January 2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

12 January 2015

'If you can dream it... Then you can achieve it.....!' - अतुल राजोळी

नमस्कार!
मित्रांनो, मी आपल्याला एक सूत्र सांगणार आहे. या सूत्राची अंमलबजावणी करून आपण आपल्या आयुष्यात आपल्याला हवे ते साध्य करू शकाल! हो मित्रांनो, आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद काहीही असो आपण ते मिळवू शकाल.
मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमामध्ये ध्येयनिश्चिती या सत्रात मी एक वाक्य सांगतो. ते म्हणजे 'If you can dream it... Then you can achieve it.....!' हे वाक्य फक्त मी सांगतच नाही, तर मी त्याचे एक प्रात्यक्षिकसुद्धा दाखवतो. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर लक्ष्यवेधचे प्रशिक्षणार्थी अक्षरशः थक्क होतात व त्यांना विश्वास बसतो की, जर एखादी गोष्ट आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने स्वप्नाच्या स्वरूपात पाहू शकतो तर आपण ती वास्तवातदेखील करू शकतो.
या लेखामध्ये याच वाक्यामागील सूत्र मी आपल्यासमोर मांडत आहे. 'If you can dream it... Then you can achieve it.....!' म्हणजेच जर एखादी गोष्ट आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या मदतीने मनातल्या मनात चित्र स्वरूपात पाहू शकतो तर ती गोष्ट आपण वास्तवात साध्य करू शकतो. या मागे जे सूत्र आहे त्या एकूण चार महत्त्वाच्या पायर्‍या आहेत. या चार पायर्‍यांच्या साहाय्याने कोणतीही व्यक्ती आपल्याला जे हवे ते साध्य करू शकते. चला तर मग जाणून घेऊ या चार पायर्‍या कोणत्या आहेत...
१. Dream
२. Conceive
३. Believe
४. Achieve
'If you can dream it... Then you can achieve it.....!'
१. Dream : Dream म्हणजेच स्वप्न जे स्वप्न आपण दिवसाढवळ्या पाहतो! सर्वप्रथम आपल्याला आपल्या भविष्यातील इच्छित परिणामांचे चित्र, आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने मनातल्या मनात पाहता आले पाहिजे. आपल्याला जे काही हवे आहे, जे काही साध्य करायचे असेल त्याचे एक काल्पनिक चित्र रेखाटणे ही या सूत्राची पहिली पायरी आहे.
उदाहरणार्थ : आपल्याला स्वतःचे घर हवे आहे, तर घर कसे असेल हे मनातल्या मनात पाहा. आपल्या कामात / व्यवसायात एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचे काल्पनिक चित्र बनवा. आपल्या स्नेहसंबंधामध्ये जे चांगले बदल हवे आहेत तेदेखील मनातल्या मनात पाहा. जेव्हा आपण आपल्या मनातल्या मनात आपल्या इच्छा, आकांक्षा चित्रांच्या स्वरूपात पाहू लागतो, (मग त्या ढोबळ स्वरूपातल्या का होईनात) तेव्हा त्या आपल्या विचारांमध्ये सतत येऊ लागतात. आपण स्वतःला सतत हे सांगू लागतो की, आपल्याला हे हवे आहे किंवा हे साध्य करायचे आहे, आणि हळूहळू आपण दुसर्‍या पायरीवर जाऊ लागतो.
२. Conceive : मित्रांनो, Conceive चा शब्दशः अर्थ आहे, गर्भधारणा होणे. या सूत्रामध्ये Conceive चा अर्थ आहे की, आपले स्वप्नं आपल्या अंतर्मनात धारण होणे आणि रुजणे. या पायरीमध्ये आपण आपल्या स्वप्नाचे ध्येयामध्ये रूपांतर करतो. स्वप्नाला एक नेमके स्वरूप देतो. स्वप्न साध्य करण्यासाठी तीव्र इच्छा निर्माण करतो अणि ते कागदावर फक्त एका वाक्यात स्पष्टपणे लिहून काढतो. जेव्हा आपण आपल्याला जे हवे आहे ते कागदावर एका वाक्याच्या स्वरूपात लिहीतो तेव्हा ते ध्येय बनते (ध्येय एका विशिष्ट वाक्यरचनेत लिहीणे गरजेचे असते. लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमात त्याबद्दलची सविस्तर माहीती दिली जाते) मित्रांनो, जेव्हा आपण आपलं स्वप्न ध्येय स्वरूपात लिहून काढतो व ते वाचतो तेव्हा आपण स्वतःला ठामपणे आणि नेमक्या शब्दांत सांगतो की, आपल्याला काय हवे आहे. फक्त एक-दोनदा वाचून काही होत नाही, तर अपल्याला आपले ध्येय सतत वाचले पाहीजे. ध्येयाचे सतत (दिवसातून किमान एकदा) वाचन केल्याने आपले ध्येय हळूहळू अपल्या अंतर्मनात रुजू लागतो. जेव्हा आपण ध्येय वाचत असतो तेव्हा आपोआपच आपण ते चित्र स्वरूपात मनातल्या मनात पाहतो. असे सातत्याने केल्याने खर्‍या अर्थाने आपल्या मनात ध्येय धारणा होते. परंतु बरीच माणसे आपले स्वप्न ध्येयाच्या स्वरूपात लिहीत नाहीत त्यामुळे त्यांना नेमके काय हवे आहे ते स्वतःला सांगण्यात कमी पडतात. फार कमी माणसे आपले ध्येय शब्द स्वरूपात लिहीतात परंतु त्यातील बरीच माणसे ते वारंवार वाचत नाहीत, त्यामुळे ते Conceive या पायरीपर्यंत पोहोचत नाहीत.
एकदा ध्येय आपल्या अंतर्मनात रुजले म्हणजेच, Conceive झाले की आपले विचार, वागणे, बोलणे ध्येयाच्या दिशेनेच होऊ लागते. आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. त्याचबरोबर आपण सूत्राच्या तिसर्‍या पायरीवर जाऊन पोहोचतो...
३. Believe : Believe म्हणजेच ध्येय साध्य होणारच आहे याबद्दल विश्वास किंवा खात्री. मित्रांनो, ध्येय आपल्या अंतर्मनात रुजल्यानंतर आपण ध्येय साध्य करण्यासाठी झपाटून जातो. ध्येय साध्य करण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते करत असतो. परंतु जे ध्येय आपल्याला साध्य करायचे आहे ते आधी कधीच साध्य न केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल धाकधूक लागलेली असते. अधी कधी न मिळवलेले मिळविण्याची जिद्द जरि असली तरी, ते साध्य करण्यासाठी आवश्यक गुण आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करावे लागतात. जोपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी परिपक्वता आपल्याकडे येत नाही तोपर्यंत, आपण ते कसे साध्य करणार? ही परिपक्वता जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत, ध्येयाबाबत सुनिश्चितता येत नाही व त्यामुळे विश्वास निर्माण होत नाही. उदाहरणार्थ : एखाद्या उद्योजकाचे ध्येय आहे की, व्यवसायाची वार्षिक उलाढाल १०० कोटी एवढी करणे, परंतु सध्या त्याच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल फक्त १० कोटी इतकी आहे तर त्याला त्याबद्दल साशंकता वाटणे साहजिकच आहे. त्याने १०० कोटींचे स्वप्न जरी पाहिले (Dream) आणि त्या स्वप्नांचे रूपांतर ध्येयात करून ते लिहीले आणि रोज वाचून ते अंतर्मनात जरी रुजवले तरी ते १०० कोटी करण्यासाठी लागणारी क्षमतासुद्धा आत्मसात करणे तेवढेच गरजेचे आहे! म्हणजेच १०० कोटींचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व सवयी त्याने आत्मसात केल्या पाहिजेत. आराखडा तयार केला पाहिजे. त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे. स्वतःची क्षमता विस्तारली पाहिजे जेणेकरून १०० कोटी करण्यासाठी तो परिपक्व होईल व त्याला सुनिश्चितता वाटेल की, 'मी आता माझी कंपनी १०० कोटींची करू शकतो.' त्याला खात्री वाटेल, त्याच्या ध्येयावरचा त्याचा विश्वास दृढ होईल.. तो ध्येय साध्य करण्यासाठी सज्ज होईल व आता ते साध्य होणारच आहे अशा वेगात तो त्या दिशेने काम करेल.
मित्रांनो, बरीच माणसे स्वप्न बघतात परंतु ती साध्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती व सवयी आत्मसात करत नाहीत व स्वप्ने साकारण्याची क्षमता कधीच अंगीकारत नाहीत. पुस्तके व प्रशिक्षण यांच्यापासून स्वतःला लांब ठेवतात. त्यांना पुस्तके वाचणे व प्रशिक्षणक्रमांमध्ये सहभागी होणे म्हणजे वेळ आणि पैसा यांचा अपव्यय वाटतो. माझ्या मते अशी विचारसरणी या लोकांना यशापासून वंचित ठेवते.
मित्रांनो, जी माणसे या पायरीपर्यंत पोहोचतात ती माणसे चौथी पायरी नक्कीच गाठतात.
४. Achieve : Achieve म्हणजेच साध्य करणे. मित्रांनो, जी व्यक्ती स्वप्न पाहते, ते आपल्या अंतर्मनात रुजवते आणि ते साध्य करण्यासाठी स्वतःच्या क्षमता विस्तारीत करून आपला विश्वास बळकट करते, आणि साहजिकच आपलं स्वप्नं साकारण्याच्या दिशेने कृती करते तीच व्यक्ती आपले स्वप्न साध्य करते. Dream - Conceive - आणि Belive या तीन पायर्‍यांनंतर ध्येयाच्या दिशेने सतत कृतिशील राहिल्याने एक ना एक दिवस आपण आपले ध्येय साध्य करूच. काही बाबतीत आपण लगेच आपले ध्येय साध्य करू. काही बाबतीत बर्‍याच उतार-चढावातून जावे लागेल. परंतु ध्येय साध्य होईलच याची मी आपणास गॅरंटी देऊ शकतो! कृती करणे मात्र कधीच थांबवायचे नाही. Never Quit!
जेव्हा आपण आपले स्वप्न साध्य करतो ती भावना इतकी सुखद असते की, त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. जी गोष्ट एकेकाळी आपल्या स्वप्नांमध्ये होती ती वास्तवात घडत आहे हा अनुभव खरच आपल्यासाठी आनंददायी असतो.
मित्रांनो, Dream - Conceive - Belive - Achieve या सूत्राचा वापर करा आणि आपल्याला हवे ते मिळवा. लक्षात ठेवा 'If you can dream it... Then you can achieve it.....!'

लेखाबद्दल आपले अभिप्राय कळवा.
- अतुल राजोळी
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites