व्यवसाय प्रगतीसाठी डेलिगेशन - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

03 June 2015

व्यवसाय प्रगतीसाठी डेलिगेशन - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण उद्योजक आहात. आपल्या व्यवसायाची संपुर्ण धुरा आपल्यावरच आहे. आपल्या व्यवसायाची प्रगती करणे, व्यवसायिक ध्येयं साध्य करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे. उद्योजक तोच असतो जो व्यवसायाचा विकास करण्यासाठी जोखिम घेतो व यशस्वी व्यवसायाची निर्मिती करतो. परंतु बर्‍याच लघुउद्योजकांच्या बाबतीत चित्रं थोडं वेगळं आढळतं. लघुउद्योजक दिवसभर दैनंदिन कामकाजातच  व्यस्त असतात. व्यवसायिक प्रगतीसाठी व व्यवसायिक ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक कार्याकडे त्यांच्या कडून दुर्लक्ष होत असते. रोजच्या तांत्रिक कामांकडे किंवा अडचणींना सोडवण्यात लघुउद्योजक संपुर्णपणे भीडलेले असतात. रोज भरपुर कामे होतात. परंतु व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीला अनुसरुन प्रगती होत नाही. उद्योजक भरपुर मेहनत करतात, त्यांची अपेक्षा असते आपण भरपूर काम करतोय म्हणजे प्रगती नक्कीच होईल. परंतु तसं होत नाही. व्यवसायात इतर कर्मचार्‍यांप्रमाणेच ते सुध्दा कर्मचार्‍याचंच काम करत असतात. नेमकं काय चुकतयं ते मात्र कळत नाही.

मित्रांनो, असंख्य लघुउद्योजक एक मोठी चुक करतात, ज्या चुकीमुळे त्यांचा व्यवसाय वाढत नाही. ती चुक म्हणजे 'डेलिगेशन' न करणे! 'डेलिगेशन' म्हणजे उद्योजक आपली कामे इतर कर्मचार्‍यांवर सोपवणे व त्याला ते करण्याचे हक्क देणे. जेणेकरुन उद्योजक दैनंदिन गुंतागुंतीमधून बाहेर पडू शकतो व व्यवसाय विकासाच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो. बर्‍याच लघुउद्योजकांना व्यवसायातील कामे इतरांवर सोपवणे फार कठीण जाते. त्यांना वाटत असतं की त्यांच्यापेक्षा इतर व्यक्ती ते काम तितकं परिणामकारकपणे नाही करु शकत. डेलिगेशन करायला ते घाबरतात. माझं असं ठाम मत आहे की जर आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर डेलिगेशन शिवाय पर्याय नाही. आपण योग्य व्यक्तीं व्यवसायात योग्य पध्दतीने नियुक्त केल्यानंतर त्यांना विविध जबाबदार्‍या दिल्या पाहिजेत व कामे त्यांच्यावर सोपवली पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्यावर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहीजे. मी आपल्याला डेलिगेशनच्या ७ पायर्‍या सांगणार आहे. या सात पायर्‍यांचा वापर करुन आपण परिणामकारकपणे डेलिगेशन करु शकता व व्यवसायाच्या विकासाच्या कामाला लागु शकता.

डेलिगेशनच्या ७ पायर्‍या :
१) डेलिगेशन करायचे कार्य ठरवा : सर्व प्रथम आपण आतापर्यंत करत असलेले कोणते काम डेलीगेट केलं पाहीजे हे ठरवलं पाहीजे. सुरुवात लहान कामांपासुन  करा. ज्यामध्ये जोखिम नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे असं काम डेलीगेट करा जे व्यवसायातील दैनंदीन कामांना अनुसरुन आहे. प्रत्यक्षरित्या जे काम उत्पन्न देणारे नाही व व्यवसाय विकासाला अनुसरुन त्याचा संबंध नाही. असे काम डेलिगेशन साठी निवडा. उदाहरणार्थ: बॅक ऑफिसची कामे, एडमिन इ.

२) डेलिगेशन करण्यासाठी व्यक्ती निवडा : एकदा आपण कोणतं काम डेलिगेट करायचं आहे हे ठरवलं की मग आपण त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहीजे. व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेला (Organization Structure) अनुसार विशिष्ट डीपार्टमेंटच्या व्यक्तिला निवडा. डेलिगे करण्यार्‍या कामाचा त्याच डीपार्टमेंटशी संबंध असावा. कोणतेही काम कोणावरही सोपवू नका. तसं केल्यास व्यवसायात फार गुंतागुंती निर्माण होईल. उदाहरणार्थ: ऍडमिनशी सबंधित काम सेल्सच्या व्यक्तिवर सोपवू नका

३) कार्याचे महत्त्व सांगा व आवश्यक माहीती द्या : कर्मचार्‍याला कामाचं महत्त्व व्यवस्थित पटवून द्या. त्याला त्या कामा मागचा खरा उद्देश कळणं गरजेचं आहे. कितीही लहान काम जरी असलं तरी करणार्‍याला त्या कामाबद्दल जाणिव असली पाहिजे की आपण करत असलेल्या कामाचं  व्यवसायाला योगदान कसं आहे. त्याच बरोबर ते काम करण्यासाठी लागणारी आवश्यक माहीती सुध्दा कर्मचार्‍याला दिली पाहिजे. तरच तो ते काम व्यवस्थितपणे व स्वतंत्रपणे पार पाडू शकतो.

४) अपेक्षित परिणाम व कालमर्यादा स्पष्ट करा : काम झाल्यावर नक्की काय झालेलं अपेक्षित आहे. ते कर्मचार्‍याला ठाऊक असणं गरजेचं आहे. फक्त कामापेक्षा अपेक्षित परिणाम स्पष्टपणे माहीत असेल तरच कर्मचारी ते साध्य करण्यासाठी गरज लागली तर आणखी काही प्रयत्न करेल. त्याच प्रमाणे काम पुर्ण करण्याची कालमर्यादा सुद्धा कर्मचार्‍याला माहीती असली पाहिजे. तरच कर्मचारी त्या कामाला अनुसरुन अपेक्षित वेगात आणि वेळेतच आवश्यक कृती करेलं.

५) आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करुन द्या : जर काम करण्यासाठी काही विशिष्ट साधन सामुग्री लागणार असेल तर ती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी उद्योजकाची आहे. अन्यथा साधनसामुग्री अभावी कर्मचारी ते काम पुर्ण करु शकणार नाही.

६) आधार द्या व इतर व्यक्तींना कल्पना द्या : कर्मचार्‍याला शक्यतो आधार द्या. त्याला जर काही मदत लागली तर आपण उपलब्ध आहात याची त्याला जाणीव असु द्या. त्याच बरोबर आणखी काय करता येईल जेणे करुन त्याच्यावर सोपवलेलं काम तो आत्मविश्वासाने पार पाडेल याचा विचार करा. आधी हे काम आपण करत होतात त्यामुळे संबंधीत व्यक्तींना सुद्धा कल्पना द्या की यापुढे हे काम आपला सहकारी करणार आहे. त्यांना विश्वासात घ्या. तरच ते कर्मचार्‍याला अपेक्षित सहकार्य करतील. उदाहरणार्थ: आधी आपण आपल्या सध्याच्या ग्राहकांशी सर्विसनिमित्त सम्पर्क करायचात आणि इतर व्यक्ति ते काम करणार असेल तर ग्राहकाना त्याबद्दल कल्पना द्या.

७) परिणाम प्राप्त झाल्यावर अभिप्राय द्या : कर्मचार्‍याला त्याच्या कामाबद्दल वेळोवेळी अभिप्राय दिला पाहिजे. जर त्याने अपेक्षीत होते त्यापेक्षा जास्त चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करा. त्याने अपेक्षितपणे काम केलं तर त्याबद्दल त्याला शाब्बासकी द्या व त्याने कसे नीट काम केलं हे सुद्धा सांगा. जर अपेक्षितपणे काम नाही झालं तर कर्मचार्‍याला एकांतात त्याच्या चुकां बद्दल सांगा व त्या कश्या सुधारता येतील याबद्दल अभिप्राय द्या. सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन द्या. यापुढे चुक न होण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहीजे ते सुध्दा समजवा.

मित्रांनो, जो पर्यंत आपण डेलिगेशन करत नाही. तो पर्यंत आपण व्यवसायामध्ये प्रगती करु शकत नाही. दैनंदीन लहान-सहान कामांमध्ये जात असलेला बराच वेळं त्यामुळे वाचू शकतो. आपल्या कर्मचार्‍यांचा सुध्दा विकास होतो.
डेलीगेशनमुळे उत्तराधिकारी तयार करायला मदत होते. आपल्याला व्यवसायाच्या विकासाला अनुसरुन महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करता येते. नवीन संधींना काबीज करण्यासाठी आपण सज्ज राहतो. सर्वात महत्त्वाचं डेलीगेशनमुळे वेगात प्रगती होते.

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


1 comment:

nishant said...

Very useful Article

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites