June 2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

24 June 2015

सकारात्मक वातावरण निर्मिती - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण व आपल्या व्यवसायातील कर्मचारी आपल्या कार्यस्थळामध्ये किंवा व्यवसायातील कामांना अनुसरुन दिवसातील किती वेळ देतो? सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती आपण काम करत असलेल्या कार्यस्थळामध्ये किंवा कामासाठी दिवसातून सरासरी आठ तास ते दहा तास वेळ देतो. बर्‍याच व्यक्तींच्या बाबतीत घरापेक्षा जास्त वेळ ते आपल्या कार्यस्थळामध्ये असतात. प्रत्येक उद्योजकाची अशी अपेक्षा असते की आपल्या व्यवसायातील कर्मचार्‍यांनी रोज कामासाठी उपस्थित असले पाहिजे, त्यांनी मनापासुन काम केले पाहिजे. त्यांनी आपले काम करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. त्यासाठी स्वतःकर्मचार्‍यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्योजकांच्या कर्मचार्‍यांकडून असणार्‍या अपेक्षा स्वाभाविक आहेत. व्यवसायामध्ये आपआपलं काम करण्यासाठीचं कर्मचार्‍यांची नेमणूक झालेली असते. परंतु मला असं ठाम पणे वाटतं की फक्त कर्मचार्‍यांची नेमणुक करुन व त्यांना सुरुवातीला काम पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन प्रत्येक दिवस सळसळत्या उत्साहात ते काम करतील अशी अपेक्षा ठेवणे पुरेसे नाही. जर उद्योजकांची अशी अपेक्षा असेल की प्रत्येक दिवस कर्मचार्‍याने मोटिव्हेट होऊन जोशात काम करावे तर उद्योजकांनी व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्मिती केली पाहिजे.

प्रत्येक दिवस, प्रत्येक कर्मचार्‍याला वैयक्तिकरित्या मोटिव्हेट करणे हे उद्योजक व व्यवस्थापकांसाठी अशक्य आहे, परंतु उद्योजक आपल्या व्यवसायाअंतर्गत किंवा आपल्या कार्यस्थळामध्ये  जाणीवपुर्वकरित्या असे वातावरण निर्माण करु शकतात ज्यामुळे आपोआपच दररोज कर्मचार्‍यांमध्ये प्रेरणा संचारेल व ते उत्साहाने काम करतील. व्यवसायाअंतर्गत कार्यस्थळामध्ये जर सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण असेल तर प्रत्येक कर्मचार्‍याला रोज काम करण्याची आपसुकच इच्छा निर्माण होते, ते मनापासुन काम करु लागतात व त्यांना काम करत असताना आनंद मिळतो.
मित्रांनो, जगातील बलाढ्य व यशस्वी कंपन्या आज या विषयाला फार महत्त्व देत आहेत. जगातील उत्कृष्ट कार्यक्षमता असलेले, प्रतिभावंत कर्मचारी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्या आपल्या व्यवसायाअंतर्गत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कर्मचार्‍यांनी त्यांच्या कंपनीला नोकरी करण्यासाठी अधिक पसंती द्यावी व त्यांच्याकडे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी जास्तीत जास्त काळासाठी टिकुन रहावेत यासाठी या मोठ्या कंपन्या विशेष कॄती करत आहेत. कर्मचार्‍यांसाठी काम करण्यासाठी जगातील सर्वोत्कॄष्ट कंपन्यांच्या Fortune मॅगझिनच्या यादीत सातत्याने अग्रगण्य क्रमांकावर असलेली कंपनी म्हणजे 'गुगल'! 'गुगल' आपल्या कर्मचार्‍यांना खुष ठेवण्यासाठी एका पेक्षा एक आगळ्यावेगळ्या संकल्पना राबवते. गुगलचे जगातील कोणतेही ऑफीस, हे ऑफीस कमी आणि अॅम्युजमेंट पार्क जास्त वाटते. असं वाटतच नाही की आपण कोणत्या ऑफीसमध्ये आलोय. इतकच नव्हे तर गुगल आपल्या कार्यस्थळाअंतर्गत सकारात्कम वातावरण निर्मिती करुन कर्मचार्‍यांना उत्पादनक्षम ठेवण्यासाठी विशेष कॄती योजना आखते. गुगलचे 'एच.आर.' डिपार्टमेंट त्यासाठी जबाबदार असते. कर्मचार्‍यांसाठी मोफत नाश्ता, मोफत दुपारचे-रात्रीचे जेवण, मोफत आरोग्य सेवा, मोफत हेअर्-कट, मोफत इस्त्री व ड्रायक्लीनींग, जिम व स्विमिंगपूल (कार्यस्थळाअंतर्गत!), व्हीडीयोगेम व इतर मनोरंजनाची साधने, कार्यस्थळात गरज लागल्यास डॉक्टर सेवा. इ. सुविधा गुगल पुरवते. 'गुगल'ला हे सर्व करण्यासाठी नक्कीच भरपुर खर्च येतो. परंतु त्यांचे कर्मचारी टिकण्याचे प्रमाण देखिल तितकेच जास्त आहे व नवीन कर्मचारी नेमणुकीसाठी लागणारा वेळ, पैसा व परिश्रम बर्‍याच प्रमाणात कमी होतात. सकारात्मक वातावरण निर्मितीचा 'गुगल' ला प्रचंड फायदा होतो. 'गुगल' चे  ४५,००० आनंदी, उत्साही व सामाधानी कर्मचारी गुगलच्या यशासाठी कारणीभुत आहेत.
मी आपल्याला एक आवाहन करतो, जर आपण लघुउद्योजक आहात आणि आपल्या व्यवसायाची, कर्मचार्‍यांची उत्पादन क्षमता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या कार्यस्थळामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करा. त्यासाठी मी आपल्याला काही टिप्स् देतो त्यांचा वापर करा.
१) आपल्या कार्यस्थळामध्ये असे वातावरण निर्माण करा जेणे करुन कर्मचार्‍यांच्या कार्याला अर्थ प्राप्त होईल व प्रत्येकाला काम करण्याचे कारण मिळेल. कर्मचार्‍यांना या गोष्टीची सदैव जाणीव असली पाहिजे की आपल्या कार्यामुळे आपल्या ग्राहकाच्या आयुष्यात व समाजामध्ये काहीतरी योगदान होत आहे!
२) कर्मचार्‍यांच्या मुलभुत गरजा व सुरक्षितता यांचा प्रामुख्याने विचार करा. जर त्या पुर्ण होत असतील तरच त्यांचे कामामध्ये लक्ष लागेल.
३) कर्मचार्‍यांनी केलेल्या कार्याबद्दल सतत दाद दिली गेली पाहिजे व त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. छोट्या चांगल्या कामगिरीची देखिल दखल घेणं गरजेचं आहे.
४) कार्यस्थळ सकारात्मक, सुंदर व प्रोफेशनल बनविण्यासाठी वेळ व पैसा Invest करा. कोणत्याही व्यक्तीला, त्याला न आवडणार्‍या ठिकाणी काम करायला मजा येणार नाही.
५) कर्मचार्‍यांचे प्रामाणिक प्रश्नं व अभिप्राय यांचा आदर व सन्मान करा. आपल्या विचारांना व मतांना जिथे किंमत असते, तिथेच आपण आपल्या भावना व्यक्त करतो. स्पष्टवक्तेपणाचा सराव करण्यास कर्मचार्‍यांना नेहमी उद्युक्त करा.
६) कर्मचार्‍यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या. प्रत्येक व्यक्ति आपल्या आवडत्या माणसांबरोबर राहणे पसंत करतो. जर आपल्या संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांमध्ये घनिष्ठ मैत्री असेल तर कार्यस्थळी नियमितपणे येण्यास व काम करण्यास आपसुकच प्रेरणा मिळते.
७) आपल्या कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक कलागुणांना वाव द्या. त्यांच्या आवडीनिवडींना व छंदांना जोपसण्यास प्रोत्साहन द्या.
८) प्रत्येक कर्मचार्‍याबरोबर दृढ विश्वास प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या बरोबर अधुनमधुन वैयक्तिक संभाषण करा. त्यांच्या कुटूंबाबद्दल, वैयक्तिक ध्येयांबद्दल, अडचणींबद्दल मनमोकळे पणाने संवाद साधा.
९) संस्थेच्या कर्मचार्र्‍यांची संस्थेच्या प्रति व आपल्या कामाच्या प्रति, प्रचंड निष्ठा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काही विशेष गोष्टी करा.
१०) कर्मचार्‍याला त्याच्या क्षमता विस्तारीत करण्याची संधी द्या. आव्हानात्मक कामे केल्याने कर्मचार्‍याच्या क्षमता विकसित होतात व त्याबद्दल त्याला समाधान वाटते व काम करण्याची जबरदस्त प्रेरणा मिळते. त्यासाठी कर्मचार्‍यांला प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी करा. नवीन कैशल्य व ज्ञान आकलन केल्याने कर्मचार्‍याची बौधिक गरज पुर्ण होते व ते उत्साहाने काम करतात.
११) प्रत्येक कर्मचारी चांगल्या मनःस्थितीत रहावा यासाठी काही यंत्रणा अथवा योजना तयार करा. आपण दिवसभरात जे काम करतो, त्याचा दर्जा आपल्या ज्ञान, कैशल्य व अनुभवापेक्षा त्या दिवसाच्या आपल्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतो.
वरिल प्रत्येक टिपचा वापर करा आणि आपल्या कार्यस्थळाच्या वातावरणामध्ये सकारात्मक परिवर्तन आणा!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


17 June 2015

इंडक्शन प्रोग्राम - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! काही वर्षांपुर्वी जेव्हा मी गाडी घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला गाडी चालवताच येत नव्हती. आता गाडी घेणार हे ठरल्यामुळे मला गाडी शिकणं भाग होतं. त्यासाठी मी एका मोटर ट्रेनिंग स्कुलमध्ये गाडी शिकण्यासाठी दाखल झालो. मला सुरुवातीला गाडी चालवणे म्हणजे प्रचंड अवघड वाटायचे. कारण ड्रायवरच्या सीट वर बसल्यावर बोनेटच दिसत नाही! अ‍ॅक्सलरेटर, ब्रेक आणि क्लचं यांमध्ये नेहमी माझा गोधंळ उडायचा. स्टेअरींग नेमक्या कोणत्या पोजिशन मध्ये असताना चाकं सरळ असतात हे कळायचच नाही. कोणता गेअर कधी टाकायचा? सिग्नलची बटने, आणि त्यात तीन-तीन आरसे! मला गाडी चालवणे म्हणजे फार मोठं दिव्य काम वाटायचं. मोटर ट्रेनिंग स्कुलवाल्यांनी २१ दिवसांचा एक कार्यक्रम तयार केला होता. रोज सकाळी अर्धा तास मी गाडी चालवायला शिकण्यासाठी जायचो. माझ्या शिक्षकाने मला अगदी पहिल्या दिवसापासुन व्यवस्थित मार्गदर्शन केलं. पहिल्या दिवशी गाडी बद्दल मुलभूत गोष्टी सांगितल्या. मग मला गाडी सुरु व बंद करायला शिकवलं. मग गाडी पहिल्या गेअर वर चालवायला सांगितलं. पहिल्या- आठवड्यात थोडी भीती कमी झाली. दुसर्‍या आठवड्यात अजुन चांगला हात बसला. तिसर्‍या आठवड्यात गाडी थेट हायवे वर चालवली. फक्त २१ दिवसात मी बिनधास्तपणे गाडी चालवू लागलो, ते सुध्दा कोणाच्याही मदती शिवाय! गाडी चालवणं मला अशक्य वाटायचं परंतु एका पध्दतशीर पणे तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मी गाडी चालवू लागलो. मित्रांनो, हे उदाहरण मी आपल्याला का सांगितलं? याचा आपल्या व्यवसायाशी काय संबंध? मला असं वाटतं की एक उद्योजक म्हणुन आपण आपल्या व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मीतीवर लक्ष केद्रीत केलं पाहिजे. आपण आपल्या व्यवसायाचे लिडर आहात व लिडरने आपली एक जबरदस्त टीम तयार  केली पाहिजे. अशी टिम जी आपल्या व्यवसाया अंतर्गत विविध कामे चोखपणे आणि मनापासुन करेल. जर आपल्या टीमने त्यांची कामे चोखपणे करावी अशी आपली अपेक्षा असेल तर त्यांना तसं करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे त्या मोटर ट्रेनिंग स्कुलच्या २१ दिवसांच्या  प्रशिक्षण कार्यक्रमाव्दारे मी व्यवस्थितपणे गाडी चालवायला शिकलो. त्याच प्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये विविध डिपार्टमेंटची कामे उत्कृष्टपणे करण्यासाठी कर्मचार्‍याची नेमणूक झाल्यावर, तो कामावर रुजु झाल्यावरचा सुरुवातीचा कालावधी तो एका विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तयार झाला पाहिजे. व्यवसायामध्ये तयार केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला 'इंडक्शन प्रोग्राम' असं म्हणतात.   
नवीन कर्मचार्‍याला आपल्या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे कार्यरत करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम'ची अत्यंत गरज असते. आपल्या व्यवसायामध्ये कामे ज्या विशिष्ट पध्दतीने चालतात त्याबाबत ओळख, मार्गदर्शन व अनुभव होण्यास कर्मचार्‍याला मदत व प्रशिक्षणाची गरज असते. इंडक्शन प्रोग्रामव्दारे ही गरज पूर्ण होते. 'इंडक्शन प्रोग्राम' म्हणजेच व्यवसायातील कर्मचार्‍याचे ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व सवयी विकसीत करणे. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता अपेक्षेप्रमाणे होण्यासाठी त्याला आवश्यक गोष्टींचा समावेश 'इंडक्शन प्रोग्राम' मध्ये झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थेमध्ये जे काम त्याच्यावर सोपवले जाणार आहे, ते काम कश्या प्रकारे केले जाते यासाठी त्याला मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी 'ऑपरेशन मॅन्युअल' ची प्रचंड मदत होते व कर्मचार्‍याला सर्व गोष्टी आकलन करण्यास सोपे जाते. सुरुवाती पासुनच 'ऑपरेशन मॅन्युअल'चा वापर करायची कर्मचार्‍याला सवय लागते. कर्मचार्‍याचा 'इंडक्शन प्रोग्राम' पुर्ण झाल्यावर त्याला स्वतंत्रपणे कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, व पाठपुरावा करावा. प्रत्येक डिपार्टमेंट व पदासाठी वेगवेगळा इंडक्शन प्रोग्राम तयार करावा.     

परिणामकारक 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करणे : इंडक्शन प्रोग्राम तयार करण्यासाठी कर्मचार्‍याच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने पुढाकार घेतला पाहिजे. व्यवस्थापकाने 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करताना स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की, 'कर्मचार्‍याला परिणामकारकपणे कार्यरत करण्यासाठी त्याला कोणते ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व अनुभवाची गरज आहे?' आणि गरजेप्रमाणे या गोष्टींचा एक प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापकाने तयार केला पाहिजे. हाच प्रशिक्षण कार्यक्रम त्या कर्मचार्‍याचा 'इंडक्शन प्रोग्राम' असतो. इंडक्शन प्रोग्राम चा कालावधी पदानुसार बदलु शकतो. काही दिवस, आठवडे किंवा महिने इंडक्शन प्रोग्राम असु शकतो. कर्मचार्‍याचे ज्ञान कौशल्य, प्रवृत्ती व अनुभव यांचा विकास करण्यासाठी पुढील विकास मार्गांचा उपयोग 'इंडक्शन प्रोग्राम' तयार करण्यासाठी व्यवस्थापकांना होऊ शकतो.

१) अभ्यास : 'इंडक्शन प्रोग्राम' दरम्यान कर्मचार्‍यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्याला विशिष्ट बाबींचा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो. त्यामध्ये पुस्तके, ऑपरेशन मॅन्युअल, आर्टिकल, रिपोर्ट, वेबसाईट, रिसर्च पेपर इ. चा अभ्यास करायला दिला जाऊ शकतो.

२) प्रशिक्षण : कर्मचार्‍याला काही विशिष्ट विषयांचे प्रशिक्षण देणे जेणेकरुन त्याच्या क्षमता विकसित होतील. वैयक्तिक भेटी द्वारे प्रशिक्षण देणे, एखाद्या सेमिनार किंवा कार्यशाळेमध्ये त्याला सामिल करणे, विडीयो प्रोग्राम दाखवणे, प्रशिक्षणक्रम इ. व्दारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. 

३) अनुभव : काही महत्त्वपुर्ण अनुभवांव्दारे कर्मचारी बर्‍याच गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करु शकतो. उदाहरणार्थ : वरिष्ठ कर्मचार्‍याचे काम करताना निरिक्षण करणे, वरिष्ठ कर्मचार्‍याला सहकार्य करणे, एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये छोटी जबाबदारी पार पाडणे इ.

४) विशिष्ट कार्य : विशिष्ट कार्यामुळे सुध्दा कर्मचार्‍याची बौधिक व मानसिक क्षमता विकसित होते. उदाहरणार्थ : आव्हानात्मक कार्य पुर्ण करण्याची संपुर्ण जबाबदारी देणे; त्यामुळे कर्मचार्‍याचा आत्मविश्वास वाढतो.मित्रांनो, लघु व्यवसायांमध्ये या विषयाला फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु लघुउद्योजकांना जर आपल्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर कार्यक्षम मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे. मनुष्यबळ कार्यक्षम करण्यासाठी 'इंडक्शन प्रोग्राम' प्रचंड महत्त्वाची भुमिका बजावतो. 'इंडक्शन प्रोग्राम' बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु त्यांना आचरणात आणल्यामुळे कर्मचारी तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. खुप कमी वेळात ते कार्यक्षम बनतात व व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवतात. जर कधी एखादा कर्मचारी तडका-फडकी सोडून गेला तर 'ऑपरेशन मॅन्युअल' व 'इंडक्शन प्रोग्राम' यांच्या आधाराने खुप कमी वेळे मध्ये नवीन कर्मचारी आधीच्या कर्मचार्‍याची जागा घेऊ शकतो.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


10 June 2015

ऑपरेशन मॅन्युअल - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनीक वस्तु विकत घेतो, (उदा. टिव्ही, मोबाइल फोन, फ्रिज इ.) तेव्हा त्या वस्तु बरोबर आपल्याला एक पुस्तक दिलं जातं. कसलं पुस्तक असतं ते? काय असतं त्या पुस्तकामध्ये? खरंच आपण ते कधी वाचतो का? मित्रांनो, जर आपण कधी इलेक्ट्रॉनीक वस्तु विकत घेतली असेल तर बहुतेक मी कश्या बद्दल बोलतोय याची आपल्याला कल्पना आली असेलच. ते पुस्तक असतं त्या इलेक्ट्रॉनीक वस्तुचं 'ऑपरेशन मॅन्युअल'. या 'ऑपरेशन मॅन्युअल' मध्ये त्या इलेक्ट्रॉनीक यंत्राची संपुर्ण माहीती दिलेली असते. त्या इलेक्ट्रॉनीक यंत्राचा योग्य वापर कसा करावा याबद्दल सुचना दिलेल्या असतात. त्याच बरोबर जर कधी त्या यंत्रामध्ये कधी बिघाड झाला तर त्यासाठी काय उपाय केला पाहीजे याबद्दल मार्गदर्शन सुध्दा 'ऑपरेशन मॅन्युअल' मध्ये असते. या 'ऑपरेशन मॅन्युअल' चा आपल्याला नक्कीच फायदा होतो. खास करुन एखादं नवीन यंत्र ज्याच्या बद्दल आपल्याला जास्त माहीती नाही, त्याचा वापर करण्यासाठी आपण त्याचं मॅन्युअल एकदा तरी चाळतोच.

मित्रांनो, त्या प्रमाणे एखाद्या इलेक्ट्रॉनीक यंत्राचा वापर करण्यासाठी ऑपरेशन मॅन्युअलचा वापर करतो. त्याच प्रमाणे आपल्या व्यवसायातील, निरनिराळ्या विभागांमध्ये कार्यरत व्यक्तींनी अपेक्षे प्रमाणे कार्यरत राहण्यासाठी त्यांच्या कामाचे 'ऑपरेशन मॅन्युअल' तयार करणं गरेजेचं आहे.  मागिल लेखात आपण पाहीले की, उद्योजकाने व्यवसाय विकासावर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे व कर्मचार्‍यांनी व्यवसायाच्या दैनंदीन कामाची जबाबदारी उचलली पाहीजे.  उद्योजकाने ही दैनंदीन कामे कर्मचार्‍यांना 'डेलीगेट' केली पाहीजेत. परंतु बर्‍याच वेळा उद्योजकांना व्यवसाया अंतर्गत कामे कर्मचार्‍यांना डेलीगेट करण्याआधी त्यांना ती वैयक्तीकरित्या शिकवावी लागतात. ही कामे इतरांना शिकवण्यासाठी फार जास्त वेळ लागतो. त्यामुळे उद्योजक टाळाटाळ करतो किंवा बर्‍याच वेळा असं होतं की कर्मचार्‍याला काम शिकवण्यासाठी उद्योजक बरीच मेहनत घेतो, आपला वेळ देतो परंतु कर्मचारी नोकरी सोडून जातो. त्या कर्मचार्‍याच्या जागी नवीन व्यक्ती येते, त्या व्यक्तीला परत शुन्यापासुन सुरुवात करावी लागते. कर्मचार्‍यांना तयार करण्याच्या प्रक्रीयेमध्ये उद्योजकांचा किंवा व्यवस्थापकांचा फार वेळ जातो. बहुतांश वेळ उद्योजकांना असे वाटते की सुशिक्षित व अनुभवी व्यक्तींना आपण कामावर ठेवले पाहीजे जेणे करुन त्यांना शिकवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. परंतु अश्या व्यक्तींसाठी त्यांना जास्त पगार मोजावा लागतो, आणि जास्त पगार देऊन सुध्दा हे कर्मचारी आपले काम योग्य पध्दतीने करतीलच याची खात्री नसते. प्रत्येक व्यवसाय हा वेगळा असतो, कंपनीच्या अंतर्गत प्रक्रीया, पध्द्त, वातावरण, पायाभुत तत्वप्रणाली या सर्व गोष्टी सर्वच व्यवसायांमध्ये सारख्या असतात असं नाही. त्यामुळे कोणत्याही कर्मचार्‍याला व्यवसायामध्ये नियुक्त केल्यानंतर लवकरात-लवकर कार्यरत करण्यासाठी त्याच्या पदाचे 'ऑपरेशन मॅन्युअल' प्रचंड फायदेशिर ठरते. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनीक यंत्राचे मॅन्युअल वाचुन आपण त्या यंत्राचा वापर योग्यपणे करु शकतो त्याचप्रमाणे कर्मचार्‍यासाठी 'ऑपरेशन मॅन्युअल' त्याच्या पदाच्या जबाबदार्‍या, कामाचे स्वरुप व यंत्रणा समजुन घेण्यास मदत करते व कर्मचारी स्वावलंबीपणे आपली कामे करण्यासाठी सज्ज होतो.

'ऑपरेशन मॅन्युअल' म्हणजे काय?
'ऑपरेशन मॅन्युअल' हे कर्मचार्‍यांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन पुस्तिके प्रमाणे असते. आपल्या व्यवसायामध्ये कश्याप्रकारे कार्य केले जाते, या बाबत सखोल माहीती त्यातुन मिळते. आपल्या कर्मचार्‍यांना महत्त्वाची माहीती सांगण्यासाठी परिणामकारक माध्यम म्हणुन आपण 'ऑपरेशन मॅन्युअल' चा वापर करु शकतो त्यामुळे आपल्या कर्मचार्‍यांना सुरक्षितता मिळते व ते स्वावलंबी होतात.   
'ऑपरेशन मॅन्युअल' मध्ये खालिल गोष्टींचा समावेश असतो.
१) बाह्य आवरण: पुठ्ठ्याची फाईल ज्यामध्ये सर्व आवश्यक माहीती एकत्रीतपणे ठेवली जाऊ शकते. फाईल वर ज्या पदाचे 'ऑपरेशन मॅन्युअल' आहे त्याचं नाव सुद्धा शिर्षक म्हणुन लिहीलं जातं.

२) कंपनी बद्दलची माहीती: प्रत्येक कर्मचार्‍याला आपण ज्या कंपनीमध्ये कार्यरत आहोत त्याची माहीती असणं अत्यंत आवश्यक आहे. कंपनीच्या ज्या महत्त्वाच्या बाबींबद्द्ल कर्मचार्‍याला माहीती असली पाहीजे अश्या सर्व गोष्टी या भागात असाव्यात. उदाहरणार्थ : कंपनीची पायाभुत तत्त्वप्रणाली, कंपनीचे भव्यध्येय, संस्थापकाबद्द्ल माहीती, कंपनीची संघटनात्मक रचना, कंपनीचा इतिहास, कंपनीची आतापर्यंतची उल्लेखनीय कामगिरी इ.

३) उत्पादने व सेवा बाबतची माहीती: कंपनीच्या उत्पादन व सेवांबद्द्ल महत्त्वपुर्ण सर्व माहीती या भागात असणे गरजेचे आहे. कंपनीच्या उत्पादन व सेवांची विशेषता व फायदे. ग्राहकाला आपल्या उत्पादनांमुळे कसा फायदा होतो. जाहिरातीची कागदपत्रे, ब्रोशर, प्रॉडक्ट कॅटलॉग, ग्राहकांची यादी इ. बद्दल माहीती असणं गरजेचं आहे.

४) नियमावली: व्यवसायाअंतर्गत पाळायचे महत्त्वाचे नियम जे प्रत्येक कर्मचार्‍याने आपल्या वागणुकीव्दारे आचरणात आणले पाहीजेत. या नियमावलीमध्ये खालिल बाबींचा समावेश असतो. कामाची वेळ, अनुपस्थितीबद्द्ल, सुट्ट्यांबद्द्ल, मोबदला व इतर फायदे, सर्वसाधारण वागणुकीचे नियम, तक्रारी व अभिप्राय नोंदवण्याबद्दल, कंपनीतर्फे सुविधा, वेशभुषा, पदाला अनुसरुन महत्त्वाचे नियम, नियमां मागिल कारणे इ. 


५) पदाबाबतची माहीती: या भागामध्ये विशिष्ट पदाकडून कोणत्या अपेक्षा आहेत ते मांडले जाते. त्या विशिष्ट पदाच्या कोणत्या जबाबदार्‍या आहेत व त्यांचे वर्णन संक्षिप्त स्वरुपात दिले जाते. त्याला 'जॉब डिस्क्रीपशन' असे म्हटले जाते. त्याबरोबर त्या पदाने कोणते काम, कोणत्या प्रक्रीयेने केलं पाहीजे त्याची सविस्तर यंत्रणा सुचनांच्या स्वरुपात लिहीलेली असते. जेणे करुन कर्मचारी आपलं काम त्या सुचनांच पालन करुन योग्य पध्द्तीने करु शकेल. त्याला SOP म्हणजेच 'Standard Operating Procedure' असं म्हणतात.

मित्रांनो, व्यवसायाचं ऑपरेशन मॅन्युअल तयार केल्यामुळे खर्‍या अर्थाने आपण व्यवसायाच्या विकासाच्या कामावर लक्ष केंद्रीत करु लागतो. परंतु बरेच लघुउद्योजक 'ऑपरेशन मॅन्युअल' बनवण्यासाठी इतके उत्सुक नसतात. त्यांना तो वेळेचा अपव्यय वाटतो, किंवा त्यांना स्वतःला त्यात रस वाटत नाही. माझ्या उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रमांमध्ये मी 'ऑपरेशन मॅन्युअल' तयार करण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देतो. त्यांनीच ते तयार केले पाहीजेत असं नाही. एच. आर. प्रोफेशनल्स् ची मदत घेऊन हे काम करता येतं. 'ऑपरेशन मॅन्युअल' मुळे नवीन कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यास मदत होते. व्यवसाया अंतर्गत यंत्रणा निर्माण होण्यास मदत होते. 'ऑपरेशन मॅन्युअल' तयार करण्यासाठी गुंतवलेला वेळ नक्कीच बर्‍याच प्रमाणात परतावा करतो.
 अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


03 June 2015

व्यवसाय प्रगतीसाठी डेलिगेशन - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण उद्योजक आहात. आपल्या व्यवसायाची संपुर्ण धुरा आपल्यावरच आहे. आपल्या व्यवसायाची प्रगती करणे, व्यवसायिक ध्येयं साध्य करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे. उद्योजक तोच असतो जो व्यवसायाचा विकास करण्यासाठी जोखिम घेतो व यशस्वी व्यवसायाची निर्मिती करतो. परंतु बर्‍याच लघुउद्योजकांच्या बाबतीत चित्रं थोडं वेगळं आढळतं. लघुउद्योजक दिवसभर दैनंदिन कामकाजातच  व्यस्त असतात. व्यवसायिक प्रगतीसाठी व व्यवसायिक ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक कार्याकडे त्यांच्या कडून दुर्लक्ष होत असते. रोजच्या तांत्रिक कामांकडे किंवा अडचणींना सोडवण्यात लघुउद्योजक संपुर्णपणे भीडलेले असतात. रोज भरपुर कामे होतात. परंतु व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीला अनुसरुन प्रगती होत नाही. उद्योजक भरपुर मेहनत करतात, त्यांची अपेक्षा असते आपण भरपूर काम करतोय म्हणजे प्रगती नक्कीच होईल. परंतु तसं होत नाही. व्यवसायात इतर कर्मचार्‍यांप्रमाणेच ते सुध्दा कर्मचार्‍याचंच काम करत असतात. नेमकं काय चुकतयं ते मात्र कळत नाही.

मित्रांनो, असंख्य लघुउद्योजक एक मोठी चुक करतात, ज्या चुकीमुळे त्यांचा व्यवसाय वाढत नाही. ती चुक म्हणजे 'डेलिगेशन' न करणे! 'डेलिगेशन' म्हणजे उद्योजक आपली कामे इतर कर्मचार्‍यांवर सोपवणे व त्याला ते करण्याचे हक्क देणे. जेणेकरुन उद्योजक दैनंदिन गुंतागुंतीमधून बाहेर पडू शकतो व व्यवसाय विकासाच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो. बर्‍याच लघुउद्योजकांना व्यवसायातील कामे इतरांवर सोपवणे फार कठीण जाते. त्यांना वाटत असतं की त्यांच्यापेक्षा इतर व्यक्ती ते काम तितकं परिणामकारकपणे नाही करु शकत. डेलिगेशन करायला ते घाबरतात. माझं असं ठाम मत आहे की जर आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर डेलिगेशन शिवाय पर्याय नाही. आपण योग्य व्यक्तीं व्यवसायात योग्य पध्दतीने नियुक्त केल्यानंतर त्यांना विविध जबाबदार्‍या दिल्या पाहिजेत व कामे त्यांच्यावर सोपवली पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्यावर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहीजे. मी आपल्याला डेलिगेशनच्या ७ पायर्‍या सांगणार आहे. या सात पायर्‍यांचा वापर करुन आपण परिणामकारकपणे डेलिगेशन करु शकता व व्यवसायाच्या विकासाच्या कामाला लागु शकता.

डेलिगेशनच्या ७ पायर्‍या :
१) डेलिगेशन करायचे कार्य ठरवा : सर्व प्रथम आपण आतापर्यंत करत असलेले कोणते काम डेलीगेट केलं पाहीजे हे ठरवलं पाहीजे. सुरुवात लहान कामांपासुन  करा. ज्यामध्ये जोखिम नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे असं काम डेलीगेट करा जे व्यवसायातील दैनंदीन कामांना अनुसरुन आहे. प्रत्यक्षरित्या जे काम उत्पन्न देणारे नाही व व्यवसाय विकासाला अनुसरुन त्याचा संबंध नाही. असे काम डेलिगेशन साठी निवडा. उदाहरणार्थ: बॅक ऑफिसची कामे, एडमिन इ.

२) डेलिगेशन करण्यासाठी व्यक्ती निवडा : एकदा आपण कोणतं काम डेलिगेट करायचं आहे हे ठरवलं की मग आपण त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहीजे. व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेला (Organization Structure) अनुसार विशिष्ट डीपार्टमेंटच्या व्यक्तिला निवडा. डेलिगे करण्यार्‍या कामाचा त्याच डीपार्टमेंटशी संबंध असावा. कोणतेही काम कोणावरही सोपवू नका. तसं केल्यास व्यवसायात फार गुंतागुंती निर्माण होईल. उदाहरणार्थ: ऍडमिनशी सबंधित काम सेल्सच्या व्यक्तिवर सोपवू नका

३) कार्याचे महत्त्व सांगा व आवश्यक माहीती द्या : कर्मचार्‍याला कामाचं महत्त्व व्यवस्थित पटवून द्या. त्याला त्या कामा मागचा खरा उद्देश कळणं गरजेचं आहे. कितीही लहान काम जरी असलं तरी करणार्‍याला त्या कामाबद्दल जाणिव असली पाहिजे की आपण करत असलेल्या कामाचं  व्यवसायाला योगदान कसं आहे. त्याच बरोबर ते काम करण्यासाठी लागणारी आवश्यक माहीती सुध्दा कर्मचार्‍याला दिली पाहिजे. तरच तो ते काम व्यवस्थितपणे व स्वतंत्रपणे पार पाडू शकतो.

४) अपेक्षित परिणाम व कालमर्यादा स्पष्ट करा : काम झाल्यावर नक्की काय झालेलं अपेक्षित आहे. ते कर्मचार्‍याला ठाऊक असणं गरजेचं आहे. फक्त कामापेक्षा अपेक्षित परिणाम स्पष्टपणे माहीत असेल तरच कर्मचारी ते साध्य करण्यासाठी गरज लागली तर आणखी काही प्रयत्न करेल. त्याच प्रमाणे काम पुर्ण करण्याची कालमर्यादा सुद्धा कर्मचार्‍याला माहीती असली पाहिजे. तरच कर्मचारी त्या कामाला अनुसरुन अपेक्षित वेगात आणि वेळेतच आवश्यक कृती करेलं.

५) आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करुन द्या : जर काम करण्यासाठी काही विशिष्ट साधन सामुग्री लागणार असेल तर ती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी उद्योजकाची आहे. अन्यथा साधनसामुग्री अभावी कर्मचारी ते काम पुर्ण करु शकणार नाही.

६) आधार द्या व इतर व्यक्तींना कल्पना द्या : कर्मचार्‍याला शक्यतो आधार द्या. त्याला जर काही मदत लागली तर आपण उपलब्ध आहात याची त्याला जाणीव असु द्या. त्याच बरोबर आणखी काय करता येईल जेणे करुन त्याच्यावर सोपवलेलं काम तो आत्मविश्वासाने पार पाडेल याचा विचार करा. आधी हे काम आपण करत होतात त्यामुळे संबंधीत व्यक्तींना सुद्धा कल्पना द्या की यापुढे हे काम आपला सहकारी करणार आहे. त्यांना विश्वासात घ्या. तरच ते कर्मचार्‍याला अपेक्षित सहकार्य करतील. उदाहरणार्थ: आधी आपण आपल्या सध्याच्या ग्राहकांशी सर्विसनिमित्त सम्पर्क करायचात आणि इतर व्यक्ति ते काम करणार असेल तर ग्राहकाना त्याबद्दल कल्पना द्या.

७) परिणाम प्राप्त झाल्यावर अभिप्राय द्या : कर्मचार्‍याला त्याच्या कामाबद्दल वेळोवेळी अभिप्राय दिला पाहिजे. जर त्याने अपेक्षीत होते त्यापेक्षा जास्त चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करा. त्याने अपेक्षितपणे काम केलं तर त्याबद्दल त्याला शाब्बासकी द्या व त्याने कसे नीट काम केलं हे सुद्धा सांगा. जर अपेक्षितपणे काम नाही झालं तर कर्मचार्‍याला एकांतात त्याच्या चुकां बद्दल सांगा व त्या कश्या सुधारता येतील याबद्दल अभिप्राय द्या. सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन द्या. यापुढे चुक न होण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहीजे ते सुध्दा समजवा.

मित्रांनो, जो पर्यंत आपण डेलिगेशन करत नाही. तो पर्यंत आपण व्यवसायामध्ये प्रगती करु शकत नाही. दैनंदीन लहान-सहान कामांमध्ये जात असलेला बराच वेळं त्यामुळे वाचू शकतो. आपल्या कर्मचार्‍यांचा सुध्दा विकास होतो.
डेलीगेशनमुळे उत्तराधिकारी तयार करायला मदत होते. आपल्याला व्यवसायाच्या विकासाला अनुसरुन महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करता येते. नवीन संधींना काबीज करण्यासाठी आपण सज्ज राहतो. सर्वात महत्त्वाचं डेलीगेशनमुळे वेगात प्रगती होते.

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites