2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 December 2017

स्वप्नांना पंख भरारीचे....!

स्वप्नांना पंख भरारीचे....!

" विमान टाटा, येताना खाऊ आण...असं म्हणूनआकाशात उडणाऱ्या विमानाला अच्छा करणे हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आवडता खेळ. आपल्या सगळ्यांप्रमाणेच विमानाचे आकर्षण असल्याने श्री. अमोल यादव यांनी लहानपणी वैमानिक बनण्याचे स्वप्न पहिले, आणि ते नुसते पूर्णच  केले नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडली जावी हे ध्येय बाळगुन Thrust Aircraft Private Limited च्या माध्यमातून पहिले भारतीय निर्मित सहा आसनी विमान निर्माण केले. कॅप्टन अमोल यादव हे मागील १७ वर्षांपासून मुख्य  वैमानिक म्हणून Jet Airways मध्ये कार्यरत आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी श्री.अमोल यादव  यांनी अमेरिकेत वैमानिक प्रशिक्षणास सुरवात केली. प्रशिक्षणाच्या सहा महिन्यांतच मित्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःचे एक जुने विमान खरेदी केले. वैमानिक बनण्याचे अतिशय  खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ते भारतात परतले. या अनुभवाने आपण स्वतः विमान निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला होता.
विमान निर्मितीच्या प्रवासात वडील श्री. शिवाजी यादव यांनी त्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. आधीच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना विमान निर्मिती ही गोष्ट कठीण आहे हे सांगितले, वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी थर्मोकॉल चे व नंतर त्यांनी लाकडाचे विमान तयार करून दाखवले. तरीही वडिलांचे समाधान न झाल्यामुळे अल्युमिनियम चे छोटेखानी विमान बनवून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले. जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विमान निर्मिती ला सुरुवात केली, तेंव्हा विमानाच्या इंजिन खरेदीसाठी त्यांच्या आईने आपले मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. आई व इतर कुटुंबीयांनीदेखील त्यांच्यावर विश्वास दाखवून मोलाची साथ दिली. 


 १९९८ मध्ये त्यांनी आपले पहिले विमान निर्माण केले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रयत्न पूर्ण नाही झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा १९९९मध्ये दुसरे  मॉडेल निर्माण करण्यास सुरवात केली, २००३ मध्ये त्यांनी २ विमाने निर्माण केली,पण  याही वेळी शासकीय नियमांमुळे या विमानांचे उड्डाण होऊ शकले नाही. विमान उभारणी साठी लागणारी जागा उपलब्ध नसल्याने राहत्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांनी विमानाची निर्मिती केली. पण या अडचणींमुळे खचून न जाता त्यांनी २०१०साली  पुन्हा एकदा TAC 003 या ०६ आसनी विमानाच्या निर्मितीस सुरुवात केली. Jet Airways मधील १० वर्षे नोकरीची कमाई ची त्यांनी या आपल्या स्वप्नामध्ये गुंतवणूक केली. अखेर २०१६ मध्ये TAC 003 विमान पूर्णत्वास आले. या कामात  त्यांना Jet Airways मधील कामाचा अनुभव यंत्र सामग्री खरेदी व सुरक्षा तसेच इतर नियमांची पूर्तता करण्यासाठी झाला. अनेक अडचणींचा सामना करत, कुटुंबीय व  मित्रपरिवाराच्या सहकार्याने २०१६ च्या भारत सरकारच्या Make In India प्रदर्शनात भारतात निर्माण झालेले पहिले वहिले विमान दाखल झाले. प्रदर्शनातील सहभागाने भारत सरकार,प्रसार  माध्यमे व सामान्य जनतेने श्री. अमोल यादव यांचे स्वप्न उचलून धरले. नुकतीच त्यांच्या या विमानास सरकारकडून नोंदणीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.


तसेच महाराष्ट्र शासनाकडून विमान निर्मितीसाठी विशेष सहाय्य म्हणून पालघर येथे १५७ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडण्याचे श्री. अमोल यादव यांचे ध्येय आहे, तसेच हा प्रवास अतिशय कमी वाहतूक खर्चात म्हणजे प्रत्येकी २०००/- रुपयांमध्ये उपलब्ध करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. " स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा " हेच आपण श्री अमोल यादव यांच्याकडून शिकतो.



- लक्ष्यवेधी ऋषिकेश आमराळे

15 December 2017

माणसाची परोपकाराच्या भावनेने केलेली एखादी कृती किती महत्त्वाची ठरते!




साड्या आणि बायका हा एक मोठ्ठा विषय आहे. पण, साडी खरेदीसारखी अत्यंत आनंदाची गोष्ट अगदी सहजच सोडून देणार्‍या सुधा मूर्ती, म्हणूनच एका उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती २१ वर्षापूर्वी काशी येथे गेल्या होत्या, काशीला गेल्यानंतर एखाद्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो अशी मान्यता आहे. त्यावेळी सुधाताईंनी खरेदीचा आणि त्यातूनही विशेषत: साडी खरेदीचा त्याग केला. या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता केवळ अत्यावश्यक वस्तूच त्या विकत घेतात, असे त्यांनी नुकतेच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इतकेच नव्हे तर या निर्णायामुळे खूप आनंदी व मोकळे वाटत आहे असेही त्यांनी सांगितले.
अनावश्यक खर्चाला कात्री लावल्यानंतर शिल्लक राहिलेली मोठी रक्कम समाजकार्यासाठी उपयोगी पडते. अशाच पैशांतून पूरग्रस्तांसाठी दोन हजार तिनशे घरे बांधली गेली तसेच गुजरातमधील भूकंपग्रस्तांनाही मदत केली गेली हे त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला थक्क झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सुरवातीच्या काळात १९८१ साली, सुधाताईंनी बचत केलेले १० हजार रुपये नारायण मूर्तींना दिले होते व त्याआधारेच इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली गेली. अर्थात, त्यांच्या मदतीमुळेच नारायण मूर्तींचे उत्पन्न आज १.९२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात आहे.


खरचं, कसं जमलं असेल त्यांना? हा प्रश्न राहून राहून मनात येतो… प्रत्येक बाई साडी हौसेने मिरवते, कोठेही, कोणाकडेही गेलं तर मानाची भेट म्हणून साडीचोळी मिळते पण त्यापेक्षाही स्वतःच्या आवडीची साडी खरेदी करण्यासाठी तासनतास दुकानांचे उंबरठे झिजवणार्‍या बायकांपैकी कदाचित आपण प्रत्येक जणच असतो. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट मनाने करायचा पक्का निर्धार केल्यावर जे त्याच मार्गावरुन चालतात तीच माणसं खरी. सुधाताईंनी साडी खरेदी थांबवली असली तरीही त्या पुस्तक खरेदी मात्र आवर्जून करतात. विशेष म्हणजे आज त्यांच्या ग्रंथालयात तब्बल वीस हजारांहून अधिक पुस्तके आहेत आणि हो, एवढी पुस्तके जवळ असूनही त्यांना आपले पुस्तक कोणालाही देणे आवडत नाही. कारण, लेखकांची घरं पुस्तकांच्या विक्रीवर चालतात, आपण अशी फुकट पुस्तकं वाटत गेलो तर लेखकांचं कसं होणार….? हा आणखी एक मोठा व्यापक विचार त्यांच्या या कृतीमागे आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकप्रेमापोटी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत कर्नाटकमध्ये तब्बल ६० हजारांहून अधिक ग्रंथालयेही उभारण्यात आली आहेत.
खरंच, एरवी आपल्याला साध्या साध्या गोष्टिही ठरवणं आणि आचरणात आणणं अवघडं जाते. काही करायला जावं की त्याला हजार फाटे फुटतात आणि मग जे ठरवलं ते मागेच पडते.
जे ठरवायचं त्यामागे योग्य विचार महत्त्वाचा आणि योग्य विचारानंतर आचरणात आणलेल्या कृतीवर ठाम राहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हेच सुधाताईंकडून प्रत्येकाने शिकायला हवे.

                                                                                                                         सौजन्य: संध्यानंद

08 September 2017

जीवनाचे नाव आहे शिकत राहणे

सध्या टीव्हीवर एक जाहिरात बरीच लोकप्रिय झाली आहे. त्या जाहिरातीत एक आजी आपल्या नातवाकडून सायकल चालविण्यास शिकत आहे. ते पाहून हसायला येतं, तसाच आनंदही होतो, तसे पाहिले तर काही नवे शिकणे आनंद देते. जगातील कोणत्याही भागातील यशस्वी लोकांच्या यशस्वीतेच्या कथा वाचा. ते असे लोक आहेत, की जे वयाच्या कोणत्याही वळणावर नवीन काही शिकण्यास मागे पाऊल घेत नाहीत.
जपानमध्ये सततच्या व कधीही न संपणार्‍या प्रगतीच्या प्रयत्नांसाठी एक शब्द वापरला जातो. कैजन हा केवळ जपानच्या व्यापार विश्वातील शब्द नाही तर तो त्यांच्या यशाचे सूत्र आहे. हा योद्ध्यांच्या जीवनाचेही दर्शन घडवितो. आश्चर्याची गोष्ट अशी , की जपानच्या लोकांची ही दृष्टी आता जगभरातील लोकांची दृष्टी बनली आहे. जगातील वेगवेगळ्या भागातील यशस्वी लोकांना मी भेटलो आहे. मग ते कला, खेळ, उद्योग जगातील असतील. ते सर्व नेहमीच स्वतःच्या चांगल्या प्रदर्शनासाठी कार्यरत राहिले आहेत. त्यांना ही गोष्ट माहीत आहे, की सतत बदलणार्‍या या जगात यश मिळवण्यासाठी सतत नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच पहिल्यापेक्षा काहीतरी चांगले शोधून काढले पाहिजे. यशस्वी लोक कुणाच्या दबावाखाली येऊन काम शिकवण्यासाठी बध्द नसतात. तर ते जवळपासच्या बदलत्या जगाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात. त्यामुळे ते जगाला चांगल्या पध्दतीने समजू शकतील.

तुम्ही नवे शिकवण्यासाठी उत्सुक आहात?
जर तुम्ही हे निश्चित करु शकत नसाल, की तुमच्यात काही नवे शिकण्याचा जोश आहे किंवा नाही, तर या गोष्टी ते निश्चित करण्यासाठी तुम्हाला मदत करु शकतील. तुम्ही काही नवे यासाठी शिकता, कारण तुम्हाला शिकावेसे वाटते. ती तुमची मजबुरी आहे म्हणून नव्हे. नेहमी काही तरी नवीन शिकण्यासाठी प्रेरीत होणारे लोक केवळ अधिक प्रश्नच विचारत नाही तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही स्वतःच करतात. तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल तर आपली आवड व त्यासाठी आवश्यक माहीती गोळा करण्यासाठी मग्न राहता. तर तुम्ही जीवन व बदलत्या जगातील कार्यपध्द्तींचा सुंदर मेळ घालू शकता. आपली उद्दिष्टे व स्वप्नपूर्तीसाठी चांगली दिशा तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य व माहिती तुम्ही चांगल्या पध्द्तीने मिळवू शकता.


तुम्हाला सर्वच काही माहीत नाही असे मानण्याचे कारण नाही.
काही लोक स्वतःकडून काही नवे शिकण्यासाठी प्रेरणा घेत असतात. त्यांना तुमचे कौशल्य, तुमच्यातील कमतरता यांची चांगली जाण असते. त्यांना तुमच्याबद्दल काहीच चूकीची माहीती नसते. जर तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग व आपली माहीती यातील अंतर स्वतःच समजून घेतलं, तुम्ही तुमचे कौशल्य वाढविण्याचा स्वतःच प्रयत्न केलातं तर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साद्य करण्यास मदत मिळेल.


तुम्ही मोठे धोके स्वीकारण्यास व त्यानुरुप चांगले परिणाम मिळण्यासाठी नेहमी तयार राहता. 
तुम्ही नेहमी मोठ्या अपेक्षा ठेवता आणि त्यांच्या पूर्ततेसाठी जीव तोडून काम करता. नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रेरित होणार्‍या लोकांसाठी आपल्या कौशल्यावर तुमचा विश्वास असतो. कारण तो तुम्ही सुरु केलेल्या प्रयत्नांच्या ताकदीवर आपल्या जीवनात बरेच काही प्राप्त करतो. जर तुम्हाला तुमच्या सुरक्षीत क्षेत्रातून बाहेर पडून मोठा धोका पत्करण्यास भीती वाटत नसेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही जिवनात बरेच काही साध्य करु शकता.


कोणतेही काम सुरु केल्यानंतर तुम्ही ते मध्येच सोडून देत नाहीत.
आव्हानांपासून दूर राहणे, त्रास पाहून पाऊल मागे घेणे आपल्याला आवडत नाही? असे लोक जे स्वतःकडून काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करतात. जे आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अधिक जागृक असतात. ते कष्ट करण्यास किंवा आव्हानांचा सामना करण्यास मागे पाहत नाहीत. जीवनात यश मिळवण्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरण्यापेक्षा स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. जर तुम्ही स्वतःला जबाबदार मानत असाल तर निश्चितपणे उद्दिष्टपूर्तीच्या मार्गातील अडचणी तुम्ही स्वतःच दूर करु शकाल. तसेच तुमचे उद्दिष्ट गाठू शकाल.


सौजन्य: संध्यानंद

17 August 2017

देवाचा पयोद

'पयोद', पयोद म्हणजे पाणी घेऊन आलेला एक ढग. कदाचीत शहरी माणसाला या शब्दाशी एवढं जुळता येणार नाही पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी पयोद म्हणजे आयुष्यच असते जणू. सध्या उन्हाची काहिली वाढलीय. त्यामुळे पाण्याचं मूल्य आपल्या प्रत्येकाला जाणवत असेलच. त्या पयोदवर त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल, त्याच्या मुलांचं शिक्षण, आईवडलांच्या आजारावर उपचार, सणासुदीचा खर्च सारं काही अवलंबून असतं. हाच पयोद शब्द त्याने आपली नवीन कंपनी सुरु करताना निवडला आणि आठ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक महिलांच्या घरी हा पयोद सुख-समृद्धी आणि विकासाच्या रुपाने बरसत आहे. हा पयोद बरसविणारे आहेत पयोद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष देवानंद लोंढे.
कवठे महांकाळ या सांगलीतल्या एका खेडेगावात देवानंदचा जन्म झाला. कवठे महांकाळ तसा दुष्काळी भाग. त्यामुळे शेती पेक्षा शेतमजूरी करणे हा तेथील प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय. देवानंदचे आई वडील देखील शेतमजूरीचे काम करीत असत. देवानंदने स्वत: शेतात राबून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूर विद्यापीठातून तो सिव्हील इंजिनियर झाला. पाणी आणि पाणी व्यवस्थापन हे त्याचे स्पेशलायझेशनचे विषय होते. याच विषयाच्या अनुषंगाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार बनला. त्याला युनिसेफ बरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली. ८० देशांमध्ये कामानिमित्ताने संचार करता आला. पण नोकरी किती दिवस करायची हा प्रश्न त्याने स्वत:लाच विचारला. लहानपणापासून त्याने आपल्या आई बाबांना शेतात राबताना पाहिले होते. जर ही गुलामगिरी झुगारायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे मनाशी पक्कं झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी सोडून दयानंद लोंढेंनी व्यवसायात उडी घेतली.

मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी व्यवसाय कोणता करावा याचे काही ठोकताळे मनाशी त्यांनी मांडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरातून आल्याने आंतरराष्ट्रीय चलनातच व्यापार करायचा हे मनाशी पक्कं होतं. असं उत्पादन असावं जे भारतात खूप कमी उद्योजक तयार करत असतील आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे या उत्पादनातून सामाजिक संदेश गेला पाहिजे. हे सर्व विचारचक्र आणि संशोधन दोन वर्षे चालू होते. संशोधनातून एक उत्पादन समोर आले ते म्हणजे हातमोजे तयार करणे. एकतर भारतात हातमोजे तयार करणारे खूपच कमी उद्योजक आहेत. हातमोजे तयार करुन ते निर्यात करायचे त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय चलन मिळणार होतं. आणि हातमोजे घालून सुरक्षितता बाळगा हा संदेश आपसूकच समाजात जाणारा होता. त्यामुळे हाच व्यवसाय करण्याचा निर्णय झाला.
पण खरी परिक्षा तर पुढेच होती. उद्योग करण्यासाठी भांडवल लागतं. हे भांडवल बॅंका देतात. भांडवल मिळावे यासाठी देवानंद यांनी वित्तीय संस्थांना प्रकल्प सादर केले. आणि वित्तीय संस्थांनी कर्ज नाकारलं. कर्ज नाकारण्याचं कारण होतं दलित समाजातील एक तरुण, उद्योग पण उभारु शकतो यावर नसलेला विश्वास. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नोकरी, मानमरातब, उच्च शिक्षण सामाजिक व्यवस्थेने तयार केलेल्या दलित या घटकासमोर निष्प्रभ झाले होते. अजूनही जात व्यवस्था आपल्या भारतीय मानसिकतेत कशी दबा भरुन बसली आहे याचं हे मूर्तीमंत्त उदाहरण आहे. मात्र जर व्यवस्था आपल्या नाकारत असेल तर आपण आपली व्यवस्था प्रस्थापित करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या जगाला दिलेलं बाळकडू दयानंद लोंढेंनी वापरलं आणि स्वत:च उद्योगासाठी लागणारा पैसा उभारला. यासाठी आपलं राहतं घर, जमीन, बायकोचे दागिने त्यांना गहाण ठेवावं लागलं. आणि त्यातून उभी राहिली पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि.

आज पयोद कडे ८५० हून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. जपान आणि काही युरोपियन देशांत पयोदचे हातमोजे निर्यात होतात. ओबेरॉय, ऑर्किड, ताज ही भारतातील पंचतारांकित हॉटेल्स, वाहने तयार करणाऱ्या कंपन्या हे पयोदचे भारतातील प्रमुख ग्राहक आहेत. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी पयोद जपते. हातमोजे सारखी वस्तू निर्जंतूक आणि स्वच्छ असावी यासाठी धूळ आणि धूर नसलेल्या ठिकाणीच पयोद हातमोजे तयार करायला देते. पण ग्रामीण भागात हे दोन्ही घटक अविभाज्य आहेत. जर कोणती महिला पयोदकडे रोजगारासाठी आली तर मशीन देताना पयोद दोन गोष्टी करते. धूराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पयोद संबंधित महिलेला गॅस कनेक्शन मिळवून देते आणि धूळ टाळण्यासाठी तिला फरशी टाकण्यासाठी संबंधित कंपनीशी भेट घालून देते वा कार्पेट मिळवून देते. हे सगळं करण्यासाठी जर कोणाकडे पैसे नसतील तर पयोद कच्चं कर्ज देखील देते ते देखील नाममात्र मासिक हफ्ता घेऊन. ग्रामीण भागामध्ये आजदेखील न्हाणीघर बाहेर असतं ते देखील व्यवस्थित झाकलेलं नसतं. परिणामी लज्जास्तव पहाटेच्या अंधारात कित्येक महिला स्नानादी आटोपून घेतात. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये शौचालयासोबत न्हाणीघर देखील व्यवस्थित असावं यासाठी पयोद मदत करते.
त्याचबरोबर २५ गावांत पसरलेला पयोदचा पसारा पाहण्यासाठी दूर दूरचे लोक येतात. त्यांना पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी न ठेवता पयोद दोन मुलांना मार्गदर्शन करण्याचा रोजगार देणार आहे. यातून उद्योजकीय सहल ही संकल्पना पयोद राबविणार आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत ते कच्चा माल देखील हिंगणगावातच तयार करणार आहेत. नद्या स्वच्छ करण्याचा प्रकल्प टाटा समूह राबवत आहे. महाराष्ट्रात पयोद या प्रकल्पात टाटाचे सहाय्यक आहेत. तरुणांना रोजगार आणि लोकांना प्यायला स्वच्छ पाणी देणे हाच यामागे हेतू आहे.

एकेकाळी देवानंद लोंढेंना वित्तीय संस्था कर्ज द्यायला नकार देत होती. आज व्हेंचर कॅपिटल कंपनी पयोदमध्ये ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार आहे. स्वत:च्या हिंमतीवर लढा देत चाळीशीच्या आतच या तरुणाचा व्यवसाय वर्षाला ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल करतो. निव्वळ दलित असल्यामुळे व्यवस्थेने नाकारलेल्या या तरुणाने स्वत:चीच व्यवस्था तयार केली. असे अनेक देवानंद लोंढे उद्योजक म्हणून उभे राहून समृद्धीचे पयोद महाराष्ट्रावर बरसावेत ही सदीच्छा.

- लक्ष्यवेधी प्रमोद सावंत
www.yuktimedia.com

03 August 2017

२० रुपये खिशात नसणार्‍या कोट्याधिशाची कहाणी

त्याच्या वडिलांचा आगप्रतिबंधक उपकरण तयार करण्याचा कारखाना होता. वयाच्या आठव्या वर्षांपासून तो वडिलांसोबत कारखान्यात जाई. त्याला कारखान्याविषयी चांगली माहिती होती. कामगार, उत्पादन, ग्राहक यांच्याबरोबर त्याचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. शाळेत असताना शाळा आणि कॉलेजच्या सुट्ट्यांदरम्यान कारखान्यात जाण्याचं त्याने वेळापत्रकंच तयार केलं होतं. मात्र लहान भाऊ असल्यामुळे कारखान्याची जबाबदारी वंशपरंपरागत पद्धतीने मोठ्या भावाकडे आली. काहीसा मनात खट्टू झालेल्या त्याने स्वत:ची वेगळी कंपनी सुरु करण्याचे ठरविले. त्यावेळेस खिशात २० रुपये सुद्धा नव्हते. पण स्वप्न मात्र मोठं होतं. एका मित्राकडून ५०० रुपये कर्ज घेऊन त्याने आपल्या व्यवसायास सुरुवात केली. १९८४ मधली ही घटना आहे. अवघ्या ३० वर्षांत त्याची कंपनी १ हजार कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. ही रोमांचक कथा आहे नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नितीन शाह यांची.

कोणत्याही एकत्र कुटुंबपद्धतीत जी वंशपरंपरागत पद्धत असते त्यालाच अनुसरुन नितीनच्या वडिलांनी आपली कंपनी झेनिथ फायर सर्व्हिसेसची सूत्रे मोठ्या मुलाकडे सोपविली. आता आपण आपलं स्वत:चं काहीतरी अस्तित्व निर्माण करुन दाखवूया असं नितीनला वाटू लागलं. पण करणार काय हा यक्षप्रश्न होताच. पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता तो पैशाचा. एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटला तर पैसा लागणारंच. आपल्या खिशात २० रुपयेसुद्धा नाही. कोण का म्हणून आपल्याला पैसे देईल असे त्याला वाटू लागले. मात्र जिथे पैसा काम करत नाही तिथे जोडलेली नाती काम करतात. नितीनच्या एका मित्राने जानेवारी १९८४ मध्ये ५०० रुपये कर्जाऊ दिले. नितीन मित्राच्या गॅरेज मध्ये काम करु लागला. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा मिळविला.
नितीन वडिलांसोबत व्यवसाय सांभाळत असताना त्याने काही चांगले संबंध तयार केले होते. यापैकी एक अणुऊर्जा विभागात जेष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मदतीने नितीनला अणुऊर्जा विभागातील आगीशी संबंधित असणार्‍या उपकरणांची निगा राखण्याचे कंत्राट मिळाले. आगप्रतिबंधक सिलेंडरच्या दुरुस्ती आणि निगा राखण्याचं हे कंत्राट होतं. अणुऊर्जा विभाग हे सिलेंडर्स नितीन काम करत असलेल्या गॅरेज मध्ये पाठवत. नितीनने ३ कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते. त्या तिघांच्या सहाय्याने नितीन सिलेंडर्स दुरुस्त करायचा. अणुऊर्जा विभाग ते दुरुस्त झालेले सिलेंडर्स परत घेऊन जात. काम सुरु केलं त्यावेळेस ट्रॉली, पुली, कन्व्हेयर सारखी उपकरणं नितीनकडे नव्हती. किंबहुना ती घेण्यासाठी पैसे नव्हते. पण हातात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या जोरावर तो काम करत राहिला. रोलिंग मशीनसाठी तो जुन्या गाडीचा भाग वापरायचा. याचा खर्च होता अवघा हजार रुपये. नवीन मशिन किंमत होती सुमारे ४५ हजार रुपये. अशाप्रकारे विविध क्लृप्ता काढून नितीन कमी खर्चात कंपनी चालवित होता.

साधारण ६-७ महिन्यांनी घाटकोपर मध्ये २० लाख रुपये बाजार मूल्य असलेली १२०० चौरस फूटाची एक जागा खरेदी केली. जमविलेले सारे पैसे या जागेत गुंतविले. अणुऊर्जा विभागाचं काम करत असतानाचं ओळखीने ओएनजीसीचं काम देखील मिळालं. हळूहळू कामाचा वेग वाढला. १९८६ मध्ये नितीनच्या कंपनीने ७ कोटींचा टप्पा गाठला. ही तर सुरुवात होती. अवघ्या २ वर्षांच्या अथक मेहनतीचं हे फळ होतं. १९८७ मध्ये कंपनी विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये खर्चून गुजरातला ५० हजार चौरस फूटाची जागा खरेदी करुन आगप्रतिबंधक उपकरण निर्मितीचा कारखाना तिथे सुरु केला. दरम्यान आगीशी संबंधित सर्व घटक एकाच छताखाली देण्याचा निर्णय नितीनने घेतला. आगप्रतिबंधक उपकरणांचं डिझाईन, निर्मिती, निगा राखणे हे सर्व कंपनी पुरवू लागली. १९८८ मध्ये गोवा आणि मुंबईच्या अग्निशमन दलाचे कंत्राट कंपनीला मिळाले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच मुळात ही आग शोधून काढणारं यंत्र बनविणार्‍या इंग्लंडमधील अपोलो फायर डिटेक्टर कंपनीसोबत नितीनच्या कंपनीने हातमिळवणी केली. त्यांची उत्पादने नितीनची कंपनी भारतात विकू लागली. उत्पादन निर्मिती ते उत्पादन विपणन व विक्री असा नवीन प्रवास सुरु झाला. २०१० मध्ये नितीन शाह यांनी संयुक्त अरब अमिरातीतील न्यू एज कंपनी ४० कोटी रुपयांना विकत घेतली. न्यू एज कंपनीचे अबुधाबी, दुबई, शारजाह येथे कार्यालये आहेत. युरोपियन बाजारपेठेसाठी फायरटेक सिस्टम नावाची कंपनी सुरु केली आहे. नितीन शाह यांची जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी आगप्रतिबंधक उत्पादनांसोबतच जड वायू, रासायनिक वायू आणि पाण्याची निर्मिती करते. ओझोन फ्रेंडली फायर प्रोटेक्शन सिस्टम हे तंत्र भारतात वापरणारी ही पहिली कंपनी होय. कंपनीचा सध्याचा एकत्रित महसूल १००० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२० रुपये सुद्धा खिशात नसताना नितीन शाह यांनी विजिगीषु वृत्ती कायम ठेवत १००० कोटी रुपयांची कंपनी उभारली. जिथे पैसा नसतो तिथे तुमचे ‘रिलेशन्स’ कामाला येतात. म्हणूनच तुमचे रिलेशन्स जपा. तुमच्यात देखील नितीन शाह दडलाय. त्याला ओळखा. स्वत:चं औद्योगिक साम्राज्य उभारा.
- प्रमोद सावंत

24 July 2017

यशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म!

यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभूत असतात?

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात...

  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कुठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कृती करण्यास त्यांना कुठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?
    वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपूर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहिजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभूत गुणधर्म असतात. ह्या सात मुलभूत गुणधर्मांना कळतनकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभूत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

    यशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म:
    १) प्रचंड ध्यास: 

    यशस्वी माणसांना त्यांच्या ध्येयाने झापाटून सोडले असते. कोणत्या तरी विशिष्ट क्षेत्राचा किंवा कार्याचा त्यांना प्रचंड ध्यास असतो. या ध्यासापोटी ते सतत कृतीवर भर देतात. अडचणी जरी आल्या तरी प्रचंड ध्यासामुळे ते त्या अडचणींवर तुटून पडतात. परंतु बर्‍याच माणसांना कोणत्याच बाबतीत ध्यासच वाटत नाही व ते मरगळल्याप्रमाणे सर्वसाधारण जीवन जगतात. यशस्वी माणसांना त्यांचा 'ध्यास' सापडतो. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो व ते अर्थपूर्ण जीवन जगतात.

    २) सकारात्मक समजुती: 
    आपण जे काही साध्य करतो त्या मागे आपल्या अंतरमनात रुजलेल्या समजुती कारणीभूत असतात. यशस्वी माणसांच्या काही विशिष्ट सकारात्मक समजुतीमुळे त्यांची स्वप्नं साकार होतात. परंतु सामान्य माणसे, त्यांच्यामध्ये क्षमता असुन सुध्दा आपल्या स्वप्नांपासुन वंचित राहतात. काही विशिष्ट व मुलभूत अश्या सकारात्मक समजुतींमुळे यशस्वी माणसे आपली ध्येय साध्य करतात.

    ३) जीवन मुल्यांबाबत स्पष्टता: 

    जीवन मुल्य म्हणजेच आपली वैयक्तीक नैतिकता दर्शवणारी यंत्रणा. बर्‍याच माणसांना आपली जीवन मुल्ये ठाऊक नसतात. ते नेहमी गोंधळलेले असतात. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्यास ते असमर्थ असतात. यशस्वी माणसे मात्र आपल्या ध्येयांच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय आपल्या मूल्यांबाबत विचार करुन स्पष्टपणे घेतात.


    ४) माणसे जोडण्याची कला: 
    यशस्वी होण्यासाठी आपण एकटेच सर्वकाही करणे अशक्य आहे. यशस्वी माणसे यशस्वी होतात कारण त्यांना माणसे जोडता येतात. त्यांच्याबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करता येतात. इतरांची साथ लागल्याने यशस्वी माणसांना प्रगती करणे सोपे जाते. सर्वसाधारण माणसे मात्र याबाबतीत कमी पडतात.



    ५) अचूक आराखडा: 
    कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करण्याची विशिष्ट पध्दत असते. उदा. गाडी चालवणे, एखादा खाद्यपदार्थ बनवणे, एखादा खेळ खेळणे, कंप्युटरचा वापर करणे इ. त्याचप्रमाणे यश मिळवण्यासाठी विशिष्ट आराखड्याची गरज असते. दुर्दैवाने बरीच माणसे यशस्वी होण्यासाठी चुकीचा आराखडा वापरतात व त्यांना हवे ते परिणाम साध्य होत नाहीत. यशस्वी माणसे अचुक आराखड्याचा अवलंब करतात आणि आपल्याला हवे ते सहजपणे साध्य करतात.

    ६) सकारात्मक संभाषण: 
    यशस्वी माणसांना आपले विचार इतरांबरोबर प्रभावीपणे मांडता येतात. त्यांच्या सकारात्मक संभाषण कौशल्यामुळे त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येतो. परंतु बर्‍याच माणसांना आपल्या विचारांना इतरांसमोर स्पष्टपणे मांडता येत नाही. त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येत नाही व ते एक सर्व साधारण जीवन जगतात.




    ७) सळसळता उत्साह: 
    यशस्वी माणसे प्रत्येक दिवस, सळसळत्या उत्साहाने कार्यरत असतात. त्यांच्याकडे न थकता अविरतपणे काम करण्याची असाधारण क्षमता असते. सर्वसाधारण माणसे मात्र लवकर थकतात, तणावग्रस्त असतात, त्यांच्या आयुष्यात उत्साहाची कमतरता असते. आपण जे करु ते सळसळत्या उत्साहाने जर केले तरच आपले ध्येय साध्य करणे सोपे होईल.

    हे सात मुलभूत गुणधर्म आपणही स्वतःमध्ये अंगिकारुन जोपासु शकतो आणि त्यांचा विकास करु शकतो. 'सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!' - Get Ready to Get Success या लक्ष्यवेधच्या जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण ह्याच सात गुणधर्मांबद्दल सविस्तर जाणून घ्याल व यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हाल!

    दिनांकः १ ऑगस्ट २०१७
    वेळः दुपारी ३ वाजता
    स्थळः मैसुर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
    संपर्कः ७६६६४२६६५४

    ह्या कार्यक्रमाबद्दलचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:




    नाव नोंदवण्यासाठी खालील Form भरा

    18 July 2017

    हमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक

    तो गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तू पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम - बंगलोर मधून एम.बी.ए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा. 
    केरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय? मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.
    मॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसर्‍या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसर्‍या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.
    सुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.
    सर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एम.बी.ए करण्यासाठी आयआयएम - बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.
    शमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.
    पहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.
    आज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.
    सहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणार्‍या आणि यंत्रणेला दोष देणार्‍या तरुणांसाठी मुस्तफा खर्‍या अर्थाने आदर्श ठरावा.
    - प्रमोद सावंत
    www.yuktimedia.com

    11 July 2017

    हे आहेत भारतातील वॉरन बफे...

    घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली.
    संघटित रिटेल क्षेत्रातील अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमानी. 'आर के दमानी' नावाने प्रसिद्ध असणार्‍या दमानींनी 2000 साली डी-मार्टची स्थापना केली.
    स्वतःभोवती अजिबात प्रसिद्धीचं वलय न बाळगणार्‍या दमानी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांविषयी कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणार्‍या दमानींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. आणि डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.


    डी-मार्टचे अनेक स्टोअर्स दुकाने रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना(व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचार्‍यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांना कामाचे पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते.
    साधारणपणे 1999 मध्ये दमानी यांनी रिलायन्स रिटेलच मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. दामोदर माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमानी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.


    डी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमानी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.
    शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमानी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमानी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे!
    - गौतमी औंढेकर, सकाळ


    Source : http://www.esakal.com/arthavishwa/gautami-aundhekar-writes-about-rk-damani-36543
    #शेअर #गुंतवणूकदार #Dmart #RKDamani #डीमार्ट #दमानी

    03 July 2017

    आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

    तुमचे मन शांत ठेवण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत. नेहमी तुमच्या वर्तमानाविषयी जागरुक रहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुमच्या अंतर्मनातील शांततेचा अनुभव हे क्षण देत असतात त्याचबरोबर वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही.
    स्वस्थचित्तासाठी दीर्घश्वसन : श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थचित्त बनते. शरीर आणि मन ताजेतवाने होते. दिर्घ श्वसनामुळे अंतरात्म्याशी संवाद शाधता येतो.


    इतरांकडून शिका : शिकणे ही कायमस्वरुपी चालणारी प्रक्रीया आहे. तुमच्या अवती-भवती वावरणार्‍यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते आपले सर्वोत्कृष्ट शिक्षक असतात. त्यांच्याकडून चांगले गुण घ्या. त्यांच्या अनुभवातून शिकत रहा.

    निसर्गातील सौंदर्य न्याहळा : निसर्ग ही देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. पक्ष्यांचे गाणे, वाहणार्‍या पाण्याचा आवाज, निसर्गाची साद हे सगळे मनुष्याला सुखावणारे असते त्याचा आस्वाद आणि आनंद कसा घ्यायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते. लवकर उठा, फिरायला जा, सूर्योद्यापूर्वीचा निसर्ग मनात साठवा, लांबवर एकटेच चालत जा. या सगळ्यातून निसर्गातील सौंदर्याची आणि सुप्त ऊर्जेची जाणीव आपल्याला होते.

    संगीताची ताकद :  तुमच्या आवडीचे संगीत ऐका. कुणाचीही फिकीर न करता मस्त पैकी नृत्य करा. त्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. मन आणि शरीराचे सूर जुळण्यासाठी संगीताचा खूपच उपयोग होतो.


    स्वतःच्या विचारांबरोबरील लढाई थांबवा : नेहमी एकाचवेळी तुमच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी झालेली असते. हे करु का ते करु, पहिल्यांदा काय करु, त्याचे कसे होणार , घाई केली पाहिजे, हा लगेच दारात उभा आहे अशा गोष्टींनी मेंदू चक्रावून गेलेला असतो. अशा गोंधळामुळे अजिबात घाबरुन जाऊ नका. विचारांचे येणेजाणे चालूच राहिले तरी त्याकडे गरजेनुसार दुर्लक्ष करायला शिका.

    विसरा आणि माफ करा : भूतकाळात कधी तरी तुम्ही लोकांना दुखावले असेल. त्या खेदजनक आठवणी अजूनही तुमच्या मनात असतील. तुम्हांला वेदना देणार्‍यांना माफ करा आणि त्या आठवणींमधून बाहेर पडा.


    सौजन्य: संध्यानंद
    Related Posts Plugin for WordPress, Blogger...

    Share

    Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites