नमस्कार उद्योजक मित्रांनो! कोणताही यशस्वी उद्योग, यशस्वी असल्यामागचे प्रमुख कारण असते, त्या उद्योगाचा मोठा ग्राहक वर्ग. यशस्वी उद्योजकाला ग्राहकांची कमतरता कधीच भासत नाही. आपल्या व्यवसायाचे जेवढे जास्त ग्राहक, तेवढा व्यवसाय यशस्वी! परंतु प्रश्न असा पडतो की 'यशस्वी व्यवसायिकाकडे भरपुर प्रमाणात ग्राहक येतात कुठून?' हा प्रश्न आपण कोणत्याही यशस्वी लघुउद्योजकाला जर विचारला, तर आपल्याला पुढील उत्तरेचं मिळतील, 'शिफारशीव्दारे', 'नेटवर्कींग', 'मार्केटींग संपर्क', 'फॉलो-अप' किंवा 'वर्ड ऑफ माऊथ' कोणत्याही व्यवसायाला प्राप्त होणारे २०% ग्राहक हे वरील माध्यमांव्दारेच प्राप्त होतात. कारण लोकं अशाच लोकांशी व्यवहार करतात ज्यांना ते ओळखतात, पसंत करतात आणि विश्वास ठेवतात. जर भरपुर माणसे आपल्याला ओळखत असतील, पसंत करत असतील आणि आपल्यावर विश्वास ठेऊ शकत असतील तर नक्कीच आपण बरेच ग्राहक आपल्याकडे आकर्षित करु शकतो. परंतु आपल्याबद्दल ओळख, आवड किंवा विश्वास नसेल तर ग्राहक मिळणे अशक्य!
आपल्या बद्दल व आपल्या व्यवसायाबद्दल ओळख, आवड व विश्वास निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे कृती करत नाहीत. लघुउद्योजकांना ते ग्राहक प्राप्त होतात ते कळत नकळत त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींव्दारेच परंतु, माझ्यामते आजच्या या बदलत्या युगात लघुउद्योजकांनी आपली ओळख वाढवण्यासाठी जाणिवपूर्वकपणे कृती केली पाहीजे. जास्तीत जास्त लोकांबरोबर ओळख करुन चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित केले पाहीजेत व आपली विश्वसनियता निर्माण केली पाहीजे. त्यासाठी लघुउद्योजकांनी 'बिझनेस नेटवर्कींग' केले पाहीजे.
'बिझनेस नेटवर्कींग' म्हणजे काय' ?
इतर उद्योजकांबरोबर, संभाव्य ग्राहक किंवा पुरवठादारांबरोबर जाणिवपूर्वकपणे उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करणे व सतत संपर्कात राहून, एकमेकांना सहाय्य करण्याची प्रक्रीया म्हणजेच 'बिझनेस नेटवर्कींग' होय.
आजकाल नेटवर्कींग मिटिंगचा सुळसुळाट झाला आहे. बर्याच लोकांना असं वाटतं की नेटवर्कींग म्हणजे फक्त जास्तीत-जास्त लोकांना भेटुन आपले बिझनेस कार्ड देणे. परंतु 'बिझनेस नेटवर्कींग' चा खरा अर्थ म्हणजे, आपला जनसंपर्क वाढवून, इतरांच्या व्यवसायवृध्दी साठी मदत करणे, आपली उच्च विश्वसनियता निर्माण करणे, नवीन ज्ञान, कौशल्य व कल्पना आत्मसात करणे व आपल्या व्यवसायाचा विकास करणे.
मित्रांनो, बिझनेस नेटवर्कींग अश्या कोणत्याही ठिकाणी होऊ शकते जीकडे नेटवर्कींग साठी योग्य माणसे भरपुर प्रमाणात जमलेली असतात. उदा. सोशल क्लब व संस्था, व्यवसायिक संघटना, विदयापीठ, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, ट्रेड शो, व्यवासायिक प्रदर्शन , सोशल कार्यक्रम इ. त्याच प्रमाणे बिझनेस नेटवर्कींग सोशल मिडियावर सुध्दा होऊ शकते. उदा. Facebook, Linkedin, Twitter इ.
मित्रांनो या लेखाद्वारे मी आपल्याला बिझनेस नेटवर्कींगच्या सात टिप्स् देणार आहे. या टिप्स् चा वापर आपण कोणत्याही बिझनेस नेटवर्कींग मिटींगला जेव्हा जाल तेव्हा नक्कीच करु शकता.
१) नेटवर्कींग साठी आवश्यक टूल्स सदैव आपल्याबरोबर ठेवा : मित्रांनो आपल्याला कुठे, कोण , कधी भेटेल, काही सांगता येत नाही. कोणत्याही व्यक्तिला आपल्या व्यवसायाची माहीती देण्यासाठी आवश्यक टूल्स (म्हणजेच साधने) आपल्याकडे असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ : बिझनेस कार्डस्, कार्ड होल्डर, आपल्या उत्पादनांचे ब्रोशर, शक्य झाल्यास किंवा टॅब मध्ये फोटो अथवा व्हीडीओ जे दाखवल्याने आपली विश्वसनियता वाढेल. नेटवर्कींग साठी लागणारी साधनसामग्री प्रोफेशनल असली पाहीजे तरच आपली चांगली छाप पाहु शकेल.
२) प्रत्येक नेटवर्कींग मिटींगमध् ये ठराविक व नवीन माणसांना भेटण्याचे लक्ष्य ठेवा : नेटवर्कींग मिटींग मध्ये गेल्यानंतर आपण नेमके किती व्यक्तींना भेटणार आहात ते आधीच ठरवा. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेत जास्तीत - जास्त व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करा. एकाच व्यक्तीबरोबर संपूर्ण मिटींग घालवू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा जास्त यशस्वी आणि अनुभवी व्यक्तींना जाणिवपूर्वकपणे भेटण्याच्या प्रयत्नात रहा. कुठल्याही प्रकारचा संकोच मनात बाळगू नका. बिनधास्तपणे लोकांना भेटा. आपल्या आजुबाजुचे शांत जरी असले तरी तुम्ही शांत नका राहू, पुढाकार घ्या, लोकांशी संवाद साधा.
३) नेटवर्कींग मिटींगमध्ये यजमान बना, अतिथी नव्हे : यजमान नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. अतिथी निवांतपणे बसलेला असतो. नेटवर्कींग मिटींग मध्ये आपली भुमिका जर यजमानाची असेल तर पुढाकार घेऊन लोकांचे स्वागत करणे व त्यांना भेटणे ही आपली जबाबदारीच असते. त्यामुळे नेटवर्कींग करण्याची नामी संधीच आपल्याला मिळते. व्यवसायिक संघटनांच्या कार्यकारी सदस्यत्व घेतल्याने आपल्याला अशी संधी आपसुकच मिळते.
४) प्रश्न विचारा आणि प्रामाणिकपणे ऐकण्यावर भर द्या : मिटींग दरम्यान त्यांना भेटाल त्यांच्या बद्दल मनापासुन जाणुन घ्यायचा प्रयत्न करा. कोणत्याही व्यक्तीला स्वतः बद्द्ल बोलायला आवडते. त्यांना बोलते करण्यासाठी त्यांना प्रश्न विचारा, जेणेकरुन ते स्वतःबद्द्ल बोलतील व आपण त्यांचे म्हणणे ऐका, लक्षात ठेवा, ऐकण्याने स्नेहसंबंध प्रस्थापित होण्यास मदत होते.
५) विकायचा किंवा सौदा करायचा प्रयत्न करु नका : नेटवर्कींग मिटींग सौदा करण्यासाठी मुळीच नसतात. त्यामुळे मिटींगमध्ये आपले उत्पादन कोणाच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करु नका. अश्या मिटींगमध्ये लोकांना विक्रेते आवडत नाहीत. आपले इतरांबरोबर स्नेहसंबंध अधीक सुदृढ करण्यासाठी ह्या मिटींग असतात त्यामुळे व्यावसायिक वाटाघाटींची सुरुवात नेटवर्कींग व्दारे होते, अंत नव्हे. प्रामाणिकपणे स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या, व्यावसायिक संधी आपोआपच निर्माण होतील.
६) नेटवर्कींग संपर्कांचे योग्य तर्हेने व्यवस्थापन करा : जेवढ्या जास्त लोकांना आपण भेटाल तेवढ्या जास्त पध्दतशिरपणे आपल्याला संपर्कांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरुन गरज लागेल तेव्हा आपण त्या व्यक्तींना संपर्क करु शकतो. भेटलेल्या व्यक्तींची माहीती स्मार्टफोन मध्ये तपशिलवार सेव करा किंवा Contact Management Software मध्ये माहीती स्टोअर करा.
७) फॉलो-अप : आपण पहिल्या ४ टिप्सचं पालन केलत परंतु सातव्या टिपचं पालन नाही केलतं तर आपण नेटवर्कींगसाठी घालवलेला वेळ व्यर्थ आहे. लोकांशी भेट झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत मेजेसव्दारे, ई-मेल व्दारे, फोनव्दारे परत एकदा संपर्क करा. जर भेटी दरम्यान आपण काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करा. नवीन व्यक्तींच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी जाणिवपुर्वकपणे प् रयत्न करा. कळत नकळत त्यामुळेच भविष्यात व्यावसायिक संधी निर्माण होतात.
मित्रांनो मी दिलेल्या 'बिझानेस नेटवर्कींग' च्या ७ टिप्सचं पालन करा आणि आपले नेटवर्क वाढवा. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी जाणिवपूर्वकरित्या काम करणे गरजेचे असते. कारण Network या शब्दातच Work हा शब्द लपलेला आहे!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन
संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy
No comments:
Post a Comment