नमस्कार उद्योजक मित्रांनो! काही वर्षांपुर्वी जेव्हा मी गाडी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला गाडी चालवताच येत नव्हती. आता गाडी घेणार हे ठरल्यामुळे मला गाडी शिकणं भाग होतं. त्यासाठी मी एका मोटर ट्रेनिंग स्कुलमध्ये गाडी शिकण्यासाठी दाखल झालो. मला सुरुवातीला गाडी चालवणे म्हणजे प्रचंड अवघड वाटायचे. कारण ड्रायवरच्या सीट वर बसल्यावर बोनेटच दिसत नाही! अॅक्सलरेटर, ब्रेक आणि क्लचं यांमध्ये नेहमी माझा गोधंळ उडायचा. स्टेअरींग नेमक्या कोणत्या पोजिशन मध्ये असताना चाकं सरळ असतात हे कळायचच नाही. कोणता गेअर कधी टाकायचा? सिग्नलची बटने, आणि त्यात तीन-तीन आरसे! मला गाडी चालवणे म्हणजे फार मोठं दिव्य काम वाटायचं. मोटर ट्रेनिंग स्कुलवाल्यांनी २१ दिवसांचा एक कार्यक्रम तयार केला होता. रोज सकाळी अर्धा तास मी गाडी चालवायला शिकण्यासाठी जायचो. माझ्या शिक्षकाने मला अगदी पहिल्या दिवसापासुन व्यवस्थित मार्गदर्शन केलं. पहिल्या दिवशी गाडी बद्दल मुलभूत गोष्टी सांगितल्या. मग मला गाडी सुरु व बंद करायला शिकवलं. मग गाडी पहिल्या गेअर वर चालवायला सांगितलं. पहिल्या- आठवड्यात थोडी भीती कमी झाली. दुसर्या आठवड्यात अजुन चांगला हात बसला. तिसर्या आठवड्यात गाडी थेट हायवे वर चालवली. फक्त २१ दिवसात मी बिनधास्तपणे गाडी चालवू लागलो, ते सुध्दा कोणाच्याही मदती शिवाय! गाडी चालवणं मला अशक्य वाटायचं परंतु एका पध्दतशीर पणे तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मी गाडी चालवू लागलो. मित्रांनो, हे उदाहरण मी आपल्याला का सांगितलं? याचा आपल्या व्यवसायाशी काय संबंध? मला असं वाटतं की एक उद्योजक म्हणुन आपण आपल्या व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मीतीवर लक्ष केद्रीत केलं पाहिजे. आपण आपल्या व्यवसायाचे लिडर आहात व लिडरने आपली एक जबरदस्त टीम तयार केली पाहिजे. अशी टिम जी आपल्या व्यवसाया अंतर्गत विविध कामे चोखपणे आणि मनापासुन करेल. जर आपल्या टीमने त्यांची कामे चोखपणे करावी अशी आपली अपेक्षा असेल तर त्यांना तसं करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे त्या मोटर ट्रेनिंग स्कुलच्या २१ दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाव्दारे मी व्यवस्थितपणे गाडी चालवायला शिकलो. त्याच प्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये विविध डिपार्टमेंटची कामे उत्कृष्टपणे करण्यासाठी कर्मचार्याची नेमणूक झाल्यावर, तो कामावर रुजु झाल्यावरचा सुरुवातीचा कालावधी तो एका विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तयार झाला पाहिजे. व्यवसायामध्ये तयार केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला 'इंडक्शन प्रोग्राम' असं म्हणतात.
नवीन कर्मचार्याला आपल्या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे कार्यरत करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम'ची अत्यंत गरज असते. आपल्या व्यवसायामध्ये कामे ज्या विशिष्ट पध्दतीने चालतात त्याबाबत ओळख, मार्गदर्शन व अनुभव होण्यास कर्मचार्याला मदत व प्रशिक्षणाची गरज असते. इंडक्शन प्रोग्रामव्दारे ही गरज पूर्ण होते. 'इंडक्शन प्रोग्राम' म्हणजेच व्यवसायातील कर्मचार्याचे ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व सवयी विकसीत करणे. कर्मचार्यांची कार्यक्षमता अपेक्षेप्रमाणे होण्यासाठी त्याला आवश्यक गोष्टींचा समावेश 'इंडक्शन प्रोग्राम' मध्ये झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थेमध्ये जे काम त्याच्यावर सोपवले जाणार आहे, ते काम कश्या प्रकारे केले जाते यासाठी त्याला मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी 'ऑपरेशन मॅन्युअल' ची प्रचंड मदत होते व कर्मचार्याला सर्व गोष्टी आकलन करण्यास सोपे जाते. सुरुवाती पासुनच 'ऑपरेशन मॅन्युअल'चा वापर करायची कर्मचार्याला सवय लागते. कर्मचार्याचा 'इंडक्शन प्रोग्राम' पुर्ण झाल्यावर त्याला स्वतंत्रपणे कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, व पाठपुरावा करावा. प्रत्येक डिपार्टमेंट व पदासाठी वेगवेगळा इंडक्शन प्रोग्राम तयार करावा.
परिणामकारक 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करणे : इंडक्शन प्रोग्राम तयार करण्यासाठी कर्मचार्याच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने पुढाकार घेतला पाहिजे. व्यवस्थापकाने 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करताना स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की, 'कर्मचार्याला परिणामकारकपणे कार्यरत करण्यासाठी त्याला कोणते ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व अनुभवाची गरज आहे?' आणि गरजेप्रमाणे या गोष्टींचा एक प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापकाने तयार केला पाहिजे. हाच प्रशिक्षण कार्यक्रम त्या कर्मचार्याचा 'इंडक्शन प्रोग्राम' असतो. इंडक्शन प्रोग्राम चा कालावधी पदानुसार बदलु शकतो. काही दिवस, आठवडे किंवा महिने इंडक्शन प्रोग्राम असु शकतो. कर्मचार्याचे ज्ञान कौशल्य, प्रवृत्ती व अनुभव यांचा विकास करण्यासाठी पुढील विकास मार्गांचा उपयोग 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करण्यासाठी व्यवस्थापकांना होऊ शकतो.
१) अभ्यास : 'इंडक्शन प्रोग्राम' दरम्यान कर्मचार्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्याला विशिष्ट बाबींचा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो. त्यामध्ये पुस्तके, ऑपरेशन मॅन्युअल, आर्टिकल, रिपोर्ट, वेबसाईट, रिसर्च पेपर इ. चा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो.
२) प्रशिक्षण : कर्मचार्याला काही विशिष्ट विषयांचे प्रशिक्षण देणे जेणेकरुन त्याच्या क्षमता विकसित होतील. वैयक्तिक भेटी द्वारे प्रशिक्षण देणे, एखाद्या सेमिनार किंवा कार्यशाळेमध्ये त्याला सामिल करणे, विडीयो प्रोग्राम दाखवणे, प्रशिक्षणक्रम इ. व्दारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
३) अनुभव : काही महत्त्वपुर्ण अनुभवांव्दारे कर्मचारी बर्याच गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करु शकतो. उदाहरणार्थ : वरिष्ठ कर्मचार्याचे काम करताना निरिक्षण करणे, वरिष्ठ कर्मचार्याला सहकार्य करणे, एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये छोटी जबाबदारी पार पाडणे इ.
४) विशिष्ट कार्य : विशिष्ट कार्यामुळे सुध्दा कर्मचार्याची बौधिक व मानसिक क्षमता विकसित होते. उदाहरणार्थ : आव्हानात्मक कार्य पुर्ण करण्याची संपुर्ण जबाबदारी देणे; त्यामुळे कर्मचार्याचा आत्मविश्वास वाढतो.
मित्रांनो, लघु व्यवसायांमध्ये या विषयाला फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु लघुउद्योजकांना जर आपल्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर कार्यक्षम मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे. मनुष्यबळ कार्यक्षम करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम' प्रचंड महत्त्वाची भुमिका बजावतो. 'इंडक्शन प्रोग्राम' बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु त्यांना आचरणात आणल्यामुळे कर्मचारी तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. खुप कमी वेळात ते कार्यक्षम बनतात व व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवतात. जर कधी एखादा कर्मचारी तडका-फडकी सोडून गेला तर 'ऑपरेशन मॅन्युअल' व 'इंडक्शन प्रोग्राम' यांच्या आधाराने खुप कमी वेळे मध्ये नवीन कर्मचारी आधीच्या कर्मचार्याची जागा घेऊ शकतो.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy
No comments:
Post a Comment