नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण व आपल्या व्यवसायातील कर्मचारी आपल्या कार्यस्थळामध्ये किंवा व्यवसायातील कामांना अनुसरुन दिवसातील किती वेळ देतो? सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती आपण काम करत असलेल्या कार्यस्थळामध्ये किंवा कामासाठी दिवसातून सरासरी आठ तास ते दहा तास वेळ देतो. बर्याच व्यक्तींच्या बाबतीत घरापेक्षा जास्त वेळ ते आपल्या कार्यस्थळामध्ये असतात. प्रत्येक उद्योजकाची अशी अपेक्षा असते की आपल्या व्यवसायातील कर्मचार्यांनी रोज कामासाठी उपस्थित असले पाहिजे, त्यांनी मनापासुन काम केले पाहिजे. त्यांनी आपले काम करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. त्यासाठी स्वतःकर्मचार्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्योजकांच्या कर्मचार्यांकडून असणार्या अपेक्षा स्वाभाविक आहेत. व्यवसायामध्ये आपआपलं काम करण्यासाठीचं कर्मचार्यांची नेमणूक झालेली असते. परंतु मला असं ठाम पणे वाटतं की फक्त कर्मचार्यांची नेमणुक करुन व त्यांना सुरुवातीला काम पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन प्रत्येक दिवस सळसळत्या उत्साहात ते काम करतील अशी अपेक्षा ठेवणे पुरेसे नाही. जर उद्योजकांची अशी अपेक्षा असेल की प्रत्येक दिवस कर्मचार्याने मोटिव्हेट होऊन जोशात काम करावे तर उद्योजकांनी व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्मिती केली पाहिजे.
प्रत्येक दिवस, प्रत्येक कर्मचार्याला वैयक्तिकरित्या मोटिव्हेट करणे हे उद्योजक व व्यवस्थापकांसाठी अशक्य आहे, परंतु उद्योजक आपल्या व्यवसायाअंतर्गत किंवा आपल्या कार्यस्थळामध्ये जाणीवपुर्वकरित्या असे वातावरण निर्माण करु शकतात ज्यामुळे आपोआपच दररोज कर्मचार्यांमध्ये प्रेरणा संचारेल व ते उत्साहाने काम करतील. व्यवसायाअंतर्गत कार्यस्थळामध्ये जर सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण असेल तर प्रत्येक कर्मचार्याला रोज काम करण्याची आपसुकच इच्छा निर्माण होते, ते मनापासुन काम करु लागतात व त्यांना काम करत असताना आनंद मिळतो.
मित्रांनो, जगातील बलाढ्य व यशस्वी कंपन्या आज या विषयाला फार महत्त्व देत आहेत. जगातील उत्कृष्ट कार्यक्षमता असलेले, प्रतिभावंत कर्मचारी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्या आपल्या व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कर्मचार्यांनी त्यांच्या कंपनीला नोकरी करण्यासाठी अधिक पसंती द्यावी व त्यांच्याकडे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी जास्तीत जास्त काळासाठी टिकुन रहावेत यासाठी या मोठ्या कंपन्या विशेष कॄती करत आहेत. कर्मचार्यांसाठी काम करण्यासाठी जगातील सर्वोत्कॄष्ट कंपन्यांच्या Fortune मॅगझिनच्या यादीत सातत्याने अग्रगण्य क्रमांकावर असलेली कंपनी म्हणजे 'गुगल'! 'गुगल' आपल्या कर्मचार्यांना खुष ठेवण्यासाठी एका पेक्षा एक आगळ्यावेगळ्या संकल्पना राबवते. गुगलचे जगातील कोणतेही ऑफीस, हे ऑफीस कमी आणि अॅम्युजमेंट पार्क जास्त वाटते. असं वाटतच नाही की आपण कोणत्या ऑफीसमध्ये आलोय. इतकच नव्हे तर गुगल आपल्या कार्यस्थळाअंतर्गत सकारात्कम वातावरण निर्मिती करुन कर्मचार्यांना उत्पादनक्षम ठेवण्यासाठी विशेष कॄती योजना आखते. गुगलचे 'एच.आर.' डिपार्टमेंट त्यासाठी जबाबदार असते. कर्मचार्यांसाठी मोफत नाश्ता, मोफत दुपारचे-रात्रीचे जेवण, मोफत आरोग्य सेवा, मोफत हेअर्-कट, मोफत इस्त्री व ड्रायक्लीनींग, जिम व स्विमिंगपूल (कार्यस्थळाअंतर्गत!), व्हीडीयोगेम व इतर मनोरंजनाची साधने, कार्यस्थळात गरज लागल्यास डॉक्टर सेवा. इ. सुविधा गुगल पुरवते. 'गुगल'ला हे सर्व करण्यासाठी नक्कीच भरपुर खर्च येतो. परंतु त्यांचे कर्मचारी टिकण्याचे प्रमाण देखिल तितकेच जास्त आहे व नवीन कर्मचारी नेमणुकीसाठी लागणारा वेळ, पैसा व परिश्रम बर्याच प्रमाणात कमी होतात. सकारात्मक वातावरण निर्मितीचा 'गुगल' ला प्रचंड फायदा होतो. 'गुगल' चे ४५,००० आनंदी, उत्साही व सामाधानी कर्मचारी गुगलच्या यशासाठी कारणीभुत आहेत.
मी आपल्याला एक आवाहन करतो, जर आपण लघुउद्योजक आहात आणि आपल्या व्यवसायाची, कर्मचार्यांची उत्पादन क्षमता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या कार्यस्थळामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करा. त्यासाठी मी आपल्याला काही टिप्स् देतो त्यांचा वापर करा.
१) आपल्या कार्यस्थळामध्ये असे वातावरण निर्माण करा जेणे करुन कर्मचार्यांच्या कार्याला अर्थ प्राप्त होईल व प्रत्येकाला काम करण्याचे कारण मिळेल. कर्मचार्यांना या गोष्टीची सदैव जाणीव असली पाहिजे की आपल्या कार्यामुळे आपल्या ग्राहकाच्या आयुष्यात व समाजामध्ये काहीतरी योगदान होत आहे!
२) कर्मचार्यांच्या मुलभुत गरजा व सुरक्षितता यांचा प्रामुख्याने विचार करा. जर त्या पुर्ण होत असतील तरच त्यांचे कामामध्ये लक्ष लागेल.
३) कर्मचार्यांनी केलेल्या कार्याबद्दल सतत दाद दिली गेली पाहिजे व त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. छोट्या चांगल्या कामगिरीची देखिल दखल घेणं गरजेचं आहे.
४) कार्यस्थळ सकारात्मक, सुंदर व प्रोफेशनल बनविण्यासाठी वेळ व पैसा Invest करा. कोणत्याही व्यक्तीला, त्याला न आवडणार्या ठिकाणी काम करायला मजा येणार नाही.
५) कर्मचार्यांचे प्रामाणिक प्रश्नं व अभिप्राय यांचा आदर व सन्मान करा. आपल्या विचारांना व मतांना जिथे किंमत असते, तिथेच आपण आपल्या भावना व्यक्त करतो. स्पष्टवक्तेपणाचा सराव करण्यास कर्मचार्यांना नेहमी उद्युक्त करा.
६) कर्मचार्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या. प्रत्येक व्यक्ति आपल्या आवडत्या माणसांबरोबर राहणे पसंत करतो. जर आपल्या संस्थेतील सर्व कर्मचार्यांमध्ये घनिष्ठ मैत्री असेल तर कार्यस्थळी नियमितपणे येण्यास व काम करण्यास आपसुकच प्रेरणा मिळते.
७) आपल्या कर्मचार्यांच्या वैयक्तिक कलागुणांना वाव द्या. त्यांच्या आवडीनिवडींना व छंदांना जोपसण्यास प्रोत्साहन द्या.
८) प्रत्येक कर्मचार्याबरोबर दृढ विश्वास प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या बरोबर अधुनमधुन वैयक्तिक संभाषण करा. त्यांच्या कुटूंबाबद्दल, वैयक्तिक ध्येयांबद्दल, अडचणींबद्दल मनमोकळे पणाने संवाद साधा.
८) प्रत्येक कर्मचार्याबरोबर दृढ विश्वास प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या बरोबर अधुनमधुन वैयक्तिक संभाषण करा. त्यांच्या कुटूंबाबद्दल, वैयक्तिक ध्येयांबद्दल, अडचणींबद्दल मनमोकळे पणाने संवाद साधा.
९) संस्थेच्या कर्मचार्र्यांची संस्थेच्या प्रति व आपल्या कामाच्या प्रति, प्रचंड निष्ठा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काही विशेष गोष्टी करा.
१०) कर्मचार्याला त्याच्या क्षमता विस्तारीत करण्याची संधी द्या. आव्हानात्मक कामे केल्याने कर्मचार्याच्या क्षमता विकसित होतात व त्याबद्दल त्याला समाधान वाटते व काम करण्याची जबरदस्त प्रेरणा मिळते. त्यासाठी कर्मचार्यांला प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी करा. नवीन कैशल्य व ज्ञान आकलन केल्याने कर्मचार्याची बौधिक गरज पुर्ण होते व ते उत्साहाने काम करतात.
११) प्रत्येक कर्मचारी चांगल्या मनःस्थितीत रहावा यासाठी काही यंत्रणा अथवा योजना तयार करा. आपण दिवसभरात जे काम करतो, त्याचा दर्जा आपल्या ज्ञान, कैशल्य व अनुभवापेक्षा त्या दिवसाच्या आपल्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतो.
वरिल प्रत्येक टिपचा वापर करा आणि आपल्या कार्यस्थळाच्या वातावरणामध्ये सकारात्मक परिवर्तन आणा!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy
No comments:
Post a Comment