December 2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 December 2012

Thank You 2012... Welcome 2013...

नमस्कार!
मित्रांनो, २०१२ वर्षाचा आज शेवटचा दिवस, आज मी जेव्हा २०१२ या वर्षाकडे मागे वळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे वर्ष बॉर्न टू विनसाठी जबरदस्त अनुभव देणारे होते. बॉर्न टू विनच्या टिममधील प्रत्येक सदस्याला वर्ष २०१२ ने भरपूर काही शिकवले. वर्ष २०१२ जरी आज संपत असले तरी या वर्षाने बॉर्न टू विनच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले.


मित्रांनो वर्ष २०१२ ची सुरुवात बॉर्न टू विनने (B2W) धमाकेदार पध्दतीने केली. आमचा THE SUCCESS BLUEPRINT Workshop, दिनांक ३ जानेवारी २०१२ रोजी आयोजीत करण्यात आला आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात कार्यशाळा पार पडली. THE SUCCESS BLUEPRINT Workshop चे नवे रुप उपस्थितांच्या आयुष्यात अभूतपूर्व अनुभव देऊन २०१२ ची सुरूवात दमदार पध्दतीने झाली.


लक्ष्यवेधच्या १० व्या बॅचच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या डबेवाल्यांनी धमाल उडवून टाकली.


मे २०१२ मध्ये लक्ष्यवेध ADVANCE ची तिसरी बॅच सुरू झाली.
१० मे २०१२ रोजी प्रसिध्द अ‍ॅड गुरू गोपी कुकडे यांनी अकराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये अ‍ॅडव्हर्टायसिंग व ब्रँडींगचे फंडे सांगितले.


१३ मे २०१२ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ एकदम दणक्यात पार पडला. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथा आणि श्री. मधुकर तळवलकर यांचे खास मार्गदर्शन. It was a highly inspiring event.


२७ मे २०१२ हा दिवस बॉर्न टू विनच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. Future Paathshala JOSH २०१२ हा फ्युचर पाठशालाचा स्वप्नपुर्ती सोहळा, भारतातील सर्वात मोठे सभागृह षणमुखानंद हॉलमध्ये २,५०० लोकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. डॉ. उदय निरगुडकर व कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. त्यांच्या हस्ते अतुल राजोळीयांचे 'माझा मोटिव्हेटर मित्र' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.


४ जुलै रोजी पुन्हा एकदा THE SUCCESS BLUEPRINT Workshop जबरदस्त प्रतिसादात पार पडला. धुंवाधार पाऊस, ट्रॅफीक जाम, असे अडथळे पार करुन हाऊसफुल कार्यक्रम करण्याचा पराक्रम B2W ने केला.


२०१२ या वर्षी B2W चे ३ नवीन कार्यक्रम झाले ९ सप्टेंबर रोजी विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती, १ ऑक्टोबर रोजी MAXIMUM ACHIEVEMENT व २८ नोव्हेंबर रोजी सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा! असे प्रेरणादायी व मार्गदर्शक कार्यक्रम B2W ने लोकांसमोर आणले. उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमांबद्दल उत्तम प्रतिक्रीया दिल्या.!




९ ऑगस्ट रोजी बाराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याम्ध्ये श्री. दिपक घैसास सरांनी खचाखच भरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये भविष्याचा वेध घेण्याबाबत विचार परिवर्तित करणारे मार्गदर्शन केले.


१ नोव्हेंबर रोजी तेराव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये डॉ. सुहास अवचट व दिपा अवचट यांनी त्यांच्या यशस्वी रेस्टॉरंट व्यवसायाबाबतची रहस्य सादर केली. याच कार्यक्रमात 'माझा मोटिव्हेटर मित्र' पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

लक्ष्यवेध ADVANCE च्या दुसर्‍या बॅचचा पद्वीदान समारंभ दिनांक १४ डिसेंबर रोजी पार पडला. लक्ष्यवेध ADVANCE च्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना भारावून टाकले व श्री. नितीन पोतदार सरांच्या प्रोत्साहसात्मक व्याख्यानाने सर्वांची मने जिंकली.


बॉर्न टू विनच्या NLP च्या २०१२ वर्षाचे एकूण चार बॅच झाल्या. आता B2W ने एकूण १५० NLP Practitioners घडवले आहेत. Graphology च्या या वर्षी ३ बॅच झाल्या व Graphology Advance ची एक बॅच झाली. फ्युचर पाठशालाच्या एकूण १० प्रशिक्षणकेंद्राद्वारे यावर्षी ३२५ फ्युचर स्टार्स घडवले गेले.


एकूणच २०१२ हे वर्ष B2W साठी आगळावेगळा अनुभव देणारे व नवीन उद्दीष्ट प्राप्त करुन देणारे ठरले. या वर्षाने B2W वरील जबाबदार्‍या वाढवल्या आहेत. B2W कडे आता महाराष्ट्रीयन माणसे आशेच्या नजरेने पाहत आहेत. आमच्या कडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमचे मनोधैर्य देखिल आत उंचावले आहे.
मित्रांनो वर्ष २०१२ ने आमची एक समजुत आणखी दृढ केली आणि ती म्हणजे " If you can dream it, then you can achieve it" - "जर आपण स्वप्न पाहू शकतो तर ते साध्य देखिल करु शकतो." ही दृढ समजुत २०१२ आम्हाला देऊन आज अलविदा करत आहे... आणि नवीन स्वप्ने व नवीन महत्त्वकांक्षा घेऊन आम्ही वर्ष २०१३ चे स्वागत करत आहोत.

Thank You 2012.... Welcome 2013...!

मित्रांनो, २०१२ प्रमाणेच २०१३ ची सुरुवात आम्ही THE SUCCESS BLUEPRINT Workshop ने करत आहोत. आपण देखिल २०१३ वर्षाची सुरुवात धमाकेदारपणे करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा...

कृपया खालिल व्हिडीवो पहा..



15 December 2012

फेसबुकचा कर्ता मार्क झकरबर्ग


फेसबुकचा कर्ता मार्क झकरबर्ग
अनघा दिघे, सोमवार, २६ मार्च  २०१२
वय, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक स्थान या कशाचीही बाधा न येता आजकाल सुविख्यात तसेच अतिवापरात आहे ती फेसबुकची सोशल नेटवर्क वेबसाइट. खरं सांगायचं तर वरील घटकांना एक निराळे परिमाण देण्यापर्यंत अमोघ ताकद या वेबसाइटनं हस्तेपरहस्ते मिळवली आहे. अतुलनीय प्रोग्रामिंग आणि सर्वशक्तिमान तंत्रज्ञान पणाला लावणारा या संपर्क क्रांतीचा प्रणेता आहे मार्क झकरबर्ग! तरुण पिढीच्या गळ्यातला ताईत, प्रतिकूलता, वाद-विवाद यांच्या भोवऱ्यातील एक विवाद्य व्यक्ती, टाइम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ज्याला २०१० मध्ये गौरविले, अमेरिकेच्या एकूण आर्थिक उलाढालीमध्ये वयाच्या केवळ सतराव्या वर्षी ज्याचा तीन टक्क्य़ांचा हिस्सा होता, असा सोशल नेटवर्कचा हिरो..
खेळता-खेळता वयाच्या बाराव्या वर्षी Atari Basic कोड वापरून घरातल्या घरात वापरण्यासाठी Zucknet    नावाचा मेसेजिंग प्रोग्राम तयार करणारा मार्क झकरबर्ग हा आज २७ वर्षांचा आहे. त्याची कारकीर्द जवळून पाहणे हाच एक व्यापक अनुभव ठरतो. 
फेसबुकला प्रायव्हसी नाही. आपली माहिती कुठेही जाऊ शकते. तरीदेखील मार्क झकरबर्गची बिझनेस टेक्निक्स, व्यवसाय धोरणं खूप चांगली आहेत, अशी मतमतांतरं पाण्याच्या लाटेप्रमाणे कापत कापत फेसबुकचे शाही जहाज मार्गक्रमण करते आहे.
मार्क झकरबर्ग यांचे विचार त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊयात :


‘मला वाटतं की, बिझनेसचा एक साधा-सोपा नियम आहे. करायला सोप्या गोष्टींपासून जर तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्ही खरोखरच खूप लांबचा पल्ला गाठू शकता. आपण कोण आहोत, ते अभिव्यक्त करण्याची एक मुख्य आणि प्रबळ इच्छा लोकांना असते आणि माझ्या मते, ती खूप हलचल उडवणारी असते.
१९ वर्षांचा असताना मी ही वेबसाइट सुरू केली. तेव्हा मला बिझनेसबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं. गेली सहा वर्षे अथकपणे एकच एक लक्ष्य ठेवून केलेल्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगकडे आज केवळ एक पार्टी आणि क्रेझी ड्रामासारखे पाहण्यात मजा आहे.
इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना खंड न पडू देता अथकपणे इनोव्हेटिव्ह राहणे, तसेच आपली सिस्टीम काय वळणं घेत आहे याबाबत सतत अपडेटस् देत राहणे ही अटल कृती आहे. तसेच आजकालच्या अलिखित सामाजिक संकेतांचे ते प्रतिबिंब आहे.
एकच गोष्ट मी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो आणि सांभाळतो आणि ती म्हणजे माझे ध्येय, माझे मिशन आहे- जगाचा कप्पान्कप्पा खुला करणे- मेकिंग द वल्र्ड ओपन! एकदा मी स्टीव्ह जॉब्स यांची मुलाखत पाहात होतो. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘अशा प्रकारचं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला अगदी खरोखरच आणि मनापासून तुम्ही जे करता ते आवडणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग अशा उद्यमाला काही अर्थच उरत नाही..’ फेसबुकसारखी काहीतरी गोष्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी जे काम करावं लागतं, त्याची शिकस्त असते. ते काम इतकं अवाढव्य आणि प्रचंड आहे की, तुम्ही जर संपूर्णपणे त्याच्यात स्वत:ला झोकून दिलं नाहीत आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं जर तुम्हाला वाटलं नाही तर इतका वेळ आणि शक्ती त्यावर खर्च करणे हे असयुक्तिक ठरेल.
एक व्यासपीठ निर्माण करणं हे आमचं ध्येय नाही तर अशा सर्व व्यासपीठांच्या पार जाणं, हे आमचं ध्येय आहे. निरनिराळ्या प्रकारच्या माहितीची देवघेव करूनच केवळ लोक सुखावतात, असे नाही तर ते ही माहिती जर खुलेआम तसेच उघडपणे जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करू शकले तर ते सुखावतात आणि हा सामाजिक संकेत गेल्या काही वर्षांतच निर्माण झाला, रुजला तसेच अलीकडच्या काळात पूर्ण विकसित झाला आहे. जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही कंपनी चालवत आहोत.
आताच्या घडीला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तसेच इतर उपलब्ध असलेल्या मार्गाच्या वापराने या ५० कोटी लोकांना त्यांना काय वाटतं, ते मांडायचा मार्ग सापडला आहे. या लोकांचा आवाज नोंदला जात आहे, तसेच त्यांची दखल घेतली जात आहे.

आम्हाला लोकांबद्दल काय माहीत करून घ्यायचंय, हा सवालच नाहीये. सवाल असा आहे की, लोकांना त्यांच्या स्वत:बद्दल काय सांगावंसं वाटतं?  फेसबुकच्या तंत्राच्या आधाराने आम्ही फक्त एवढंच साधण्याचा प्रयत्न करतो आहोत की, एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करून जास्त प्रभावीरीत्या संवाद साधणे आम्ही त्यांना शक्य करून देत आहोत.
स्वत:बद्दल अथवा कुठलेही कौशल्य शिकण्यासंदर्भात बोलायचं तर जेव्हा तुम्हाला जास्त लोकांचा दृष्टिकोन कळतो, त्यांची एखाद्या बाबीकडे पाहण्याची पद्धत समजते तेव्हा तुमचा प्रगल्भतेकडे प्रवास होत असतो. काही व्यक्ती खरोखरच उत्तम व्यवस्थापक असतात. संस्थांचं व्यवस्थापन करणे आणि कामाची उभारणी, हाताळणी ते उत्तमरीत्या करतात तर काहीजण उत्तम विश्लेषक असून ते व्यापार धोरणावर लक्ष केंद्रित करतात. अनेकदा एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण सापडत नाहीत. हे दोन भिन्न प्रकारचे लोक असण्याच्याच शक्यता दाट असतात. मी माझी वर्गवारी दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या कंपूत करेन.
प्रत्येकाचाच आवाज जेव्हा ऐकला जात आहे आणि प्रत्येकाला अधिकारशक्ती लाभते तेव्हा ती खरोखरच एक चांगली व्यवस्था बनते. लोकांना ती शक्ती प्राप्त करून देणे ही आमची भूमिका आहे, असं याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे. आतापर्यंतचा इंटरनेटचा ढाचा असा होता की, तिथल्या अनेक गोष्टी या सोशल नव्हत्या, तसेच तुमच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तिथं जाहीर होत नव्हती. मात्र, सरतेशेवटी लोकांपर्यंत आम्ही पोहचत आहोत. आमचे ठेवीदार, गुंतवणूकदार तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना हाच तर वायदा आम्ही केला आहे.
एखाद्या कंपनीनं जे रचलं, जे बांधलं, त्याचा वारसा, त्याची परंपरा त्या कंपनीला लाभते. पारंपरिकतेच्या या जोखडामध्ये अनेक कंपन्या अडकतात. आम्ही जेव्हा ‘प्रायव्हसी चेंज’- गोपनीयतेबद्दलचा आमच्या धोरणात बदल केला तेव्हा ३५० दशलक्ष वापरकर्त्यांचा विचार करून तो केला. अनेक कंपन्या अशा प्रकारे पुढचं पाऊल टाकत नाहीत. परंतु नुकतीच सुरुवात केलेल्या नवागतासारखी मनोवृत्ती ठेवणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. आज आता आपण जर ही कंपनी सुरू केली असती तर आपण ‘प्रायव्हसी चेंज’बाबत काय केलं असतं, असा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारला. मग आम्ही निर्णय घेतला की, आजघडीला हा विवक्षित सामाजिक प्रघात असा असला पाहिजे आणि मग पुढे मार्गक्रमणा करणे हे फार सहजसुलभ होऊन गेले.’

03 December 2012

सकारात्मक दृष्टीकोन

महाराष्ट्र टाइम्स - ऑगस्ट २०१
संतोष कस्तुरे 

तुमच्या वैयक्तिक आणि कार्पोरेट जीवनात तुमचे अंगभूत गुण आणि कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी सोपे उदाहरण द्यायचे, तर सारखीच शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींच्या वैयक्तिक आणि कार्पोरेट आयुष्यात मात्र फार मोठी तफावत असू शकते. असे का होत असावे, या प्रश्नाचे उत्तर खरेतर फार सोपे नाही. 

त्यामुळे अनेकजण यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, नशीब याला दोष देतात आणि आहे त्यात 'समाधान' मानतात; पण वैयक्तिक कौशल्यांवर विचारपूर्वक काम केले, तर त्यांचा विकास नक्की होऊ शकतो. वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा विचार करताना मला नेहमी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूतीर् यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते. ज्या काळात इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी ही संकल्पना फारशी माहितही नव्हती, तेव्हा त्यांनी केवळ स्व-विश्वासावर इन्फोसिसची स्थापना केली. तत्त्वांशी कोणतीही प्रतारणा न करता त्यांनी या क्षेत्रात जे योगदान दिले, ते केवळ अतुलनीय आहे. त्यांचा वेगळेपणा त्यांच्या प्रामाणिकपणा, सातत्य आणि तत्त्वनिष्ठा या गुणांमध्ये आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की असे कोणते गुण आहेत जे वैयक्तिक आणि कापोर्रेट आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकामध्ये असायला हवेत? तर, असे अनेक गुण आहेत आणि त्याबद्दलच आपण या लेखात सविस्तरपणे बोलणार आहोत. 

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय? 
अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे मत याचे एक मिश्रण असते. तुम्ही तुमचा भवताल कसा बघता आणि त्यावर भविष्य कसे ठरवता यावर तुमचा दृष्टीकोन ठरत असतो. हा दृष्टीकोन म्हणजे तुम्ही ठरवत असलेला तुमच्या आयुष्याचा फोकस असतो. आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर आपणे खरे बोलतो की खोटे, कृती करतो की निष्क्रिय राहतो हे ठरत असते. 



हा दृष्टीकोनच ठरवतो की आपण यशस्वी होणार की अयशस्वी! दृष्टीकोन सकारात्मक, नकारात्मक किंवा मध्यममागीर्ही असू शकतो. मात्र, केवळ चांगले विचार असणे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन नव्हे, हेही लक्षात ठेवायला हवे. कोणत्याही परिस्थितीत होकारात्मक मन:स्थिती ठेवण्याची क्षमता म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. पण सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे केवळ आनंदी असणे किंवा बरे वाटणे नव्हे, तर आपल्या मन:स्थितीवर नियंत्रण आणून त्याची आपण ज् या वेगवेगळ्या सामाजिक, आथिर्क, पर्यावरणीय आणि राजकीय सिस्टिम्समध्ये राहतो, त्याच्याशी योग्य सांगड घालणेही आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर चुकीच्या ठिकाणी नोकरी करणे किंवा आपले भवितव्य काही चांगले नाही, असा विचार करत घरात बसून राहणे म्हणजे आहे ती परिस्थितीही आणखी वाईट करणे ठरेल. नकारात्मक विचार करत आणि जगाला दोष देत बसलात, तर काहीच घडणार नाही. तुमच्या मनाची स्थिती तुमच्या शरीरालाही सांगेल, की तुम्ही अयशस्वी होणार आहात. पण मला यशस्वी व्हायचे तर मग काय करावे लागेल? सर्व विसरा, सकारात्मक विचार करा आणि नवी सुरुवात करा. सेल्स विभागातील एखाद्या कर्मचाऱ्याचा आपल्या कंपनीबाबत किंवा ब्रँडबाबतच नकारात्मक दृष्टीकोन असेल, तर कितीही उत्तम शैक्षणिक पात्रता असेल, तरी तो कर्मचारी आपले उत्पादन विकू शकणार नाही. तीच गोष्ट पचेर्स विभागातील कर्मचाऱ्याबाबत. त्याचा दृष्टीकोन नकारात्मक असेल, तर तो सप्लायरशी किमतीबाबत चांगली तडजोड करू शकणारच नाही. तुमची पार्श्वभूमी, ज्ञान, शिक्षण, कौशल्ये यापेक्षाही तुमचा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो. आपण आपली पार्श्वभूमी, नाती, कुटुंब बदलू शकत नाही; पण आपण आपला दृष्टीकोन नक्कीच बदलू शकतो. ज्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवायची तयारी आहे, त्यांच्यासाठी सर्व काही उत्तमच होणार आहे. सकारात्मक दृष्टीकोनाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट घडलेली नाही, घडत नाही, हे लक्षात ठेवा! 



सकारात्मक होण्यासाठी टिप्स्... 
  • तुमच्याबद्दल योग्य विश्वास बाळगा आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक ठेवा.
  • सकाळी उठल्यावर म्हणा की आजचा दिवस माझ्यासाठी उत्तम असणार आहे.
  • नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
  • तुमच्या आधीच्या यशांचा विचार करा; ते तुम्हाला नव्याने यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देईल.
  • लक्षात ठेवा, तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी तुमची कंपनी, तुमचे काम, कामाची जागा आणि तुमचा बॉस यांच्याबद्दल सकारात्मक विचार करा.
  • सकारात्मक दृष्टी असलेल्या लोकांबरोबर राहा.
  • समवयस्कांचा एक छोटा ग्रुप तयार करा आणि त्यामध्ये सकारात्मक विचार रुजवा.
  • करिअरची पहिली पायरी असल्याने शिकून घ्या, दुसऱ्यांच्या पगाराचा विचार करू नका.
  • जीवनाबाबत सकारात्मक राहा आणि तुमच्या सिनीअरचा विश्वास संपादन करा मिड मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हसाठी.
  • नकारात्मक मन:स्थितीत असाल, तरीही तुमच्या कंपनीबाबत नकारात्मक बोलू नका.
  • तुमच्या टीमबरोबर कंपनीच्या सर्व सकारात्मक गोष्टी शेअर करा.
  • तुमच्या टीमला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 
  • तुम्ही कंपनीचा प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहात, तेव्हा स्वत:ला सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा 
  • सकारात्मक संवाद संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करा 
  • कंपनीमध्ये सकारात्मक दृष्टीकोनावर कार्यशाळा आयोजित करा 
  • कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन हे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते 

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9568463.cms
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites