June 2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 June 2017

इच्छाशक्तीमुळे तुमचे जग तुम्ही नक्कीच बदलू शकता!

आपण आपली इच्छाशक्ती वाढवून आपल्या रोजच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो का? याचे उत्तर होय असे असेच आहे. त्यामुळे तुम्हाला जगताना सहजपणे प्रत्यक्षात आणता येऊ शकतात असे काही उपाय आज सांगणार आहे. हे उपाय तुमच्या जगण्यातील सवय बनून गेले तर आयुष्य बदलून जाईल.
ज्या-ज्यावेळी आपण आपल्या दिवसभराच्या नियोजनात सुधारणा करतो. म्हणजेच आपण स्वनियंत्रण ही संकल्पना प्रत्यक्षात जगत असतो. स्वतःवर जितके जास्त नियंत्रण म्हणजेच प्रबळ इच्छाशक्ती होय. छोटे बदल करण्यात आपण यशस्वी झालो तर मोठे ध्येय ठेवून ते साध्य करण्याची क्षमता आपण विकसित करु शकतो. ब्रश करणे, खाणे, दरवाजा उघडणे आदी कृती तुम्ही ज्या हाताने करता त्याच्या विरुध्द हाताने त्या करुन पाहा. सुरुवातीला अगदी विचित्र वाटेल पण, दिर्घकाळात त्यातून इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल.

मेंदूला ऊर्जा मिळणे आवश्यक : जेवणाच्या वेळा कधीही चुकवू नका. आपला मेंदू म्हणजे आपल्यासंदर्भात निर्णय घेणारा महत्त्वाचा अवयव आहे. त्याला अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा झाला आहे किंवा नाही यावरच त्याने योग्य निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक ती जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण होणार आहे. त्यामुळे रोज नियमित आणि वेळच्यावेळी जेवण करा. जेवणात आरोग्यदायी प्रोटीन्स, भाज्या यांचा समावेश असू द्या. पचनाला जड असणारे पदार्थ टाळा.


एकावेळी एकाच बदलावर लक्ष केंद्रीत करा : इच्छाशक्ती वाढवता येऊ शकते. ती दिर्घकालीन प्रक्रीया आहे. एखादे अवघड वाटणारे काम सरावाने आपल्याला सोपे वाटू लागते तसेच इच्छाशक्ती वाढवण्याच्या प्रक्रीयेचे आहे. आपल्याला एकदम एका दिवसात सगळा बदल करता येणार नाही. आपल्याला खरोखर झालेला बदल आणि त्यातील फायदे अनुभवायचे असतील तर सुरुवातीला छोट्या गोष्टीमध्ये बदल करा. एकावेळी एकच ध्येय ठेवा आणि ते साध्य करा.


प्रभावी सवयी आत्मसात करा : संशोधनातून हे सिध्द झाले आहे, की चांगल्या सवयीतून आपली इच्छाशक्ती बळकट होते. साधी गोष्ट आहे. रोज झोपताना बेडशीट बदलायचे आणि उठल्यावर पांघरुण घडी घालून ठेवायचे. यातून आपल्या इच्छाशक्तीवर जबरदस्त सकारात्मक परिणाम होतो. कारण छोट्या सवयींमधून स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण वाढते आणि ते शरीरात भिनते.

रोजच्या कामाचे व्यवस्थापन : आपली रोजची कामाची यादी असते. आपण विचार न करता उगाचच लांबलचक यादी बनवली आणि त्यातील अनेक कामे झाली नाहीत तर मग आपले मन आपल्याला खाते. मग प्रत्यक्ष काम करण्या ऐवजी आपण जास्त काळजी करु लागतो. आपला मूड खराब होतो. मग त्यातून आपण भावनिक बनतो आणि नको त्या गोष्टींच्या आहारी जातो. त्यासाठी दिवसअखेर जास्तीत जास्त कामे झालेली असतील अशा बेताने सकाळी कामाची यादि तयार करा.


कामातून ब्रेक घ्या :  स्वतःवर कायमस्वरुपी नियंत्रण ठेवणे अवघड असते. अनेकदा इच्छाशक्ती विसरुन आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती आणि ब्रेक घेतला तर त्याचा फायदा होतो. बसल्याजागी दोन मिनिट डोळे मिटणे, तोंडात काही तरी टाकणे अर्थातच आरोग्यदायी, एक-दोन मिनिटांसाठी टीव्ही पाहणे आणि परत आपल्या जागेवर येऊन कामाला सुरुवात करण्यातून आपण ताजेतवाने होतो आणि इच्छाशक्तीचा वापर करुन चांगले काम करु शकतो.


आपण हे सगळं का करत आहोत?
आपल्या वागण्यात आपल्याला बदल का घडवून आणायचा आहे? आपल्याला काय साध्य करायचे आहे? आपण आपल्या चुकीच्या सवयी सोडल्या तर आपण काही गमावणार आहोत का? आपण सातत्याने या प्रश्नांच्या उत्तरांची स्वतःला आठवण करुन दिली तर आपण ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहण्याबाबत आपली इच्छाशक्ती निश्चितपणे वाढलेली असेल. हे सगळे माझ्या जगण्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी करायचे आहे याची जाणिव स्वतःला सातत्याने करुन द्या.


सौजन्य: संध्यानंद

16 June 2017

डोळसांनाही थक्क करणारी भावेश भाटिया यांची उत्तुंग झेप

भावेश भाटिया जन्माने अंध नव्हते, मोठे होईपर्यंत त्यांना अंधुकसं दिसत होतं. वयाच्या २३ व्या वर्षीच अपेक्षेपेक्षा लवकर दृष्टी गेली. तेव्हा ते एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. कर्करोगग्रस्त आईच्या उपचारांसाठी पैसा साठवत होते. आईला गमावण्याची भीती असतानाच दृष्टी गमावणं त्यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांना नोकरीवरुनही काढून टाकण्यात आलं. या धक्क्यानं लवकरच त्यांच्या आईचं निधन झालं. पण, 'तुला जग नाही पाहता आलं तरी चालेल पण असं काही तरी कर ज्यामुळे जग तुझ्याकडे पाहिल'. आईच्या या शब्दांनी त्यांना हिम्मत दिली. लहानपणापासूनच त्यांना हातांनी वस्तू बनवण्याचा छंद होता. ते पतंग बनवायचे, मातीची खेळणी, छोट्या मूर्ती तयार करायचे. त्यांनी मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात हात घालण्याचं ठरवलं. १९९९ मध्ये मुंबईच्या राष्ट्रीय अंध प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी याचे प्रशिक्षण घेतलं. ते मेणबत्त्या तयार करुन महाबळेश्वरच्या बाजारात मोटगाडीवर विक्री करायचे.


एक दिवस एक महिला त्यांच्या गाडीजवळ मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी थांबली आणि अचानक काही तरी सकारात्मक घडत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांची सौम्य वागणूक आणि त्यांच्या स्मितहास्यानं त्या प्रभावित झाल्या. त्यांची मैत्री झाली आणि ते तासनतास गप्पा मारु लागले. त्यांचं नाव नीता होतं आणि भावेशने त्यांच्याशी लग्नाचा निश्चय करुन टाकला. लवकरच त्यांनी लग्न करुन महाबळेश्वरमध्ये एका छोट्याशा घरात आपल्या संसाराला सुरुवात केली.


पुढे बॅंकेने त्यांना १५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर केलं आणि हेच त्यांच्या जिवनातलं महत्त्वपूर्ण वळण ठरलं. त्या पैशांच्या सहाय्यानं त्यांनी १५ किलो मेण, दोन साचे आणि पन्नास रुपयात एक हातगाडी विकत घेतली. त्यानंतर त्यांनी यातूनच कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आज अनेक प्रतिष्ठीत कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत, तसच २०० कर्मचारी त्यांच्याकडे आता काम करत आहेत. आता सनराईज कँडल्स ९ हजार प्रकारच्या साध्या, सुगंधीत मेणबत्त्या बनवण्यासाठी २५ टन मेणाचा वापर करतात, रिलायन्स इंडस्ट्रिज, रनबक्षी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब यांसारखे काही प्रमुख उद्योग त्यांचे ग्राहक आहेत. भाटिया यांच्याकडे आता २०० लोक काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व २०० कर्मचारी अंध आहेत.


सौजन्य: संध्यानंद

09 June 2017

यशस्वी उद्योग सुरु करण्यासाठीच्या ७ टिप्स

प्रत्येकाच्या सूचनांवर विचार करण्यापेक्षा या टिप्सवर विचार करा.
एखादा नवा उद्योग सुरु करणे हे अर्थातच सोपे काम नाही. सुरुवातीला तुम्हाला ओळखणार्‍या प्रत्येकाकडून सल्ला दिला जाईल. प्रत्येक सूचना वा सल्ल्याचे विश्लेषण करणे अवघड असते. प्रत्येक सूचनेचा अतिविचार केल्याने त्याचा एकूण निर्णय प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. तो टाळण्यासाठी तुम्ही ठळक सूचनांचा वा प्रस्तावांचा विचार करणेच चांगले. तुम्ही उद्योग सुरु करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे सांगणार्‍या काही टिप्स.

१) तपशीलवार योजना तयार करा : तुम्ही सुरु करत असलेला उद्योग कशाशी संबंधित आहे, त्याचे स्वरुप काय असेल याचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. तुम्हाला काय साध्य करावयाचे आहे, तुमच्या उद्योगाची उद्दिष्टे काय असतील, तुमचे संभाव्य ग्राहक कोण असतील, तुमची वाटचाल नफ्याकडे कशी होईल, या वाटचालीची कालमर्यादा काय असेल. या बाबी तुम्ही नियोजनात समाविष्ट केल्या पाहिजेत, संभाव्य अडचणी आणि अडथळ्यांचाही विचार त्यात असला पाहिजे.

२) तुम्हाला मदत करणार्‍या घटकांची यादी करा : नवा उद्योग सुरु करणे हे धाडसी पाऊल असते. कुटूंब, मित्र, सहकारी वा तुम्हाला ज्यांची मदत होऊ शकेल अशा व्यक्तींची यादी तयार करा. तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकेल अशा परिसरातील खाजगी संघटनांची, मालमत्तांची निश्चिती करा. शैक्षणिक संस्थाही तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतील.

३) आवश्यक तो निधी मिळवा : तुमच्या उद्योगासाठी भांडवल मिळवणे हे आव्हानात्मक असते. बँकेकडून कर्ज मिळवणे अवघड असते. तुम्हाला जर बँकेकडून कर्ज मिळवायचे असेल तर तुम्ही अर्जाबरोबर तुमच्या उद्योगासाठीची योजना सादर केली पाहिजे. त्यात नफ्याची वा उद्योग किफायतशीरपणे चालण्याची शक्यता स्पष्ट केली पाहिजे. कर्जफेडीबाबत विश्वास वाटला तरच बँका कर्ज देतात. इतरही मार्गांनी कर्ज उभे करता येते. त्यासाठी ऑनलाईन मार्गांनीही गुंतवणूकदारांचा शोध घेतला पाहिजे.

४) नेटवर्क आवश्यक आहे :  कोणताही नवा उद्योग योग्य त्या नेटवर्क वा संपर्क जाळ्यावाचून यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे आणि त्यांना तुमचा उद्योग कोणते उत्पादन किंवा सेवा देऊ शकेल आणि ती इतर स्पर्धकांपासून कशी वेगळी असेल ते पटवून दिले पाहिजे. प्रदर्शने, व्यापारी मेळावे आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून तुम्ही नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करु शकता, त्यातून तुम्ही ग्राहकांबरोबरच तज्ज्ञांशीही संवाद साधू शकता. यातून काही व्यावसायिक भागीदारही उपलब्ध होऊ शकतात. तुमचे नेटवर्क ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात तुमचा उद्योगही वाढेल.

५) योग्य व्यक्तिंबरोबर राहा : तुमच्या उद्योग क्षेत्राबद्द्ल ज्ञान असणार्‍यांच्या सहवासात तुम्ही राहिले पाहिजे, तुमच्या अडीअडचणीच्या वेळी हे लोक तुम्हाला सल्ला देऊ शकतात. तुम्ही तुमचे कर्मचारी नेमताना ते निष्ठावान असतील आणि तुमच्या उद्दिष्टांशी समरस असतील, याची खबरदारी घेतली पाहिजे.

६) पुढचा विचारही करा : एक उद्योजक म्हणून तुम्ही केवळ तुमच्या दैनंदिन कामात अडकून पडता कामा नये. तुम्ही केवळ भविष्याचाही विचार केला पाहिजे. बाजारपेठेतील ताज्या घडामोडींचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ग्राहकांच्या दृष्टीने बाजारपेठेत कोणते बदल होताहेत ते तुम्ही पडताळून पाहिले पाहिजे. त्याचा तुम्हाला निर्णय घेण्यासाठी उपयोग होईल.

७) काम आणि जगणे यातील समतोल सांभाळा : नव्या उद्योगासाठी खूप वेळ आणि उर्जा खर्चावी लागते. तुमचे काम आणि तुमचे जगणे यात तुम्हाला समतोल साधावा लागतो यासाठी तुम्ही वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. तुम्ही घरच्यांसाठीही पुरेसा वेळ दिला पाहिजे त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकता, घरातील व्यक्तींचा तुमच्या प्रयत्नांमधील सहभाग तुमच्यासाठी नेहमीच प्रोत्साहनकारक ठरु शकतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites