December 2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

21 December 2017

स्वप्नांना पंख भरारीचे....!

स्वप्नांना पंख भरारीचे....!

" विमान टाटा, येताना खाऊ आण...असं म्हणूनआकाशात उडणाऱ्या विमानाला अच्छा करणे हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आवडता खेळ. आपल्या सगळ्यांप्रमाणेच विमानाचे आकर्षण असल्याने श्री. अमोल यादव यांनी लहानपणी वैमानिक बनण्याचे स्वप्न पहिले, आणि ते नुसते पूर्णच  केले नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडली जावी हे ध्येय बाळगुन Thrust Aircraft Private Limited च्या माध्यमातून पहिले भारतीय निर्मित सहा आसनी विमान निर्माण केले. कॅप्टन अमोल यादव हे मागील १७ वर्षांपासून मुख्य  वैमानिक म्हणून Jet Airways मध्ये कार्यरत आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी श्री.अमोल यादव  यांनी अमेरिकेत वैमानिक प्रशिक्षणास सुरवात केली. प्रशिक्षणाच्या सहा महिन्यांतच मित्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःचे एक जुने विमान खरेदी केले. वैमानिक बनण्याचे अतिशय  खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ते भारतात परतले. या अनुभवाने आपण स्वतः विमान निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला होता.
विमान निर्मितीच्या प्रवासात वडील श्री. शिवाजी यादव यांनी त्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. आधीच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना विमान निर्मिती ही गोष्ट कठीण आहे हे सांगितले, वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी थर्मोकॉल चे व नंतर त्यांनी लाकडाचे विमान तयार करून दाखवले. तरीही वडिलांचे समाधान न झाल्यामुळे अल्युमिनियम चे छोटेखानी विमान बनवून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले. जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विमान निर्मिती ला सुरुवात केली, तेंव्हा विमानाच्या इंजिन खरेदीसाठी त्यांच्या आईने आपले मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. आई व इतर कुटुंबीयांनीदेखील त्यांच्यावर विश्वास दाखवून मोलाची साथ दिली. 


 १९९८ मध्ये त्यांनी आपले पहिले विमान निर्माण केले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रयत्न पूर्ण नाही झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा १९९९मध्ये दुसरे  मॉडेल निर्माण करण्यास सुरवात केली, २००३ मध्ये त्यांनी २ विमाने निर्माण केली,पण  याही वेळी शासकीय नियमांमुळे या विमानांचे उड्डाण होऊ शकले नाही. विमान उभारणी साठी लागणारी जागा उपलब्ध नसल्याने राहत्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांनी विमानाची निर्मिती केली. पण या अडचणींमुळे खचून न जाता त्यांनी २०१०साली  पुन्हा एकदा TAC 003 या ०६ आसनी विमानाच्या निर्मितीस सुरुवात केली. Jet Airways मधील १० वर्षे नोकरीची कमाई ची त्यांनी या आपल्या स्वप्नामध्ये गुंतवणूक केली. अखेर २०१६ मध्ये TAC 003 विमान पूर्णत्वास आले. या कामात  त्यांना Jet Airways मधील कामाचा अनुभव यंत्र सामग्री खरेदी व सुरक्षा तसेच इतर नियमांची पूर्तता करण्यासाठी झाला. अनेक अडचणींचा सामना करत, कुटुंबीय व  मित्रपरिवाराच्या सहकार्याने २०१६ च्या भारत सरकारच्या Make In India प्रदर्शनात भारतात निर्माण झालेले पहिले वहिले विमान दाखल झाले. प्रदर्शनातील सहभागाने भारत सरकार,प्रसार  माध्यमे व सामान्य जनतेने श्री. अमोल यादव यांचे स्वप्न उचलून धरले. नुकतीच त्यांच्या या विमानास सरकारकडून नोंदणीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.


तसेच महाराष्ट्र शासनाकडून विमान निर्मितीसाठी विशेष सहाय्य म्हणून पालघर येथे १५७ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडण्याचे श्री. अमोल यादव यांचे ध्येय आहे, तसेच हा प्रवास अतिशय कमी वाहतूक खर्चात म्हणजे प्रत्येकी २०००/- रुपयांमध्ये उपलब्ध करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. " स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा " हेच आपण श्री अमोल यादव यांच्याकडून शिकतो.- लक्ष्यवेधी ऋषिकेश आमराळे

15 December 2017

माणसाची परोपकाराच्या भावनेने केलेली एखादी कृती किती महत्त्वाची ठरते!
साड्या आणि बायका हा एक मोठ्ठा विषय आहे. पण, साडी खरेदीसारखी अत्यंत आनंदाची गोष्ट अगदी सहजच सोडून देणार्‍या सुधा मूर्ती, म्हणूनच एका उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती २१ वर्षापूर्वी काशी येथे गेल्या होत्या, काशीला गेल्यानंतर एखाद्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो अशी मान्यता आहे. त्यावेळी सुधाताईंनी खरेदीचा आणि त्यातूनही विशेषत: साडी खरेदीचा त्याग केला. या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता केवळ अत्यावश्यक वस्तूच त्या विकत घेतात, असे त्यांनी नुकतेच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इतकेच नव्हे तर या निर्णायामुळे खूप आनंदी व मोकळे वाटत आहे असेही त्यांनी सांगितले.
अनावश्यक खर्चाला कात्री लावल्यानंतर शिल्लक राहिलेली मोठी रक्कम समाजकार्यासाठी उपयोगी पडते. अशाच पैशांतून पूरग्रस्तांसाठी दोन हजार तिनशे घरे बांधली गेली तसेच गुजरातमधील भूकंपग्रस्तांनाही मदत केली गेली हे त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला थक्क झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सुरवातीच्या काळात १९८१ साली, सुधाताईंनी बचत केलेले १० हजार रुपये नारायण मूर्तींना दिले होते व त्याआधारेच इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली गेली. अर्थात, त्यांच्या मदतीमुळेच नारायण मूर्तींचे उत्पन्न आज १.९२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात आहे.


खरचं, कसं जमलं असेल त्यांना? हा प्रश्न राहून राहून मनात येतो… प्रत्येक बाई साडी हौसेने मिरवते, कोठेही, कोणाकडेही गेलं तर मानाची भेट म्हणून साडीचोळी मिळते पण त्यापेक्षाही स्वतःच्या आवडीची साडी खरेदी करण्यासाठी तासनतास दुकानांचे उंबरठे झिजवणार्‍या बायकांपैकी कदाचित आपण प्रत्येक जणच असतो. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट मनाने करायचा पक्का निर्धार केल्यावर जे त्याच मार्गावरुन चालतात तीच माणसं खरी. सुधाताईंनी साडी खरेदी थांबवली असली तरीही त्या पुस्तक खरेदी मात्र आवर्जून करतात. विशेष म्हणजे आज त्यांच्या ग्रंथालयात तब्बल वीस हजारांहून अधिक पुस्तके आहेत आणि हो, एवढी पुस्तके जवळ असूनही त्यांना आपले पुस्तक कोणालाही देणे आवडत नाही. कारण, लेखकांची घरं पुस्तकांच्या विक्रीवर चालतात, आपण अशी फुकट पुस्तकं वाटत गेलो तर लेखकांचं कसं होणार….? हा आणखी एक मोठा व्यापक विचार त्यांच्या या कृतीमागे आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकप्रेमापोटी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत कर्नाटकमध्ये तब्बल ६० हजारांहून अधिक ग्रंथालयेही उभारण्यात आली आहेत.
खरंच, एरवी आपल्याला साध्या साध्या गोष्टिही ठरवणं आणि आचरणात आणणं अवघडं जाते. काही करायला जावं की त्याला हजार फाटे फुटतात आणि मग जे ठरवलं ते मागेच पडते.
जे ठरवायचं त्यामागे योग्य विचार महत्त्वाचा आणि योग्य विचारानंतर आचरणात आणलेल्या कृतीवर ठाम राहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हेच सुधाताईंकडून प्रत्येकाने शिकायला हवे.

                                                                                                                         सौजन्य: संध्यानंद
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites