बॉर्न २ विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळ्यात २ डिसेंबर १० ला लार्सन अन्ड टूर्बोचे सीएफओ व डायरेक्टर वाय. एम. देवस्थळी हे प्रमुख पाहुणे होते. बॉर्न २ विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी देवस्थळींची मुलाखत घेतली. अनेक बिझनेस चॅनेलवर देवस्थळी आपल्याला अनेकवेळा दिसतात व ते एल अन्ड टी, इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थव्यवस्था अशा विषयांवर बोलत असतात. पण लक्ष्यवेध सोहळ्यास आलेला श्रोतृवर्ग तरुण व करिअरमध्ये पुढे जायच्या ध्येयाने पछाडलेला. त्यामुळे राजोळींनी मुलाखतीचा रोख ठेवला होता करिअर ग्रोथ. व देवस्थळींचे मोठेपण हे की त्यांनी सर्व प्रश्नांना सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत व मोकळेपणाने उत्तरे दिली. ही मुलाखत चांगलीच रंगली व प्रत्येकजण काही शिकून गेला, जाताना बरोबर काही मौल्यवान विचार घेऊनच गेला.
सिडनेहॅम कॉलेजमधून बी. कॉम. केल्यानंतर देवस्थळींनी सी. ए. व एल. एल. बी. दोन्ही एकदमच केले ते सहज व तशी प्रथाच असल्यासारखे होते म्हणून. एल. अन्ड टी. ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील आज एक अजस्त्र कंपनी आहे. सध्या तिची वार्षिक उलाढाल ३७००० कोटींची आहे व नक्त नफा ४३७५ कोटींचा आहे. एक स्वच्छ, निष्कलंक व अत्यंत कार्यक्षम कंपनी अशी एल अन्ड टीची ख्याती आहे. डेन्मार्कमधील दोन तरूण इंजिनिअर व्यवसायासाठी भारतात आले व १९३८ मध्ये त्यांनी ही कंपनी स्थापन केली. १९५० मध्ये हीचे रुपांतर पब्लीक लिमिटेड कंपनीत झाले व त्यावेळेस तिची वार्षिक उलाढाल होती एक कोटी रुपये फक्त! म्हणजेच ६० वर्षात १ कोटीवरून ३७००० कोटी अशी कंपनीने झेप घेतलेली आहे. आता ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. भारताच्या प्रगतीत तिचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. या कंपनीत ७४ साली अकाऊंटस सुपरवाझर म्हणून रुजू होताना पुढे ही कंपनी इतकी मोठी होईल असे वाटले होते का, या प्रश्नाच्या उत्तरात देवस्थळी म्हणाले, ह्या कंपनीत मूल्यांना महत्व आहे, वाटेल त्या प्रकारे व्यवसाय ती करणार नाही इतके माहिती होते. माणसे छान निवडतात याची कल्पना होती. इथे प्रगतीच्या संधी आहेत दिसत होते. कंपनीत अधिकारीपदावर रुजू झाल्यावर आजही ती व्यक्ती डायरेक्टर होऊ शकते. ही एक प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी आहे.
देवस्थळींना मुंबईत फॅक्टरीतील, मॅन्यूफॅक्चरींगमधील कामाचा अनुभव होता. काही वर्षांनी ते कोलकाता, दिल्ली इथे गेले व कामाचे स्वरूपही बदलले. मार्केटींग, सेल्स अशा विभागात त्यांनी काम केले. ही वर्षे खडतर होती का विचारल्यावर ते म्हणाले, खडतर नव्हे तर माझ्यासाठी ही मजेची वर्षे होती. तरुण वय होते, नवे शिकायचे होते, स्वत:चा सर्वांगीण विकास साधायचा होता. बाहेर काम केल्याने बिझनेसकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला. तिथल्या कार्यसंस्कृतीशी परिचय झाला. दिल्लीत उदा: खूशमस्करेपणा चालतो! तरुणांना त्यांचे सांगणे होते, आज स्पेशलायझेनला खूप महत्व दिले जाते. नव्याने रुजू होणारे म्हणतात, मला ट्रेझरीमध्ये काम करायचे आहे. पण फक्त ट्रेझरी, फक्त एक खाते असा दृष्टीकोन नको. एकाच खात्याचा अनुभव असेल तर त्या खात्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारता येईल, पण कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत जाता येणे कठीण. स्वत:च्या कम्फर्ट झोनमध्ये राहू नका. नवे शिकत राहा, मी आजही शिकत असतो असे ते म्हणाले. बदल्यांच्या वेळचा काळ कुटुंबासाठी मात्र खडतर होता हे ते मान्य करतात.
९० नंतर खाजगीकरणाचा काळ सुरू झाला. पायाभूत सुविधा क्षेत्रात कंपनीला मोठी कामे मिळायला लागली, त्याचा व्यावसायिक जीवनावर काय परीणाम झाला याबाबत ते म्हणतात, ९० पासून आर्थिक उदारीकरण सुरू झाले, पण कंपन्यांना बांधा, वापरा, हस्तांतरीत करा प्रकल्प मिळणे ९८ सालापासून सुरू झाले. तसेच कंपनीला परदेशातील मोठे प्रकल्प मिळत होते. वित्त विभागाच्या कामात फार मोठा फरक झाला. अनेकविध मार्गाने भांडवल उभारणे आवश्यक झाले. परदेशातून एडीआर, जीडीआर मार्फत भांडवल उभारले. ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागला. बिझनेसच्या लोकांना विचारून माहिती करून घेतली. देवस्थळी म्हणतात, प्रश्न विचारा, जिज्ञासूवृत्ती हवी. अर्जूनाने प्रश्न विचारला म्हणून तर श्रीकृष्णाने गीता सांगितली. प्रश्न विचारण्याबाबत कोणताही संकोच नको असे ते आग्रहाने सांगतात. प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्याऐवजी जर कोणी काय मुर्खासारखा प्रश्न विचारतोयस म्हणत असेल तर त्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. अशा लोकांच्या धास्तीने प्रश्न विचारणे बंद करू नका असे ते म्हणतात.
देवस्थळी आजही सकाळी ८ ते रात्री ८ काम करतात. ही पॅशन, ड्राईव्ह, उर्जा कुठून येते यावर ते म्हणतात, ह्या कंपनीने मला खूप दिले, पुढच्या पाच-दहा वर्षांचा विचार कंपनीत सुरू असतो. यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवणे कठीण असते. ते टिकवायचे ह्या जबाबदारीने पॅशन येते. एल अन्ड टीचे हे वैशिष्ट आहे की इथे सामान्य माणसे असामान्य कर्तृत्व दाखवतात. सकारात्मक दृष्टीकोन, उद्दीष्ट माहीत हवे व मी ते साध्य करू शकतो हा दृढ विश्वास हवा, यशस्वी व्यक्तीच्या अशा ते तीन क्वालीटी सांगतात. अधिकार्याना त्यांचा सल्ला आहे, कर्मचार्याचे काही चांगले दिसले तर दहा वाक्ये बोला पण वाईट दिसले तर एकच वाक्य बोला. मनापासून कौतूक करा, तेही दहा लोकांसमोर, पण दोष त्या एकट्यालाच सांगा. अपयशाला तोंड देण्याबाबत ते म्हणतात, २००८ च्या जगभरच्या पडझडीमुळे एल अन्ड टीच्या ट्रेझरीला तोटा सहन करावा लागला. भावनिक असल्याने देवस्थळीना त्याचा त्रास झाला. पण कंपनी फार छान असल्याने त्रास सहन करू शकले. त्यातून ते शिकले बिझनेसमध्ये चढ-उतार होणारच. पुन्हा ती चुक होऊ नये याची काळजी घेणे.
रोल मॉडेल अर्थात आपली आदर्श व्यक्ती ह्या कल्पनेला आपण खूप महत्व देतो. देवस्थळी म्हणतात, एकच व्यक्ती रोल मॉडेल असू नये कारण ती व्यक्ती काही बाबतीत चांगली असेल तर काही बाबतीत नसेलही. तिला आंधळेपणाने फॉलो करू नका व अनेक व्यक्तींकडून जे जे चांगले गुण आहेत ते घ्या.
एल अन्ड टी वित्तक्षेत्रात धडाक्याने विस्तार करत आहे. म्युचुअल फंड ताब्यात घेऊन त्या व्यवसायात प्रवेश केला आहे. बॅंक सुरू करणार आहे अशी कुणकुण आहे. अशा अनेक नव्या व्यवसायाची सुरवात करून ते यशस्वी करण्याची फार मोठी जबाबदारी देवस्थळींवर आहे. ते आता केवळ एक प्रोफेशनल नाहीत तर बिझनेसमन म्हणून त्यांचे ट्रान्झिशन झालेले आहे. ह्या स्थित्यंतराबाबत ते म्हणतात, उद्योजक धोका पत्करतो, जोखीम घेण्याची ताकद हवी. त्याला धंद्याचा सर्वांगीण विचार करावा लागतो, फक्त आपल्या खात्यापुरते पाहून चालणार नाही. उद्योगासंबधी त्यांनी जे सांगितले ते सर्व उद्योजकांसाठी महत्वाचे आहे. ते म्हणतात, ऑर्गनायझेशन बिल्डींग म्हणजे संस्था ऊभारणे आवश्यक. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी जमवावे लागतात. त्यांना टिकवून ठेवावे लागते. निर्णय घेताना केवळ तात्कालीक फायद्याचा विचार करून चालत नाही तर दीर्घ पल्याचा विचार करावा लागतो. यश मिळाले तरी ते टिकवून ठेवणे, त्यात सातत्य राखणे महत्वाचे असते. करिअर बाबत त्यांचा सल्ला आहे, दिशा ठरवा, शॉर्टकटने फायदा होत नाही. पटापट नोकर्या बदलवून ज्ञान मिळत नाही. कंपनीत मुल्यांना महत्व असावे, पण तुम्ही रुजू झालेल्या कंपनीत हे तत्व नसेल तर स्वत:साठी तुम्ही मूल्ये निर्माण करा. भारत देश महान करायचा असेल तर उद्योजक प्रामाणिक हवेत.
बिझनेस वाढवण्यासाठी काय करावे ह्याबाबत त्यांचे मार्गदर्शन आहे, कुठे जायचे ते माहीत हवे, इतरांनी केलेले डोळसपणे बघा. इनोव्हेशन, चेंज व इनट्रॉस्पेक्शन म्हणजे नवे मार्ग शोधणे, बदल करत राहाणे व आत्मपरिक्षण हवे.
मराठी संस्कार – अपब्रिगिंगबाबत ते म्हणतात, आपण मुलांना फार सुरक्षित वातावरणात वाढवतो, नको शब्दाचा जास्त वापर करतो, त्यांना धडाडी शिकवायला पाहिजे. केवळ घरातूनच नव्हे तर शाळा, कॉलेजातूनही नवे करण्यासाठी प्रोत्साहन हवे. संतुष्ट, समाधानी असणे वेगळे आणि काही अचीव्ह न करताचा संतुष्ट असणे वेगळे. निवृत्तीला पाच – दहा वर्षे बाकी असतानाही, आता मी जास्त काम करून काय करू, लवकरच निवृत्त होणार असा विचार करणे चुक आहे. आपल्या मेंदूचा पाच टक्के वापरही आपण करत नाही.
मुलाखतीचा समारोप करताना, पुढे काय ह्या प्रश्नावर ते म्हणाले, सध्या मायक्रोफायनान्स क्षेत्र वादाच्या भोवर्यात सापडलेले आहे. पण ह्या आव्हानाचे संधीत रुपांतर करुन दाखवायचे आहे. फायनान्शियल इनक्लूझनसाठी भरीव कामगिरी करायची आहे. मला सिनेमाची आवड आहे, निवृत्त झाल्यावर एक चांगला सिनेमा काढायचा आहे, हे त्यांचे उद्गार त्यांच्या एका वेगळ्या पैलूकडे निर्देश करणारे होते.
बॉर्न २ विनने मुलाखतीआधी देवस्थळींच्या वेळोवेळी विविध चॅनेलवर झालेल्या मुलाखती संकलीत करुन त्याचा व्हिडीओ दाखवला. ह्या संस्थेच्या कार्यक्रमातील तांत्रिक बाबी वाखाणण्याजोग्या होत्या.
अर्थ व उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती समाजासमोर वारंवार यायला हव्यात.
उदय कुलकर्णी ९८६९६७२६९६
No comments:
Post a Comment