May 2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 May 2015

मनुष्यबळाचे आयोजन - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! गेल्या लेखात आपण समजुन घेतले की व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी उद्योजकाने 'संघटना निर्मिती'वर भर दिला पाहीजे. कोणतीही संघटना ही त्या संघटनेतील लोकांमुळे यशस्वी होते. जर व्यावसायिक संघटनेमध्ये योग्य लोकं, योग्य प्रकारे कार्यरत असतील तर निश्चितच व्यवसायाची प्रगती होते. परंतु व्यवसायामध्ये अयोग्य माणसे जर भरती केली तर ते व्यवसायाच्या प्रगतीला हातभार लावणं तर सोडा, उलट व्यवसायाच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करतात. कित्येक लघु उद्योगांचा योग्य लोकांच्या अभावामुळे विकास होत नाही. मला बरेच लघु उद्योजक भेटतात व या विषयाबद्दल बोलतात. त्यांचं म्हणणं असतं की, "आजकाल चांगली माणसं मिळत नाहीत. चांगली माणसं मिळाली तर ती जास्त काळ टिकत नाहीत. जी माणसं टिकतात ती चांगलं काम करत नाहीत!" कित्येक लघु उद्योजक या विषयाला अनुसरुन त्रस्त असतात. त्यांना या अडचणीवर मार्ग सापडत नसतो. त्यांची अशी अपेक्षा असते की आपल्याला झटपट तोडगा मिळाला पाहीजे व लगेच चांगली माणसे मिळाली पाहीजेत. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या विषयावर आपल्याला 'पी हळद, हो गोरी!' असा रातोरात मार्ग सापडणार नाही. उत्कृष्ट व्यावसायिक संघटना निर्मिती करण्यासाठी 'योग्य मनुष्यबळाचे योग्य पध्दतीने आयोजन' करणं अत्यंत गरजेचं आहे.

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की योग्य मनुष्यबळाचं योग्य पध्दतीने आयोजन केल्यामुळे, व्यवसायातील माणसांना अनुसरुन भेडसावणार्‍या ८०% अडचणी दुर होऊ शकतात. परंतु बरेच लघु उद्योजक मनुष्यबळ नेमणुक व आयोजनाच्या प्रक्रीयेबद्दल तितकेसे काटेकोर नसतात. जेव्हा गरज पडेल तेव्हा, माणसे शोधण्याची त्यांची धडपड सुरु होते. अश्या वेळी त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो, नेमणुकीची कोणतीच विशिष्ट प्रक्रीया लघु उद्योगामध्ये नसते. त्यामुळे माणसांची नेमणुक योग्य प्रक्रीयेद्वारे होत नाही. त्यामुळे योग्य व्यक्तीची नेमणूक होतेच असे नाही. परिणामी पुढे जाऊन ती व्यक्ती टिकत नाही किंवा टिकली तर त्या व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत. म्हणून कोणत्याही व्यक्तीला नियुक्त करताना सर्वप्रथम ती व्यक्ती पदासाठी योग्य आहे का याची खात्री करणे गरजेचं आहे व त्या व्यक्तीची नेमणुक प्रक्रीयासुध्दा काटेकोरपणे झाली पाहीजे.
या लेखामध्ये मी आपल्याला व्यवसायासाठी योग्य मनुष्यबळ योग्य प्रकारे आयोजन करण्यासाठी सात पायर्‍या सांगणार आहे. या सात पायर्‍यांचं पालन जर आपण केलत तर मी आपल्याला हमी देऊ शकतो की माणसांच्या व्यवस्थापनाला अनुसरुन भेडसावणार्‍या बहुतांश अडचणींवर आपण मात कराल.

मनुष्यबळ आयोजनाच्या सात पायर्‍या:
१. कोणत्या पदांसाठी नेमणूक करायची आहे ते ठरवा: 
सर्वप्रथम आपल्या व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेला (Organizational Structure) अनुसरुन नेमक्या पदासाठी आपल्याला व्यक्तीची गरज आहे ते ठरवा व आपल्याला कोणत्या पदावर कधी पर्यंत नेमणुक करणं आवश्यक आहे, त्याची कालमर्यादा निश्चित करा. महत्त्वाच्या पदांपासुन सुरुवात करा.


२. अपेक्षित उमेदवाराची पात्रता ठरवा: 
ज्या पदासाठी आपल्याला व्यक्तीची नेमणुक करायची आहे, त्या व्यक्तीकडुन काय अपेक्षित असणार आहे?, कोणते परिणाम त्याने साध्य केले पाहिजेत? या आधारावर त्या पदासाठी आदर्श व्यक्ती कसा असला पाहीजे ते ठरवा. उदाहरणार्थ त्या उमेदवाराचं शिक्षण, अनुभव, भाषा, कौशल्य,  मुल्य, कुटुंब, ध्येय इ. गोष्टींबद्दल आपण आधीपासुनच पात्रता ठरवू शकता. या पात्रतांमध्ये उमेदवार बसत असेल तरच त्याची आपण नेमणुक केली पाहीजे.

३.  योग्य उमेदवार आकर्षित करा: 
उमेदवाराची पात्रता ठरल्यानंतर आपण अंदाज बांधू शकतो की असा उमेदवार आपल्याला कसा उपलब्ध होऊ शकेल व आपण त्याला कश्या प्रकारे आकर्षित करु शकतो? आपण पुढिल काही माध्यमांद्वारे उमेदवार आकर्षित करु शकता. उदाहरणार्थ- वैयक्तिक ओळखी, व्यावसायिक मित्रांच्या ओळखी, प्रसार (एस. एम. एस., इंटरनेट, इ-मेल), मानव संसाधन पुरवठादार, इंटरनेट जॉब पोर्टल, जाहीरात इ. ज्या पदासाठी नेमणूक करायची आहे व उमेदवाराची पात्रता यांच्या आधारावर योग्य माध्यमाची निवड करावी.

४. योग्य उमेदवार ओळखणे: 
अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र असलेले उमेदवार ओळखणे, निवडणे व इतर उमेदवारांना नकार देणे. योग्य उमेदवार ओळखण्यासाठी काही विशेष प्रक्रीयेचा वापर केला गेला पाहीजे जेणे करुन त्या व्यक्तीच्या पात्रतेबद्दल काहीच शंका रहणार नाही.


५. योग्य उमेदवाराची नेमणूक करणे: 
निवडलेल्या योग्य उमेदवाराची नेमणूक एका विशिष्ट पध्दतीने झाली पाहीजे. व्यवसायाबद्दल, त्याच्या जबाबदारीबद्दल माहीती दिली पाहीजे व त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहीजे. वेतन, इतर उत्पन्न व सोयी सुविधांबद्दल समजवले पाहीजे. ही पायरी फार महत्त्वाची कारण व्यवसायाचे ध्येय व उमेदवाराचे वैयक्तिक ध्येय यांमध्ये संलग्नता या पायरी दरम्यान निर्माण होते.

६. उमेदवाराला परिणामकारकपणे कार्यरत होण्यासाठी प्रशिक्षण देणे: 
उमेदवार कामावर रुजु झाल्यानंतर जबाबदारी घेऊन अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी त्याच्या क्षमतांचा विकास करणं गरजेचं असतं. सुरुवातीला व्यवसायातील कामकाजाला अनुसरुन त्याचे ज्ञान, कौशल्य व प्रवृत्ती विकसित करायला मदत केली गेली पाहीजे. जेणेकरुन काही काळातच तो अपेक्षित परिणाम साध्य करु शकेल.  

७. कर्मचार्‍यांच्या कार्याचं मुल्यमापन करणे: 
कर्मचार्‍याच्या जबाबदार्‍या व अपेक्षित परिणाम काटेकोरपणे ठरवले पाहीजे, जेणे करुन विशिष्ट कालावधी दरम्यान त्याच्या कामगिरीचं मुल्यमापन करता येईल. कर्मचार्‍याच्या कामगिरीचं मुल्यमापन करण्यासाठी परिणामकारक यंत्रणा त्यासाठी राबवावी.मित्रांनो, व्यवसायाच्या विकासासाठी आपल्याला एक उत्कृष्ट व्यावसायिक संघटना निर्माण करावी लागणार आहे. मनुष्यबळ हा कोणत्याही संघटनेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे योग्य मनुष्याचे योग्यरित्या आयोजन करा. त्यासाठी मनुष्यबळ आयोजन प्रक्रीया व्यवसाया अंतर्गत तयार करा.  या प्रक्रीयेमुळे आपल्या व्यवसाया अंतर्गत एक उत्कृष्ट संघटना निर्मिती होण्यास निश्चितच प्रारंभ होईल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


20 May 2015

व्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! व्यवसाय सुरु केल्यानंतर, आपले उत्पादन व सेवा जर दर्जेदार असेल, व आपल्या ग्राहकापर्यंत त्या बद्दलची माहीती योग्य माध्यमांद्वारे पोहचवू शकलो तर नक्कीच आपल्याला ग्राहक मिळू लागतात. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढू लागते व व्यवसायाचा विकास होऊ लागतो. जस-जसा व्यवसाय वाढू लागतो तस-तसे व्यवसायाअंतर्गत कामकाज देखिल वाढू लागते. हे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. बरेच लघुउद्योजक आवश्यकता असेल त्याप्रमाणे नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक करतात. व्यवसायाअंतर्गत विविध प्रकारची कामे प्रत्येक दिवस होत असतात. व्यवसायातील कुठली ना कुठली व्यक्ती ही कामे करत असतात. कोणी उत्पादन प्रक्रीयेमध्ये सहभागी असतो, कोणी डिलीव्हरीमध्ये, कोणी ग्राहकाला बील पाठवतो, कोणी ग्राहकाकडून पेमेंट गोळा करतो, कोणी ग्राहकाकडून आलेल्या उत्पादनाबद्दलच्या चौकशीला उत्तर देतो, कोणी ग्राहकाला दरपत्रक इ-मेल करतो, कोणी बॅंकेत चेक डीपोझीट करतो, कोणी हिशोबाच्या वह्या नीट ठेवतो. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे दर दिवशी व्यवसायाअंतर्गत होत असतात. बर्‍याच लघुउद्योगांमध्ये ही कामे सुनियोजीत पध्दतीने होत नाहीत. मी हजारो लघुउद्योजकांच्या संपर्कात येतो. बहुतांश उद्योजक स्वतःच सगळ्या कामांमध्ये गुंतलेले असतात. व्यवसायात कर्मचारी काम करत असतात व ते सुध्दा कामात व्यस्त असतात. परंतु कोणतेही काम कोणीही करत असतो. 'जिथे कमी तिथे आम्ही!' अशी त्यांची काम करायची पध्द्त असते. अश्या कामकाज करण्याच्या पध्द्तीमुळे दैनंदिन कामकाज कसेबसे पार पडते. परंतु व्यवसायाच्या प्रगतीला खीळ बसते व व्यवसाय त्याच स्वरुपाचा राहतो. सुरुवातीच्या काळात वेगात झालेला व्यवसायाचा विकास आता मात्र थांबतो!
मित्रांनो! माझं असं ठाम मत आहे, कोणत्याही पहिल्या पिढीच्या उद्योजकाने व्यवसाय उभारणी करत असताना 'संघटना निर्मिती' वर भर दिला पाहिजे. जो उद्योजक व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मितीवर भर देतो तो व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीचा विचार करणारा असतो. जर आपल्या व्यवसायाला दुरगामी प्रगती करायची असेल व उत्तुंग यश मिळवायचं असेल तर ते संघटनात्मक कार्यपध्द्तीनेच शक्य आहे आणि म्हणुनच लघुउद्योजकांनी व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळापासुनच व्यवसायाचा दुरगामी विचार केला पाहीजे व संघटना निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे.

संघटना म्हणजे लोकांचा एक असा गट जो ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रपणे काम करतो. संघटना निर्मिती करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो व्यवसायाची अंतर्गत विभागणी. व्यवसायाअंतर्गत आदर्शपणे कामकाज कसे चालले पाहिजे याचे स्पष्ट चित्र उद्योजकांकडे असणे गरजेचे आहे; त्याला 'संघटनात्मक रचना' (Organizational Structure) असं आपण म्हणू शकतो. 'संघटनात्मक रचना' म्हणजे व्यवसायामधील विविध कामकाज कश्या प्रकारे विभागले आहे, त्यांचे कोणते गट आहेत व त्यांचे आपापसात समन्वय कश्या प्रकारे चालते हे दर्शवणारे चित्र होय. प्रत्येक लघूद्योजकाने त्याच्या व्यवसायाची 'संघटनात्मक रचना' दर्शवणारे चित्र तयार करणे गरजेचे असते. प्रत्येक व्यवसायाची श्रेणी नुसार अंतर्गत रचना असणे गरजेचे आहे व ती विशिष्ट पध्द्तीने झाली पाहीजे. जर ती विशिष्टपध्द्तीने झाली नसेल तर ती संघटनानसुन फक्त गर्दी असते. गर्दी करुन काही होत नाही. गर्दीमुळे फक्त गोष्टी बिघडतात. व्यवसायाच्या 'संघटनात्मक रचने' मुळे व्यवसायातील माणसं व कामं यांची योग्य प्रकारे विभागणी होते, ज्याच्या मदतीने आपल्या व्यवसायामधील विविध कामे सुनियोजित पध्द्तीने केली जातील व व्यवसायाची व्यवसायिक उद्दीष्टे साध्य होतील. संघटनात्मक रचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दही हंडी! सर्वांनी मिळून हंडी फोडायची असते. सर्वांचे ध्येय एकच असते! परंतु प्रत्येक व्यक्तीची जागा व जबाबदारी वेगवेगळी असणे. प्रत्येकाला माहीत असतं की हंडी फोडण्यासाठी त्याच्या कडून काय अपेक्षीत आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला काही ठराविक व्यक्तीं बरोबरच समन्वय साधायचा असतो, सगळ्यांशी बोलायची गरज नाही. आधी पासुनच या गोष्टी स्पष्टपणे माहीत असल्यामुळे गोविंदा पथक सुनियोजित सांघिक कामगिरी करुन दहीहंडी फोडतात.
मित्रांनो आपल्याला सुध्दा आपल्या व्यवसायाचे दुरगामी ध्येय साध्य करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेचे प्रकार खालिल प्रमाणे आहेत :-
१) निरनिराळ्या प्रकारच्या कार्यानुसार विभागणी : या संघटनात्मक रचनेमध्ये प्रामुख्याने 'सेल्स व मार्केटींग', 'प्रोडक्शन किंवा ऑपरेशन्स','अकांउट्स व फायनान्स' आणि 'एच. आर. व अॅडमीन्' असे चार वेगवेगळ्या प्रकारचे विभाग केले जातात. प्रत्येक विभागाचा एक विभाग प्रमुख असतो व त्या विभागा अंतर्गत कामकाजासाठी तोच जबाबदार असतो.  
२) निरनिराळ्या उत्पादन व सेवांनुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध उत्पादनांनुसार व्यवसाया अंतर्गत विभाग करण्यात येतात. उदा. प्रॉडक्ट A विभाग, प्रॉडक्ट B विभाग, प्रॉडक्ट C विभाग इ.
३) विविध प्रकारच्या ग्राहक वर्गानुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध ग्राहकांच्या गरजानुसार विभागणी केली जाते. उदाहरणार्थ: कॉर्पोरेट कस्टमर विभाग, रिटेल कस्टमर विभाग, इंडस्ट्रीयल कस्टमर विभाग इ.
४) भौगोलिक कार्यक्षेत्रानुसार विभागणी : व्यवसाय जर भौगोलिकरित्या बर्‍याच मोठ्या क्षेत्रात पसरला असेल तर अशी रचना केली जाते. उदाहरणार्थ: पुर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षीण विभाग ई.
५) विविध क्षेत्रातील व्यवसायांना अनुसरुन स्वतंत्र विभाग : उदाहरणार्थ : ट्रांसपोर्ट बिझनेस विभाग, कंस्ट्रक्शन बिझनेस विभाग, कंसल्टन्सी विभाग
६) मॅट्रीक्स रचना : जे व्यवसाय गुंतागुंतीचे असतात व विविध प्रोजेक्ट वर काम करत असतात त्याची रचना गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ: आय. टी. कंपन्या, कंस्ट्रक्शन कंपन्या.

बर्‍याच लघुउद्योगांमध्ये संघटनात्मक रचनेचा अभाव आढळतो आणि त्यामु़ळे संस्थेअंतर्गत जबाबदारी बद्दल गोंधळ असतो. भरपूर चुका सतत होत असतात. संभाषणामध्ये गोंधळ असतो. निर्णय प्रक्रीया पुर्णपणे उद्योजकावरच अवलंबून असते. आरोप प्रत्यारोपांचं वातावरण असतं. दैनंदीन गुंतागुंतीला तोंड देणं फार कठीण होऊन बसतं. संस्थेअंतर्गत कामे भरपूर होतात परंतु संस्थेच्या ध्येयाच्या दिशेने अजीबात वाटचाल होत नाही. उद्योजकांना कळतच नाही नेमकं काय चुकत आहे. संस्थेची संघटनात्मक रचना केल्याने वरील सर्व अडचणी दुर होण्यास मदत होते. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळेमध्ये मी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करण्यास मदत करतो. लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाबद्दल या दृष्टिकोनातुन कधी विचार केलेला नसतो. या विषयाचं आकलन केल्यानंतर त्यांना जणु साक्षात्कार होतो.
मित्रांनो, व्यावसायिक प्रगतिसाठी सुनियोजीत सांघीक कामगिरी फार महत्त्वाची आहे. त्याशिवाय व्यवसाय एकाच पातळीवर येऊन थांबतो. तसं होऊ नये म्हणून आपल्या व्यवसाया अंतर्गत संघटना निर्मितीवर भर द्या. आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करा. आपल्या व्यावसायिक ध्येयाची हंडी फोडायची असेल तर तसं करावच लागेल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

13 May 2015

बाजारपेठेतील आपल्या व्यवसायाची अव्दितीयता - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आजच्या स्पर्धात्मक युगात आपण जो व्यवसाय करत आहात त्याच व्यवसाय क्षेत्रात कित्येक इतर उद्योग कार्यरत आहेत. आपण ज्या ग्राहक वर्गाला आपले उत्पादन व सेवा विकू पाहत आहात त्याच ग्राहकवर्गाला इतरदेखील व्यवसाय त्यांची उत्पादने विकू पाहत आहे. आपली स्पर्धा फक्त आपल्याच भौगोलिक विभागातील इतर व्यवसायांबरोबर नाही आहे. आजच्या जागतिकीकरण व इ-कॉमर्सच्या युगामध्ये आपली स्पर्धा जागतीक पातळीवरील व्यवसायांशी आहे. आज आपला व्यवसाय लघु स्वरुपाचा जरी असला तरी भविष्यात आपल्याला मोठी मजल मारायची आहे. त्यासाठी आपले उत्पादन व सेवा अव्वल दर्जाचे असलेच पाहिजे, या बाबत काहीच शंका नाही परंतु काही महत्त्वाचे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. ते म्हणजे 'आपल्या ग्राहकाने आपल्या कडूनच उत्पादन किंवा सेवा का विकत घ्यावे?', 'आपल्या उत्पादन व सेवेमध्ये असे काय वेगळे आहे, जे आपल्या प्रतिस्पर्धांकडे नाही?', 'आपल्या व्यवसायाच्या कोणात्या महत्त्वाच्या बाबी मुळे आपण बाजारपेठेत अव्दितीय ठरु शकतो?', 'आपला ग्राहक आपल्या कोणत्या खासियतमुळे परत परत आपल्याकडेच येतो?', 'आपल्या व्यवसायातील कोणत्या गुणधर्मामुळे आपला ग्राहक आपल्यावर विश्वास ठेवतो?'

मित्रांनो, वरील सर्व प्रश्न आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. कोणत्याही विशिष्ट कंपनीचेच उत्पादन विकत घेण्यासाठी ग्राहकाकडे एक सक्षम कारण असावे लागते.
उदाहरणार्थ : BMW विकत घेण्यामागे ग्राहकांची महत्त्वाची ३ कारणे पुढील प्रमाणे आहेत.
१) यशाचे प्रतिक : BMW प्रिमीयम गाड्यांच्या श्रेणीमध्ये गणली जाते. एखाद्या व्यक्तीकडे BMW कार असणे , हे त्याने आपल्या जीवनात आर्थिकरित्या उल्लेखनीय कामागिरी केली आहे हे दर्शवते.
२) जबरदस्त डिझाइन व गाडीच्या प्रत्येक मॉडेलचे वेगळे वैशिष्ट : BMW च्या प्रत्येक गाडीमध्ये काहीतरी खासियत असते. उत्कृष्ट डिझाइन, सुरक्षितता, आरामदायी अंतर्गत रचना व अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ BMW च्या गाड्यांमध्ये अनुभवायला मिळतो,
३) विक्री पश्चात उत्कृष्ट सेवा :  BMW च्या ग्राहकांना नेहमीच अपेक्षेपेक्षा चांगल्या सेवेचा अनुभव येतो.
आपल्या उत्पादन व सेवेची बाजारपेठेतील प्रतिस्पर्धांच्या तुलने मध्ये काहीतरी विशेषता असणं गरजेचं असतं. उत्पादनाच्या या विशेष गुणधर्माला USP असं म्हणलं जातं.

USP म्हणजे काय?
बाजारातील प्रतिस्पर्धांच्या तुलनेत आपले उत्पादन व सेवेचे वेगळे व आणखी चांगले स्थान निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे तयार केलेला गुणधर्म म्हणजेच USP.
BMW कंपनीने त्यांचा USP हा निश्वितच आपल्या बाजारपेठेतील ग्राहकवर्गाला लक्षात घेऊन जाणिवपूर्वकपणे तयार केलेला आहे. USP हा संक्षिप्त शब्द आहे. USP या शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.
U :  Unique - अव्दितीय गुणधर्म
S :  Selling  -  विक्रिसाठी आवश्यक
P :  Proposition -  दावा
Unique : उत्पादन अथवा सेवेचा अद्वितीय गुणधर्म जो आपल्या बाजारपेठेत फक्त आपल्याच उत्पादनामध्ये आहे. या गुणधर्मामुळे ग्राहकाला काही विशिष्ट आणि महत्त्वाचे फायदे होतात, त्यासाठी तो ते उत्पादन विकत घेतो.
Selling : उत्पादनाची विक्री होण्यासाठी व ग्राहकांनी त्यासाठी किंमत मोजण्यासाठी तयारी दर्शवणे महत्त्वाचे आहे. USP मुळे ग्राहकांचा उत्पादन किंवा सेवेबाबत विश्वास निर्माण होतो व ते उत्पादन विकत घेतात.
Proposition : आपले उत्पादन किंवा सेवा अव्दितीय असण्याबाबतचा दावा किंवा विधान ज्याची उलटतपासणी आपण करु शकतो. आपल्याला याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे की आपण ग्राहकांच्या गरजा USP च्या मार्फत पुर्ण करत आहोत.

जर आपले उत्पादन व बाजारपेठेतील इतर उत्पादने यांमध्ये काहीच फरक नसेल तर आपल्या उत्पादनाची काहीच किंमत राहणार नाही. आपल्या उत्पादनामध्ये काहीतरी विशेष असलं पाहीजे. जगातील सर्व यशस्वी व्यवसायांचा जर विचार केला तर आपल्याला नक्कीच असं जाणवेल कि त्यांच्या उत्पादन किंवा सेवेचं वेगळेपण त्यांनी निर्माण केलं आहे. काही उत्पादनांचे वेगळेपण ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करणे असते तर काही उत्पादने अव्वल दर्जाची असतात. काही उत्पादने ग्राहकांना वेगात कसे उपलब्ध होतील याची काळजी घेतात तर काही उत्पादने ग्राहकांना विविधता पुरवण्यावर भर देतात. काही उत्पादने ग्राहक सेवा चांगली देण्यावर भर देतात तर काही उत्पादने ग्राहकांच्या गरजेप्रमाणे उत्पादन निर्मिती करतात. प्रत्येक उत्पादन व सेवेचा कमीत कमी एक तरी USP असायला हवा. 

USP ची उदाहरणे :
FedEx : Fedex या जगप्रसिध्द कुरीयर कंपनीचा USP त्यांनी निर्माण केला तो असा, 'When it absolutely, positively has to be there overnight'. म्हणजेच 'निश्चितपणे आणि व्यवस्थितपणे ग्राहकाचे पार्सल एका रात्रीत योग्य ठीकाणी पोहोचवणे'.

Domino's Pizza : 'डॉमिनोज पिझा' आणि 'पिझा हट' या दोन्ही कंपन्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. डॉमिनोज पिझा ने आपले वेगळेपण निर्माण करण्यासाठी USP तयार केला तो असा. 'You get fresh, hot pizza delivered to your door in 30 minutes or less — or it’s free'. म्हणजेच 'अर्ध्या तासाच्या आत ताजा व गरमागरम पिझा तुमच्या घरी पोहचवू, जर नाही पोहोचवता आला तर तो मोफत'. 

अश्या कित्येक व्यवसायांची उदाहरणे मी आपल्याला देऊ शकतो ज्या व्यवसायांच्या उत्पादनांच्या व सेवेच्या तयार केलेल्या USP मुळे त्यांनी प्रचंड मोठा ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित केला व त्यांचे बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण झाले. ते व्यवसाय यशस्वी झाले. बर्‍याच लघुउद्योजकांना बाजारपेठेत कठोर स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यांच्या उत्पादनाची अद्वितीयता निर्माण करण्यात ते कमी पडतात. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये हाच विषय मी लघुउद्योजकांना शिकवतो व त्यांच्या व्यवसायाचा USP निर्माण करण्यासाठी टुल्स देतो. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. 

परिणामकारक USP मुळे आपले ग्राहक आपल्याकडे पुन्हा पुन्हा येतात. आपल्या ग्राहकांच्या गरजा व अव्यक्त अपेक्षा पूर्ण होतात. आपल्या उत्पादनांवर त्यांचा विश्वास बसतो व त्यांच्या मनात व्यवसायाची चांगली प्रतिमा निर्माण होते. आपले ग्राहक आपल्याशी एकनिष्ठ बनतात. कितीही स्पर्धा असली तरी आपल्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

उद्योजकांनो, आपल्या व्यवसायातील उत्पादनांच्या USP तयार करा. आपले ग्राहक आपल्याकडूनच उत्पादन विकत घेण्यासाठी प्रेरीत झाले पाहिजेत. त्यांना आपले उत्पादन विकत घेण्यासाठी चांगले कारण मिळाले पाहिजे तरचं ते आपल्याकडे पुन्हा पुन्हा येतील व व्यवसायाची प्रगती होईल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईटः www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

06 May 2015

व्यवसायाची चतु:सूत्री - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! व्यवसायाचा विकास आराखडा तयार करत असताना आपण व्यवसायाच्या भविष्याचा विचार करतो. भविष्यात काय साध्य करायचे आहे, कोणते बदल घडवून आणायचे आहेत, कोणत्या नवीन कृती योजना राबवायच्या आहेत इ. परंतु भविष्यात जे काही साध्य करायचे आहे ते ठरवण्याआधी महत्त्वाची पायरी आपल्या व्यवसायाच्या वर्तमानाच्या परिस्थितीचा आढावा घेणे. व्यवसाय विकासाचा आराखडा तयार करताना व्यवसायाच्या सद्यपरिस्थितीला समजुन घेण्यास SWOT Analysis महत्त्वाची भुमिका बजावते. SWOT Analysis विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक असे विचारमंथन 'टूल' आहे. या 'टूल' चा वापर करुन आपण व्यवसायाकडे योग्य दृष्टीकोनातुन पाहू शकतो व व्यवसायाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो.
व्यवसायाच्या SWOT Analysis दरम्यान आपण व्यवसायाच्या बलस्थानांचा विचार करतो, व्यवसायातील अंतर्गत तृटी समजून घेतो, व्यवसायासमोर असलेल्या संधीचा आढावा घेतो व उदभवू शकणार्‍या धोक्यांबद्दल अंदाज बांधतो. जेणे करुन आपण व्यवसायाची ध्येय योग्य प्रकारे ठरवू शकू व ती साध्य करण्यासाठी उचित आराखडा तयार करु शकू. असे केल्याने निश्चितच आपण ठरवलेल्या बाजारपेठेत जबरदस्त प्रगती करु शकतो.
SWOT Analysis हा संक्षिप्त शब्द आहे. SWOT शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.
S - Strength - बलस्थान
W - Weakness - कमतरता
O - Opportunity - संधी
T - Threat - धोका
व्यवसायाचा SWOT Analysis करताना वरील चार गोष्टींबद्दल विशिष्ट प्रकारे विचार मंथन केले जाते.

SWOT Analysis कसा करावा?
SWOT Analysis एका विचार मंथन सत्रा अंतर्गत आपण करु शकतो. व्यवसायातील महत्त्वपूर्ण व्यक्तींचा त्यामध्ये आपण समावेश करु शकतो. या विचार मंथन सत्रामध्ये सर्वप्रथम प्रत्येकाने व्यवसायावर परिणाम करणार्‍या चार मुख्य बाबी (S. W. O. T.) या ओळखाव्यात व त्या एका कागदावर लिहाव्यात. त्यानंतर सर्वांच्या समोर त्याचे विश्लेषण करावे. सर्वांनी मांडलेल्या SWOT Analysis च्या आधारावर व्यवसायाचा SWOT Analysis तयार करावा.

SWOT Analysis मधील प्रत्येक बाबीला समजून घेऊया:

STRENGTH (व्यवसाया अंतर्गत बलस्थाने किंवा सकारात्मक गोष्टी) आपल्या व्यवसायामध्ये किंवा संस्थेमध्ये सध्या अश्या कोणत्या अंतर्गत सकारात्मक गोष्टी आहेत किंवा बलस्थाने आहेत, त्यांच्या मदतीने आपण भविष्यात जबरदस्त प्रगती आपण करु शकतो? खालील बाबींचा त्यामध्ये समावेश घेऊ शकतो.
- आपण कोणत्या गोष्टी उत्कृष्टपणे करतो?
- व्यवसायाअंतर्गत असलेली महत्त्वाची साधन सामुग्री.
- संस्थेअंतर्गत सकारात्मक गुण-ज्ञान, पार्श्वभुमी, शिक्षण, अधिकारपत्रे, नेटवर्क, ब्रँड, कौशल्य इ.
- व्यावसायिक संपत्ती - भांडवल, सद्यग्राहक, पेटंट, तंत्रज्ञान, जागा, भौगोलिक स्थान.
- प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जमेची बाजू.
- भक्कम रिसर्च आणि डेव्हलपमेंट.
- उत्पादन क्षमता.
- इतर सकारात्मक बाबी.

WEAKNESS (व्यवसाया अंतर्गत कमतरता किंवा नकारात्मक बाबी) आपल्या व्यवसायामध्ये अश्या सध्या कोणत्या अंतर्गत कमतरता किंवा नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींवर आपण सुधारणा करणे गरजेचे आहे. खालील बाबींचा विचार करा.
- प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत असणारी कमतरता.
- कोणत्या साधन सामुग्रीची, कौशल्यांची उणीवा आपल्याला भासते?
- आपण कुठे कमी पडतो?
- कुठे सुधारणेला वाव आहे?

OPPORTUNITIES (व्यवसाय बाह्य संधी किंवा सकारात्मक गोष्टी) व्यवसायाच्या समोर अश्या कोणत्या संधी आहेत ज्यांचं सोनं करुन आपण व्यवसायाचा विकास करु शकतो? खालील गोष्टींचा आपण विचार करु शकता.
- आपण कार्यरत असलेल्या बाजारपेठेत कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
- आपल्या इंडस्ट्री, उत्पादनांच्या गरजांबद्दलची जागरुकता.
- बाजारपेठेतील मागणीचे स्वरुप.
- भविष्यातील संधी.

THREATS (व्यवसाय बाह्य धोके किंवा नकारात्मक गोष्टी) व्यवसाय बाह्य धोक्यांवर आपला प्रत्यक्ष ताबा नसतो. खालील बाबींवर आपण विचार करु शकता.
- बाजारपेठेतील कठीण परिस्थिती
- कोणत्या बाह्य बाबी आपल्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम करु शकतात.
- जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, सरकारी नियमांचा व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम.
- नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उदभवणारा धोका.

मित्रांनो SWOT Analysis चा महत्त्वाचा फायदा असा की, व्यवसायाचा आराखडा तयार करत असताना आपल्याला स्पष्टपणे कळते की कोणत्या बलस्थानांच्या आधारावर आपल्याला प्रगती करायची आहे? कोणत्या कमतरतांवर मात करुन व्यवसायात सुधारणा करायच्या आहेत? बाजारपेठेतील नक्की कोणत्या संधींना काबीज करायचं आहे? व व्यवसायासमोर उदभवणारे कोणते धोके आपण टाळले पाहीजेत.
लक्षात ठेवा; STRENGTH आणि WEAKNESS हे व्यवसाया अंतर्गत असतात व ते आपल्या ताब्या क्षेत्रात असतात. OPPORTUNITY व THREATS व्यवसायाच्या बाहेर असतात.

SWOT Analysis कंपनीतील महत्त्वाच्या व्यक्तींद्वारे वर्षातून किमान एकदा आपला Strategic Plan तयार करताना जरुर केले पाहीजे. मी माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये SWOT Analysis करण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो ज्याच्या मदतीने उद्योजक आपल्या व्यवसायाचा आराखडा तयार करतात. आपण सुद्धा आपल्या व्यवसायाचा आराखडा तयार करण्यासाठी SWOT Analysis करा आणि व्यवसायाचा विकास करण्यासाठी परिणामकारक निर्णय घ्या.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईटः www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites