घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली.
संघटित रिटेल क्षेत्रातील अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमानी. 'आर के दमानी' नावाने प्रसिद्ध असणार्या दमानींनी 2000 साली डी-मार्टची स्थापना केली.
स्वतःभोवती अजिबात प्रसिद्धीचं वलय न बाळगणार्या दमानी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांविषयी कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणार्या दमानींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. आणि डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.
डी-मार्टचे अनेक स्टोअर्स दुकाने रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना(व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचार्यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचार्यांना कामाचे पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते.
साधारणपणे 1999 मध्ये दमानी यांनी रिलायन्स रिटेलच मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. दामोदर माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमानी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.
डी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमानी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमानी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमानी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे!
- गौतमी औंढेकर, सकाळSource : http://www.esakal.com/
#शेअर #गुंतवणूकदार #Dmart #RKDamani #डीमार्ट #दमानी
No comments:
Post a Comment