापसात समन्वय कश्या प्रकारे चालते हे दर्शवणारे चित्र होय. प्रत्येक लघूद्योजकाने त्याच्या व्यवसायाची 'संघटनात्मक रचना' दर्शवणारे चित्र तयार करणे गरजेचे असते. प्रत्येक व्यवसायाची श्रेणी नुसार अंतर्गत रचना असणे गरजेचे आहे व ती विशिष्ट पध्द्तीने झाली पाहीजे. जर ती विशिष्टपध्द्तीने झाली नसेल तर ती संघटनानसुन फक्त गर्दी असते. गर्दी करुन काही होत नाही. गर्दीमुळे फक्त गोष्टी बिघडतात. व्यवसायाच्या 'संघटनात्मक रचने' मुळे व्यवसायातील माणसं व कामं यांची योग्य प्रकारे विभागणी होते, ज्याच्या मदतीने आपल्या व्यवसायामधील विविध कामे सुनियोजित पध्द्तीने केली जातील व व्यवसायाची व्यवसायिक उद्दीष्टे साध्य होतील. संघटनात्मक रचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दही हंडी! सर्वांनी मिळून हंडी फोडायची असते. सर्वांचे ध्येय एकच असते! परंतु प्रत्येक व्यक्तीची जागा व जबाबदारी वेगवेगळी असणे. प्रत्येकाला माहीत असतं की हंडी फोडण्यासाठी त्याच्या कडून काय अपेक्षीत आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला काही ठराविक व्यक्तीं बरोबरच समन्वय साधायचा असतो, सगळ्यांशी बोलायची गरज नाही. आधी पासुनच या गोष्टी स्पष्टपणे माहीत असल्यामुळे गोविंदा पथक सुनियोजित सांघिक कामगिरी करुन दहीहंडी फोडतात.
मित्रांनो आपल्याला सुध्दा आपल्या व्यवसायाचे दुरगामी ध्येय साध्य करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेचे प्रकार खालिल प्रमाणे आहेत :-
१) निरनिराळ्या प्रकारच्या कार्यानुसार विभागणी : या संघटनात्मक रचनेमध्ये प्रामुख्याने 'सेल्स व मार्केटींग', 'प्रोडक्शन किंवा ऑपरेशन्स','अकांउट्स व फायनान्स' आणि 'एच. आर. व अॅडमीन्' असे चार वेगवेगळ्या प्रकारचे विभाग केले जातात. प्रत्येक विभागाचा एक विभाग प्रमुख असतो व त्या विभागा अंतर्गत कामकाजासाठी तोच जबाबदार असतो.  
२) निरनिराळ्या उत्पादन व सेवांनुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध उत्पादनांनुसार व्यवसाया अंतर्गत विभाग करण्यात येतात. उदा. प्रॉडक्ट A विभाग, प्रॉडक्ट B विभाग, प्रॉडक्ट C विभाग इ.
३) विविध प्रकारच्या ग्राहक वर्गानुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध ग्राहकांच्या गरजानुसार विभागणी केली जाते. उदाहरणार्थ: कॉर्पोरेट कस्टमर विभाग, रिटेल कस्टमर विभाग, इंडस्ट्रीयल कस्टमर विभाग इ.
४) भौगोलिक कार्यक्षेत्रानुसार विभागणी : व्यवसाय जर भौगोलिकरित्या बर्‍याच मोठ्या क्षेत्रात पसरला असेल तर अशी रचना केली जाते. उदाहरणार्थ: पुर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षीण विभाग ई.
५) विविध क्षेत्रातील व्यवसायांना अनुसरुन स्वतंत्र विभाग : उदाहरणार्थ : ट्रांसपोर्ट बिझनेस विभाग, कंस्ट्रक्शन बिझनेस विभाग, कंसल्टन्सी विभाग
६) मॅट्रीक्स रचना : जे व्यवसाय गुंतागुंतीचे असतात व विविध प्रोजेक्ट वर काम करत असतात त्याची रचना गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ: आय. टी. कंपन्या, कंस्ट्रक्शन कंपन्या.

बर्‍याच लघुउद्योगांमध्ये संघटनात्मक रचनेचा अभाव आढळतो आणि त्यामु़ळे संस्थेअंतर्गत जबाबदारी बद्दल गोंधळ असतो. भरपूर चुका सतत होत असतात. संभाषणामध्ये गोंधळ असतो. निर्णय प्रक्रीया पुर्णपणे उद्योजकावरच अवलंबून असते. आरोप प्रत्यारोपांचं वातावरण असतं. दैनंदीन गुंतागुंतीला तोंड देणं फार कठीण होऊन बसतं. संस्थेअंतर्गत कामे भरपूर होतात परंतु संस्थेच्या ध्येयाच्या दिशेने अजीबात वाटचाल होत नाही. उद्योजकांना कळतच नाही नेमकं काय चुकत आहे. संस्थेची संघटनात्मक रचना केल्याने वरील सर्व अडचणी दुर होण्यास मदत होते. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळेमध्ये मी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करण्यास मदत करतो. लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाबद्दल या दृष्टिकोनातुन कधी विचार केलेला नसतो. या विषयाचं आकलन केल्यानंतर त्यांना जणु साक्षात्कार होतो.
मित्रांनो, व्यावसायिक प्रगतिसाठी सुनियोजीत सांघीक कामगिरी फार महत्त्वाची आहे. त्याशिवाय व्यवसाय एकाच पातळीवर येऊन थांबतो. तसं होऊ नये म्हणून आपल्या व्यवसाया अंतर्गत संघटना निर्मितीवर भर द्या. आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करा. आपल्या व्यावसायिक ध्येयाची हंडी फोडायची असेल तर तसं करावच लागेल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites