December 2018 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

07 December 2018

२०१९ - संकल्प अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा



नमस्कार उद्योजक मित्रांनो...!
आता डिसेंबर महिना उजाडला आहे, आपण या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. या वर्षभरात आपल्या सगळ्यांचा व्यवसाय निश्चितच उत्तमरीत्या पार पडला असेल अशी आशा आहे. या काळात आपण काही कटू-गोड अनुभव घेतले असतील. बऱ्याचदा पुढचे पाठ आणि मागचे सपाट या उक्तीप्रमाणे पुढचे वर्ष चांगले असेल, यावर्षी भारी काम करू अशी स्वतःची समजूत करून आपण नकारात्मक अनुभवांकडे दुर्लक्ष करतो. कदाचित आपल्या स्वतःच्या काही चुकांमुळे किंवा आपल्या ताबाक्षेत्राबाहेरील वैयक्तिक व व्यावसायिक अडचणींमुळे आपण भव्य कामगिरी करू शकलो नसलो तरीही त्यांचा जाणीवपूर्वक विचार करून पुढील वर्षी आणखी चांगल्या प्रकारे कामगिरी करण्यासाठी काही लक्ष्यवेधी कृती करण्याची वेळ आली आहे.
१. पुनरावलोकन -
ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह एक विशिष्ट अंतर पार केल्यावर मागे वळून परिस्थितीचा अंदाज घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्या व्यवसायाचे सिंहावलोकन करायला हवे.
- आतापर्यंत आपण व्यवसायात काय साध्य केले आहे ?
- आपण वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेल्या ध्येयाची सद्यस्थिती काय आहे ?
- व्यवसायात कोणत्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टी घडल्या ?
- आपल्या व्यवसायाचा, ग्राहकांचा, बाजारपेठेचा काही विशिष्ट ट्रेंड आपण अनुभवला का?
- त्याचा आपल्या व्यवसायावर कशाप्रकारे प्रभाव जाणवला ?
२. अर्थकारण -
पैसे किंवा रोख रक्कम हा आपल्या व्यवसायाचा प्राणवायू असतो. सगळी सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. त्यामुळे आपली आर्थिक आघाडी नेहमीच भक्कम असणे आवश्यक आहे.
- आपल्या व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद तपासा
- आपल्या व्यवसायाचा विक्री, वसूली आणि नफा यांचा अंदाज घ्या.
- GST, प्राप्तिकर, इतर व्यावसायिक करांचा वेळेत भरणा झाला आहे की नाही हे पाहा.
- तज्ञांशी सल्ला-मसलत करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या.
३. संवाद
वर्षभरात कदाचित आपण व्यवसाय वाढीच्या कामात व्यग्र असल्याने वेळोवेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे अवघड होते. परंतु वर्षाच्या या टप्प्यावर एखादी अनौपचारिक बैठक आयोजित करून तुम्ही उत्तमरीत्या व्यवसायाची आत्तापर्यंतची कामगिरी, पुढील वाटचाल, नवीन ध्येय, योजना यासंदर्भात सहकाऱ्यांशी चर्चा करू शकता.
कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्राहक हा आपल्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे, ग्राहक आपल्यावर नाही तर आपण व आपला व्यवसाय ग्राहकांवर अवलंबून असतो. म्हणूनच आपल्या कामगिरीबाबत ग्राहकांचे अभिप्राय घ्या, काही महत्वाच्या बाबींसंदर्भात त्यांच्याकडून सूचना घ्या, आपल्या व्यवसायाच्या पुढील योजनांची त्यांना कल्पना द्या व पुढील सहकार्याची अपेक्षा व्यक्त करा.
अशाप्रकारे कर्मचारी व ग्राहकांना आपल्या ध्येयपूर्तीच्या प्रवासात सामील करून घ्या.
४. नियोजन -
भव्य ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन ही आवश्यक बाब आहे. आपल्या अंदाजपत्रकाची उजळणी करा. पुढील वर्षाच्या अपेक्षित व्यवसाय वाढीसाठी आपल्याकडे असणाऱ्या साधनांचा आढावा घ्या.
- व्यवसायाच्या कोणत्या घटकावर अधिक काम करणे आवश्यक आहे ? (Sales, Marketing, Finance)
- महसूल वाढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का ?
- वाढीव मनुष्यबळाची गरज असल्यास आपल्या कार्यालयात पुरेशी जागा उपलब्ध आहे का ?
- ग्राहकांची संख्या वाढवून त्यांना सेवा देण्यासाठी आपलयाकडे सक्षम यंत्रणा, तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध आहे का ?
- भविष्यातील बाजारपेठ, सामाजिक, राजकीय आणि व्यवस्थेतील अनपेक्षित बदलांसाठी आपण सज्ज आहोत का ?
५. कृतियोजना
आगामी वर्षासाठी आपले SMART ध्येय निश्चित करा. (Specific, Measurable, Achievable, Realistic, Time Bound) आपण आपल्या ज्येष्ठांकडून नेहमी ऐकत आलो आहे, " क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे “म्हणूनच ध्येयपूर्तीसाठी कृतीआराखडा बनविणे ही नियोजन प्रक्रियेच्या पुढील पायरी आहे. नियोजन प्रक्रियेमध्ये अधोरेखित झालेल्या आवश्यक बाबींवर कालबद्ध योजना आखणे श्रेयस्कर ठरते. त्याचप्रमाणे कृतीयोजनेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी सक्षम व्यक्तींची जबाबदारी देखील निश्चित करणे आवश्यक आहे.
सर्वात महत्वाचे आपल्या ध्येयावर ,कृतींवर विश्वास ठेवा आणि आपले लक्ष केंद्रित करा.
चला तर मग कामाला लागा,आणि आपले ध्येय खाली असणाऱ्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हांला जरूर कळवा.
त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास आपल्या व्यवसायाचे ध्येय निश्चित करणे व त्याला अनुसरून कृतीयोजनेसंदर्भात मार्गदर्शनासाठी ९९६९२०४५८५ या नंबरवर थेट किंवा WhatsApp द्वारे संपर्क करा. आम्हांला आपल्या आगामी वर्षाच्या ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्तीच्या प्रवासात सहभागी होण्यास आनंद वाटेल.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites