जगण्यातील चांगुलपणावरचा विश्वास “सुदृढ” करणारी मुलाखत! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

01 April 2011

जगण्यातील चांगुलपणावरचा विश्वास “सुदृढ” करणारी मुलाखत!

“लोक सतत माझ्यामागे ऊभे राहिले. भांडवल कमी पडायचे तेव्हा पैसे मिळत गेले, जागेसाठी लोकांनी मदत केली. व्यायामाचा प्रसार हाच माझा ध्यास होता, माझा हेतू चांगला होता, मी स्वत: माझ्या स्पर्धकानांही मदत करतो, त्यातून मला आनंद मिळतो. मला जे मिळत गेले, ते मी इतरांना देतो, ते माझे कर्तव्य समजतो”, तळवलकर जिमचे संस्थापक मधुकर तळवलकर यांचे हे उद्गार. “बॉर्न२विन” संस्थेचा लक्ष्यसिध्दी सोहळा २८/२/११ला झोकात साजरा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. मागील वर्षी तळवलकर जिमने शेअरबाजारात आपले शेअर विकायला काढले, १०० कोटी रुपयांचा हा छोटा आयपीओ. पण भरणा झाला ४,००० कोटी रुपयांचा आणि दक्षिण-उत्तर भारतातूनही लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकांचा हा विश्वास बघून मधुकर सरांचे मन इतके हेलावले, ते भावनाविवश झाले व एका खोलीत जाऊन त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. तळवलकर हा असा मोठा ब्रॅन्ड झाला, त्याची सुरवात झाली, १९६२पासून. हा प्रवास उलगडत गेला बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी मधुकर सरांच्या घेतलेल्या मुलाखतीतून. सरांच्या वडिलांच्या व्यायाम शाळा होत्या. सरांनी जिम काढायचे ठरवले तेव्हा तळवलकर जिम या वेगळ्या नावाने त्या सुरू केल्या. त्याकाळीसुध्दा त्यांच्याकडे धर्मेंद्र, माला सिन्हा असे कलाकार सभासद होतेच, पण दारासिंग हे नावाजलेले कुस्तीवीरही त्यांचे सभासद होते. एक जिम सुरू केल्यावर वडिल सरांना म्हणाले, तुझ्या धाकट्या तीन भावंडांसाठी आणखी जिम सुरू कर. सर स्वत: टेक्सटाईल इंजिनिअर. त्यांनी खटाऊ मिलमध्ये काही काळ नोकरी केली. जिम व्यवसायात त्यांच्या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळाला. विशेषत: जिमसाठी लागणार्‍या उपकरणांची निर्मीती करताना तर ते ज्ञान फारच कामात आले. आज तळवलकरांची अंगदला उपकरण निर्मीतीची ६००० फुटांची फॅक्टरी आहे.

अनेक वर्षांपूर्वी ते जिमसाठी कर्ज मागायला बॅंकेत गेले तेव्हा मॅनेजर म्हणाले, जिम ही इंडस्ट्री नाही किंवा तुम्ही शेतकरीही नाही आहात. तुम्हाला कर्ज मिळणार नाही. आज मात्र यालाच “फिटनेस इंडस्ट्री” म्हणतात व या उद्योगाचे तळवलकर हे प्रणेते- पायोनिअर. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या जिम आहेत. त्यात अमृतसर इथे त्यांची जिम ही मला विशेष बाब वाटते. पंजाबी हे लोक धट्टेकट्टे- सुदृढ, तर त्यांच्यासमोर मराठी माणूस दुबळा असा समज गैर आहे, हे दाखवणारी ही बाब. एक मराठी माणूस पंजाबी लोकांना व्यायामचे धडे देतो ही कल्पनाच विशेष वाटते!

शेवटी सरांनी सुत्र सांगितले, कुटुंबावर प्रेम करा, व्यायाम करा व सतत देत राहा, बी अ गिव्हर. चांगुलपणा करा, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल, असे चांगुलपणावरचा विश्वास सुदृढ करणारी ही मुलाखत.

त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते व त्यांनी मुलाखतीला मनमोकळी दाद दिली.


विशेष आभारः श्री. उदय कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites