July 2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

24 July 2017

यशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म!

यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभूत असतात?

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात...

  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कुठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कृती करण्यास त्यांना कुठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?
    वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपूर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहिजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभूत गुणधर्म असतात. ह्या सात मुलभूत गुणधर्मांना कळतनकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभूत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

    यशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म:
    १) प्रचंड ध्यास: 

    यशस्वी माणसांना त्यांच्या ध्येयाने झापाटून सोडले असते. कोणत्या तरी विशिष्ट क्षेत्राचा किंवा कार्याचा त्यांना प्रचंड ध्यास असतो. या ध्यासापोटी ते सतत कृतीवर भर देतात. अडचणी जरी आल्या तरी प्रचंड ध्यासामुळे ते त्या अडचणींवर तुटून पडतात. परंतु बर्‍याच माणसांना कोणत्याच बाबतीत ध्यासच वाटत नाही व ते मरगळल्याप्रमाणे सर्वसाधारण जीवन जगतात. यशस्वी माणसांना त्यांचा 'ध्यास' सापडतो. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो व ते अर्थपूर्ण जीवन जगतात.

    २) सकारात्मक समजुती: 
    आपण जे काही साध्य करतो त्या मागे आपल्या अंतरमनात रुजलेल्या समजुती कारणीभूत असतात. यशस्वी माणसांच्या काही विशिष्ट सकारात्मक समजुतीमुळे त्यांची स्वप्नं साकार होतात. परंतु सामान्य माणसे, त्यांच्यामध्ये क्षमता असुन सुध्दा आपल्या स्वप्नांपासुन वंचित राहतात. काही विशिष्ट व मुलभूत अश्या सकारात्मक समजुतींमुळे यशस्वी माणसे आपली ध्येय साध्य करतात.

    ३) जीवन मुल्यांबाबत स्पष्टता: 

    जीवन मुल्य म्हणजेच आपली वैयक्तीक नैतिकता दर्शवणारी यंत्रणा. बर्‍याच माणसांना आपली जीवन मुल्ये ठाऊक नसतात. ते नेहमी गोंधळलेले असतात. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्यास ते असमर्थ असतात. यशस्वी माणसे मात्र आपल्या ध्येयांच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय आपल्या मूल्यांबाबत विचार करुन स्पष्टपणे घेतात.


    ४) माणसे जोडण्याची कला: 
    यशस्वी होण्यासाठी आपण एकटेच सर्वकाही करणे अशक्य आहे. यशस्वी माणसे यशस्वी होतात कारण त्यांना माणसे जोडता येतात. त्यांच्याबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करता येतात. इतरांची साथ लागल्याने यशस्वी माणसांना प्रगती करणे सोपे जाते. सर्वसाधारण माणसे मात्र याबाबतीत कमी पडतात.



    ५) अचूक आराखडा: 
    कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करण्याची विशिष्ट पध्दत असते. उदा. गाडी चालवणे, एखादा खाद्यपदार्थ बनवणे, एखादा खेळ खेळणे, कंप्युटरचा वापर करणे इ. त्याचप्रमाणे यश मिळवण्यासाठी विशिष्ट आराखड्याची गरज असते. दुर्दैवाने बरीच माणसे यशस्वी होण्यासाठी चुकीचा आराखडा वापरतात व त्यांना हवे ते परिणाम साध्य होत नाहीत. यशस्वी माणसे अचुक आराखड्याचा अवलंब करतात आणि आपल्याला हवे ते सहजपणे साध्य करतात.

    ६) सकारात्मक संभाषण: 
    यशस्वी माणसांना आपले विचार इतरांबरोबर प्रभावीपणे मांडता येतात. त्यांच्या सकारात्मक संभाषण कौशल्यामुळे त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येतो. परंतु बर्‍याच माणसांना आपल्या विचारांना इतरांसमोर स्पष्टपणे मांडता येत नाही. त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येत नाही व ते एक सर्व साधारण जीवन जगतात.




    ७) सळसळता उत्साह: 
    यशस्वी माणसे प्रत्येक दिवस, सळसळत्या उत्साहाने कार्यरत असतात. त्यांच्याकडे न थकता अविरतपणे काम करण्याची असाधारण क्षमता असते. सर्वसाधारण माणसे मात्र लवकर थकतात, तणावग्रस्त असतात, त्यांच्या आयुष्यात उत्साहाची कमतरता असते. आपण जे करु ते सळसळत्या उत्साहाने जर केले तरच आपले ध्येय साध्य करणे सोपे होईल.

    हे सात मुलभूत गुणधर्म आपणही स्वतःमध्ये अंगिकारुन जोपासु शकतो आणि त्यांचा विकास करु शकतो. 'सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!' - Get Ready to Get Success या लक्ष्यवेधच्या जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण ह्याच सात गुणधर्मांबद्दल सविस्तर जाणून घ्याल व यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हाल!

    दिनांकः १ ऑगस्ट २०१७
    वेळः दुपारी ३ वाजता
    स्थळः मैसुर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
    संपर्कः ७६६६४२६६५४

    ह्या कार्यक्रमाबद्दलचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:




    नाव नोंदवण्यासाठी खालील Form भरा

    18 July 2017

    हमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक

    तो गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तू पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम - बंगलोर मधून एम.बी.ए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा. 
    केरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय? मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.
    मॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसर्‍या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसर्‍या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.
    सुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.
    सर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एम.बी.ए करण्यासाठी आयआयएम - बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.
    शमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.
    पहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.
    आज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.
    सहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणार्‍या आणि यंत्रणेला दोष देणार्‍या तरुणांसाठी मुस्तफा खर्‍या अर्थाने आदर्श ठरावा.
    - प्रमोद सावंत
    www.yuktimedia.com

    11 July 2017

    हे आहेत भारतातील वॉरन बफे...

    घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली.
    संघटित रिटेल क्षेत्रातील अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमानी. 'आर के दमानी' नावाने प्रसिद्ध असणार्‍या दमानींनी 2000 साली डी-मार्टची स्थापना केली.
    स्वतःभोवती अजिबात प्रसिद्धीचं वलय न बाळगणार्‍या दमानी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांविषयी कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणार्‍या दमानींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. आणि डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.


    डी-मार्टचे अनेक स्टोअर्स दुकाने रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना(व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचार्‍यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांना कामाचे पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते.
    साधारणपणे 1999 मध्ये दमानी यांनी रिलायन्स रिटेलच मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. दामोदर माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमानी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.


    डी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमानी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.
    शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमानी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमानी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे!
    - गौतमी औंढेकर, सकाळ


    Source : http://www.esakal.com/arthavishwa/gautami-aundhekar-writes-about-rk-damani-36543
    #शेअर #गुंतवणूकदार #Dmart #RKDamani #डीमार्ट #दमानी

    03 July 2017

    आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

    तुमचे मन शांत ठेवण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत. नेहमी तुमच्या वर्तमानाविषयी जागरुक रहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुमच्या अंतर्मनातील शांततेचा अनुभव हे क्षण देत असतात त्याचबरोबर वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही.
    स्वस्थचित्तासाठी दीर्घश्वसन : श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थचित्त बनते. शरीर आणि मन ताजेतवाने होते. दिर्घ श्वसनामुळे अंतरात्म्याशी संवाद शाधता येतो.


    इतरांकडून शिका : शिकणे ही कायमस्वरुपी चालणारी प्रक्रीया आहे. तुमच्या अवती-भवती वावरणार्‍यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते आपले सर्वोत्कृष्ट शिक्षक असतात. त्यांच्याकडून चांगले गुण घ्या. त्यांच्या अनुभवातून शिकत रहा.

    निसर्गातील सौंदर्य न्याहळा : निसर्ग ही देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. पक्ष्यांचे गाणे, वाहणार्‍या पाण्याचा आवाज, निसर्गाची साद हे सगळे मनुष्याला सुखावणारे असते त्याचा आस्वाद आणि आनंद कसा घ्यायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते. लवकर उठा, फिरायला जा, सूर्योद्यापूर्वीचा निसर्ग मनात साठवा, लांबवर एकटेच चालत जा. या सगळ्यातून निसर्गातील सौंदर्याची आणि सुप्त ऊर्जेची जाणीव आपल्याला होते.

    संगीताची ताकद :  तुमच्या आवडीचे संगीत ऐका. कुणाचीही फिकीर न करता मस्त पैकी नृत्य करा. त्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. मन आणि शरीराचे सूर जुळण्यासाठी संगीताचा खूपच उपयोग होतो.


    स्वतःच्या विचारांबरोबरील लढाई थांबवा : नेहमी एकाचवेळी तुमच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी झालेली असते. हे करु का ते करु, पहिल्यांदा काय करु, त्याचे कसे होणार , घाई केली पाहिजे, हा लगेच दारात उभा आहे अशा गोष्टींनी मेंदू चक्रावून गेलेला असतो. अशा गोंधळामुळे अजिबात घाबरुन जाऊ नका. विचारांचे येणेजाणे चालूच राहिले तरी त्याकडे गरजेनुसार दुर्लक्ष करायला शिका.

    विसरा आणि माफ करा : भूतकाळात कधी तरी तुम्ही लोकांना दुखावले असेल. त्या खेदजनक आठवणी अजूनही तुमच्या मनात असतील. तुम्हांला वेदना देणार्‍यांना माफ करा आणि त्या आठवणींमधून बाहेर पडा.


    सौजन्य: संध्यानंद
    Related Posts Plugin for WordPress, Blogger...

    Share

    Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites