LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 May 2017

उद्योग चिकित्सा

रोगनिदानाच्या क्षेत्रात गेली ३३ वर्षे व्यावसायिक यश मिळवून स्वतःच्या नावाचेच ब्रॅन्डनेम तयार करणाऱ्या डॉ. अविनाश फडके यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजची उलाढाल आज हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. भारतात ३४६ प्रयोगशाळा व भारताबाहेर १२ प्रयोगशाळा आणि सात हजार कर्मचारी यांचे बळ आज त्यांच्या पाठीशी आहे आणि रोगनिदानातील अचूकतेबाबत ते काटेकोर आहेत.

आरोग्यसेवेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रोगनिदान अर्थात डायग्नोस्टिक्स. या क्षेत्रात मराठी संशोधकांची संख्या मोठी असली, तरी डॉ. अविनाश फडके यांनी त्याला उत्तुंग व्यावसायिकतेची जोड दिली व ३३ वर्षांत पॅथॉलॉजीमध्ये आपल्या नावाचाच ब्रॅन्ड तयार करण्यात यश मिळविले. आज भारतात ३४६ प्रयोगशाळा व भारताबाहेर १२ प्रयोगशाळा आणि सात हजार कर्मचारी यांच्या बळावर ते दर दिवशी ५००० हजार पेक्षा जास्त रुग्णांना सेवा देत आहेतत्याच बरोबर २०,००० पेक्षा जास्त चाचण्या दरदिवशी केल्या जातात.

Maxell Award for Business Leadership 2017

दादरमध्ये वंध्यत्व आणि इतर समस्यांवरील उपचारांसाठी परिचित असलेले डॉ. अच्युत फडके हे अविनाश फडके यांचे वडील. साहजिकच वैद्यकीय क्षेत्राचे बाळकडू त्यांना घरातूनच लाभले. परळच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजातून अविनाश यांनी एमबीबीएस पदवी मिळवली. त्यानंतर टाटा मेमोरियल हास्पिटलमध्ये एमडी पॅथॉलॉजीचा अभ्यास केल्यानंतर केईएम हॉस्पिटलमधूनच त्यांनी डीपीबीचे शिक्षण पूर्ण केले. या दोन्ही परीक्षेत त्यांनी सुवर्णपदके पटकावली. १९८० च्या दशकात डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रात डॉ. फडके यांनी पाऊल ठेवले, तेव्हा सरकारी आणि पालिका हॉस्पिटल्सच्या पलिकडे रोगनिदानासाठी खासगी केंद्रे अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी एमडी पॅथॉलॉजिस्ट्सचेच यात प्रावीण्य होते. तेव्हा डॉ. फडके यांनी रुग्णांच्या तपासणीचे विश्लेषण करून देण्याचा पायंडा पाडला. पॅथॉलॉजी लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टने वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालाचे विश्लेषण करण्याची पध्दत त्यांनी रुजविली. अनेक नवनव्या तपासण्या त्यांनी उपलब्ध केल्या. कॅन्सर निदानासाठी आवश्यक बायोप्सी त्यांच्याकडे होते आणि सध्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या खालोखाल म्हणजे सुमारे २५ हजार बायोप्सी दरवर्षी ते आपल्या लॅबमध्ये करतात. हॉस्पिटल्समध्ये आपली लॅब उभारण्याचे नवे मॉडेल त्यांनी १० हॉस्पिटल्समध्ये उभे केले.


पॅथॉलॉजी लॅब्सची अचूकता वाढविण्यासाठी 'नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरॅटोरी' (एनएबीएल) या संस्थेकडून प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. तसेच आयएसओ मानांकनही मिळविले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करत असताना इतर रोगांची किंवा गुंतागुंतीची माहिती मिळाल्यास संबंधित डॉक्टरांबरोबर सल्ला-मसलत करून त्याची कल्पना देणेही त्यांनी लॅबमध्ये बंधनकारक केले.

कट प्रॅक्टिस आणि मार्केटिंग या दोन्ही प्रकारांना आपण ३३ वर्षातटाक्षाने दूर ठेवले, असे डॉ. फडके सांगतात. रोगनिदान चाचणीतील सवलतींचा फायदा थेट रुग्णालाच मिळायला हवा, त्यांना पाठविणाऱ्या डॉक्टरांना नव्हे, याच धारणेने ते व्यवसाय करतात.

डायग्नोस्टिक्समध्ये कार्यरत असतानाच वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले. भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे चालविल्या जाणाऱ्या रेडिओ-इम्युनोअॅसे प्रशिक्षण वर्गात विविध वैद्यकीय चाचण्यांचे निकष, त्यांचे विश्लेषण यांचे मार्गदर्शन ते करतात. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासक्रमात पॅथॉलॉजी लॅब स्थापनेपासून त्याचे संचालन आणि नियोजन या विषयांचे अध्यापन करतात. 'फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया'च्या सल्लागारपदी ते आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भार मातांची कशी काळजी घ्यावी, यावर त्यांनी असोसिएशनला मार्गदर्शन केले. आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आयव्हीएफ, थायरॉईड कॅन्सर या विषयांवर आपले शोधनिबंध प्रसिध्द करत संशोधनातही त्यांनी सातत्य राखले आहे. विविध हॉस्पिटल्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सवलती तसेच मोफत चाचण्या असे उपक्रमही ते करतात. आज त्यांच्या व्यवसायाचा डोलारा १०० कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. आरोग्यसेवेत आर्थिक गुंतवणुकीच्या उद्देशाने सुरू झालेल्या इंडिया व्हेंचर हेल्थकेअर फंडचे ते संचालकही आहेत.


सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स

आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की ह्या वेळी ३१ व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक लाभले आहेत SRL Diagnostics या भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीचे नेतृत्व करणारे व यंदाच्या Maxell Award for Business Leadership 2017 सन्मानित डॉ. अविनाश फडके सर. त्यांना सतत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अधिस्वीकृती मिळत असते. त्यांच्या नेतृत्वाखाली एस आर एल डायग्नॉस्टिकने २०१५ साली सिक्स सिग्मा हेल्थकेअर एक्सलन्स पुरस्कारांचा सर्वोत्कृष्ट डायग्नॉस्टिक सेवा देणारी संस्था हा पुरस्कार पटकावलेला आहे. जगातील सर्वात महान ब्रँड व नेतृत्व याबाबतचा २०१५ सालचा आशिया व गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. त्यांनी अनेक संशोधनपर पेपर्स लिहिलेले असून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. ४०० पेक्षा जास्त परिषदांमध्ये त्यांचा सहभाग होता.
सर आपल्याला 'उद्योग चिकित्सा' या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.
भेटूया तर

!! लक्ष्यसिद्धी सोहळा !!

विषय: उद्योग चिकित्सा

दिनांक: ६ जून २०१७
वेळ: सायंकाळी ६ वाजता
स्थळ: मैसूर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)

आयोजक: लक्ष्यवेध इन्स्टिट्युट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स 

इव्हेंट पार्टनर: जोश इव्हेंट्स
नेटवर्किंग पार्टनर: मी उद्योजक 
रिअल इस्टेट पार्टनर: जस्ट अ होम

प्रवेश विनामुल्य... अनुभव अमुल्य!
नाव नोंदणीसाठी संपर्क: ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा


11 May 2017

इच्छाशक्तीच्या जोरावर सकारात्मक विचार

अनेक गोष्टी करायच्या असतात. पण होत नाहीत, कंटाळा येतो, राहून जातात. कारण इच्छाशक्ती कमी पडते.
आपली इच्छाशक्ती किती तीव्र आहे; यावर आपण नक्की कुणाच्या ताब्यात आहोत हे अवलंबून असतं. आपलं मन आपल्याला विविध दिशांनी खेचत असतं, त्याचबरोबर अनेकदा मनात नकारात्मक विचारांचं प्राबल्य असतं अशावेळी इच्छाशक्तीच्या जोरावर आपण मनात सकारात्मक विचार रुजवू शकतो. इंग्रजीत एक म्हण आहे 'व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे' इच्छा असेल तिथे मार्ग सापडू शकतो.इच्छाशक्तीची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे. आपण किती वेळा ठरवतो व्यायाम करु, वजन कमी करु पण ना व्यायाम होतो ना आपलं वजन कमी होतं. कारण काय तर कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते. जेव्हा केव्हा तुम्ही ठरवलेले ध्येय सोडून देण्याचा विचार मनात येईल तेव्हा तेव्हा तुमच्या ध्येय पूर्तीबद्दल तुम्ही केलेला विचार आठवा. कधीतरी आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो किंवा काही काळासाठी निराळ्या पध्द्तीने विचार करुन मग पुन्हा मूळ पदावर परततो.आपली इच्छाशक्ती आपण शाबूत ठेवायची असते. तिच्या जोरावर आपण जी वाटेल ती गोष्ट साध्य करु शकतो. एखादी गोष्ट मिळणं, पूर्ण करणं अशक्यं वाटत असलं तरीही इच्छाशक्तीच्या बळावर आपण ती गोष्ट सहज साध्य करु शकतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना आपली इच्छाशक्ती कशी आहे याचा जरुर विचार करा.सौजन्य: संध्यानंद

08 May 2017

व्यवसाय विकासाचे ७ मार्ग - अतुल राजोळी

पहा व्यवसाय प्रशिक्षक अतुल राजोळी यांचा उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा जबरदस्त व्हिडीओ

20 April 2017

नेतृत्वगुणांच्या १० टिप्स

जेव्हा कुणी पहिल्यांदा व्यवस्थापकाच्या जागी विराजमान होतो. तेव्हा निश्चितपणे त्याची योग्यता त्याला या जागी येण्यासाठी कारणीभूत ठरते. एक कामगार म्हणून काम करणे यात मोठा फरक आहे. व्यवस्थापकाला आपल्या टीमचे नेतृत्व करत त्या सर्वांना पुढे न्यायची जबाबदारी असते. जर तुम्ही प्रथमच अशी जबाबदारी पेलत असाल तर काम करताना यशस्वीपणे काम करण्यासाठी या दहा टिप्स.

१) शिकणे: तुमच्या विशेषत्वाशिवाय आपल्या सहकार्‍यांकडून काही नवे शिकण्याची वृत्ती ठेवा.

२) संभाषण: आपल्या टीमच्या सदस्यांना प्रकल्पाचे उद्देश स्पष्टपणे सांगा. प्रकल्पाची आवश्यकता व महत्त्वपूर्ण बाबी पूर्ण करण्याची अंतिम वेळ ही सांगा.

३) उदाहरण: ज्या पद्धतीचा व्यावसायिक व्यवहार तुम्ही दुसर्‍याकडून अपेक्षित ठेवता तो प्रथम स्वतः अंगीकारा.

४) फिडबॅक: टीमला विश्वास द्या की, तुम्ही त्यांच्याकडून नव्या कल्पना ऐकण्यासाठी तत्पर आहात. प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी उपाय ऐकण्यास उत्सुक आहात.

५) ओळख: आपल्या टिमच्या सदस्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वासमक्ष त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहीजे.

६) स्पष्टपणा: आपल्या मूडनुसार दररोज बदलणार्‍या नेतृत्त्वाचे लोक आपल्या टीमला पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे एकदा घेतलेल्या निर्णयावर कायम रहा.

७) मदत: आपल्या टीमला चांगल्या पधद्तीने समजून सांगणे ही सुद्धा एक गुंतवणूक आहे. तुम्ही तुमच्या सहकारी कर्मचार्‍यांना स्पष्टपणे सांगा की हा प्रकल्प कंपनीच्या धोरणानुसार कसा महत्त्वाचा आहे.

८) शिकण्याचे वातावरण: तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक बाब शिकण्याची भरपूर आवड असेल, परंतु तुमच्या टीमला एवढे स्वातंत्र्य जरुर द्या की चुकांमधून शिका. तसेच त्यांच्या एखाद्या चांगल्या रचनात्मक कल्पनांबद्दल त्यांना बक्षिसही द्या.

९) व्यावसायिक मार्गदर्शन: आपल्या स्टाफसाठी सदैव वेळ द्या. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या करिअर विकासासाठी प्राधान्य देता. त्यामुळे टीमचा उत्साह वाढेल.

१०) धैर्यवान बना: व्यवस्थापकाचे गुण व त्या संबधातील कौशल्य शिकण्यास तुम्हाला विलंब लागेल त्यामुळे निराश होऊ नका. आपल्या संपर्कातील व्यवस्थापक पदावरील मित्रांचे मार्गदर्शन घ्या.

सौजन्य: संध्यानंद

11 April 2017

यशाच्या शिखरावरही पूर्वीची दु:खस्थिती न विसरणारे 'अलिबाबचे' संस्थापक जॅक मा

जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत.

जॅक माअलिबाबा समूहाचे संस्थापक२७.९ दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यातून ते चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मा यांना हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. संघर्षपिळवणूक आणि मेहनत यांची परिसीमा गाठल्यानंतर ते येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या यशामागे एक कहाणी आहे.

कदाचित अपयश आल्यावर त्यातून बाहेर पडण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात असावी त्यामुळेच हे शक्य झाले. जॅक मा गरीब विद्यार्थी होते. बालपणीच मा यांना त्यांच्या प्राथमिक शाळेतील जीवनात दोनदा नापास व्हावे लागले, माध्यमिक परीक्षेत ते तीनदा नापास झाले, तर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत हांगझोऊ सर्वसाधारण विद्यापीठात येण्यापूर्वी देखील तिनदा ते नापास झाले होते. या परिक्षेत तर त्यांना गणित विषयात एक टक्केपेक्षा कमी गुण मिळाले होते. अनेकदा त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते.


मा यांची जिद्द आणि चिकाटी यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे; कारण त्यांना सुमारे तीस वेळा वेगवेगळ्या कामांवरुन काढून टाकण्यात आले. मात्र ते नाराज न होता दुसरे काम शोधत राहिले. इतकेच काय, केएफसीमध्ये निवड झालेल्या २४ जणांमधून, हाकलून लावण्यात आलेले ते एकमेव होते. केवळ पाच उमेदवारांमधील ते एकजण होते ज्याची निवड पोलीसदलात झाली होती, मात्र तेथून काढून टाकण्यात आलेले ते एकमेव होते, कारण त्यांना सांगितले गेले की ते 'चांगले' नाहीत. हार्वर्डने त्यांना दहावेळा नाकारले. १९९९ मध्ये मा यांनी मित्रांच्या मदतीने अलिबाबाची स्थापना केली पण सिलिकॉन व्हॅलीला निधीसाठी गळ घातली नाही.

एका वेळी अलिबाबा दिवाळ्यात जाण्यापासून केवळ १८ महिने दूर होते. पहिली तीन वर्ष, अलिबाबाला काहीच महसूल मिळाला नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये अलिबाबा सार्वजनिक कंपनी झाली. त्यातून ९२.७० डॉलर्सचे समभाग विकण्यात आले. असे करुन ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आय. पी. ओ. ठरली.

सन २००९ मध्ये आणि २०१४ मध्ये मा यांचे नाव सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून 'टाइम' नियतकालिकात झळकले होते. बिझनेस विकमध्ये चीनमधील सर्वांत शक्तीवान व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली. फोर्बच्या मुखपृष्ठावर देखील त्याची छबी चीनमधील पहिला मुख्य प्रवाहातील उद्योजक म्हणून झळकली आहे. जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत, त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, तुम्ही जर काही त्याग केला नसेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे, तसे करता न येणे हे मोठे अपयश आहे.

सौजन्य: संध्यानंद

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites