March 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

25 March 2014

'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती'

'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती'
आज जगात संधींचा तुटवडा नाही. आजच्याइतकं संधींनी भरलेलं जग पुर्वी कधीच नव्हतं एखाद्या व्यक्तीकडे कार्यक्षमता असेल व यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती भविष्यात नक्कीच यश मिळवू शकेल. जगातील अर्थव्यवस्थेमध्ये व व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्यात चढ-उतार हे होतच असतात, परंतु आपण ज्या युगात प्रवेश करत आहोत ते पुर्वीच्या युगांपेक्षा कितीतरी पटीने जास्तं सुख समृधींनी भरलेले आहे. तज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढील काही वर्षांमध्ये भारतातील यशस्वी माणसांचे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. यामध्ये प्रमुख समावेश असेल तो आजच्या सर्वसामान्य माणसांचा. आज ज्या व्यक्ती सर्वसामान्य माणसांच्या वर्गामध्ये गणली जातात, या वर्गामधील निश्चयी माणसे स्वतःचे भाग्य या संधींनी भरलेल्या युगामध्ये नक्की बदलु शकतात. सर्वसामान्य माणसांना जर या संधीचा स्वतःसाठी फायदा करुन घ्यायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट तत्वे, कौशल्ये व प्रवृत्ती त्यांनी आत्मसात करुन एका स्पष्ट व आव्हानात्मक लक्ष्याचा वेध घेणं गरजेचं आहे. गरज आहे ती एक स्पष्ट ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्याची! बॉर्न टू विन सादर करत आहे 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' सहा तासांची प्रेरणादायी कार्यशाळा जी कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मोटिव्हेशन देईल. 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' - या कार्यशाळेमध्ये वैयक्तिक व व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी आपल्याला 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' करण्यासाठी काही प्रभावी मंत्र अतिशय विचार परिवर्तित करणार्‍या शैलीत मांडतील. ही कार्यशाळा आपल्या आयुष्यात उत्तुंग यश मिळवण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल.

या कार्यक्रमात आपण काय शिकालः
. यशस्वी व्यक्ती व सर्वसामान्य व्यक्तींमधील मुलभुत फरक
. यशस्वी होण्यासाठी लागणारा मानसिक नकाशा
. अदृष्य गोष्टींचे सदृष्य परिणाम
. बाह्य परिणामांची अंतर्गत यंत्रणा
. लक्ष्यसिध्दीच्या ६ महत्त्वाच्या पायर्‍याही कार्यशाळा कोणासाठी
. उद्योजक
. स्वयंरोजगारकर्ते
. नोकरदार
. प्रोफेशनल्स
. एक्सेक्युटीव
. लिडर

बुधवार दिनांक ९ एप्रिल २०१४
वेळः ठिक दुपारी ३:०० वाजता
स्थळः यशवंत नाट्यमंदिर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)
गुंतवणूकः रुपये १२००/-, १०००/-, ८००/- व ६००/-
संपर्कः 022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689


06 March 2014

ठिणगी विझू देऊ नका..

ठिणगी विझू देऊ नका..
प्रा. सुरेश नाखरे, लोकसत्ता, सोमवार, १७ फेब्रुवारी २०१४
जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी बोलावल्या गेलेल्या मान्यवरांच्या भाषणांचा निवडक अंश या मासिक सदरातून देत आहोत -
चेतन भगत हे प्रथितयश भारतीय लेखक असून त्यांची गाजलेली इंग्रजी पुस्तके म्हणजे फाइव्ह पॉइंट समवन, वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ, टू स्टेट्स, रिव्होल्यूशन २०२० आणि व्हॉट यंग इंडिया वाँट्स. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारीत चित्रपटही गाजले आहेत. एक स्तंभलेखक व वक्ता म्हणूनही ते सुपरिचित आहेत. चेतन भगत यांनी सिम्बॉयसिस (इंडिया) या संस्थेच्या २००८ सालच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतपर समारंभात केलेल्या उत्कृष्ट भाषणाचा हा भावानुवाद..
आजचा दिवस तुमचा आहे. आपल्या घरातले समाधानाचे (काहींचे बाबतीत असमाधानाचे) आयुष्य मागे ठेवून काही तरी बनण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश घेतला आहात. मला खात्री आहे की, तुम्ही आज खूप उत्तेजित झालेले असणार. माणसाच्या जीवनात काही दिवस असे असतात, जेव्हा तो अतीव आनंदात व उत्साहात असतो. कॉलेजमधला पहिला दिवस हा त्यातला एक. आज जेव्हा तुम्ही कॉलेजला येण्याची तयारी करत होता तेव्हा तुमच्या पोटात जरा सुखद झिणझिण्या येत असणार. सभागृह कशाप्रकारे असेल, प्राध्यापक कसे असतील, माझे नवीन वर्गमित्र कोण असतील- खूप काही कुतूहल वाटलेले असणार. या उत्सुकतेला मी तुमच्यातली एक ठिणगी किंवा चमक असे म्हणतो, जी तुम्हाला खऱ्या अर्थाने जिवंतपणा जाणवून देते. मी आज तुमच्याशी ही ठिणगी कायमची चमकत ठेवण्याबाबत बोलणार आहे. जरी सर्व काळ नाही जमले तरी बऱ्याचदा खूप आनंदी कसे राहाता येईल, याबाबत बोलणार आहे.
या ठिणग्या कुठून बरे उगम पावतात? मला असे वाटते की, आपल्या जन्माबरोबरच त्याही जन्माला येतात. मी तुमच्यासारखे विद्यार्थी पाहतो आणि आजही मला अशा ठिणग्या दिसून येतात.. पण जेव्हा मी वृद्ध माणसे पाहतो आणि तिथे अशा ठिणग्या मोठय़ा मुश्किलीने दिसून येतात. याचा अर्थ असा की जसजसे आपण मोठे होत जातो तसतशा या ठिणग्या विझू लागतात. ज्यांच्यातल्या ठिणग्या बऱ्याच प्रमाणात विझल्या आहेत, त्यांची आयुष्ये मंद, उदास, हेतुशून्य आणि कडवट अशी बनतात. आठवून बघा, 'जब वुई मेट'च्या पहिल्या अध्र्या भागातली करीना आणि तीच दुसऱ्या अध्र्या भागातली. असेच काहीसे ठिणगी विझली की होते. मग ही ठिणगी, ही चमक सांभाळायची कशी? 
कल्पना करा की, ही ठिणगी म्हणजे दिव्याची एक ज्योत आहे. पहिली गोष्ट संगोपनाची- ठिणगीला निरंतर इंधन पुरवण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्या-वादळापासून तिचे रक्षण करण्याची.
संगोपन करण्यासाठी आपल्यासमोर नेहमी काही उद्दिष्टे बाळगा. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, त्यात सुधारणा करणे आणि संपूर्ण क्षमता प्राप्त करणे हा मानवी स्वभाव असतो. वास्तविक यश म्हणतात, ते हेच असते. आणि हे प्राप्त करणे तुम्हालाही शक्य आहे. ते मोजायला काही बाह्य साधन नसते- उदा. कंपनीने तुम्हाला दिलेले पगाराचे पॅकेज, एखादी विशेष कार किंवा घर.
आपल्यापैकी बहुतांश जण मध्यमवर्गातले आहेत. आपल्यासाठी भौतिक टप्पा/ प्राप्ती हे यश असते आणि ते बरोबरच आहे. जेव्हा तुम्ही मोठे होता, ज्यावेळी पैसा दर दिवशीच्या निवडी/ गरजा तुमच्यावर लादत असतो, त्यावेळी आर्थिक स्वातंत्र्य ही एक मोठी प्राप्ती असते.
पण हा काही जीवनहेतू असू शकत नाही. जर तो तसा असता तर श्रीयुत अंबानी आज कामावर आलेच नसते. शाहरुख खान घरीच थांबला असता आणि यापुढे कुठे नाचलाही नसता. स्टीव्ह जॉब्ज अधिकाधिक चांगला आय-फोन बनवण्यासाठी झगडला नसता, कारण त्याने तेव्हा पिक्सार ही आपली कंपनी अब्जावधी डॉलर्सना विकूनसुद्धा टाकली होती. मग ते तसे का बरे वागले? ते दर दिवशी काम का करीत राहिले? त्यात त्यांना आनंद मिळत होता, म्हणून ते काम करीत राहिले. त्यामुळे त्यांना जिवंत असल्यासारखे वाटत होते, म्हणून ते काम करत राहिले. आहे त्या पातळीपेक्षा चांगले होण्यातच त्यांना बरे वाटत होते. तुम्ही जास्त अभ्यास केलात तर तुमचा दर्जा उंचावेल. तुम्ही जर विविध व्यक्तींमध्ये मिसळलात तर मुलाखतींच्या वेळी तुम्हांला लाभ होईल. तुम्ही सराव केलात तर तुमचे क्रिकेट अजून चांगले होईल. तुम्हाला हे माहीत आहे की, तुम्ही सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही, पण तरीही सरावाने तुम्ही तुमचा स्तर उंचावू शकता. पुढचा स्तर गाठण्यासाठी झगडणे हे फार महत्त्वाचे आहे.
निसर्गाने गुणसूत्रांचे आणि परिस्थितिकीचे चित्र-विचित्र असे संच आरेखित केले आहेत, ज्यामध्ये आपण जन्माला आलो आहोत. ही बाब आपण सुखी होण्यासाठी स्वीकारली पाहिजे आणि निसर्गाच्या त्या आराखडय़ाला मानले पाहिजे. या गोष्टीला तुम्ही तयार आहात? या बाबतीत तुमची ध्येये-उद्दिष्टे तुम्हाला मदत करतील.
मला आणखी एक सांगायचे आहे, ते असे की, केवळ करिअर आणि शैक्षणिक उद्दिष्टे स्वत:समोर बाळगू नका. तुमची ध्येये-उद्दिष्टे अशी ठेवा की, तुमचे आयुष्य हे समतोल व यश यांनी युक्त असेल. 'समतोल' हा शब्द मी मुद्दाम 'यश' या शब्दाच्या आधी वापरला आहे. समतोल आयुष्य म्हणजे तुमचे स्वास्थ्य, संबंध, मानसिक शांती सारे काही चांगल्या स्थितीत असेल याची काळजी घेणे. विभक्त होण्याच्या दिवशी पदोन्नती मिळण्याला काही अर्थ नाही. तुमची पाठ दुखत असेल त्यावेळी कार चालवण्यात काही मजा नाही. तुमचे मन ताणतणाव यांनी व्यापलेले असेल तर शॉपिंग आनंददायी होणार नाही.
तुम्ही काही अवतरणे वाचली असतील- 'जीवन ही एक कठीण शर्यत आहे, मॅरेथॉन किंवा तत्सम'. नाही नाही, मी जे काही आत्तापर्यंत पाहिले आहे, त्यावरून 'जीवन ही शिशुवर्गाच्या शाळेतल्या शर्यतींपैकी एक आहे,' जिच्यामध्ये तुम्हांला गोटी असलेला चमचा तोंडात ठेवून धावायचे असते. गोटी जर खाली पडली तर शर्यतीत पहिला क्रमांक येऊनही फायदा नाही. तेच जीवनाचेही आहे, यात गोटी म्हणजे स्वास्थ्य आणि नातेसंबंध. जेव्हा तुमच्या जीवनात असा सुंदर संगम असेल तेव्हाच तुमच्या परिश्रमांना अर्थ राहील. अन्यथा, तुम्हाला यश मिळेल, पण ही ठिणगी, ही चमक, ही उल्हासित आणि जिवंत असल्याची जाणीव संपून जायला सुरुवात होईल.
या ठिणगीचे संगोपन करण्यासंदर्भातील आणखी एक गोष्ट! आयुष्य फार गंभीरतेने घेऊ नका. माझे एक योग-शिक्षक विद्यार्थ्यांना योगवर्गात हसायला भाग पाडायचे. एका विद्यार्थ्यांने तर विचारले की, हे विनोद योगाच्या सरावातून काहीतरी हिरावून घेत नाही का? ते शिक्षक म्हणाले, 'फार गंभीर बनू नका, प्रामाणिक असा'. हे वाक्य तेव्हापासून माझ्या कामाचे बोधवाक्य ठरले. मग ते माझे लेखन असो, माझा व्यवसाय असो, संबंध असो की माझे ध्येय असो. माझ्या लिखाणावर मला रोज हजारो प्रतिक्रिया येतात. त्यात ढीगभर स्तुती असते, तशी प्रखर टीकाही असते. हे सर्व मी जर गंभीरपणे घेतले तर मी लिहू कसा शकेन? किंवा मी जगू तरी कसा शकेन? आयुष्य फार गंभीरपणे घेऊ नये, कारण आपण सर्वच जण इथे (पृथ्वीवर) खरेच तात्पुरते असे आलो आहोत. आपण मर्यादित मुदतीच्या प्री-पेड कार्डप्रमाणे आहोत. आपण भाग्यवान असू तर पुढची ५० वर्षे जगू. आणि ५० वर्षे म्हणजे अडीच हजार शनिवार-रविवार. खरेच आपल्याला इतके कामात गुंतवून घेण्याची गरज आहे का? ठीक आहे, की काही क्लासेसना दांडी मारा, काही मुलाखतींमध्ये चुका करा, प्रेमात पडा. आपण माणसे आहोत, ठरावीक प्रणाली वापरलेली उपकरणे नाही.
मी तुम्हाला ठिणगी जोपासण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या - रास्त उद्दिष्टे, समतोलपणा आणि आयुष्य फार गंभीरपणे न घेणे. तथापि, जीवनात चार मोठी वादळे असतात, ज्यामुळे ती ज्योत पूर्णपणे विझण्याची भीती असते. त्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचे. ती चार वादळे म्हणजे निराशा, असहायता, असमानता (अनफेअरनेस) आणि (हेतूचा) एकाकीपणा किंवा अलगत्व.
निराशा तेव्हा येते जेव्हा तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही, गोष्टी तुमच्या नियोजनाप्रमाणे घडत नाहीत किंवा जेव्हा तुम्हाला अपयश येते. अपयश हाताळणे फारच कठीण असते, पण जे त्यातून बाहेर पडतात ते मात्र अधिक कणखर होतात. या अपयशाने मला काय शिकवले? हा प्रश्न तुम्ही स्वत:ला अशावेळी विचारला पाहिजे. तुम्हांला दु:ख वाटेल. तुम्हाला सारे सोडून जावेसे वाटेल, जसे मला वाटले होते- जेव्हा नऊ प्रकाशकांनी माझे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला होता. काही आयआयटीयन्स कमी ग्रेड्स मिळाल्याने स्वत:ला संपवून टाकतात--- किती मूर्खपणाचे आहे ते? पण अपयश हे तेवढी खोल जखम तुम्हाला करू शकते.
पण हे जीवन आहे. जर का आव्हानांना परतवून लावता आले तर ती आव्हाने म्हणून उरत नाहीत. आणि हेही लक्षात ठेवा की, जर तुम्हाला कशात अपयश आले तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या क्षमतेची परमावधी गाठली आहे, असा होतो. आणि तिथेच तर तुम्हांला असायचे आहे.
नराश्याचा चुलतभाऊ म्हणजे वैफल्य/असहायता. हे दुसरे वादळ. तुम्ही कधी असहाय झाला आहात का? जेव्हा सर्व गोष्टी ठप्प होतात, अडकतात तेव्हा असहायता येते. हे विशेषत: भारताशी संबंधित आहे. वाहतुकीच्या खोळंब्यापासून ते तुम्हाला योग्य असा जॉब मिळेपर्यंत, काही वेळा याला इतका प्रदीर्घ वेळ लागतो की ध्येय वा उद्दिष्ट योग्य निवडले आहे का, याचीच आपल्याला शंका यावी. पुस्तक लिहून झाल्यावर मी स्वत: बॉलीवूडसाठी लिखाण करण्याचे उद्दिष्ट ठरवले. मला वाटले होते की, त्यांना लेखकाची आवश्यकता आहे. मला नशीबवान म्हटले गेले खरे, पण तो सिनेमा प्रदर्शित व्हायला जवळ जवळ पाच वर्षे लागली.
असहायता उत्सुकतेला दुबळे बनवते आणि तुमच्या प्राथमिक ऊर्जेला नकारात्मकतेकडे वळवते. तुम्हांला एक कडवट व्यक्ती बनवते. मी याला कसा सामोरा गेलो? लागलेल्या वेळेचे वास्तव मूल्यमापन- सिनेमे पटकन बघून होतात, पण ते बनवायला प्रचंड वेळ लागतो. शेवटच्या निष्पत्तीकडे बघण्याऐवजी त्या प्रक्रियेत आनंद घेणे अशावेळी महत्त्वाचे ठरते. निदान मी स्क्रिप्ट म्हणजे बरोबर आराखडा बाळगून पटकथा कशी लिहायची, ते शिकत होतो. मला त्या काळात माझे तिसरे पुस्तक लिहायचे होते. सर्वात साधी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनातले सुखद वळण, मित्र, खाणे-पिणे, प्रवास या साऱ्या गोष्टी तुम्हांला तुमच्या असहायतेवर मात करायला उपयोगी पडतात. लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट फार गंभीरतेने घ्यायची नसते. असहायता ही गोष्ट तुम्ही काही तरी गंभीरपणे घेत आहात, याची निदर्शक असते.
असमानता (अनफेअरनेस) - सामोरे जायला ही सर्वात कठीण गोष्ट. पण दुर्दैवाने आपला देश असाच चालतो. लागेबांधे, श्रीमंत बाप, सुंदर चेहरे, कुळवंश असलेले लोक अशी असमानता  सहजपणे उभी करतात. केवळ सिनेक्षेत्रात नाही तर सगळीकडे. आणि काही वेळा केवळ नशीब असते. भारतात संधी इतक्या कमी आहेत की, ग्रह-नक्षत्रांचा योग आला तरच ती मिळणे शक्य आहे. एखादी गोष्ट कमी वेळात मिळणे ही गोष्ट गुणवत्ता आणि परिश्रम यांच्याशी जोडली असतेच, असे नाही. पण जरा अधिक वेळेने प्राप्त होणाऱ्या गोष्टींशी मात्र यांचा संबंध आहे, अखेर गोष्टी घडून येतातच. पण तरीही हे ओळखायला शिका की काही जण तुमच्यापेक्षा अधिक नशीबवान असणारच आहेत.
हेच बघा की, कॉलेजमध्ये जायची संधी मिळणे आणि हे इंग्रजीमध्ये केलेले भाषण समजणे याचा अर्थ सर्वसाधारण भारतीयांच्या तुलनेत तुम्ही भरपूर नशीबवान आहात, असाच होतो. आपल्याला जे काही मिळाले आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहूया आणि जे मिळाले नाही त्याचा स्वीकार करण्याची शक्ती संपादित करूया! मान्य आहे की, मला साहित्यिक प्रशंसा मिळाली नाही, मी ऐश्वर्या रायसारखा दिसत नाही. पण मला तिच्यापेक्षा सुंदर अशी दोन मुले आहेत ना! तेव्हा या असमानतेमुळे तुमच्यातली ठिणगी विझू देऊ नका.
शेवटचा मुद्दा जो तुमच्यातली ठिणगी विझवू शकतो तो म्हणजे अलगत्व किंवा वेगळेपणा. तम्ही जसजसे मोठे होऊ लागता तसे तुमच्या लक्षात येते की, तुम्ही एकमेव असे आहात, अद्वितीय आहात. जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा सर्वच लहान मुलांना आईस्क्रीम आणि स्पायडरमॅन आवडतातच. तुम्ही कॉलेजला जाण्याइतपत मोठे होता तेव्हादेखील तुम्ही इतर मित्रांप्रमाणेच असता. पण दहा एक वर्षांनंतर तुम्हाला तुम्ही एकमेवाद्वितीय असे वाटू लागता. तुम्हाला जे हवे आहे, तुमचा कशात विश्वास आहे, तुम्हाला कशाने काय वाटते हे इतरांपेक्षा, अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा भिन्न असेल. यामुळे विरोधभावना निर्माण होऊ शकते, कारण तुमची उद्दिष्टे इतरांशी मिळतीजुळती असतेच, असे नाही. आणि त्यातली काही तुम्ही काळाच्या ओघात टाकूनही देता. कॉलेजमध्ये बास्केटबॉलमध्ये असलेले कर्णधार बऱ्याचदा त्यांना दुसरे मूल झाले की, बास्केटबॉल खेळणे थांबवतात. ते काही तरी थांबवतात, की जे त्यांना पूर्वी अतिप्रिय होते. आणि हे ते स्वत:च्या कुटुंबासाठी करतात. पण हे करताना त्यांच्यातली ती ठिणगी मात्र विझून जाते. कधीही अशी तडजोड करू नका. सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करा, मग इतरांवर.

तेव्हा ध्यानात असू द्या. मी तुम्हांला गडगडणारी चार वादळे सांगितली- निराशा, असहायता, असमानता आणि अलगत्व. तुम्ही त्यांना टाळू शकत नाही, नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे अगदी ठरावीक मुदतीने ही वादळे तुमच्या जीवनात येतील. तुम्हाला तुमचे रेनकोट मात्र सज्ज ठेवावे लागतील, जेणे करून तुमच्यातली ही ठिणगी तुम्ही विझू देणार नाही.
मी तुमचे पुन्हा एकदा, तुमच्या जीवनातल्या सुंदर अशा वर्षांमध्ये प्रवेश घेताना, स्वागत करतो. जर मला कुणी मागील काळात जाण्याची एक संधी मिळवून दिली तर मी निश्चितपणे कॉलेजचीच निवड करीन. पण दहा वर्षांनंतरही तुमचे डोळे असेच आजच्यासारखे चमकत राहोत, अशी मी आशा बाळगतो. तुमच्यातली ही ठिणगी, ही चमक केवळ कॉलेजमध्येच नव्हे तर पुढचे अडीच हजार शनिवार-रविवार कायम जागृत ठेवाल, अशी आशा करतो. आणि तुम्हीच केवळ नाही, तर माझा संपूर्ण देश ही ठिणगी जिवंत ठेवो अशी अशा व्यक्त करतो, जी गोष्ट काळाच्या कोणत्याही क्षणापेक्षा आज अधिक गरजेची आहे. आणि हे सांगायला मला छान वाटते की, मी अशा अब्जावधी ठिणग्या असलेल्या देशातून आलो आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites