मनुष्यबळाचे आयोजन - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 May 2015

मनुष्यबळाचे आयोजन - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! गेल्या लेखात आपण समजुन घेतले की व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी उद्योजकाने 'संघटना निर्मिती'वर भर दिला पाहीजे. कोणतीही संघटना ही त्या संघटनेतील लोकांमुळे यशस्वी होते. जर व्यावसायिक संघटनेमध्ये योग्य लोकं, योग्य प्रकारे कार्यरत असतील तर निश्चितच व्यवसायाची प्रगती होते. परंतु व्यवसायामध्ये अयोग्य माणसे जर भरती केली तर ते व्यवसायाच्या प्रगतीला हातभार लावणं तर सोडा, उलट व्यवसायाच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करतात. कित्येक लघु उद्योगांचा योग्य लोकांच्या अभावामुळे विकास होत नाही. मला बरेच लघु उद्योजक भेटतात व या विषयाबद्दल बोलतात. त्यांचं म्हणणं असतं की, "आजकाल चांगली माणसं मिळत नाहीत. चांगली माणसं मिळाली तर ती जास्त काळ टिकत नाहीत. जी माणसं टिकतात ती चांगलं काम करत नाहीत!" कित्येक लघु उद्योजक या विषयाला अनुसरुन त्रस्त असतात. त्यांना या अडचणीवर मार्ग सापडत नसतो. त्यांची अशी अपेक्षा असते की आपल्याला झटपट तोडगा मिळाला पाहीजे व लगेच चांगली माणसे मिळाली पाहीजेत. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या विषयावर आपल्याला 'पी हळद, हो गोरी!' असा रातोरात मार्ग सापडणार नाही. उत्कृष्ट व्यावसायिक संघटना निर्मिती करण्यासाठी 'योग्य मनुष्यबळाचे योग्य पध्दतीने आयोजन' करणं अत्यंत गरजेचं आहे.

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की योग्य मनुष्यबळाचं योग्य पध्दतीने आयोजन केल्यामुळे, व्यवसायातील माणसांना अनुसरुन भेडसावणार्‍या ८०% अडचणी दुर होऊ शकतात. परंतु बरेच लघु उद्योजक मनुष्यबळ नेमणुक व आयोजनाच्या प्रक्रीयेबद्दल तितकेसे काटेकोर नसतात. जेव्हा गरज पडेल तेव्हा, माणसे शोधण्याची त्यांची धडपड सुरु होते. अश्या वेळी त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो, नेमणुकीची कोणतीच विशिष्ट प्रक्रीया लघु उद्योगामध्ये नसते. त्यामुळे माणसांची नेमणुक योग्य प्रक्रीयेद्वारे होत नाही. त्यामुळे योग्य व्यक्तीची नेमणूक होतेच असे नाही. परिणामी पुढे जाऊन ती व्यक्ती टिकत नाही किंवा टिकली तर त्या व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत. म्हणून कोणत्याही व्यक्तीला नियुक्त करताना सर्वप्रथम ती व्यक्ती पदासाठी योग्य आहे का याची खात्री करणे गरजेचं आहे व त्या व्यक्तीची नेमणुक प्रक्रीयासुध्दा काटेकोरपणे झाली पाहीजे.
या लेखामध्ये मी आपल्याला व्यवसायासाठी योग्य मनुष्यबळ योग्य प्रकारे आयोजन करण्यासाठी सात पायर्‍या सांगणार आहे. या सात पायर्‍यांचं पालन जर आपण केलत तर मी आपल्याला हमी देऊ शकतो की माणसांच्या व्यवस्थापनाला अनुसरुन भेडसावणार्‍या बहुतांश अडचणींवर आपण मात कराल.

मनुष्यबळ आयोजनाच्या सात पायर्‍या:
१. कोणत्या पदांसाठी नेमणूक करायची आहे ते ठरवा: 
सर्वप्रथम आपल्या व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेला (Organizational Structure) अनुसरुन नेमक्या पदासाठी आपल्याला व्यक्तीची गरज आहे ते ठरवा व आपल्याला कोणत्या पदावर कधी पर्यंत नेमणुक करणं आवश्यक आहे, त्याची कालमर्यादा निश्चित करा. महत्त्वाच्या पदांपासुन सुरुवात करा.


२. अपेक्षित उमेदवाराची पात्रता ठरवा: 
ज्या पदासाठी आपल्याला व्यक्तीची नेमणुक करायची आहे, त्या व्यक्तीकडुन काय अपेक्षित असणार आहे?, कोणते परिणाम त्याने साध्य केले पाहिजेत? या आधारावर त्या पदासाठी आदर्श व्यक्ती कसा असला पाहीजे ते ठरवा. उदाहरणार्थ त्या उमेदवाराचं शिक्षण, अनुभव, भाषा, कौशल्य,  मुल्य, कुटुंब, ध्येय इ. गोष्टींबद्दल आपण आधीपासुनच पात्रता ठरवू शकता. या पात्रतांमध्ये उमेदवार बसत असेल तरच त्याची आपण नेमणुक केली पाहीजे.

३.  योग्य उमेदवार आकर्षित करा: 
उमेदवाराची पात्रता ठरल्यानंतर आपण अंदाज बांधू शकतो की असा उमेदवार आपल्याला कसा उपलब्ध होऊ शकेल व आपण त्याला कश्या प्रकारे आकर्षित करु शकतो? आपण पुढिल काही माध्यमांद्वारे उमेदवार आकर्षित करु शकता. उदाहरणार्थ- वैयक्तिक ओळखी, व्यावसायिक मित्रांच्या ओळखी, प्रसार (एस. एम. एस., इंटरनेट, इ-मेल), मानव संसाधन पुरवठादार, इंटरनेट जॉब पोर्टल, जाहीरात इ. ज्या पदासाठी नेमणूक करायची आहे व उमेदवाराची पात्रता यांच्या आधारावर योग्य माध्यमाची निवड करावी.

४. योग्य उमेदवार ओळखणे: 
अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र असलेले उमेदवार ओळखणे, निवडणे व इतर उमेदवारांना नकार देणे. योग्य उमेदवार ओळखण्यासाठी काही विशेष प्रक्रीयेचा वापर केला गेला पाहीजे जेणे करुन त्या व्यक्तीच्या पात्रतेबद्दल काहीच शंका रहणार नाही.


५. योग्य उमेदवाराची नेमणूक करणे: 
निवडलेल्या योग्य उमेदवाराची नेमणूक एका विशिष्ट पध्दतीने झाली पाहीजे. व्यवसायाबद्दल, त्याच्या जबाबदारीबद्दल माहीती दिली पाहीजे व त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहीजे. वेतन, इतर उत्पन्न व सोयी सुविधांबद्दल समजवले पाहीजे. ही पायरी फार महत्त्वाची कारण व्यवसायाचे ध्येय व उमेदवाराचे वैयक्तिक ध्येय यांमध्ये संलग्नता या पायरी दरम्यान निर्माण होते.

६. उमेदवाराला परिणामकारकपणे कार्यरत होण्यासाठी प्रशिक्षण देणे: 
उमेदवार कामावर रुजु झाल्यानंतर जबाबदारी घेऊन अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी त्याच्या क्षमतांचा विकास करणं गरजेचं असतं. सुरुवातीला व्यवसायातील कामकाजाला अनुसरुन त्याचे ज्ञान, कौशल्य व प्रवृत्ती विकसित करायला मदत केली गेली पाहीजे. जेणेकरुन काही काळातच तो अपेक्षित परिणाम साध्य करु शकेल.  

७. कर्मचार्‍यांच्या कार्याचं मुल्यमापन करणे: 
कर्मचार्‍याच्या जबाबदार्‍या व अपेक्षित परिणाम काटेकोरपणे ठरवले पाहीजे, जेणे करुन विशिष्ट कालावधी दरम्यान त्याच्या कामगिरीचं मुल्यमापन करता येईल. कर्मचार्‍याच्या कामगिरीचं मुल्यमापन करण्यासाठी परिणामकारक यंत्रणा त्यासाठी राबवावी.



मित्रांनो, व्यवसायाच्या विकासासाठी आपल्याला एक उत्कृष्ट व्यावसायिक संघटना निर्माण करावी लागणार आहे. मनुष्यबळ हा कोणत्याही संघटनेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे योग्य मनुष्याचे योग्यरित्या आयोजन करा. त्यासाठी मनुष्यबळ आयोजन प्रक्रीया व्यवसाया अंतर्गत तयार करा.  या प्रक्रीयेमुळे आपल्या व्यवसाया अंतर्गत एक उत्कृष्ट संघटना निर्मिती होण्यास निश्चितच प्रारंभ होईल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites