तो गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तू पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम - बंगलोर मधून एम.बी.ए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा.
केरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय? मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.
मॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसर्या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसर्या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.
सुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.
सर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एम.बी.ए करण्यासाठी आयआयएम - बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.
शमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.
पहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.
आज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.
सहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणार्या आणि यंत्रणेला दोष देणार्या तरुणांसाठी मुस्तफा खर्या अर्थाने आदर्श ठरावा.
- प्रमोद सावंत
www.yuktimedia.com
No comments:
Post a Comment