October 2010 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

14 October 2010

दुसरा THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार

 नमस्कार!
मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे, बॉर्न टू विनचा पहिला THE SUCCESS BLUEPRINT हा सेमिनार ६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात. THE SUCCESS BLUEPRINT सेमिनारला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

६ ऑगस्ट नंतर फोन कॉल्स, SMS व E-Mail द्वारे अनेक व्यक्तिंनी आम्हाला संपर्क केला व हा कार्यक्रम पुन्हा कधी आहे याची विचारपुस केली. खरेतर हा कार्यक्रम पुन्हा आयोजित कधी करायचा याची पुर्वयोजना आम्ही केलीच नव्हती, त्यामुळे "पुढचा THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार जेव्हा असेल तेव्हा आपणास आम्ही कळवू." या उत्तराशिवाय आमच्याकडे वेगळे उत्तर नसायचे. परंतु कार्यक्रमाच्या एका महिन्यानंतरसुध्दा Phone calls येत आहेत हे बघितल्यानंतर लोकांच्या खास आग्रहामुळे THE SUCCESS BLUEPRINT सेमिनार पुन्हा एकदा बॉर्न टू विन घेउन येत आहे.

THE SUCCESS BLUEPRINT या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा चार तासांचा कार्यक्रम आहे, जो आपणास कमीत कमी परिश्रमांमध्ये जास्तीत जास्त यश मिळविण्यास मदत करेल. THE SUCCESS BLUEPRINT हा अतिशय उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रम आहे, ज्या मधुन आपणास आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद... आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी नक्कीच फायदेशिर ठरेल.
THE SUCCESS BLUEPRINT येत्या २७ ऑक्टोबर २०१० रोजी  संध्याकाळी ६:३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

ह्या कार्यक्रमाला देखिल आपणा सर्वांचा दणदणीत प्रतिसाद मिळणार यात काहीच दुमत नाही, कारण ज्या दिवशी ह्या कर्यक्रमाची औपचारीक घोषणा करण्यात आली, त्याच दिवसापासुन कार्यक्रमासाठी भरपुर प्रमाणामध्ये नोंदणी सुरु झाली.

आगामी THE SUCCESS BLUEPRINT कार्यक्रमामध्ये पहिल्या कार्यक्रमापेक्षा आणखी जोश, आणखी प्रेरणा, आणखी उत्साह आपणास अनुभवायला मिळेल...!

तर मग नक्कीच भेटूया... बुधवार, २७ ऑक्टोबर २०१० रोजी, संध्याकाळी ६:३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे!- धन्यवाद!

टिम बॉर्न टू विन
वेळ : सायंकाळी ठिक ६:३० वाजता


स्थळ : रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर (प.)

गुंतवणुक : रुपये ५००/-, ४००/- व ३००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क :

०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

06 October 2010

लोकसत्ता मुंबई वृत्तांतः उद्योगधंद्यातील छक्के पंजे उघड करणारी दिलखुलास मुलाखत

उद्योगधंद्यातील छक्के पंजे उघड करणारी दिलखुलास मुलाखत

उदय कुलकर्णी, बुधवार, ६ ऑक्टोबर २०१०

‘बॉर्न २ विन’ ही कॉर्पोरेट व रिटेल क्षेत्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण व सल्ला देणारी संस्था. ‘लक्ष्यवेध’ हा त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यासाठी लक्ष्यसिद्धी सोहळा दादर इथे आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे पितांबरी प्रॉडक्टस्चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत. बॉर्न २ विनचे संस्थापक- संचालक अतुल राजोळी यांनी ही मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हो गोषवारा..

बी.एस्सी. (केमिस्ट्री) केल्यानंतर रवींद्रनी मोझ्ॉक टाइल्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. पण टाइल्स सदोष बनल्याने तीन लाखांचा फटका बसला. एकूणच रवींद्र यांच्या लक्षात आले. आपल्याला अकाऊंटस्, टॅक्सेशनची माहिती नाही. माणसे, व्यवसाय मॅनेज करणे माहीत नाही. त्यांनी मॅनेजमेंटचे रीतसर शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स केला. आजही ते आग्रहाने सांगतात, मॅनेजमेंटचा निदान एक वर्षांचा कोर्स कराच. आजही ते स्वत: या विषयावरची पुस्तके वाचत असतात. काही उद्योजकांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्र हे थोतांड वाटते किंवा त्यांचा त्यावर फारसा विश्वास नसतो. स्वत:च्या हुशारीवर त्यांचा अतोनात विश्वास असतो, पण त्यांनी या शास्त्रामुळे काय फायदा होतो हे एकदा आजमावून बघायला हवे.

डीबीएम केल्यानंतर रवींद्र यांनी डिर्टजट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. वडिलांची एक वापरात नसलेली जागा पडून होती. त्याचा त्यांना लाभ मिळाला. इथे ते सांगतात की, स्वत:ची जागा असण्याचे अनेक फायदे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहे. यशस्वी उद्योजक आपण किती खस्ता खाल्ल्या ते सांगत असतात. पण आपल्याला ज्या अनुकूल बाबी होत्या त्याचाही रवींद्र उल्लेख करतात हे विशेष. आपले डिर्टजट ताजसारख्या मोठमोठय़ा हॉटेलांना विकतानाच त्यांनी ठरवले आपण कंझ्युमर प्रॉडक्ट बनवायचे, म्हणजे त्याची विक्री जास्त होईल. डिर्टजट ते हॉटेलला विकतात तेव्हा धोका हा असतो की त्यांच्यापेक्षा स्वस्त देणारा दुसरा कुणी भेटला तर हॉटेलवाला त्याच्याकडून माल घेईल. त्यामुळे मार्जिन कमी ठेवावे लागणार. कंझ्युमर प्रॉडक्ट म्हणजे थेट किरकोळ ग्राहक विकत घेतो असे उत्पादन करायचे, पण ते टी-३ प्रकारातील नको, युनिक हवे.

त्यांनी मग तांब्या-पितळेची भांडी घासण्यासाठी पावडर बनवण्याचे ठरवले. लोक म्हणाले, आता सर्वजण स्टीलची भांडी वापरतात ही पावडर कोण घेणार? पण रवींद्रना आपल्या निर्णयाबाबत व जो अभ्यास केला होता त्याबाबत खात्री होती. त्यांनी पितांबरीची एक रुपयाची पुडी बनवली व त्याची विक्री करण्यासाठी काही अभिनव कल्पना लढवल्या. जाहिरातीचा खर्च करण्याऐवजी हँडबिले छापली, मुलांना सॅम्पल्स दिली, त्यांना ५० टक्के कमिशन दिले. बरेचसे नोकरी करून विकणारे वितरक होते. त्यांच्यासाठी हे खूप आकर्षक लाभ होते ते उत्साहाने कामाला लागले. नंतर उद्योगाचा विस्तार झाल्यावर मात्र त्यांनी वितरण यंत्रणा उभारली, लोक नेमले, त्यांना टारगेट ठरवून देणे असे सगळे केले.

प्रॉडक्शन, मार्केटिंग व फायनान्स हे उद्योगाचे तीन आधारस्तंभ. तितकेच महत्त्वाचे आहे मनुष्यबळ. सुरुवातीच्या काळात कौशल्यवान, अनुभवी माणसे मिळत नाहीत, त्यांचा पगारही आवाक्याबाहेरचा असू शकेल. त्याऐवजी मग प्रामाणिक, मेहनती माणसे घ्या. त्यांना प्रेमाने व पैशाने जोडा असे ते सांगतात.

एकटा रवींद्र काही करू शकत नाही, असे ते म्हणतात. त्यांना हे भान आहे हे नोंद घेण्यासारखे. ते म्हणतात, एक कोअर टीम उभी करा. त्या टीममध्ये बॉण्डिंग हवे. नवीन कर्मचाऱ्यांचे कंपनीत इंडक्शन व्हायला हवे, म्हणजे त्याला कामाची माहिती द्या. त्याचबरोबर कंपनीची फिलॉसॉफी, व्हिजन, मूल्ये हेही शिकवा.

माणसावर हा नालायक आहे असा शिक्का मारण्याऐवजी, त्याच्याकडे काय गुण आहेत, तो कोणते काम करू शकतो, ते बघा. प्रत्येक व्यक्तीचा एक कोअर कॉम्पिटन्स असतो. त्याचे चारित्र्य, प्रामाणिकपणा ओळखा. माणसांना इन्सेटिव्ह द्या, सुधारणा कुठे हवी ते सांगा, दोष खासगीत सांगा. काही लोकांना मात्र लगेच काढून टाकणे आवश्यक असते. त्याबाबत मग तो मित्र, नातेवाईक असले तरी ते पर्वा करीत नाहीत. काही वेळा तो स्वत:च निघून जाईल अशी परिस्थिती निर्माण करा. राइट पीपल आर असेट, नॉट पीपल आर असेट.

१९९९-२००० साली त्यांची वार्षिक उलाढाल १० कोटींची होती. त्यावेळेस एकाच वेळी अनेक संकटे आली. एक्साइजची धाड पडली. मुलगा आजारी, कंपनीत पगारवाढीसाठी संप त्यामुळे ऑर्डर्स पुऱ्या करता येत नाहीत तेव्हा रवींद्र यांच्यावर खूप ताण होता. कुठून धंदा वाढवला असे वाटायला लागले. वय फक्त ३३ तरीही रक्तदाब वाढला. यावेळेस पूजाअर्चा, नामस्मरणातून शांतता मिळाली. त्यांनी युनियनला वश करून संप मिटवला. एक्साइजविरुद्ध उच्च न्यायालयातून आदेश आणला. धंदा म्हटल्यावर असे धोके येणार. ते पचवायची आर्थिक ताकद हवी. त्यासह मानसिक खंबीरताही हवी हे लक्षात येईल. रवींद्र महत्त्वाचा सल्ला देतात, निर्णय घेतलाच पाहिजे. त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून तो घ्यायचा. प्रत्येक वेळी तो एकदम अचूक असेल असे नाही. ओघातच ते सांगतात, उद्योजकता म्हणजे स्वातंत्रचे युद्ध असते, सतत लढाई सुरू असते, ज्ञान कौशल्य-स्कील मिळवत राहणे, वाढवत राहणे आवश्यक असते. धूर्तपणा हवा, भोळेपणा नको, गनिमी कावा हवा.

रवींद्र म्हणतात, प्रेम, युद्ध व उद्योगात सर्व क्षम्य. एक उदाहरण त्यांनी दिले. गुजरातमधील एक उत्पादक पितांबरीची नक्कल करून तिथे विकायला लागला. विक्रीवर परिणाम होत होता. शिवाय लोक त्या नकली पावडरला असली समजत. कारण पॅकिंग, नाव वगैरे दिशाभूल करणारे. त्या मालाची गुणवत्ता अर्थातच खराब असल्याने नावही बदनाम होण्याचा धोका होता. त्या उत्पादकावर गुजरातमध्ये खटला भरला तर स्वत:लाच त्रास. महाराष्ट्रात खटला भरता येत नाही. कारण इथे त्याची विक्री नाही. त्यांनी मग ठाण्यात एक डमी एजंट उभा केला. त्या एजंटने नकली मालाची खरेदी-विक्री इथे सुरू केली. मग रवींद्र यांनी त्या उत्पादकावर ठाण्यात सिव्हिल व क्रिमिनल केस केली. त्याला ताळ्यावर आणला, नक्कल बंद करायला लागली. नुकसानभरपाई द्यायला लावली. शत्रूवर दयामाया नको, असे ते स्पष्ट सांगतात.

उद्योग म्हणजे नफा, विकास हवा, दरवर्षी कमीत कमी २५ टक्के वाढ हवी. रवींद्र यांची आता १०० कोटींपर्यंत उलाढाल नेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांनी हेल्थ केअर क्षेत्रात प्रवेश केला आहे. फूड, अ‍ॅग्रो, निर्यात याद्वारे उलाढाल वाढवणार आहेत. नफा जास्त मिळावा यासाठी व्हॅल्यू अ‍ॅडिशन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणतात. कंपनी आपल्या हातातून निसटेल का वगैरे अनाठायी भीती न बाळगता रवींद्र यांनी संचालक मंडळाची नेमणूक केली, सीईओची नियुक्ती केली. कंपनी अजून १५० वर्षे टिकली पाहिजे हा उद्देश.


सौजन्यः लोकसत्ता - मुंबई वृत्तांत

स्त्रोतः http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105763:2010-10-05-15-58-05&catid=39:2009-07-09-06-54-27&Itemid=6
विशेष आभारः श्री. उदय कुलकर्णी www.charcha-kuluday.blogspot.com
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites