जान्हवी राऊळ कल्पकतेचा परिस्पर्श ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

08 July 2011

जान्हवी राऊळ कल्पकतेचा परिस्पर्श

लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी श्रीमती जान्हवी राऊळ यांची यशोगाथेबद्द्लचा लेख चित्रलेखा या साप्ताहीकामध्ये छापुन आला होता. तो लेख आपणास वाचायला इथे उपलब्ध करुन देत आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये मिस्टर व मिसेस राऊळ यांनी एकत्रपणे लक्ष्यवेध प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले. बिग आइडीया या त्यांच्या अ‍ॅड एजन्सी ची यशस्वी वाटचाल तेव्हाच सुरु झाली...

संपर्कः 
बिग आइडिया कम्युनिकेशन: ९८२०३१०२९६, ९८३३१५५९८३
वेब साईटः http://www.bigideacommunication.com/जान्हवी राऊळ: कल्पकतेचा परिस्पर्श


अंगभूत कलागुण, परिश्रमाने कलेचं कौशल्यात केलेलं रुपांतर आणि नावीन्याचा ध्यास घेत कौशल्यातील वेगळेपणावर भर देऊन फुलवलेला व्यवसाय, एवढं वर्णन जान्हवी राऊळ यांची आणि त्यांच्या व्यवसायाची ओळख करुन द्यायला पुरेस नाही. या सूत्राने एखाद्या कलाकाराचं करियर आकाराला येणं, त्याला व्यावसायिक यश मिळणं, हे सहजसोपं नसलं तरी काहीसं स्वाभाविक म्हणता येईल. याच फॉर्म्युल्याने आयुष्यात यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणं आहेत पण जान्हवी राऊळ यांच्याबद्दल पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की, आपल्या अंगभूत कलेच्या आधारे यश मिळवण्याचं स्वप्न तर त्यांनी पाहिलंच, पण आपापल्या व्यवसायात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहाणा-या अनेकांच्या कर्तृत्वाला सोन्याची झळाळी देण्याचा परिस त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने गवसला आहे.

उपयोजित कलेमध्ये (applied art) प्रावीण्य मिळवलेल्या जान्हवी राऊळ यांची बिग आयडिया कम्युनिकेशन नावाची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. त्या प्रोडक्ट ब्रॅंडिंगचं काम करतात. ऍडव्हर्टायझिंग कंपन्या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचं ब्रॅंडिंग करतच असतात. ब्रॅंडिंग केल्याशिवाय कुठल्याही उत्पादनाची बाजारात ओळख निर्माणच होऊ शकत नाही. खरं तर व्यवसायातील हा सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पण अनेक लघू आणि मध्यम उद्योजकांना याचं महत्त्व जाणवतच नाही. अनेकजण अतिशय हिरीरीने, प्रसंगी आपल्या कुटुंबियांचा, मित्रमैत्रिणींचा, समाजाचा विरोध पत्करुन व्यवसायात उतरतात. पण खूप परिश्रम घेऊन, व्यवसायासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची पूर्तता करुनही व्यवसायात त्यांना मर्यादित यश मिळतं. दर्जेदार उत्पादन असूनही काही कारणाने व्यवसायात प्रगती होत नाही. त्याच विशिष्ट वर्तुळात ते उत्पादन विकलं जातं. बरेचदा उत्पादनाला ब्रॅंडिंग नसणं किंवा योग्य प्रकारे उत्पादनाचं सादरीकरण न होणं, हे यामागचं महत्त्वाचं कारण असू शकत. लघू-मध्यम उद्योजकांची ही समस्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ब्रॅंडिंग आणि ऍडव्हर्टाझिंगचं काम करणा-या जान्हवी राऊळ यांनी नेमकी हेरली आणि लघू-मध्यम उद्योजकांसाठी काम करुन, त्यांचा व्यवसाय नावारुपाला आणण्याचं जान्हवी राऊळ यांनी मनावर घेतलं.


चित्रकलेतील आपल्या निर्विवाद कौशल्याच्या जोरावर जान्हवी यांनी आपला व्यवसाय सुरु केला असला, तरी त्यांचा प्रवास सरळ, निर्वेध मुळीच नव्हता. जान्हवी यांना लहाणपणापासूनच चित्रकलेची आवड होती. पण इतर असंख्य पालकांप्रमाणे जान्हवी यांच्या आई-वडिलांचीही आपल्या मुलीने चित्रकला सोडून इतर कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेऊन करियर करावं, अशी अपेक्षा होती. पण जान्हवी यांचा निर्धार पक्का होता.

रहेजा स्कूल ऑफ आर्ट्‌समधून डिप्लोमा इन अप्लाईड आर्ट्‌स केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांच्या सुदैवाने मंगेश राऊळ यांच्यासारखा कलावंत पती म्हणून लाभला. जान्हवी यांनी फ्री-लान्सर म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ग्रीटिंग कार्ड्‌स तयार करुन देण्याचं काम हाती घेतलं. चित्रकलेतील प्रावीण्याबरोबरच जान्हवी यांना कविता लेखनातही चांगली गती असल्याने त्यांच्यातील कलावंतासाठी संधीचं नवीन दालन उघडलं. ग्रीटिंग कार्डाच्या ले-आऊट डिझायनिंगबरोबरच त्या छोटेखानी कविताही करायच्या. जान्हवी यांना झी टीव्हीच्या नक्षत्राचं देणं या कार्यक्रमाच्या कन्सेप्ट डिझायनिंगचं काम मिळालं. कार्यक्रमाच्या पिचिंगसाठी यात सहभागी होणा-या प्रत्येक गायकावर चार ओळी लिहिणं आणि ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन करणं, या जबाबदा-या जान्हवी यांनी पार पाडल्या. त्यानंतर जान्हवी यांना झी टॉकीजच्या महाराष्ट्र फेव्हरिट कोण या कार्यक्रमाचंही काम मिळालं. मग त्यांना हिंदी, मराठी चॅनल्सवर काही कामं मिळत गेली. त्याच दरम्यान, त्यांनी बोरीवलीत एका फूड कॅफेच्या डिझायनिंगचं आणि ब्रॅंडिंगचं काम हाती घेतलं. या छोट्याशा प्रोजेक्टमधून त्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. जान्हवी राऊळ यांच्या ग्राहकांमध्ये झी मराठी, झी टॉकीज, झी हिंदी, वामन हरी पेठे ज्वेलर्स, टाटा इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड, बॉर्न टू विन असे अनेक नामवंत क्लायंट्‌स आहेत.

उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी योग्य नाव सुचवण्यापासून ते त्यांच्या उत्पादनाचा ब्रॅंड लोकप्रिय करुन त्या व्यवसायाचा ब्रॅंड जर्नी (त्या विशिष्ट व्यवसायाचा/उत्पादनाचा भविष्यातील प्रवास) कसा असेल, याचा मार्केट रिसर्च करुन काढलेला निष्कर्ष सांगणं, ब्रॅंडिंगसाठी लोगो डिझाईन करुन देणं, व्हिजिटिंग कार्ड- माहितीपत्रकं बनवणं, दुकानाचं/ऑफिसचं/शेरुमचं लेआऊट डिझायनिंग करुन अत्यंत वाजवी खर्चात संपूर्ण कायापालट करणं, अशा सेवा जान्हवी राऊळ आपल्या बिग आयडिया कम्युनिकेशनद्वारे ग्राहकांना देत असतात.

व्यवसायाचं ब्रॅंडिंग करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात आणि ती बाब आपल्या आवाक्यातील नाही. असा एक समज लघू-मध्यम उद्योजकांचा असतो. पण जान्हवी राऊळ क्लायंटच्या गरजा जाणून घेऊन त्यांच्या बजेटनुसार, त्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. त्या सांगतात. ‘ब्रॅंडिंगची गरज, त्यामधून मिळणारा फायदा या गोष्टी क्लायंटना व्यवस्थित समजावून सांगितल्या की, क्लायंट स्वत:च ब्रॅंडिंगसाठी ठरवून आलेल्या बजेटपेक्षा जास्त बजेट नक्की करतात.’

यासंदर्भात जान्हवी राऊळ यांच्या एका क्लायंटचं उदाहरण अगदी बोलकं आहे थालिपीठ, आंबोळी, वडे यांची तयार पिठं करणा-या एका बाईना जान्हवी यांनी त्यांच्या उत्पादनासाठी आकर्षक पॅकेजिंग बॉक्सेसचं डिझाईन तयार करुन दिलं आणि काही डमी बॉक्सेस घेऊन मार्केटमध्ये अंदाज घ्यायला सांगितला. या बाईंना मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा होता. पॅकेजिंगचे बॉक्सेस अजून पूर्ण तयार झालेले नाहीत. तरीही त्यांच्या पिठांना काही मॉल्समधून मागणी आली आहे.
तीच गोष्ट जान्हवी यांनी नव्याने डिाझाईन केलेल्या एका फोटो स्टुडिओची आहे. या स्टुडिओचा धंदा तसा फार फायद्यात नव्हता. पण स्टुडिओचे वॉल पॅनेलिंग करुन जान्हवी यांनी रंगरुप बदललं आणि त्या स्टुडिओत येणा-या ग्राहकांची गर्दी वाढली.

जान्हवी यांना आलेला एक अनुभव मात्र स्त्री उद्योजिका म्हणून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणारा होता. एका ग्राहकाशी त्यांच्या कामाच्या संदर्भात चर्चा करत असताना, जान्हवी यांच्या लक्षात आलं की, भाभीजी भाभीजी करुन बोलणारा हा माणूस कामाबद्दल आपल्याशी बोलायला तयार नाही. नंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणा-या एका महिलेला त्या गृहस्थाकडे कामाच्या संदर्भात पाठवलं. तेव्हा त्या गृहस्थाने तुमच्या ऑफिसमध्ये कुणी पुरुष माणूस असेल तर त्याला पाठवा, मी बायकांबरोबर व्यवहार करत नाही, असं सांगितलं. जान्हवी यांना त्यावेळी त्यांच्या वर्तणुकीमागचं कारण कळलं आणि जान्हवी यांनी तो क्लायंटच सोडला. जान्हवी राऊळ यांना केवळ पैशाच्या मागे धावण्यापेक्षा कलावंत म्हणून मानाने जगणं महत्त्वाचं वाटतं.

जान्हवी आणि मंगेश राऊळ हे दोघेही एकाच क्षेत्रातील असले, तरी आपापल्या जबाबदा-या आणि भूमिका व्यवस्थित ठरवून घेतल्यामुळे त्यांच्यात इगो प्रॉब्लेम्स होत नाहीत. मंगेश राऊळ यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला प्रवाहविरुद्ध पोहोण्याचं बळ मिळालं, हे जान्हवी आवर्जून सांगतात. या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या जान्हवी यांना पहिल्या पिढीच्या उद्योजकांना येणा-या सर्व अडचणींना, अडथळ्यांना सामोरं जावं लागलं आहे. आज यशाचा एक टप्पा त्यांनी पार केला असला, तरी अजून त्यांना त्यांच्या नजरेसमोरचा किनारा गाठायचा आहे. प्रत्येक उद्योजकाला आपण एकदा तरी बिग आयडियामधून काम करुन घ्यावं, असं वाटावं इतक्या उंचीवर जान्हवी यांना बिग आयडियाला न्यायचं आहे.

जान्हवी यांचा वेगळ्या वाटेवरचा हा प्रवास त्यांच्या क्षेत्रातील तरुणींना नक्कीच मार्गदर्शक ठरणारा आहे. आयुष्याची योग्य दिशा आणि भरकटत न जाता या क्षेत्रात राहिल्यास हे क्षेत्र तरुणींना कामाचं समाधान आणि यश देणारं आहे, असं जान्हवी राऊळ यांना वाटतं.

कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ब्रॅंडिंग आणि ऍडव्हर्टाझिंगचं काम करणा-या जान्हवी राऊळ छोट्या आणि मध्यम उद्योजकांच्या गरजांचाही विचार करतात.


संपर्कः 
बिग आइडिया कम्युनिकेशन: ९८२०३१०२९६, ९८३३१५५९८३
वेब साईटः http://www.bigideacommunication.com/

1 comment:

Anonymous said...

great

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites