August 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 August 2014

मैत्री बॅलन्सशीट संगे

डॉ. अनिल लांबा हे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबर देशातील लोकांना अर्थसाक्षर बनवणे यासाठीही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. लोकांना अर्थसाक्षर बनवणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक गुंतवणूकीबाबत (पर्सनल फायनान्स) मार्गदर्शन करणे हा मात्र त्याचा अजिबात अर्थ नाही. ते गुंतवणूक सल्लागार नाहीत! त्यांचा विषय किंवा कार्यक्षेत्र आहे बॅलन्स शीट - ताळेबंद पत्रक. काही विषयांचे नाव काढले तरी सर्वसाधारणपणे माणसे लगेच ते विषय किचकट आहेत, गुंतागुंतीचे आहेत, आपल्याला समजणार नाहीत असे गृहीत धरतात व त्यापासून दूर पळतात. आयकर, बॅलन्स शीट हे असे लोकांना दूर पळवून लावणारे विषय. पण बॉर्न टू विन संस्थेच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात डॉ. अनिल लांबांचे बॅलन्स शीट फायनान्स यावर भाषण झाले त्याला उपस्थित सर्व श्रोत्यांनी मन:पूर्वक दाद दिली. उपस्थित श्रोत्यांमध्ये बॉर्न टू विन संस्थेचा लक्ष्यवेध प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी होते, शिवाय इतरही मान्यवर होते. त्यातील बहुतेक सारे उद्योजक किंवा व्यावसायिक. त्यांच्यासाठी बॅलन्स शीट फायनान्स हे महत्वाचे विषय. भाषणानंतर या विषयांबाबतचे त्यांचे गैरसमज दूर झाले आणि या विषयांबाबत नवे विचार ते बरोबर घेऊन गेले. कार्यक्रम इतका यशस्वी झाला त्यासाठी प्रथम दाद द्यावी लागेल ती उद्योजकांची गरज लक्षात घेऊन कार्यक्रमासाठी डॉ. अनिल लांबा यांना पाचारण करणारे बॉर्न टू विनचे सीईओ अतुल राजोळी यांना!
कार्यक्रमात सुरवातीला लक्ष्यवेध हा बॉर्न टू विन संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना डॉ. अनिल लांबा यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. रोमान्सिंग बॅलन्स शीट हे डॉ. अनिल लांबा यांचे गाजलेले इंग्लिश पुस्तक. या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन त्यानंतर अतुल राजोळी यांच्या हस्ते झाले. बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना हे अनुवादीत पुस्तकाचे नाव. डॉ. वीरेंद्र ताटके यांनी अनुवादाचे काम केले आहे. रोहन प्रकाशन या पुण्याच्या नामवंत संस्थेने हा प्रकाशित केला असून प्रकाशनाच्या वेळी रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर म्हणाले हे पुस्तक अगदी योग्य श्रोत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे याचा आनंद होत आहे. अतुल राजोळी पुस्तक प्रकाशित करताना म्हणाले, आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे याची जाणीव उद्योजकांना होत आहे व हे एक सुचिन्ह आहे.
मध्यतंरानंतर डॉ. अनिल लांबा यांचे बॅलन्स शीट व फायनान्स या विषयांवर भाषण झाले. सुरवातीलाच त्यांनी श्रोत्यांना विचारले, तुमच्यापैकी नॉन- फायनान्स म्हणजे आपले काम फायनान्सशी संबंधित नाही असे समजणारे कोण आहेत त्यांनी हात वर करावा. बहुतेकांनी हात वर केले. डॉ. लांबा यावर म्हणाले, तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी जे काम करता त्यामुळे कंपनीच्या बॉटम लाईनवर परिणाम होत असेल तर तुम्ही फायनान्सशी नक्कीच संबंधित आहात. बॉटम लाईन म्हणजे काय? तर डॉ. लांबा म्हणाले, कंपनीचा नफा-तोटा हा प्रॉफीट व लॉस स्टेटमेंटमध्ये सर्वात खाली - तळाशी दाखवलेला असतो म्हणून त्याला बॉटम लाईन म्हणण्याचा प्रघात आहे. तुम्ही जर विक्रेते असाल तर कंपनीच्या उत्पादनाची विक्री केल्यामुळे तिला उत्पन्न मिळते व नफ्या-तोट्यावर परिणाम होतो. जर तुम्ही प्रॉडक्शन डिपार्टमेंटला असाल तरीही तुमच्या कामामुळे तुम्ही फायनान्सशी संबंधित आहात. या अर्थाने बघितले तर कंपनीच्या विविध खात्यात काम करणारा प्रत्येकजण फायनान्सशी संबंधित असतोच. पण आपला गैरसमज असतो, अकाऊंटस खात्यात काम करणारे म्हणजे हिशेब ठेवणारे तेवढे फक्त फायनान्सशी संबंधित आहेत. डॉ. लांबा पुढे म्हणाले, फायनान्सशी संबंधित असणार्‍या कंपनीतील प्रत्येकाने जर फायनान्स मॅनेजमेंटचे भान ठेवले तरच कंपनीची आर्थिक स्थिती चांगली राहील. मग प्रश्न येतो फायनान्स मॅनेजमेंट - आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे, आपल्या कामाशी निगडीत कृतीचा बॉटम लाईनवर काय परिणाम होतो त्याची जाण म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट.
एक सविस्तर उदाहरण त्यांनी दिले, एका मोबाईल कंपनीच्या विक्रेत्याला समजा मोबाईल फोन विकायचा आहे. हा दहा हजार रुपये विक्री किंमत निश्चित केलेला फोन ग्राहकाने आठ हजार रुपयांना मागितला तर त्या विक्रेत्यास माहीत हवे की या किंमतीत तो देणे कंपनीला परवडणारे आहे की नाही? याचाच अर्थ त्या फोनची कंपनीसाठी अंतिम कॉस्ट काय आहे त्यास माहीत हवे. समजा फोनची कॉस्ट नऊ हजार आहे तर आठ हजारात विकणे म्हणजे तोटा, पण सात हजार आहे व मालाला मागणी नाही तर विकून टाकणे यात फायदा. हे कॉस्टचे तत्व उद्योजकासाठीही महत्वाचे आहे, कसे ते पुढे बघू.
अनेक उद्योजक, अगदी बड्या कंपन्या उद्योगासाठी बॅंकांकडून कर्जे घेतात. ती हजारो कोटीच्या घरातील असतात. यातील काही हमखास बुडीत खात्यात जातात. सध्या याबाबतचे बहुचर्चित उदाहरण म्हणजे किंगफिशर एअरलाइन्सचे. या कंपनीला बॅंकांनी दिलेले सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. छोट्या उद्योजकांबाबतही हे चित्र दिसते. डॉ. लांबा याबाबत म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने उद्योग अपयशी-अयशस्वी का होतात याचा अभ्यास केला. त्यांना काही कारणे आढळून आली ती अशी;
  • उद्योग तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य होणे
  • उत्पादनाची विक्री न करता येणे
  • लढाऊ व गैरवाजवी मागण्या करणारी कामगार संघटना - कामगार समस्या.
पण या अभ्यासातच दिसून आले, केवळ ५ टक्के उद्योग या कारणांनी अपयशी-अयशस्वी झालेले आहेत व ९५ टक्के उद्योग आर्थिक गैरव्यवस्थापन (फायनान्शियल मिस-मॅनेजमेंट) या एकाच कारणाने अपयशी-अयशस्वी झालेले आहेत. चांगले आर्थिक व्यवस्थापन किती महत्वाचे आहे ते यावरून दिसते. डॉ. लांबा म्हणतात, चांगल्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही कळीचे नियम आहेत;

उद्योगाच्या भांडवलाची कॉस्ट (कॉस्ट ऑफ कॅपिटल) काय आहे?
उद्योजक उद्योगात स्वत:चे पैसे टाकतो, रिझर्व्हमधून म्हणजे व्यवसायाच्या संचित नफ्यातून जमा झालेले पैसे उद्योगात टाकतो, कर्ज घेतो, उधारीवर माल घेतो, त्याचे व्याज द्यावे लागते. अशा विविध प्रकारे भांडवल जमा करतो. तेव्हा मूलभूत तत्व असे की उद्योगातून मिळणारा नफा हा या भांडवलाच्या कॉस्टपेक्षा जास्त हवा. तसेच जेव्हा उद्योगासाठी कर्ज घेतले जाते तेव्हा त्या उद्योगातून कर्ज व व्याज परत करता येईल इतका नफा जनरेट व्हायला हवा. उद्योगासाठी आणखी सर्वात महत्वाची बाब म्हणजे कॅश फ्लो अर्थात रोकड. उद्योगाने समजा मोठा व्यवहार केला व त्यात भरपूर नफा होणार आहे, परंतु तो हातात येईपर्यंत कंपनीने तग धरायला हवा तर त्यासाठी तिच्याकडे रोकड हवीच. तसेच उद्योगात तेजी-मंदी-तेजी असे चक्र सुरू असते. तेव्हा मंदीतही तग धरून राहता येणे आवश्यक आहे.
डॉ. लांबानी देशाच्या अर्थव्यवस्थेचीही थोडी चर्चा केली. ते म्हणाले, उद्योग जसे आर्थिक गैरव्यवस्थापन यामुळे जसे अपयशी होते तसे संपूर्ण देशसुध्दा त्यामुळे धोक्यात येऊ शकतो. २००८ सालचा सबप्राईम घोटाळा हा त्याचेच उदाहरण आहे. मात्र आपल्या देशाचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असल्याने त्यावेळेस आपण बचावलो. अर्थात जागतिकीकरणामुळे आता अनेक देशांतील तेज-मंदीचा एकमेकांवर परिणाम होत असतो, त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला झळ बसली हेही खरे.
उद्योगाचे आर्थिक व्यवस्थापन व शासनाचे आर्थिक व्यवस्थापन यात महत्वाचा फरक असा की उद्योगाला आधी भांडवल - पैशाची तरतूद करावी लागते किंवा किती भांडवल उभे करू याचा तो अंदाज घेतो व मग त्यानुसार खर्च किती करायचा ते ठरवतो, परंतु शासन मात्र खर्च किती करायचा ते आधी ठरवते. तितका पैसा सरकारकडे नसला तर त्याला डेफिशिट बजेट - तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. तुटीचे अंदाजपत्रकामुळे महागाई वाढते. डॉ. लांबा यांनी एक खुलासा केला, ते म्हणाले, महागाई खूप जास्त प्रमाणात वाढत असेल तर ते वाईट, तसेच ती खूप कमी प्रमाणात वाढत असेल तर तेही वाईट, कारण त्याचा अर्थ अर्थव्यवस्थेत गतिरोध निर्माण झाला आहे. महागाई हे अर्थव्यवस्था जिवंत आणि क्रियाशील असल्याचे लक्षण आहे व ४ ते ४.५ टक्के हा महागाईचा दर आवश्यक समजला जातो. तसेच महागाई वाढण्याचे कारण असते बाजारात येणारा पैशाचा मुबलक पुरवठा. वस्तुंच्या उपलब्धतेपक्षा त्यांना जास्त मागणी असेल तर त्यांचे भाव वाढतात व मागणी कमी असेल तर भाव कमी होतात, मागणी कमी होणे म्हणजे मंदी. सरकारला बाजारात येणारी पैशाची आवक घटावी वाटले तर सरकार कर वाढवते व व्याजदर वाढवते.
डॉ. लांबा यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते श्रोत्यांना कळेल असे बोलतात, उगाच क्लिष्ट तांत्रिक संज्ञा वापरत नाहीत. अर्थशास्त्राविषयी कुतुहूल जागृत करणारा हा यशस्वी कार्यक्रम त्यासाठी आभार बॉर्न टू विन, अतुल राजोळी त्यांच्या संपूर्ण टीमचे.
ही तर डॉ. लांबा यांच्या भाषणाची झलक म्हणता येईल. त्यांची मैत्री बॅलन्सशीट संगे ही पूर्ण दोन दिवसांची कार्यशाळा बॉर्न टू विन' तर्फे १७ व १८ ऑक्टोबर २०१४ ला आयोजित केलेली आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

गुंतवणुक: रु. ३५,०००/-
बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रु. २०,००० + 12.36% Services Tax
गणेश उत्सव विषेश ऑफर ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत नाव नोंदणी केल्यास १५% ची सूट

19 August 2014

आदर्श व्यावसायिक संघटना उभारण्याचे धडे गिरवुया दहीहंडीतुन..!

नमस्कार मित्रांनो!
आपण ठिकठीकाणी गोविंदा पथकांद्वारे दहीहंडीचे थर लागताना पाहतो. माझ्या मते व्यावसायिक संस्था उभारण्याचे काही धडे त्यातून प्रत्येक उद्योजक घेउ शकतो व एक आदर्श संघटनेची निर्मिती करू शकतो. चला दहीहंडीतुन हे धडे गिरवुया...

1. स्पष्ट ध्येय असणे व ते साध्य करण्यासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्ती वचनबध्द असणे:
आपल्या संस्थेचे पुढील 3 ते 5 वर्षाचे ध्येय, वार्षिक ध्येय व 3 महीन्यांचे ध्येय स्पष्टपणे ठरले असले पाहीजे व ते संस्थेतील प्रत्येकाला माहीत असले पाहीजे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक वचनबध्द असला पाहीजे. ज्या प्रमाणे दहीहंडीतील थरामधील एखाद्या थरातील व्यक्ति वचनबध्द नसेल तर सगळे थर कोसळू शकतात त्याचप्रमाणे संस्था उभारणीच्या प्रक्रीयेमध्ये होऊ शकते.
2. संघटनेचा पाया जेवढा मजबूत तेवढी संस्था यशस्वी होऊ शकते:
ज्या प्रमाणे जेवढी उंच दहीहंडी तेवढा मोठा पाया. त्याच प्रमाणे जेवढी मोठी व् यशस्वी संघटना उभारायची असेल तेवढा मोठा व भक्कम पाया बांधणी होणं गरजेचं आहे. व्यावसायिक संघटनेचा पाया, हा विचारसरणी व मुल्यांवर अवलंबुन असतो. संघटनेची विचारसरणी व मूल्य ठरवल्याने दूरगामी यशासाठी आपण सज्ज होतो.
3. सांघिक कामगिरी:
एकाच व्यक्तिद्वारे दहीहंडी फोडणं अशक्य! सांघिक कामगिरीनेच ते शक्य होऊ शकतं. हंडी फुटण्या मागे प्रत्येक व्यक्तीचे योगदान असते. उद्योजकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की तो एकटा एका विशिष्ट पातळी पर्यंतच यशस्वी होऊ शकतो. दूरगामी यश मिळवण्यासाठी चांगला संघ निर्माण करणं गरजेचं आहे.
4. संघातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका व जबाबदारी ठरवा:
संघटनेमध्ये फक्त लोकं जमा करून चालत नाही. त्यामुळे केवळ गर्दी होईल. ज्याप्रमाणे हंडीमधे थर असतात व प्रत्येक व्यक्तीचे विशिष्ट स्थान ठरलेले असते, त्याच प्रमाणे संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तिची भूमिका व जबाबदारी आधीपासुनच ठरली असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याची भूमिका ठरवणं महत्त्वाचं आहे.
5. श्रेयाच्या व प्रसिद्धीच्या मोहात पडू नका:
हंडी फोडण्यामध्ये दहीहंडीच्या थरातील प्रत्येकाचे योगदान असते, परंतु दहीहंडी एकच व्यक्ती फोडते. लोकांचं लक्ष त्या एकाच व्यक्तीकडे असते. पारितोषिक घेण्यासाठीसुध्दा एकच व्यक्ती व्यासपीठावर जाते. परंतु कोणत्याही गोविंदाच्या मनात त्याबद्दल द्वेष नसतो. त्याचप्रमाणे संघटनेमध्ये भुमिकेनुसार काही व्यक्तिंना प्रसिध्दी मिळते परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहीजे की प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळे संस्था यशस्वी होऊ शकते.
6. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या:
दहीहंडी फोडण्याच्या प्रक्रीयेमध्ये आपल्याला लागेल, दुखेल, आपण पडू याची भिती न बाळगता गोविंदा त्याची मजा लुटतात. धमाल करतात. जर थर कोसळला तर त्याचे विश्लेषण करून पुन्हा थर रचतात व हंडी फोडतात. त्याचप्रमाणे व्यवसायात उतार-चढाव हे येतच असतात, संघातील प्रत्येक सदस्याने आनंदाने संस्था उभारणीच्या प्रक्रीयेमध्ये सामिल झाले पाहिजे. अपयश जरी आलं तरी त्यातून शिकून पुन्हा नवीन जोशात कामाला लागलं पाहीजे.
7. लिडरची महत्त्वाची भूमिका:
गोविंदा पथकाला थर रचण्यासाठी त्यांचा लिडर मार्गदर्शक सूचना देत असतो. सर्व गोविंदा त्या सुचनांचं पालन करत असतात. लिडर हां एकच असणं गरजेचं असतं. त्यामुळे सुचनांबद्दल गोंधळ निर्माण होत नाहीत. सर्व गोविंदांनी लिडरला स्विकारणं अत्यंत महत्त्वाचं असतं अन्यथा तो नामधारीच राहतो. संघटना उभारणीसाठी एका कर्तुत्ववान लिडरची गरज असते. लिडर स्वत: संघटना उभारणीसाठी प्रशिक्षित असला पाहीजे किंवा त्याने स्वत:ला त्यासाठी तसं घडवलं पाहीजे.
मित्रांनो, प्रत्येक लघूद्योजकाने दहीहंडीचा हा धडा घेतला पाहीजे व एक आदर्श संघटना उभारण्यासाठी सज्ज झालं पाहीजे... शुभेच्छा!
Just Do It...!!!

- अतुल राजोळी
BORN2WIN

06 August 2014

वीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'Romancing the Balance Sheet'

नमस्कार मित्रांनो!
बॉर्न टू विन साठी २०१४ हे वर्ष खुपच आनंद आणि चांगल्या घडामोडीचं ठरलं. वर्ष सुरु झाल्यापासुन प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल गर्दित पार पडला. १९ वा लक्ष्यसिद्धी सोहळा तर सर्वांच्या कायमच विस्मरणात राहिल असाच होता. तसेच बॉर्न टू विन ने महिलांसाठी सुरु केलेल्या नवीन उपक्रमास तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याबद्द्ल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपली लक्ष्यवेधची २० वी बॅच तिच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील सर्व बॅचेस प्रमाणे या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखिल जबरदस्त झाली आहे. त्यांचा उत्साह तसेच प्रोजेक्टचे रिझल्ट्स अप्रतिम व अविश्वसनीयच आहेत. आणि आता या सर्वांचा कौतुक सोहळा म्हणजेच २० वा लक्ष्यसिद्धी सोहळा व स्नेह मेळावा येत्या १४ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता शिवजी पार्क, दादर (प.) येथिल वीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. आम्हाला पुर्ण खात्री आहे की नेहमी प्रमाणे या लक्ष्यसिद्धी सोहळ्यास तुम्ही हाऊसफुल प्रतिसाद देणार आहात.

दर तीन महिन्यांनी होणार्‍या या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असता. आम्ही खात्रीनीशी सांगु शकतो की नेहमीप्रमाणे या सोहळ्यामधून देखिल आपण एक जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवाल व नवीन प्रेरणा बरोबर घेउन जाल. पुन्हा आजी - माजी प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येण्याची ही संधी तुम्ही नेहमीच हेरता. म्हणून या कार्यक्रमास देखिल आपण उपस्थित रहालच असा आम्हाला विश्वास आहे. तसेच तुम्ही या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची यशोगाथा व अनुभव जाणून घेण्यास देखिल उत्सुक असालच.

नेहमी प्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे येत्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! परंपरे प्रमाणे या लक्ष्यसिद्धी सोहळ्यास देखिल एक दिग्गज व्यक्तिमत्त्व लाभलं आहे. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातील मैलाचा अजून एक दगड म्हणजे हे अत्यंत हुषार, मल्टी डायमेन्शनल व्यक्तीमत्त्व म्हणजेच या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल लांबा. अत्यंत हुषार अभ्यासु व चिकीत्सक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षणाने ते C. A. आहेत व भारताला आर्थिक साक्षर बनवणे या जबरदस्त ध्येयाने ते झपाटलेले आहेत. या सोहळ्यामध्ये 'Romancing the Balance Sheet' या विषयावर ते आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. अनिल लांबा सरांविषयी थोडसं:

  • सर शिक्षणाने Chartered Accountant आहेत.
  • ते Lamcon School of Management आणि Lamcon Finance and Management Services Pvt. Ltd. या संस्थेचे फाउंडर आणि डायरेक्टर आहेत.
  • 'Romancing the Balance Sheet' ह्या अर्थविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. तसेच 'Figure Out The World of Figures' या ट्रेनिंग विडीओस् प्रचंड लोकप्रिय आहेत.
  • भारताला आर्थिक साक्षर करणे हे त्यांचे ध्येय आहे व त्यासाठी ते कार्यरत देखिल आहेत.
मित्रांनो 'Romancing the Balance Sheet' या विषयावर सरांच आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.
अशा या स्फुर्तिदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा...

वीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा
विषयः 'Romancing the Balance Sheet'
दिनांकः १४ ऑगस्ट २०१४
वेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites