LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE: Lakshyavedh
Showing posts with label Lakshyavedh. Show all posts
Showing posts with label Lakshyavedh. Show all posts

30 May 2019

"नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयातून ✌🏻शिकण्यासारखे ७ उद्योजकीय धडे"



  "नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयातून ✌🏻शिकण्यासारखे ७ उद्योजकीय धडे"

नमस्कार उद्योजक मित्रांनो, भारतामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्याचे ऐतिहासिक निकाल आपण पाहिले. या वेळच्या निवडणुका म्हणजे 'कांटे की टक्कर' होती. एन.डी.ए. (भाजप आणि मित्र पक्ष) च्या विरोधकांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनू न देण्याचा चंग बांधला होता. प्रतिस्पर्धी पक्ष आणि नेते, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते, असं असून सुद्धा नरेंद्र मोदी प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. पुढील पाच वर्षे भारताला स्थिर नेतृत्त्व लाभले. या निवडणुकीमधून एक उद्योजक म्हणून आपण कोणते ७ धडे शिकले पाहिजेत, हे या लेखामध्ये मी आपल्या समोर मांडत आहे.

♦️टीप - या लेखाचा उद्देश उद्योजकांनी, दैनंदिन जीवनातील गोष्टींचा संदर्भ घेऊन आपल्या व्यवसायात काहीतरी नविन शिकावे हा आहे. त्यामुळे कृपया याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये.

♦️धडा पहिला - बाजारपेठेत आपली व आपल्या व्यवसायाची उत्कृष्ट प्रतिमा म्हणजेच ब्रँड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे:
मित्रांनो, लोक लॉजिकल विचार करतात, परंतु बहुतांशी महत्वाचे निर्णय आणि कृती भावनांनी प्रभावीत होऊन करतात. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांची Larger Than Life अशी 'प्रामाणिक, देशभक्त आणि राष्ट्राच्या विकासासाठी समर्पित लिडर' अशी प्रतिमा बनवण्यासाठी जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले. ज्याप्रमाणे मतदान करताना लोक भावनांना प्राधान्य देतात, त्याच प्रमाणे ग्राहक सुद्धा उत्पादन विकत घेताना उत्पादनाच्या भावनिक प्रतिमेला प्राधान्य देतात. उत्पादनाची वेगळी आणि विश्वास्नीय प्रतिमा म्हणजेच ब्रँड..! यावेळच्या निवडणुका एन.डी.ए. ने 'ब्रँड मोदी' च्या जीवावर जिंकल्या असं जर आपण म्हणालो तर ते वावगं ठरणार नाही. त्याच प्रमाणे उद्योजकांनी बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची, उत्पादन आणि सेवेची वेगळी आणि विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

♦️धडा दुसरा - स्पष्ट व्हिजन आणि भक्कम विचारधारा
मित्रांनो, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण सर्वांनी पहिले प्रतिस्पर्धी पक्ष नेते (आणि काही निवडणूक न लढणारे नेते सुद्धा) मोदी सरकारवर फक्त टीका करण्यात गुंग होते. प्रचारसभा दरम्यान एकमेकांवर टीका होणं स्वाभाविक आहे. परंतु देशासाठी आपलं व्हिजन काय? आपल्या पक्षाची नेमकी विचारधारा काय? या बाबत फार कमी खुलासा केला जात होता. सगळे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन फक्त मोदींना पाडण्याच्या विचारांनी एकत्र आलेले दिसले. ही विचारधारा भक्कम नक्कीच नव्हती. मतदार त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांच्या विचारधारेबद्दल शेवटपर्यंत संभ्रमात राहिला. एवढंच नव्हे तर प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते आणि समर्थक सुद्धा निरनिराळ्या प्रसार-माध्यमांमध्ये गोंधळलेले आढळले. या उलट भाजपा च्या विचारधारेमध्ये 'राष्ट्रवाद' स्पष्टपणे सर्व प्रचार-मंचांवर व्यक्त झाला. भाजपचे नेते प्रसार-माध्यमांमध्ये आपली राष्ट्रीय विचारधारा प्रभावीपणे मांडताना दिसले, सर्वांच्या संभाषणामध्ये एकसूत्रता होती. त्याच बरोबर भविष्याबद्दलचे व्हिजन सुद्धा परिणामकारकपणे मांडण्यात आले. उद्योजकांना यामधून हे शिकलं पाहिजे की, व्यवसायाची पायाभूत विचारधारा आपल्या संघामध्ये रुजवल्यामुळे, व्यवसायाला दूरगामी यश मिळवून ते टिकवून ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरते.

♦️धडा तिसरा - विचारपूर्वक आराखडा (स्ट्रॅटजी) आणि जबरदस्त अंमलबजावणी
मित्रांनो, भाजपने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काही विशिष्ट मुद्दे प्रत्येक वेळी ठळकपणे आणि सातत्याने मांडले (आणि काही मुद्दे जाणीवपूर्वक पणे टाळले). गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामे, नवीन योजनांची यशस्वी अंमलबजावणी, पाकिस्तान आणि आतंकवादाविरुद्ध कठोर लष्करी कारवाई, भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले महत्त्व, इत्यादी गोष्टी प्रत्येक सभेमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये बोलल्या जात होत्या. गेल्या पाच वर्षात काही निर्णयांना यश आले नाही, परंतु भाजपने चतुराईने ते मुद्दे टाळले. यामागे नक्कीच एक विचारपूर्वक स्ट्रॅटजी तयार केली गेली असावी. प्रचार सभांचे यशस्वी आयोजन, प्रसिद्धी माध्यमांचा योग्य वापर, नेत्यांचा सोशल मिडियाचा प्रभावीआणि सक्रीयसहभाग अश्या विविध पातळ्यांवर जबरदस्त अंमलबजावणी करण्यासाठी पडद्यामागे योग्य टीम कार्यरत होती याबद्दल काहीच शंका नाही. उद्योजकांना यामधून हे शिकलं पाहिजे की, व्यवसायाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपली बलस्थाने आणि कमतरता यांबाबत विचारमंथन करून एक योग्य आराखडा तयार केला पाहिजे आणि अंमलबजावणी करण्यासाठी योग्य व्यक्तींना, योग्य पद्धतीने कार्यरत केले पाहिजे.

♦️धडा चौथा - उत्कृष्ट संघबांधणी - मोदी आणि शहा यांची पूरक जोडी
मित्रांनो, नरेंद्र मोदी फ्रंट स्टेजवर मतदारांना प्रभावित करत होते तर, अमित शहा बॅक स्टेजवर प्लानिंग, मॅनेजमेंट आणि ऍडमिन सांभाळत होते. दोन्ही अत्यंत महत्वाच्या आणि एकमेकांना पूरक अशा भूमिका, मोदी आणि शहा यांनी अत्यंत सरसपणे पार पाडल्या. अमित शहा यांनी जर बॅक स्टेज प्रभावीपणे मॅनेज केले नसते तर, मोदींसारखे करिश्माई नेता अशी अलौकिक कामगिरी करू शकले नसते. उद्योजकाचे खरे काम व्यवसायाचा विकास करणं हेच असतं, परंतु बरेच उद्योजक दैनंदिन कामकाजात फसतात आणि त्यांना त्यांच्या खर्या कार्याकडे लक्ष देणं कठीण होऊन बसतं. अमित शहा यांच्या सारखा एक जबरदस्त बॅक स्टेज सांभाळणारा 'ऍडमिनीस्ट्रेटर' म्हणजेच उत्कृष्ट सहकाऱ्यांची दुसरी फळी उद्योजकाच्या जोडीला असेल तर व्यवसायाची सुसाट प्रगती नक्कीच होऊ शकेल.

♦️धडा पाचवा - ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य
मित्रांनो, लोकशाही मध्ये मतदार हा राजा असतो. 'सत्ता कोणाची?' हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याच्याकडे असते. त्याचप्रमाणे कोणते उत्पादन बाजारपेठेमध्ये राज्य करणार? हे ग्राहक ठरवतो. माझ्यामते बहुसंख्य भारतीय जनतेच्या मनात काय आहे? हे मोदींना ओळखण्यात यश आलं, असं म्हणायला हरकत नाही. मोदींनी मतदारांच्या गरजा ओळखून, त्या पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कायम ठेवले. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात संपूर्णपणे मोदी यशस्वी झाले, असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु लोकांना त्या दिशेने होणार्या कार्याबद्दल विश्वास वाटला. उद्योजकांना सुद्धा आपल्या प्रत्येक निर्णयामागे ग्राहकांच्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे. ग्राहकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. तरच ग्राहक राजा बाजारपेठेची सत्ता आपल्या हातात देईल.

♦️धडा सहावा - परिणामकारक मार्केटिंग
मित्रांनो, Visibility + Credibility = Profitability हा मार्केटिंग फॉर्म्युला मोदींच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडला. भारतातील १ अब्ज पेक्षा जास्त जनतेपर्यंत मोदींच्या नेतृत्त्वाबाद्द्ल जागरूकता निर्माण करणं. ते सुद्धा अश्या वेळी जेव्हा प्रतिस्पर्धी आणि त्यांचे समर्थक मोदी विरुद्ध संदेश पसरवण्यात भिडलेले आहेत. ही एक मोठी आणि आव्हानात्मक गोष्ट होती, परंतु मोदींचे परिणामकारक मार्केटिंग करण्यात भाजपला यश मिळाले. माझ्या मते तीन पातळीवर हे मार्केटिंग झाले. १. Visibility २. Credibility आणि ३. Outreach. Visibility द्वारे मोदी हे एन.डी.ए. चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हा संदेश तमाम भारतीयांपर्यंत पोहोचवणे. Credibility द्वारे त्यांची विशिष्ट आणि विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यात आली. Outreach द्वारे मोदींनी वेळोवेळी मतदारांबरोबर संपर्क डायरेक्ट साधला आणि आपले विचार मांडले. टी.व्ही. चॅनेल, वर्तमानपत्र आणि सोशल मिडिया यांनी या मध्ये प्रमुख भूमिका बजावली. उद्योजकांनी या मधून असं शिकलं पाहिजे कि आपले उत्पादन कितीही चांगले असले तरीही सातत्त्याने निरनिराळ्या माध्यमाद्वारे ग्राहकांच्या संपर्कात राहायला हवे, तरच आपण ग्राहकाच्या लक्षात राहू आणि ग्राहक आपले उत्पादन विकत घेण्यासाठी पुढे सरसावेल.

♦️धडा सातवा - परिश्रमांना पर्याय नाही
मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना २०१४ निवडणुकांमध्येअभूतपूर्व यश मिळालं होतं. तरी सुद्धा २०१९ च्या निवडणुका दरम्यान त्यांनी २०१४ च्या यशाला गृहीत धरलं नाही. नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या प्रचारादरम्यान, दर दिवसाला सरासरी २ प्रचार सभा घेतल्या. इतकंच नव्हे प्रचारादरम्यान काही दिवस तर, त्यांनी एकाच दिवशी तीन सभा, तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून घेतल्या. २०१९ मध्ये प्रचाराला तशी उशिरा सुरुवात झाली. २८ मार्च ते १७ मे २०१९ या कालावधी दरम्यान मोदींनी एकूण १३० प्रचार सभांना संबोधले. उद्योजकांनी या मधून असं शिकलं पाहिजे की, प्राथमिक यशाने हुरळून न जाता, आपल्या कामावर निष्ठा ठेवा, मनापासून आपल्या ध्येयाच्या दिशेने अथक परिश्रम घ्या आणि त्यात सातत्य ठेवा. स्वतःची शारीरिक आणि मानसिक उर्जा प्रफुल्लीत ठेवा. जर उत्साही असाल तरच परिश्रम घेऊ शकाल. वयाच्या ६८व्या वर्षी जर मोदी इतकं प्रचंड काम करू शकतात तर आपण नक्कीच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो.
धन्यवाद..!
©️ अतुल राजोळी
व्यवसाय प्रशिक्षक
संचालक, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट🎯

03 August 2018

मूर्ती लहान पण कीर्ति महान

मूर्ती लहान पण कीर्ति महान

नमस्कार मित्रांनो,
साधारणपणे 13 वर्षाच्या मुलाचे आयुष्य कसे असते? शाळेत जाणे, अभ्यास करणे, उपक्रमांमध्ये सहभागी होणे, खेळ खेळणे, व्हिडिओ गेम खेळणे, टीव्ही पाहणे बरोबर ना, आपण असे म्हणू शकतो. परंतु जर तुम्हांला हे सांगितले तर मुंबईतील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थाने स्वतःची कंपनी स्थापन केली असून वर्ष २०२० पर्यंत त्याला कंपनीचे उत्पन्न १ अब्ज रुपये इतके करायचे आहे. विश्वास बसत नाहीये ना.. तर आपण जाणून घेऊया तिलक मेहता विषयी.
तिलक ने Paper n Parcel नामक कुरिअर सुविधा पुरवणारी कंपनी स्थापन केली आहे. या कुरिअर सर्विस चे वैशिष्ट्य म्हणजे त्याच दिवशी पार्सल इप्सित स्थळी पोहोचवण्यात येईल. या कामात मुंबईचे सुप्रसिद्ध डब्बेवाले यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
याची सुरुवात कशी झाली?
तिलक सांगतो, गेल्या वर्षी त्याला काही पुस्तके शहराच्या एका टोकापासून मागवायची होती. परंतु कामावरून थकून आल्यानंतर वडिलांना त्याला ती पुस्तके आणण्यासाठी त्रास द्यायचा नव्हता, तेव्हा या कंपनीच्या कल्पनेचा जन्म झाला. ही कल्पना तिलक ने आपल्या वडिलांना सांगितली. तेव्हा ही कल्पना तिलक च्या वडिलांनी उचलून धरली. ऋषभ सीलिंक या लॉजिस्टक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे त्याचे वडील यांनी या कामात त्याला मदत केली असती, परंतु तिलक ने सोपा मार्ग न निवडता चार महिने या संकल्पनेवर अभ्यास केला व Paper n Parcel ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. घनश्याम पारेख यांची मदत घेतली, श्री. पारेख हे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
Paper n Parcel हे एक अॅप्लिकेशन आहे, सध्या २०० कर्मचारी आणि ३०० डब्बेवाले यांच्या मदतीने दररोज सुमारे १२०० कुरिअर पोहोचवले जातात. साधारणपणे ३ किलोग्रॅम पर्यंत वजनाच्या पार्सल साठी ४० रुपये आकारण्यात येतात. हे अॅप्लिकेशन रिअल-टाइम ट्रॅकिंग फीचरसह येते जे डिलीव्हरी ट्रॅक करण्यासाठी वापरले जाऊ शकते. सध्या ही सुविधा मुंबई ते खारघर, मुंबई ते ठाणे व चर्चगेट ते बोरिवली पर्यंत मर्यादित आहे. सुरवातीच्या काळात कंपनी पॅथॉलॉजी लॅब, शिपिंग एजन्सी, कॉस्मेटिक प्लेअर्स, बुटीक स्टोअर्स आणि डिलिव्हरीसाठी वैयक्तिक ग्राहक यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आगामी काळात हि सुविधा दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये विस्तरण्याचा कंपनीचा मानस आहे. २०१९ पर्यंत कंपनीचे २००० लोकांना रोजगार देऊन सुमारे १ लाख पार्सल दर दिवशी डिलिव्हर करण्याचे लक्ष्य आहे.
या युवा उद्योजकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील कौतुक केले आहे. India Maritime Awards ने देखील त्याला सन्मानित करण्यात आले आहे. तिलक ला २०२० मध्ये म्हणजेच आपल्या १५ व्या वाढदिवसाआधी Paper n Parcel कंपनीच्या १ अब्ज उत्पनाचे लक्ष्य गाठायचे आहे.

12 January 2018

भारतीय.. ८ वी नापास.. वय २१.. असा हा २००० कोटींचा मालक.!!

वयाच्या विशीत, साधारणतः तरुणाई आपले शिक्षण पूर्ण करत असते , आणि बहुतांशी तरुण आपल्या भविष्याबाबाबत साशंक असतात. याला अपवाद म्हणजे लुधियाना स्थित आंतरराष्ट्रीय पातळीवर Ethical Hacker म्हणुन नावाजलेला त्रिश्नीत अरोरा. व्यवसायाची व computer क्षेत्राची कोणतीही कौंटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्रिश्नीत चा मध्यमवर्गीय तरुण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्रिश्नीत चा जन्म ०२ नोव्हेंबर १९९३ मध्ये झाला. त्रिश्नीत चे वडील एक खाजगी कंपनीतील वरिष्ठ अकाउंट्स अधिकारी आहेत आणि आई गृहिणी आहे.

वयाच्या ११ व्या वर्षी त्याला computer ची तोंड ओळख झाली. कालांतराने त्याला computer hardware मध्ये आवड निर्माण झाली. या computer च्या आकर्षणामुळे त्रिश्नीत च्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला व तो ८ व्या इयत्तेत नापास झाला त्यामुळे नंतर त्याला दहावीची परीक्षा बाहेरून दयावी लागली.

२०१२ मध्ये त्रिश्नीत ने TAC Security Solutions ची  स्थापना केली. व्यवसायाने कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय स्वतःचा व्यवसाय स्थापन करणे हे एक अतिशय आव्हानात्मक काम होते. परंतु काही वेगळं करण्याची आणि आयटी सुरक्षेच्या वाढत्या समस्यांच्या संख्येने उत्स्फूर्तपणे त्रिश्नीत ला स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्यास प्रेरित केले.  त्रिश्नीत च्या मते कोणत्याही कार्यात उत्कटता सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आणि मी काही वेगळं करण्याच्या उत्कटतेमुळे, आयटी सुरक्षा क्षेत्रात मी एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला सिध्द करू शकलो.


TAC Security Solutions ही एक सायबर सुरक्षा कंपनी जी नेटवर्कच्या अभेद्यता आणि डेटा चोरीविरुद्ध कंपन्यांसाठी संरक्षण पुरवते. सध्या कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांचे काही ग्राहक रिलायन्स उद्योग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, पंजाब पोलिस (भारत) आणि गुजरात पोलिस आहेत. त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पंजाब आणि गुजरात पोलिसांना मदत केली आहे.

त्रिश्नीत अरोरा ने सायबर सुरक्षा, नैतिक हॅकिंग आणि वेब संरक्षण याविषयी पुस्तके लिहिली आहेत.
Hacking TALK with Trishneet Arora
The Hacking Era
Hacking With Smart Phones


त्रिश्नीत ला त्याच्या कार्याबद्दल विविध पुरसकरांनी गौरवण्यात आले आहे. 
२०१३ मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
२०१४ मध्ये, पंजाबचे मुख्यमंत्री, प्रकाशसिंग बादल यांनी राज्य पुरस्कार देऊन गौरविले. तसेच पंजाब पोलिस अकादमीचा आयटी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१५ मध्ये पंजाबी आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
२०१७- मॅन'स मॅगझीन तर्फे न्यूज मेकर अवॉर्ड


त्रिश्नीत च्या मते तुमच्या पॅशनपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही.
अपयशाची पुढील पायरी यश आहे. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. पॅशनवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्रिश्नीत ने दिला आहे.

- सौजन्य : दिव्यमराठी 

26 August 2016

एक असामान्य यशोगाथा

संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय. आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.


इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..

आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला !

सौजन्य: लोकसत्ता वृत्तपत्र 

हणमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळवा लक्ष्यासिद्धी सोहळ्यामध्ये

!! लक्ष्यसिद्धी सोहळा !!
विषय: एक असामान्य यशोगाथा
दिनांक: 31 ऑगस्ट 2016
वेळ: सायंकाळी 6 वाजता
स्थळ: मैसूर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
प्रवेश विनामुल्य... अनुभव अमुल्य!
नाव नोंदणीसाठी संपर्क: 7666426654, 9619465689
नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा





31 May 2014

फ्युचर पाठशाला जोश २०१४ व ५वा उद्योगस्फुर्ती सोहळा


नमस्कार!

मित्रांनो टिम बॉन टू विनला आपल्याला कळवण्यास आत्यंत आनंद होत आहे की दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखिल उन्हाळी सुट्टी दरम्यान फ्युचर पाठशाला हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडला. त्याच बरोबर फ्युचर पाठशालाचा समारोप नेहमी प्रमाणे फ्युचर पाठशाला जोश २०१४ या धमाकेदार कार्यक्रमाने झाला. दिनांक २५ मे २०१४ रोजी, यशवंत नाट्यमंदिर मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्‍या वातावरणात फ्युचर पाठशाला जोश कार्यक्रम पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखिल तेवढंच एंजोय केलं. 

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...






 




खास तुमच्यासाठी झी २४ तास ने घेतलेला फ्युचर पाठशाला जोश २०१४ चा आढावा



मित्रांनो, बॉन टू विनचा फक्त उद्योजकांसाठी असणारा एक अत्यंत परिणामकारक प्रशिणक्रम म्हणजे लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस. हा एक वर्षाचा जबरदस्त असा प्रवास आहे ज्याच्या मदतीने कोणताही लघुउद्योजक त्याच्या उद्योगाचे यशस्वी व्यवसायामध्ये रुपांतर करु शकतो. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसची पाचवी बॅच सध्या अंतीम टप्प्यात आलेली असुन, याच बॅचचा पदवीदान समारंभ म्हणजेच पाचवा 'उद्योगस्फुर्ती सोहळा' दिनांक ७ जुन २०१४ रोजी, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थींचा पदविका देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कृत देखिल करण्यात येणार आहे.

उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे, लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या Business Case Study Presentations. लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांसच्या पाचव्या बॅचचे १० यशस्वी प्रशिक्षणार्थी लक्ष्यवेध व लक्ष्यवेध अ‍ॅडव्हांस दरम्यान व्यावसायिक प्रवास आपल्या प्रेझेंटेशनद्वारे उलघडणार आहेत. हे १० Presentations प्रचंड प्रेरणादायी असे असतील व प्रत्येक लघुउद्योजकाला मार्गदर्शक असे असतील. म्हणुनच प्रत्येक लघुउद्योजकाने ह्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा असा हा अद्वीतीय कार्यक्रम असणार आहे. 
पाचव्या उद्योगस्फुर्ती सोहळ्याचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक असणार आहेत, सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर, मॅक्सेल फाउंडेशनचे संचालक व 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचे लेखक श्री. नितीन पोतदार सर. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात येईल व एका उद्योजक प्रशिक्षणार्थीला 'सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. नितीन पोतदार सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन देखिल उपस्थितांना लाभणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक उद्योजकाला स्फुर्ती देणारा असणार आहे.



तर मग ७ जुन ला नक्की या!
दिनांकः शनिवार, ७ जुन २०१४
वेळः सकाळी ठिक १० वाजता
स्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य
धन्यवाद!

01 February 2014

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: ‘सामाजिक उद्योजकता, जागतिकीकरण आणि भारत’

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत
नमस्कार मित्रांनो !
बॉर्न टू विन च्या परिवारास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि २०१४ ची दणदणीत सुरुवात द सक्सेस ब्लू प्रिंट या कार्यक्रमाने झाली.आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. मित्रांनो १९ जानेवारी ला बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ६ वर्षे पूर्ण करून धमाक्यात ७ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
द सक्सेस ब्लू प्रिंट


आपणा सर्वास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि लक्ष्यवेधची १८ वि बॅच तिच्या शेवटच्या टप्प्यात आहेसर्व बॅचेस प्रमाणे या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त झाली आहे. आणि या सर्वांचा कौतुक सोहळा म्हणजेच अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा... येत्या १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजतामाटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यमंदीर येथे पार पडणार आहे. दर ३ महिन्यांनी होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने सर्वच लक्ष्यवेधचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत असतात. अशा या  आपल्या लक्ष्यवेधच्या कार्यक्रमाला बॉर्न टू विनचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी आपल्या स्नेहींबरोबर उपस्थित राहतील व जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवतील यात काहीच शंका नाही. हा एक खुप छान असा क्षण असणार आहे जिथे त्यांना आपले सर्व सहप्रशिक्षणार्थी भेटतीलचत्याच बरोबर नवीन ओळखी आणि मित्र देखील बनतील! हि एक संधी असते ती एनर्जीतो अनुभव पुन्हा अनुभवण्याची. तसेच या बॅचच्या प्रशिक्षाणार्थ्यांची यशोगाथा जाणून घेण्याची.

नेहमीप्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! नेहमीप्रमाणेच या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला देखील एक दिग्गज व्यक्तिमत्व लाभलं आहे. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. St Angelo’s Professional Education Institution for Technology & Management चे Chief Managing Director श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे.
त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते एक मल्टी-डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी विविध व्यवसायक्षेत्रात आघाडी घेतली आहे. ते कन्सट्रक्शन तसेच हॉटेल व हॉस्पिट्यालिटी व्यवसायात देखील आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय असणार आहे.. सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत.


सध्या जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे आज वेग-वेगळ्या देशांमध्ये सीमा राहिल्या नाहित. त्याचाच परिणाम वेग-वेगळ्या व्यवसायांवर देखील होत चालला आहे. आज भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य आहे व भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जातंय. या जागतिकीकरणाबरोबरच सामाजिक उद्योजकतेला अनुसरून कोणकोणत्या नवीन संधी भारतात आहेत व पुढे या कश्या वाढत जाणार आहेत आणि या संध्याकडे उद्योजकांनी किवां सर्वसामान्य व्यक्तीने कश्याप्रकारे बघितलं पाहिजेत्यांचा दृष्टीकोन कसा असला पाहिजेआणि या संधीचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करू शकतोत्याच बरोबर सामाजिक बांधिलकी असलेले व्यवसाय कोणतेआणि ते कसे करावेतयाबद्दल देखील मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.


श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे, आणि सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन यांच्याविषयी थोडेसे:

  • St. Angelo’s Computer ltd. An ISO 9001:2008 Certified Company is one of the leading IT group in Mumbai, India. St. Angelo’s was Established in the year 1993 & today has grown up to be one of the largest IT training organizations in Mumbai.
  • सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन  हि एकमेव संस्था आहे जीला  Bombay Stock Exchange  व Ahmedabad Stock Exchange कडून पब्लिक इशु काढण्याची मान्यता मिळाली आहे.
  • आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन घडवलं आहे. आणि यांचे विद्यार्थी आतापर्यंत अमेरिकाचायनाहॉंग़-कॉंगन्यूझीलंडऑस्ट्रेलिया आणि सिंगापोर येथे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.
  • उद्योजकांना सामाजिक उद्योजकतेत येण्यासाठी नेहमीच प्रेरित करणे हा ध्यास आहे. शिकाकमवा आणि परतफेड करा या संकल्पनेतून सामाजिक उद्योजकतेला ते पाठींबा देत असतात.
  • माजी मुख्यमंत्री कै. श्री. विलासराव देशमुख यांनी सेंट अ‍ॅन्जेलोज व अथायडे यांना हजारो गरजू विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल खास सन्मानित केले आहे.
  • यांच्या कामाची दखल आत्तापर्यंत टाइम्स ऑफ इंडियाइंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवभारत, मिड-डे. इकॉनॉमिक टाइम्स तसेच स्टार टीव्हीझी टीव्हीइ टीव्ही, झी २४ तासस्टार माझासाम टीव्ही या सारख्या मिडिया ने घेतली आहे.  
  • मित्रांनोआपण या कार्यक्रमाला का उपस्थित असले पाहिजे हे आणखी नव्याने सांगायची गरज नक्कीच नाही... आपण आपल्या संपुर्ण कुटुंबासह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी आशा करतो.

अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: 'सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत'
दिनांक: १३ फेब्रुवारी २०१
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंत नाट्यमंदिर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८७६६६४२६६५४९६१९४६५६८९


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites